मोदींच्या राज्यात भारतीय मुस्लिम!

मोदींच्या राज्यात भारतीय मुस्लिम!

मी पक्का राष्ट्रवादी होतो. भारताचा विजय दाखवणारे युद्धपट मला खूप आवडायचे. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणं ऐकलं की घशात आवंढा दाटून यायचा.

एप्रिलमध्ये बेरोजगारीमध्ये वाढ, ७.८३ टक्के बेरोजगारीचा दर
मेमध्ये देशात कोरोना बाधितांच्या संख्येत ४ पट वाढ
आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक

मी आयुष्यातली पहिली मारामारी केली १९९०च्या दशकात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिकत असताना. होस्टेलच्या टीव्हीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच सुरू असताना एका कश्मिरी मुस्लिम मुलाशी मारामारी झाली होती. भारताची टीम चांगली खेळत असूनही तो पाकिस्तानच्या बाजूने बोलत होता.

मी पक्का राष्ट्रवादी होतो. भारताचा विजय दाखवणारे युद्धपट मला खूप आवडायचे. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणं ऐकलं की घशात आवंढा दाटून यायचा. भारत पाकिस्तानकडून क्रिकेटमध्ये हरला की मला फार दु:ख व्हायचं. माझे तथाकथित ‘देशावर प्रेम न करणारे’ मुस्लिम मित्र आणि ‘देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नसलेले’ हिंदू मित्र अधिक चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशांत गेले. मी मात्र भारतातच राहायचं ठरवलं.

दुसऱ्या बाजूला माझ्या उदारमतवादामुळे एएमयूसारख्या ठिकाणी मी वेगळा उठून दिसत होतो. माझ्यासारख्या मुस्लिमांचं वर्णन उपरोधाने ‘लिबरेटेड’ असं केलं जायचं. मी मुस्लिम आहे आणि मुक्त विचारांचाही आहे याचा मला केवढा अभिमान होता. ही ओळख मी स्वत:हून निवडली होती. तुम्हाला सगळे हक्क मिळत असतात तेव्हा अशी निवड करणं शक्य असतं.

काळ बदलला. भारत बदलला. बाबरी मशिदीचं उद्ध्वस्तीकरण, गुजरात दंगली, वाढता जातीय तणाव आणि अखेर सत्तापालट. या सगळ्याची दाट सावली माझ्या व्यक्तीत्वावर पडू लागली. आयुष्यात प्रथमच मला मुस्लिम असल्यासारखं वाटू लागलं. व्यक्तीत्व निवडण्याची मुभा देणारा आरसा कुठेतरी तडकला होता. टिपिकल मुस्लिम नावामुळे महानगरात घर भाड्याने मिळणं कठीण होऊन बसलं.

माझं नाव ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पालटायचे. ते एकमेकांकडे शंकेने भरलेले कटाक्ष टाकायचे. मी ऑफिसमध्ये शिरलो की चालू असलेली संभाषणं थांबायची. काळ जात होता आणि माझ्या निवडीच्या हक्कांवर मर्यादा येत होत्या. शेवटी माझी ओळख पक्की झाली. मी एक मुस्लिम होतो. त्याहून जास्त काही नाही आणि कमीही काही नाही.

मोदी सरकारची पाळंमुळं घट्ट झाली तसे मुस्लिमांवर जमावाने हल्ले होण्याचे प्रकार सुरू झाले. मी अस्वस्थ झालो. माझी नव्याने प्रस्थापित झालेली ओळख माझ्या आयुष्याची हिंसक अखेर करू शकत होती. मी चारचौघांमध्ये वाद घालणं कमी केलं. सार्वजनिक ठिकाणी असताना फोन कॉल घेत असलो तर सलामवालेकुम म्हणणं टाळू लागलो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मला अब्बा म्हणून हाक मारू नका असं मुलांना शिकवलं. बाहेर असताना मांसाहार तर वर्ज्यच केला. स्वत:चं व्यक्तीत्व निवडण्याचा हक्क कधीतरी मला दुबळा करून टाकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. या नवभारतामध्ये मुस्लिम आणि ‘लिबरेटेड’ दोन्ही असणं म्हणजे संकट ओढवून घेण्याची हमीच.

मी एका भीतीखाली जगू लागलो. आयुष्यात कधीच केला नव्हता तेवढा माझ्या व्यक्तित्वाचा विचार करू लागलो. मी आजही पाचवेळा नमाज पढत नाही किंवा रमजानमध्ये रोजा वगैरे करत नाही. पण तरीही मी मुस्लिमच आहे.

सोशल मीडियावर केवळ माझं नाव लोकांना संताप आणण्यासाठी पुरेसं ठरतं. माझ्या सोबतच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काही बोललो तर एकतर मला लोक टाळू लागले किंवा ट्रोल करू लागले. आश्चर्य म्हणजे मी जातिव्यवस्थेवर लिहिलं तेव्हा सर्वांत जास्त शिव्या खाव्या लागल्या. व्यक्तीत्व आता दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार होता! काफिर, जिहादी, अँटिनॅशनल, मुल्ला, कटुआ असे शब्द वेबच्या प्रत्येक पानावर माझा पाठलाग करू लागले. माझे तालिबान आणि आयसिसशी लागेबांधे असल्याचे आरोप होऊ लागले. माझ्या उदारमतवादी तत्त्वांची खिल्ली उडवली जाऊ लागली: “एक मुस्लिम लोकशाहीचं समर्थन कसं करू शकतो”. मी काही युक्तिवाद केला की मला पाकिस्तानात, तर काही वेळा सौदी अरेबियात, जाण्याचा सल्ला मिळू लागला. तिरस्काराचा एक ढग माझ्याभोवती सतत फिरू लागला आणि हळुहळू मला त्याच्या अस्तित्वाची सवय होऊ लागली.

मी केवळ एक मुस्लिम आहे, दुसरा कोणीही नाही हे मला जाणवून देण्याकडे सगळे प्रयत्न एकवटलेले होते. दुसरी कोणतीही ओळख माझ्यासाठी नव्हती. हळुहळू मलाही राष्ट्रभक्तीचा तुरा डोक्यावर मिरवण्याचा कंटाळा येऊ लागला. जात, धर्म, वंश कोणत्याही बाबीवरून होणाऱ्या भेदाचा सर्वांत धोकादायक आणि दुर्दैवी भाग म्हणजे या भेदाच्या वागणुकीनंतरही आशावादी राहणाऱ्यांना या आशावादाचा थकवा येत जातो. आशावादी व्यक्तीची आशा हरपू लागते, तसा भेदाचा विजय होतो आणि तो आणखी घट्ट रुजत जातो. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याच्या विरोधाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा यात ओढला गेलो. पण आता मी केवळ एक मुस्लिम म्हणून यात पडत होतो. लोकशाहीचा एक सजग नागरिक ही माझी ओळख संध्याकाळच्या आकाशासारखी फिकट होत चालली होती.

माणूस जेव्हा प्रेमाला पारखा होतो, तेव्हा त्याच्यातली आशा मालवत जाते. वेगळी, भेदाची वागणूक सतत मिळाली की तो वेगळा पडत जातो. पाबलो नेरुडा यांनी त्यांच्या ‘इफ यू फर्गेट मी’ नावाच्या कवितेत म्हटलं आहे-

Well, now,

if little by little you stop loving me
I shall stop loving you, little by little

If suddenly

you forget me
do not look for me
for I shall already have forgotten you

२०१९ मध्ये भारत वर्ल्डकपची सेमी-फायनल हरला, तेव्हा मला वाईट वाटलं पण ते दु:ख भारत हरल्याहून जास्त माझ्यातलं काहीतरी मरून गेल्याचं होतं. नंतर मला दिलासाच वाटला. चला, मोदींना स्वत:चा ढोल बडवण्यासाठी वर्ल्डकप विजयाचं शस्त्र मिळालं नाही, असं मनात आलं. मला शिवीगाळ करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून आनंद व्यक्त करण्याचं एक निमित्त हिरावलं गेलं असा दिलासा वाटला. नाहीतर त्यांनी या आनंदाचं रूपांतर अतिरेकी देशभक्तीत करून टाकलं असतं. खेळातलं काहीही न कळणाऱ्या उथळ न्यूज अँकर्सना स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची आणि या विजयाला धार्मिक रंग देण्याची संधी मिळाली नाही याचा दिलासा वाटला.

चीनच्या घुसखोरीची बातमी आली तेव्हा मी त्या मुद्दयाकडे त्रयस्थासारखं बघितलं. मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांसाठी मला अर्थातच खूप वाईट वाटलं पण त्यांच्यासारखाच एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून नव्हे. ‘खुशामत’ हा शब्द वारंवार आणि कुठेही वापरणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ अँकर्सबद्दल माझ्या मनात राग दाटून आला. खुशामत जेव्हा खरोखर त्यांच्यासमोर घडतेय तेव्हा ती ओळखण्याची क्षमताही त्यांच्यात उरलेली नाही. चीनच्या घुसखोरीनंतर पंतप्रधानांनी जो काही भ्याड पवित्रा घेतला तो बघून माझा राग उसळून आला. ज्या नेत्याच्या सत्तेने मला आणि माझ्यासारख्या अनेकांना अपमानित केलं, आमच्यावर ‘अँटि-नॅशनल’ आणि ‘सेडिशिअस’ असे शिक्के मारले, त्यांना अपमानित होताना मला आनंद झाला नाही, तर आपल्या देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटली. कारण, आपला देश सध्या सुरक्षित हातात नाही हे निश्चित आहे.

हा लेख मी अज्ञात म्हणून लिहिला आहे. कारण, मला कुटुंब आहे, नोकरी आहे. मला येथे राहायचे आहे. हा नवभारत आहे आणि मी एक भ्याड. त्यामुळे मला अज्ञातवासाखेरीज पर्याय नाही.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0