दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन

दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन

अमेरिकन सरकारनं दंगलीचा आरोप करून सात तरूणांविरोधात दाखल केलेल्या खटल्याची हकीकत ‘दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन’ या चित्रपटात  आहे.

चित्रपटात दिसतं ते असं.

शिकागोमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन भरणार असतं, तरूण त्या अधिवेशनासमोर निदर्शनं करण्यासाठी गोळा झालेले असतात. अमेरिकन सरकारनं व्हीयेतनाममधे चालवलेल्या लढाईला तरूणांचा विरोध असतो. पोलिस आपले हस्तक या आंदोलनात घुसवतात आणि चिथावणी देऊन दंगल घडवून आणतात. खटल्यात न्यायाधीश त्या सात जणांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा देतो.

व्हीयेतनाम युद्धाच्या बातम्यांनी चित्रपट सुरू होतो. तरूणांची निदर्शनं दिसतात, पोलिस त्यांना फटकावतांना दिसतात. मग मार्टिन लुथर किंग यांचा खून झालेला आपण पहातो. पाठोपाठ रॉबर्ट केनेडींचा खून झालेला दिसतो, टीव्हीच्या पडद्यावर. पाठोपाठ प्रेसिडेंट जॉन्सन व्हीयेतनाममध्ये अधिकाधीक सैन्य पाठवण्याचं धोरण जाहीर करताना दिसतात.

मग दिसतात ते बैठकांमधे भाषण करणारे तरूण. त्यांना सामाजिक न्याय हवा असतो, सरकारचं हिंसक धोरण नको असतं. मग दिसतो एक बॉब सील्स नावाचा ब्लॅक पँथर चळवळीचा पुढारी. तो आंदोलनात भाग घ्यायला जाणार असतो, एक स्त्री त्याला पिस्तूल देते, सील्स म्हणतो की मी शस्त्रं वापरणार नाही. एक नेता आपल्या पत्नीला आणि मुलाला सांगतो की सरकारनं कितीही हिंसा केली तरी आम्ही अहिंसेनंच उत्तर देऊ. एक तरूण गांधींचा उल्लेख करून सांगतो की सविनय कायदेभंगाच्या पद्दतीनंच आंदोलन करायचं आहे.

मुलं शिकागोतल्या उद्यानात गोळा होतात. भाषणं, चर्चा, घोषणा, गाणी, पोस्टरं रंगवणं.

रात्र पडलेली असते. एका पिंपात जाळ केलेला असतो. एकेक मुलगी पिंपातल्या जाळात आपली ब्रेसियर टाकते.

तरूणांना राजकीय क्रांती हवीय, तरुणांना सांस्कृतीक क्रांती हवीय.

शिकागोचा मेयर सैनिक तैनात करतो. वेळ पडल्यास गोळ्या घाला असा आदेश देतो.

डेमॉक्रॅटिक पक्ष त्यांचा अध्यक्षीय उमेदवार निवडणार असतो. आंदोलकांनी एक गलेलठ्ठ डुक्कर अध्यक्षीय उमेदवार म्हणून उभा केलेला असतो, डुक्कर रस्त्यावर मतं मागण्यासाठी फिरणार असतं. (चित्रपटात ते डुक्कर दिसत नाही)

पोलिसांचे हस्तक आंदोलनात घुसलेले असतात. ते दंगा घडवून आणतात. एका पुढाऱ्याला अटक होते. निदर्शक सुटकेची मागणी करत पोलिस कार्यालयासमोर पोचतात. तिथं पोलिस वाटच पहात असतात. ते निदर्शकांना बडवून काढतात. निदर्शक उद्यानात परततात. तिथं त्यांच्यावर लाठी हल्ला होतो. शेवटी एका हॉटेलसमोर पोलिस आणि निदर्शकांत झटापट होते, खूप मोडतोड होते.

हे सारं आपल्याला चित्रपटात फार वेगानं सरकणाऱ्या दृश्यांमधे दिसतं. तरूण नेत्यांची नावंही आपल्याला चित्रपट सांगतो.

खटला सुरू होण्याच्या आधी निवडणुक झालेली असते. नव्यानं नेमला गेलेला कायदेमंत्री आपल्या कार्यालयात खटला चालवण्यासाठी सरकारी वकील नेमतो. कायदे मंत्री सांगतो की काहीही करून या चळवळीच्या नेत्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे.

वकील सांगतो की शिक्षा देण्यासारखे गुन्हे त्यानी केलेले नाहीत. कायदेमंत्री सांगतो, शिक्षा देण्यासाठी तुम्हाला नेमलं आहे.

कायदे मंत्री हे बोलत असतानाच त्या कार्यालयाच्या भिंतीवरचा जॉन्सन यांचा फोटो काढून त्या जागी निक्सन यांचा फोटो लावला जातो.

मग आपल्याला कोर्टाची कारवाई दिसते आणि फ्लॅश बॅकमधे आंदोलनाची चित्रं दिसतात.

न्यायाधीश हॉफमन आपल्याला उघडपणे पक्षपाती वागतांना दिसतो. माजी कायदे मंत्री कोर्टात येऊन सांगतो की दंगलीला तरूण जबाबदार नाहीत, ती दंगल शिकागो पोलिसांनीच घडवून आणलीय. न्यायाधीश ही जबानी कोर्टाच्या कामकाजातून काढून टाकतो.

सील्स या तरुणावर खुनाचा खोटा आरोप ठेवलेला असतो आणि या आंदोलनाचा काहीही संबंध नसतांना काळे लोक अमेरिकन सरकारला  विरोध करत आहेत हे दाखवण्यासाठी त्याला खटल्यात गोवण्यात आलेलं असतं

त्याचं म्हणणं न्यायाधीश ऐकत नाहीत. त्याला बोलू देत नाहीत. न्यायाधिशाच्या सांगण्यावरून कोर्ट पोलिस त्याला कोर्टाच्या बाजूच्या खोलीत नेऊन बडवतात, त्याच्या हाता पायात बेड्या घालतात, तोंडात बोळा कोंबतात आणि त्या स्थितीत त्याला कोर्टात उभं करतात. माणसाचं तोंड बंद करणारी न्यायव्यवस्था.

आंदोलकांचा एक नेता, एबी, अंगात अमेरिकन झेंड्याचा शर्ट घालून भाषणं करतो.

कोर्टात ब्लॅक पँथर संघटनेचे कार्यकर्ते बसलेले असतात. त्यांच्या अंगात लेदर जॅकेट्स असतात, कोर्टातही त्यांच्या डोळ्यावर गॉगल्स असतात आणि डोक्यावर बॅरेट्स असतात. न्यायाधीश एका ब्लॅक पँथरला सांगतो की त्या भयानक टोप्या वापरू नका.

अमेरिकेतले काळे आणि गोरे तरूण रंगीत कपडे, फाटक्या जीन्स, गळ्यात मण्यांच्या माळ्या, कानात डूल इत्यादी वाटांनी आपल्याला समाजाच्या रीती मंजूर नाहीत असं दाखवतात. डोक्यावर सत्य साईबाबासारखे वाढवलेले केस ही सुद्धा त्या काळातली फॅशन चित्रपटात दिसते.

न्यायाधीश उघडपणे पक्षपाती असतो. त्यानं आरोपी दोषी आहेत हे आधीपासूनच ठरवलेलं असतं.

आरोपी, आरोपीचे वकील जाम म्हणजे जामच वैतागलेले असतात. एक आरोपी भर कोर्टात न्यायाधीशाला तुम्ही गुंड आहात असं सांगतो.

एकदा वकील म्हणतो की न्यायाधिशाच्या डोक्याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

एकदा आरोपीचा वकील इतका वैतागतो की एक जाडजूड ग्रंथ तो दाणकन टेबलावर आपटतो.

वकील न्यायाधिशाला दणादण धोपटतो, न्यायाधीश त्या वकीलावर सोळा वेळा कोर्टाचा अपमान केल्याचा ठपका ठेवतो. तरीही सतराव्या वेळा न्यायाधिशाला ठोकायला वकील तयार असतो.

तरूण आरोपी सॉलिड धमाल असतात. दोघे जण कोर्टात न्यायाधिशाचा झगा घालून उभे रहातात. न्यायाधीश वैतागतो आणि विचारतो की झग्याखाली शर्ट बिर्ट घातलाय की नाही. ते दोघं झग्याची  झिप खाली ओढतात. आपण चरकतो. आत कपडेच घातले नसतील तर काय असं आपल्याला वाटतं. तर आत असतो पोलिसाचा शर्ट आणि त्यावर पोलिसाचा मेटलचा बिल्ला.

हा खटला चालू असतानाच तिकडं व्हीयेतनामचं युद्ध चाललेलं असतं. एक आरोपी कोर्टात बसल्या बसल्या एका रजिस्टरसारख्या जाड वहीत नावं नोंदत असतो. त्या दिवशी युद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांची.

चित्रपट संपताना न्यायाधीश एका आरोपीला शेवटचं समारोपाचं निवेदन करायला सांगतो. तो आरोपी वही काढून खटल्याच्या काळात मेलेल्या जवानाचं नाव आणि त्याचा हुद्दा वाचू लागतो. एक. दोन. तीन. त्याच्या यादीत ४७७५ सैनिकांची नावं असतात. न्यायाधीश जाम वैतागतो. तू पाच हजार नावं वाचणार काय असं विचारतो. आरोपी न्यायाधिशाकडं लक्ष देत नाही. नावं वाचत रहातो. न्यायाधीश लाकडी हातोडा टेबलावर बडवून कामकाज संपलं असं सांगतो. आरोपी थांबत नाही. हुतात्म्यांची नावं वाचून दाखवली जात असल्यानं कोर्टातली माणसं उभी राहून श्रद्धांजली वाहतात.

लक्षात रहाणारी एक भूमिका फ्रँक लँगेलानी केलीय. चित्रपट पहाताना आठवणीला ताण दिला की लक्षात येतं की याच माणसानं फ्रॉस्ट अँड निक्सन या चित्रपटात निक्सनची भूमिका केली होती आणि त्या भूमिकेसाठी त्याला ऑस्करचं नामांकन होतं. निक्सन आणि लँगेला यांच्या दिसण्यात सारखेपणा नसूनही लँगेला यांचा निक्सन पहाताना आपण खराच निक्सन पहातोय असं वाटत होतं.

पण चित्रपटाला त्यांच्या सहाय्यक अभिनयासाठी ऑस्कर नामांकन नाहीये. ते नामांकन आहे साचा बॅरन कोहेन या नटाला. याच कोहेननं बोरॅट नावाची फिल्म लिहीलीय, त्यात कामही केलंय आणि ती फिल्म यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत आहे. पण त्या फिल्ममधे मारिया बकालोवा या नटीला सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन मिळालंय, कोहेनला नाही.

ॲरन सॉर्किनला ओरिजिनल पटकथा या वर्गासाठी नामांकन आहे. पटकथा अत्यंत घट्ट विणलेली आहे. सॉर्किनच चित्रपटाचा दिग्दर्शक असल्यानं पटकथा, चित्रण आणि संकलन या तीनही घटकांवर त्याची घट्ट पकड आहे. त्यामुळंच चित्रपटाचं संकलनही प्रभावी आहे. दृश्यं पटापट सरकतात, रेंगाळत नाहीत. दंगलीची दृश्यं आहेत. दंगल अधिक नाट्यमय आणि भावनाचिंब करण्यासाठी त्या दृश्यांची लांबी वाढवता आली असती किंवा रक्त वगैरे अधिक वेळा दाखवता आलं असतं. सॉर्किननं ते केलेलं नाही.

दंगलीत एका मुलीशी गैरवर्तन करण्याचं एक अगदी लहान दृश्यं आहे. ते एक सेकंदही लांबवलेलं नाहीये. चित्रपटाचा गाभा लक्षात घेतला तर ते दृश्यं हे अगदीच मर्यादीत महत्वाचं आहे. म्हणूनच ते पटापट तीन चार शॉट्समधे संपतं.

टीव्हीवर बातम्या दिसतात, त्यात दंगलीची दृश्यं, पुढाऱ्यांची भाषणं दिसतात. पण चित्रपट सवंग राजकारणाच्या बाजूनं न्यायचा नसल्यानं ती दृश्यंही खूप पटापट काय सांगायचे ते सांगून पुढं सरकतात.

संकलनाचं नामांकन चित्रपटाला मिळालं आहे.

चित्रपटाला छायाचित्रणाचं नामांकन आहे त्याचं कारण चित्रपट पहाताना लक्षात येतं. १९६८ चा काळ चित्रपटात चित्रीत झालाय. कोर्ट, कार्यकर्त्यांच्या बैठका, रस्त्यावरच्या घटना इत्यादी गोष्टी आपल्याला त्या काळात नेतात.

चित्रपटाचं डिझायनिंग,कला दिक्दर्शन लक्षात रहाण्यासारखं आहे. १९६८ व त्या आधीच्या काळातल्या अमेरिकन माणसांचे कपडे, त्यांच्या केषभुषा, कोर्टातलं फर्निचर, ज्यूरींच्या खुर्च्या. कायदे मंत्री ऑफिसमधे कामाच्या वेळात व्हिस्की घेतो, पाहुणे आणि सहकाऱ्यांना चहा की कॉफी असं न विचारता व्हिस्की घेणार कां असं विचारतो.

घटना, कोर्टातलं कामकाज, घटना अशी दृश्यांची गुंफण चित्रपटात करण्यात आलीय. डॉक्युमेंटरीची शैली आहे. आरोपी, वकील, न्यायाधीश, प्रेसिडेंट इत्यादी सगळी खरीखरी नावं वापरण्यात आली आहेत. कार्टात नाट्य आहेच पण आंदोलनातलं नाट्यही पटापट सरकणाऱ्या दृश्यातून दिक्दर्शकानं प्रभावी केलंय.

डॉक्युमेंटरीत घटना महत्वाच्या असतात, पात्रं तशी दुय्यम असतात. त्यामुळं डॉक्युमेंटरी कथानक प्रधान होते, पात्रांची गुंफण दुय्यम असते. त्यामुळं डॉक्युमेंटरी कधी कधी कथानक पुरेसं नाट्यमय नसेल तर फार काळ प्रेक्षकाला धरून ठेवू शकत नाही. सॉर्किननं घटनांमधे माणसं गोवली आहेत. पात्रांची व्यक्तिमत्व आणि त्यांचे आपसातले तणावही सॉर्किननं गुंफले असल्यानं डॉक्यूमेंटरी असली तरी ती फीचरच्या अंगानं जाते.

चित्रपटात आपल्याला अमेरिकन राजकारण, अमेरिकन समाजातली घालमेल, अमेरिकन न्याय व्यवस्था, अमेरिकेतला वंशद्वेष आणि मद्दड राजकीय वृत्ती अशा गोष्टी लक्षात येतात. जॉन्सन आणि निक्सन या दोन्ही प्रेसिडेंटांचं राजकीय चरित्रही आपल्याला कळतं. पोलिस किती पक्षपाती असतात तेही कळतं.

या खटल्याचा निकाल नंतर काही वर्षांनी कोर्टानं फिरवला आणि आरोपींना सोडून दिलं.

हा खटला आणि १९६०च्या दशकातली अमेरिकेतली राजकीय-सामाजिक-सांस्कृतीक चळवळ ही अमेरिकन इतिहासातली एक अद्वितीय आणि असामान्य घटना आहे.

म्हणूनच तर या घटनेवर १० पेक्षा अधिक चित्रपट झाले, सहा सात वेळा नाटकं लिहिली गेली आणि पाच पन्नास गाणी लोकप्रिय झाली. स्पीलबर्ग हाच चित्रपट करण्याच्या नादात होता, जमलं नाही.

अमेरिकेतल्या राजकारणातला दंभ आणि वंशद्वेष आजही अमेरिकेला छळतोय, म्हणूनच तर २०२० सालात त्या विषयावर सिनेमा करावा असं कोणाकोणाला वाटत रहातं.

चित्रपटाला सहा ऑस्कर नामांकनं आहेत.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

‘दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन’
दिग्दर्शक – ॲरन सॉर्किन
कलाकार – साचा बॅरन कोहेन, फ्रँक लँगेला, एडी रेडमायनेमार्क रीलन्स 

COMMENTS