सूर्य पाहिलेला माणूस गेला

सूर्य पाहिलेला माणूस गेला

विवेकवादी कार्यकर्ते, अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे  पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिनानाथ म

कार्यकर्ते डॉ. लागू
मी आणि ‘गिधाडे’
माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू

विवेकवादी कार्यकर्ते, अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे  पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

देवाला रिटायर्ड करा, असे म्हणणारे डॉ. लागू हे खऱ्या अर्थाने विवेकवादी विचारांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेकांना विवेकवादाची प्रेरणा दिली होती. म्हणून त्यांचे वर्णन सूर्य पाहिलेला माणूस, असे केले जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर त्यांचे योगदान ४५ वर्षांहून अधिक होते.

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी सातारा येथे झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात भावे हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुण्यात बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, येथे झाले होते. १९५० मध्ये त्यांनी कान-नाक-घसा उपचाराचे विशेष प्रशिक्षण घेतले आणि प्रथम पुण्यात काही वर्षे काम करून नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील शिक्षण घेतले.

१९६० च्या दशकात पुण्यात आणि आफ्रिकेत टाबोरा, टांझानिया येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. नंतर ते १९६९ मध्ये पुण्यात परतले आणि त्यांनी पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करण्याचे निश्चित केले.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांच्याबरोबर नाट्य संस्था सुरू केली. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील काम सुरू केले होतेच.

भारतात परतल्यावर वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. वि. वा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी केलेली नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

शैलीबद्ध अभिनयाचा पगडा असणाऱ्या काळामध्ये डॉ. लागू यांनी वास्तववादी अभिनयाने नवी वाट निर्माण केली. शिस्तबद्ध अभिनेते असणारे डॉ. लागू यांनी विचार आणि नाटक हे एकच मानले.

पिंजरा या व्ही शांताराम यांच्या चित्रपटातील भूमिका त्यांना खूप यश मिळवून देणारी ठरली. सिंहासन, झाकोळ, मुक्ता हे चित्रपट त्यांचा अभिनय सर्वदूर पोहोचविणारे होते. डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘सामना’ (१९७५) या चित्रपटातील डॉ. लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाचा आणि संवादफेकीची जुगलबंदी मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाची मानली जाते.

समांतर मराठी, हिंदी चित्रपटात आणि रंगभूमीवर काम करीत असतानाच ‘सौतन’, ‘घरौंदा’, ‘लावारिस’, ‘नमकहलाल’, ‘मग्रुर’, अशा व्यावसायिक हिंदी सिनेमांमध्ये भूमिका केल्या.

विवेकवादी विचारांचे डॉ. लागू नास्तिक, तर्कसंगत विचारांना मानणारे विज्ञानवादी आणि समाजवादी होते. ते महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीशी जोडलेले होते.

निळू फुले, बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबरीने त्यांनी अनेक सामाजिक लढ्यांना आणि चळवळीना सक्रीयपणे पाठींबा दिला.
‘देवाला रिटायर्ड करा’, असे जाहीरपणे सांगून त्यांनी विवेकवादी विचारांना चालना दिली. त्याच काळामध्ये सॉक्रेटीसवर बेतलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक रंगभूमीवर आले आणि एक प्रकारे त्यांच्या विचारांना अधिक प्रसिद्धी मिळाली.

वाचक, लेखक व विचारवंत असणाऱ्या डॉ. लागू यांची रूपवेध आणि लमाण, ही पुस्तके प्रसिध्द आहेत. होते. कितीही प्रतिक्रिया येवोत, सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0