दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार

दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार

मुंबई: राज्यातील दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत २०२१मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

संकेतस्थळावर निकाल

विद्यार्थ्यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी )  http: //result.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १०वी) लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.  पण कोरोना महासाथीमुळे १२ मे २०२१ नुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर २८ मे, २०२१मध्ये १० वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. पुढे १० जून, २०२१ रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार घेण्यात आले.

नंतर २३ जून, २०२१ ते ०२ जुलै, २०२१ माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदविले होते.

इयत्ता १०ची एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या

२०२१च्या इयत्ता १०वीत एकूण मुले- ९ लाख ९ हजार ९३१ प्रविष्ट होते, तर मुली -७ लाख ७८ हजार ६९३ असे एकूण- १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी  प्रविष्ट होते.  एकूण  आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

२०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ. १०वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.

२८ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

COMMENTS