फुलपाखरांच्या दुनियेत…

फुलपाखरांच्या दुनियेत…

फुलपाखरांचे संशोधन, निरीक्षण, प्रकाशचित्रण हा खूप आनंद देणारा प्रवास आहे. हल्ली त्यामुळेच बटरफ्लाय गर्दांची संकल्पना आपल्याकडे रुजायला लागलीय. मुख्य म्हणजे "फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी "फूड प्लांट" आपल्या बागेत लावली तर फुलपाखरांचे पूर्ण जीवनचक्र जवळून अनुभवता येते.

देशातील वनक्षेत्र वाढले; डोंगराळ प्रदेशात मात्र घट
अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात
उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज

फुलपाखरांचे जीवनचक्र हे फारच सौंदर्यपूर्ण आणि चित्तवेधक असते. मुळातच रंगीबेरंगी फुलपाखरे, त्यांच्या जीवनातल्या विविध अवस्था आणि स्थित्यंतराचा प्रवास अभ्यासणे हे तसे अभ्यासपूर्ण व चित्त वेधून घेणारे आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात तसेच आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, बागेत, माळरानावर, जंगलात, नॅशनल पार्कमध्ये फिरत असताना रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतात आणि आपल्या मनात कुतूहल जागे होऊन आपल्याला प्रश्न पडतो की, फुलपाखरांचा सुरवंट ते एक सौंदर्याने नटलेले फुलपाखरू हा प्रवास नेमका कसा होत असेल? मग आपण त्याची माहिती मिळवायला सुरवात केल्यावर आपल्या समोर अत्यंत मनोरंजक अशी माहिती येते.

मग मनात विचार येतो या फुलपाखरांशी मैत्री करता येईल? त्यांना आपल्या घराच्या अंगणात बोलावता येईल? त्यांना आपल्या हातांच्या बोटांवर घेऊन गुजगोष्टी करता येतील?? किंवा काही प्रसिद्ध वन्यजीव वाहिन्यांवर दाखवतात तसे छायाचित्रण करता येईल, याचा विचार केलातर हे आपल्या कोणालाही सहज शक्य आहे असे दिसून येते.
परंतु त्यासाठी थोडासा आपल्या भोवतालचे पर्यावरण, अधिवास, वातावरण तसेच आपण ज्या फुलपाखरांशी मैत्री करायची म्हणतोय त्यांच्याबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल. यामध्ये आपल्या देशात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती, त्यांचे नैसर्गिक अधिवास, त्यांचे जीवनचक्र, त्यांना जगण्यासाठी लागणारे अन्न, त्यांच्या उडण्याच्या पद्धती, त्यांच्या विविध अवस्था या सर्वांचा आपल्याला थोडा सखोल अभ्यास करावा लागेल.
“अंडी, त्यातून बाहेर येणाऱ्या खादाड अळ्या, अळ्यांनी विणलेले कोष आणि मग कोषातून हळुवारपणे बाहेर येणारं फुलपाखरू” हे त्यांचे जीवनचक्र. या कोषातून बाहेर येण्याच्या घटनेतही एक गंमत आहे. फुलपाखरांना रंगापेक्षाही गंधाची जाण चांगली असते. अशा कोशात तयार होणार फुलपाखरू मादी असेल तर त्या प्रजातीची नर फुलपाखर आधीच त्या कोषाभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात. कारण त्यांना कोषातून बाहेर आल्या आल्या त्या मादीशी मीलन करायचं असतं. फुलपाखरांच आयुष्यमान हे कमीत कमी आठ दिवस ते जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यापर्यंत असतं. या अल्पशा काळात त्यांना पक्षी, नाकतोडे, कोळी या भक्षकांपासून स्वत:चा बचाव करीत प्रजनन करावं लागतं.

सर्वांत आधी फुलपाखरे आणि पतंग यातला फरक आपल्याला थोडक्यात जाणून घ्यावा लागेल. मुळात फुलपाखरे आणि पतंग हे कीटकांच्या एकाच वर्गातले पण काही बाबतीत त्यांच्यात फरक असतो. फुलपाखरे ही दिनचर आहेत तर पतंग निशाचर. काही दिवसा उडणारेही पतंग आपल्याला बघायला मिळतात. तसेच रात्री उडणारी “इव्हिनिंग ब्राऊन” सारखी फुलपाखरेही आहेत, पण ते अपवादच! फुलपाखरे फुलांवर पानांवर बसलेली असताना पंख मिटून किंवा पंखांची उघडझाप करत बसतात, त्याला फुलपाखरांचे “बास्किंग” असे म्हणतात. तर पतंग विश्रांती घेताना पंख पसरून बसतात. फुलपाखरांचे antennae लूपसारखे किंवा शेवटी गाठ असलेले असतात, तर पतंगांचे antennae केसाळ झालर असलेले असतात. अळीच्या अवस्थेत असतानाही त्यांच्यातला फरक लक्षात येतो. पतंगांच्या अळ्यांच्या अंगावर काट्यांसारखे केस असतात. फुलपाखरांच्या अळ्यांना मात्र असे केस नसतात. हा झाला फुलपाखरे व पतंग यांतला फरक.

फुलपाखरांच्या मिलनानंतर मादी सर्वात आधी शोधते ती तिच्या प्रजातीसाठी उपयुक्त खाद्य वनस्पती किंवा फूड प्लॅण्टस्. या फूड प्लॅण्टसचे विविध प्रकार असतात. त्यातील काही फूड प्लॅण्टस् ही विषारी देखील असतात.
फूड प्लॅण्टसचा शोध घेतल्यानंतर मादी त्याच्या पानांखाली अंडी घालते. ही अंडी पानांखाली घालण्यामागे ती अंडी उपद्रवी, भक्षक प्राण्यापक्ष्यांना दिसू नयेत हे मुख्य कारण असते. एका पानाखाली एक अंडे घातले जाते. त्यामुळे पुढे त्या पानावर सुरवंटाची गर्दी वाढून त्यांना खाद्य अपुरे पडत नाही. अंडी आपोआपच काही दिवसांनी उबतात व त्यातून अगदी लहान आकाराचा सुरवंट बाहेर पडतो. हा सुरवंट कवचातून बाहेर पडतो. बाहेर आल्याबरोबर तो सर्वप्रथम आपल्याच अंड्याचे कवच खाऊन टाकतो. ते खाल्यानंतर तो पानांकडे वळतो. पानांच्या काठापासून सुरुवात करून तो मध्यापर्यंत खातो. सुरवंट अतिशय अधाशी असतो. या त्याच्या अधाशी वृत्तीमुळे त्याची वाढ जलद होते. थोड्या दिवसातच सुरवंट कित्येक पटीने वाढतो.

यामध्ये टायगर जातीची फुलपाखरे मिल्कविड ( ज्या झाडाचे पान तोडल्यावर पांढरट दुधट रंगाचा रस निघतो.) या झाडाच्या पानांवर अंडी घालतात. मिल्कविड विषारी असते पण त्याच्या विषाचा परिणाम सुरवंटावर होत नाही. ते वेगाने पानांचा फडशा पाडतात आणि शरीरात विष शोषून घेतात. त्याचा फायदा परभक्षी प्राणी- पक्ष्यांपासून बचाव करताना होतो. अशा सुरवंटाला किंवा फुलपाखराला खाताच भक्षकाला गरगरते किंवा उलट्या होतात. त्यातून तो धडा शिकतो व अशा फुलपाखरांच्या नादी लागत नाही. सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचे कोशात रुपांतर होण्याची अवस्था सुरू होते. झाडाच्या फांदीवर एका ठिकाणी तो स्वतःला लाळेच्या साहाय्याने चिटकवतो व काही काळातच आपली कातडी उतरविण्याची प्रक्रिया सुरू करतो. ही प्रक्रिया फारच हळू घडते व सुरवंटाचे रुपांतर कोषात होते. कोष ही स्थिर अवस्था असते. या काळात ते काहीच खात नाहीत व हालचालही करत नाही. या अवस्थेत त्यांना धोकाही तेवढाच जास्त असतो. त्यामुळे बऱ्याच फुलपाखरांचे कोष हिरवे किंवा फांदीच्या रंगरूपाचे असतात. त्यामुळे ते भक्षकांना झाडापेक्षा वेगळे ओळखता येणे कठीण असते.

कोष कालांतराने काळपट किंवा गडद होत जातो. हा गडदपणा कोषातील फुलपाखरांची वाढ दर्शवितो. पूर्ण गडद व काळसर झालेल्या कोषात पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू असते. यानंतर एखाद्या भल्या पहाटे कोवळ्या उन्हात कोष एका बाजूने तडकतो व ओलावल्या पंखांनी हळुवारपणे पूर्ण वाढ झालेले सुंदर फुलपाखरू बाहेर येते. कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू लगेच उडण्यास असमर्थ असते. थोडा वेळ ते कोषावर बसूनच पंख वाळवते. पंख वाळतात आणि आपल्याला पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखरांचे दर्शन घडते. हा क्षण फुलपाखराच्या आयुष्यातील व सर्व अवस्थांमधील अत्यंत देखणा व सुंदर अनुभव असतो. तो अनुभवायला मिळणे हे अत्यंत कठीण व भाग्याचे असते. कारण बरीच फुलपाखरे साधारणपणे भल्या पहाटे कोषातून बाहेर येतात.

“फुलपाखरांचे आयुष्य आठ दिवसांपासून ते आठ ते नऊ महिने इतके कमी असते. या अल्पशः काळात त्यांना पक्षी, नाकतोडे, कोळी, या भक्षकांपासून बचाव करत त्यांना प्रजनन करावं लागते.

फुलपाखरांविषयी आपण आणखी माहिती गोळा केल्यास आपल्याला कळते कि विल्यम ब्लिथ नावाच्या संशोधकाने त्याच्या पुस्तकात भारतातल्या १,२०० जातींची नोंद केलीय, त्यातल्या ३३० जातीतर आपल्या पश्चिम घाटातच एकवटल्यात. त्यात “ग्रास ज्वेल” या सर्वात छोट्या फुलपाखरापासून ते “सदर्न बर्ड विंग” या या जगातल्या सर्वात मोठ्या फुलपाखराचा समावेश होतो. आपल्या भारतात अरुणाचल प्रदेशमधील “जयरामपूर” येथे जगातील सर्वात जास्त म्हणजे ९६७ प्रजाती दिसतात तर सिक्कीममध्ये ७०० फुलपाखरे आढळतात.

आता थोडेसे फुलपाखरांशी मैत्रीविषयी… फुलपाखरांचे संशोधन, निरीक्षण, प्रकाशचित्रण हा खूप आनंद देणारा प्रवास आहे. हल्ली त्यामुळेच बटरफ्लाय गर्दांची संकल्पना आपल्याकडे रुजायला लागलीय. मुख्य म्हणजे “फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी “फूड प्लांट” आपल्या बागेत लावली तर फुलपाखरांचे पूर्ण जीवनचक्र जवळून अनुभवता येते. अशा फूड प्लांटमध्ये ‘कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक’ अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात. या झाडापानांमध्ये लपलेल्या अळ्या पाळायच्या, त्यांना विशिष्ट प्रकारचे खाद्य द्यायचे आणि मग कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखराला निसर्गात सोडायचे… हेही एक तंत्र आहे. एवढंच कशाला गुलबक्षी, सदाफुली, एक्झोरा अशी गुच्छांनी फुलणारी झाडे तुम्ही लावलीत तर क्रीम्झन रोझ, पेंटेड लेडी, लाझबेल सारखी सुंदर फुलपाखरे तुम्हाला भेट द्यायला येतील.

फुलपाखरांशी मैत्री करण्याच्या आणखीन काही मजेशीर गमतीजमतीपण आपण करू शकतो. यातलीच एक गम्मत “बेटिंगची”! फुलपाखरांच्या मागे धावण्यापेक्षा त्यांनाच आपल्याकडे बोलवायचे असेल तर संशोधक ही शक्कल लढवतात. फुलपाखरांना फुलांचा मधुरसच नव्हेतर सडकी कुजकी फळे आवडतात. याचा फायदा घेऊन आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये अशी सडकीकुजकी फळे, बिअर एखाद्या बाउलमध्ये घेऊन ठेवू शकतो किंवा पपई, पेरू अशी आंबट गोड चवीची पिकलेली फळे घेऊन त्यांचा गर घेऊन त्यात आंबट ताडी किंवा बिअर मिसळून ते मिश्रण ३ ते ४ दिवस आंबवून आपल्या घराच्या अंगणात ठेवू शकतो. त्या मिश्रणाचा वास जसा पसरायला लागतो तशी ग्रेट एग फ्लाय, कमांडर, ब्लू ओकलीफ अशी सुंदर फुलपाखरे त्या ठिकाणी झेपावतात व त्या मिश्रणावर तुटून पडलेली दिसतात. अशावेळी आपण त्यांच्या जवळ जाऊन प्रकाशचित्रण केले तरी जसे एखादे ramp walk करणारे मॉडेल आपल्याला फोटो घेण्यासाठी साहाय्य करते तसेच ही फुलपाखरेही आपल्याला एखाद्या सराईत मॉडेलप्रमाणे प्रकाश चित्रणासाठी छान पोझ देऊन मदत करतात.

अशा अनेक गमतीजमती व घटना फुलपाखरांच्या आयुष्यात घडत असतात. या सर्व घटनांमध्ये नैसर्गिक अवस्थेत फुलपाखरांचे कोशातून बाहेर येताना पाहणे खूप कठीण असते. कारण बर्याच वेळा ती पहाटेच बाहेर येतात. कोशातून बाहेर येण्याचा काळ म्हणजे कसोटी असते. अशावेळी पंख ओलावल्या अवस्थेत पक्ष्यांनी गाठू नये म्हणून निसर्गाने ही पहाटे बाहेर येण्याची योजना केली असावी. ” त्या कोशातून फुलपाखरू बाहेर येण्याचा क्षण खूपच जादूई (magical) असतो.”

फुलपाखरांच्या नावांमध्येही बरीच विविधता जाणवते. फुलपाखरांना त्यांची ही पदव्यांसारखी नावे ब्रिटीशानी दिली. त्यांच्या रूपावरून किंवा त्यांच्या काही विशिष्ट सवयींमुळे. ब्रिटिशांनी जेव्हा आपल्याकडची फुलपाखरे बघितली तेव्हा ते अक्षरशः वेडे झाले एवढे कौतुक वाटण्याचे कारण म्हणजे पूर्ण इंग्लंडमध्ये केवळ ५७ प्रजातींची फुलपाखरे आढळतात, तर तर जगभरात १८,००० जाती आढळतात आणि आपल्याकडे भारतात त्यांच्या सुमारे १,५०३ जाती आढळतात.

अंडी, सुरवंट व कोष या अवस्थाही प्रत्येक फुलपाखरांमध्ये वेगवेगळ्या असतात. काहींचे सुरवंट भडक, चटकन दिसणारे तर काहींचे निसर्गाशी, निसर्गातल्या रंगाशी, आकारांशी मिळतेजुळते, काही चमकदार व उठून दिसणारे असतात. या विविध चित्तवेधक अवस्थांचे  निरीक्षण, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण अवलोकन करणे हे मनाला निश्चितच खूप आनंद मिळवून देणारे असते. फुलपाखरांच्या फूड प्लॅण्टसची ओळख व त्यांच्या अधिवासांची ओळख झाल्यावर तुम्ही पण त्यांचे सुरवंट व कोष शोधू शकाल. मग सुरुवात करताय ना?

सौरभ महाडिक. हे वन्यजीव अभ्यासक व संशोधक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0