१९८९मध्ये, लोकशाहीसाठी चाललेल्या निदर्शनांमध्ये 'कामगार' विद्यार्थ्यांच्या बरोबर सामील झाले होते. आता जगण्याची परिस्थिती सुधारावी याकरिता संघर्ष करणाऱ्या कामगारांना विद्यार्थी साथ देत आहेत.
“आम्ही एकत्र लढू, एकत्रच पुढे जाऊ किंवा एकत्रच माघार घेऊ,” ४ मे, २०१९ रोजी किउ झानशुआन (Qiu Zhanxuan) याच्या साथीदारांनी प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओचा शेवट करताना तो हे म्हणतो! किउ हा प्रतिष्ठित अशा पेकिंग विद्यापीठात मार्क्सवादी विद्यार्थी संघटनेचा माजी नेता होता. तो गायब झाला तर प्रसिद्ध करण्यासाठी त्याने हा व्हिडिओ तयार केला होता.
एप्रिलच्या शेवटी, कुप्रसिद्ध तियानमेन चौक घटनेला ३० वर्षे झाल्यानंतर विद्यार्थी आणि कामगारांनी संयुक्त आघाडी स्थापन करावी असे आवाहन करण्याचे धाडस दाखवल्यानंतर, किउ खरेच गायब झाला आहे. त्याला आधीही एकदा डिसेंबर २०१८ मध्ये माओ त्से तुंग यांचा १२५ वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जात असताना अटक झाली होती व त्यानंतर त्याची सुटकाही झाली होती.
जुलै २०१८ मध्ये जेसिक टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीमध्ये संप करणाऱ्या कामगारांना साथ द्यायला पेकिंगमधले विद्यार्थी आले होते. या कामगारांना युनियन बनवण्यास मनाई करण्यात आली होती. पेकिंग विद्यापीठातलेच नव्हे तर रेनमिन आणि त्सिंगुआ विद्यापीठातले विद्यार्थीही आंदोलन करणाऱ्या कामगारांना पाठिंबा द्यायला मोठा प्रवास करून दक्षिण चीनमध्ये गेले होते. त्यांना अटक करण्यात आली, काहींना सोडण्यात आले, काही किउसारखेच गायब झाले.
एप्रिल १९८९ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव आणि सुधारणावादी नेते हु याओबांग यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर पेकिंगमधल्या विद्यार्थ्यांनीच निदर्शने चालू केली होती. राजकीय सुधारणा आणि लोकशाहीबरोबरच आणखी सामाजिक स्वातंत्र्य आणि समानता याही त्यांच्या मागण्या होत्या. हळूहळू संपूर्ण चीनमधून कामगारही या चळवळीमध्ये सामील झाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी त्यांचे फारसे स्वागत केले नाही. कामगारांच्या येण्याने त्यांची चळवळ फिकी होईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की सगळेच चिनी नागरिक, त्यांच्या समाजवादी आदर्शाला एका अधिक लोकशाहीवादी आणि समतावादी समाजाच्या स्वरूपात मूर्त रूप देण्यासाठी लढत होते:.
कम्युनिस्ट राजवटीच्या दृष्टीने हे आंदोलन म्हणजे प्रतिक्रांतिवादी दंगल होती. त्यामुळे ३ आणि ४ जून रोजी त्यांनी आंदोलन चिरडायला २००,००० सैनिकांना तैनात केले आणि त्याबरोबरच तियानमेन चौकातील विद्यार्थ्यांचे शांततेत चाललेले उपोषण संपुष्टात आले. या कारवाईत शेकडो निदर्शक मारले गेले असा अंदाज आहे.
आज पुन्हा, तेच मुद्दे ऐरणीवर आले आहेत. समाजवादी स्वप्न सोडून देऊन कट्टर भांडवली बाजारपेठ बनलेल्या देशात पुन्हा एकदा समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सगळे नागरिक एकत्र येत आहेत. चीनमधील आर्थिक वृद्धी कुंठित झाली असताना आणि ३० कोटी चिनी कामगारांकरिता झि जिंगपिंग यांनी वचन दिलेले “चिनी स्वप्न” आणखी दूर जात असताना, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन वर्तमान सत्तेला अस्थिर करू शकते.
सर्वहारा वर्गाची वाईट स्थिती
आयर्न राईस बाऊलचे – आयुष्यभरासाठी एक स्थिर नोकरीची हमी आणि त्याबरोबर विविध सामाजिक लाभ मिळण्याचे – दिवस केव्हाच संपले. चिनी सर्वहारा आता साम्यवादी समाजातला उच्चभ्रूवर्ग नाही. तो चिनी पद्धतीची भांडवलशाही आणि आक्रमक जागतिकीकरणाचा प्रमुख शिकार आहे. चिनी कामगार आज १९८९ पेक्षा वाईट स्थितीत आहेत. त्यांना शासनाकडून मिळणारे संरक्षण कमी होत आहे, आणि अनेकांचे भविष्य खाजगी क्षेत्रातली अंदाधुंद परिस्थिती स्वीकारण्याच्या आणि तिथे टिकून राहण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
हाँग काँग येथील चायना लेबर बुलेटिन (सीएलबी) चे कार्यकारी संचालक हान डोंगफँग यांच्या मते आजची परिस्थिती ३० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीची आहे. १७ एप्रिल, १९८९ मध्ये त्यांनी तियानमेन चौकामध्ये भाषण केले तेव्हा ते फक्त २६ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या भाषणात चिनी कामगारांच्या मुक्तपणे संघटित होण्याच्या अधिकाराचा ठामपणे पुरस्कार केला होता. त्यांनी बीजिंग वर्कर्स ऑटोनॉमस फेडरेशन या क्रांतीनंतरच्या चीनमधल्या पहिल्या स्वतंत्र ट्रेड युनियनची निर्मिती करण्यात मदत केली होती. ही युनियन ४ जून १९८९ च्या कारवाईनंतर लगेचच संपुष्टात आणली गेली. पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत असणारे हान, त्यावेळी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी दोन वर्षे तुरुंगात काढली. चीनमधून हद्दपार केल्यानंतर त्यांनी हाँग काँगमधून आपला संघर्ष चालू ठेवला. १९९४ मध्ये त्यांनी सीएलबी सुरू केले.
अजूनही संघर्ष करावे अशा अनेक गोष्टी आहेत. आज चीनमध्ये कामगारांना संप करण्याचा अधिकार नाही, युनियन बनवण्याचा अधिकार नाही. तरीही काही कामगार वेतन न मिळणे, संरचनात्मक सुधारणा योजना, आरोग्य आणि सुरक्षा किंवा अगदी लिंगभाव समता यासारखे मुद्दे घेऊन लढत आहेत. सीएलबीच्या अहवालानुसार २०१८ मध्ये १७०१ संप झाले. संप केल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाण्यापासून, तुरुंगवास किंवा अगदी गायब होण्यापर्यंत अनेक धोके असू शकतात. असे असूनही चिनी कामगार खूप सक्रिय आहेत.
उदासीन आणि शोषित कामगार
माझ्या संशोधनानुसार चिनी कामगार कायदा खरे तर कामगारांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रकारे बनवण्यात आला आहे. १९९० आणि २०००मधल्या कायद्यातील सुधारणांनंतर चिनी पद्धतीचे सार्वजनिक हितार्थ होणारे खटले तसेच वेगवेगळ्या स्वरूपातील सामूहिक वाटाघाटी – जरी त्यात सामूहिकपणे वेतनवाढीसाठी घासाघीस करणे समाविष्ट नसले तरीही – चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले आहे. पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा या कायद्यांची अंमलबजावणी आणि न्यायनिवाडा स्वतंत्रपणे केला जातो. आणि व्यवस्थेचा प्रतिसाद कसा असेल याचे अनुमान कधीच लावता येत नाही!
मागच्या दहा वर्षात चिनी कायदा व्यवस्थेने खूप मोठी निराशा केली आहे. कायद्याच्या राज्याची फसवणूक झाली आहे. अनेक गोष्टी संशयास्पद रितीने चालू असतात. जसे की – “कामामधून सुधारणा” किंवा “कामामधून पुनर्शिक्षण” अशा नावाखाली जबरदस्ती काम करवून घेणे. अजूनही शासकीय आणि काही खाजगी कंपन्याही अशा गोष्टींचा वापर करतात. दोन्ही प्रकारच्या कंपन्या असतात चिनी भूप्रदेशातच, परंतु परदेशातील परकीय गुंतवणूक प्रकल्पांच्या सहाय्याने चालवल्या जातात! परदेशी पाठवण्यात आलेल्या चिनी कामगारांना कशा प्रकारे अमानवी स्थितीमध्ये राहण्यास भाग पाडले जाते, त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जातात, महिनोन् महिने त्यांना पगार मिळत नाहीत या प्रकारचे सविस्तर अहवाल प्रकाशित झाले आहेत.
यापूर्वीच्या काळात असंतोष मुख्यतः बांधकाम कामगारांमध्ये दिसून येत होता. त्यांच्यापैकी अनेकजण रहिवासाच्या परवानगीशिवाय, ज्याला हुकोऊ दर्जा म्हटले जाते, गावाकडून शहरात स्थलांतरित झालेले असत. त्यामुळे त्यांचा छळ होण्याची शक्यताही अधिक असे. मात्र, आता हा असंतोष सर्वत्र फैलावत आहे.
अलिकडेच एक चळवळ झाली. जी “996” या नावाने ओळखली गेली. यामध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत, आठवड्यातले सहा दिवस काम करण्याच्या संस्कृतीबद्दल चिनी तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी, ते नोकरी करत असलेल्या कंपन्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली. यामध्ये सामर्थ्यवान अलिबाबा कंपनीतील कामगारांनी त्यांचा संस्थापक जॅक मावरही मोठी टीका केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांनी गिटहबमार्फत, किंवा मीम, स्टिकर, टीशर्ट वापरूनही दीर्घकाळ काम करण्याच्या संस्कृतीबद्दल ऑनलाईन निदर्शने केली.
१९८९ पासून चीनमध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत, आणि तरीही बहुतांश गोष्टी तशाच आहेत. अत्यंत विषम बनलेल्या समाजात प्रत्येक पातळीवर शासनाचा हस्तक्षेप आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाला राजकीयदृष्ट्या कोणतेही आव्हान नाही, आणि तरीही, स्वतंत्र व्यक्तीच्या लोकशाहीवादी आकांक्षांना पायदळी तुडवणाऱ्या हुकूमशाही राजवटीबरोबरच एक प्रकारच्या नागरी समाजाचे सहअस्तित्व आहे. आज काही विद्यार्थी आणि कामगार हे त्यांच्या १९८९ मधल्या पूर्वजांसारखेच त्याच आशा-आकांक्षा घेऊन इतरांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत – समता आणि न्यायासाठी!
लायला चुकेरून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्राध्यापक आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाऊथ येथे युनिव्हर्सिटी रीसर्च अँड इनोव्हेशन थीम इन डेमोक्रेटिक सिटिझनशिपच्या संचालक आहेत.
हा लेख द कॉन्व्हर्सेशन मधील लेखाचा अनुवाद आहे. मूळ इंग्रजी लेख येथे वाचा.
लेखाचे छायाचित्र – १९८९ च्या तियानमेन चौक निदर्शनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ मे २०१९ मध्ये लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी हाँग काँग मध्ये काढलेला मोर्चा. श्रेय: रॉयटर्स
COMMENTS