चीनच्या पोलादी पडद्याआड १९८९ साली मे आणि जून महिन्यामध्ये प्रचंड मोठे आंदोलन झाले. लोकशाही मागण्यांसाठी विद्यापीठांमधील विद्यार्थी रस्त्यावर आले होते. सरकारने हे आंदोलन निर्दयीपणे चिरडून काढले. हजारो विद्यार्थी आणि नागरीक मारण्यात आले. अनेक गोष्टी बाहेर आल्याच नाहीत. त्यानंतर गेल्या ३ दशकांमध्ये अनेक बदल झाले. आता चीनच्या अधिपत्याखालील ‘हाँग काँग’मध्ये पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘तीआनमेन’बद्दल सांगणारा लेख.
४ आणि ५ जून १९८९ रोजी चीनमध्ये एका लोकशाही आंदोलनाचा शेवट केला गेला आणि त्या आंदोलनाला चीनव्यतिरिक्त जगात “तीआनमेन चौक हत्याकांड” असं संबोधलं जातं. ज्या चौकातून माओ ने १ ऑक्टोबर १९४९ ला “पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना” ची घोषणा केली त्याच तीआनमेन चौकाने १९८९ ला आंदोलक विद्यार्थ्यांचा आक्रोश, पीपल्स लिबरेशन आर्मी (पी.एल.ए.)ने केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव, जखमी आंदोलक आणि भर शहरातून रस्ता चिरडत आलेले भले मोठे रणगाडे पहिले आणि त्याच चौकात १९८९ ला ‘माओ’च्या बलाढ्य तैलचित्राला कामगारांनी काळं फासलं,
खरंतर ही घटना म्हणजे व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं एक आधुनिक उदाहरण होय. या

डावीकडून जियांग चमिन, ली पेंग आणि देंग-शाओपिंग.
आंदोलनानंतर चिनी सरकार इतकं सावध झालं आहे, की आजतागायत तीआनमेन चौकाच्या या घटनेबद्दल कुणाला चकार शब्दही काढू दिला जात नाही आणि त्याचबरोबर ‘तीआनमेन’ चौकामध्ये लाखो सी.सी.टी. व्ही. कॅमेरे बसवून त्याद्वारे प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जातं.
हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं, कोणी सुरु केलं, सरकारने कशाप्रकारे ते हाताळलं आणि आंदोलनानंतर चीनमध्ये कोणते बदल घडून आले. मुख्य म्हणजे त्या आंदोलकांचं नेमकं काय झालं?
आंदोलनाची ठिणगी पडली कशी?
खरंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या (सी.सी.पी )विरोधात १९८६ पासूनच आग धुमसत होती. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात शिकून चीनमध्ये परतलेले खगोलशास्त्रज्ञ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना’चे उपाध्यक्ष फांग लिची, जे स्वतः आधी ‘सी.सी.पी’चे सदस्य होते. १९५७ ते १९५८ च्या दरम्यान या शास्त्रज्ञाने ‘सी.सी.पी’कडे पत्रव्यवहार करत सत्तेचं विकेंद्रीकरण, उदारीकरण तसेच चीनमध्ये मोकळी राजकीय- सामाजिक व्यवस्था यावी अशी मागणी केली. अर्थातच या मागणीनंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ‘सी.सी.पी’ने ‘पुनर्शिक्षणासाठी’ म्हणून हेबेई प्रांतातल्या लेबर-कॅम्पमध्ये पाठवलं. सजा पूर्ण करून आल्यावर फांग पुन्हा विद्यापीठात रुजू झाले. मात्र त्यांच्यावर सरकारने संशोधन बंदी घातली होती. या माणसाने आपले संशोधन छुप्या रीतीने चालूच ठेवत लोकशाहीप्रेमी विचार कायम ठेवले. १९८६ ला फांग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आनहुई प्रांताच्या राजधानीत म्हणजेच हेफेई येथे निदर्शने केली आणि सत्तेचे विकेंद्रीकरण, आर्थिक आणि सामाजिक सुधारणा, मानवी हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली. १९८९ ला ‘सी.सी.पी’चे तत्कालीन सर्वोच्च नेते देंग-शाओपिंग यांना पत्र पाठवून पुन्हा त्याच मागण्या केल्या, त्यामुळे देंग-शाओपिंग फांग यांच्यावर बरेच नाराज होते..
हे सगळं घडत असताना १९८६ मध्ये ‘सीसीपी.’चे तत्कालीन महानिर्देशक हू-याओ-बांग यांच्यावर हेफेई मधील विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हाताळता आलं नाही व त्यांनी या आंदोलनाला सौम्य प्रतिसाद दिला,असा आरोप केला गेला. १९८७ ला या कारणास्तव पार्टीतील कट्टर कम्युनिस्टांनी हू- याओ-बांग यांना राजीनामा देण्यास भाग पाडत त्यांची ‘सीसीपी.’मधून थेट हकालपट्टी केली. मात्र त्यानंतर काही काळाने हेफेई मधील आंदोलन थंड पडत गेलं.
१५ एप्रिल १९८९ ला अचानक हू याओ-बांग यांचं निधन झालं. काहींच्या मते ‘सी.सी.पी’मध्ये झालेल्या अपमानामुळे हू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून काही विद्यार्थी बीजिंगच्या त्या प्रसिद्ध अशा ‘तीआनमेन’ चौकात एकत्र आले. १७ एप्रिलपर्यंत “पेकिंग विद्यापीठ” आणि “चिंग-व्हा” विद्यापीठातील जवळपास ४००० विद्यार्थी या चौकात जमले आणि त्यानंतर सुरु झाला संघर्ष.
विद्यार्थी एकत्र येऊन सरकारी व्यवस्थेतील काळा बाजार, कमकुवत अर्थव्यवस्था, मानवी हक्क याबद्दल चर्चा करू लागले. मात्र सरकारने हे थांबविण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करून पाहिला, मात्र तो जास्त काळ टिकला नाही. काही दिवसांनी या श्रद्धांजली सभेला आंदोलनाचं रूप आलं आणि विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची संपत्ती, वर्तमानपत्रांवरील नियंत्रण, व्यक्तिस्वातंत्र्य हे मुद्दे घेत सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. २२ एप्रिल १९८९ या दिवशी हू यांचा तीआनमेन चौकातील ग्रेट हॉल ऑफ पीपल येथे सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आला. असं म्हणतात, की यावेळी जवळपास १० हजार विद्यार्थी चौकात उपस्थित होते. आंदोलनाचं हे लोण संपूर्ण चीनमध्ये पसरत चाललं होतं. शी-आन, शांघाई, चांग-शा येथे आंदोलनाने उग्र रूप घेतलं होतं. आंदोलनाची झळ सत्तेच्या खुर्चीपाशी गेल्याने २७ एप्रिलच्या ‘पीपल्स डेली’मध्ये “शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज” अशा मथळ्याखालील संपादकीय वृत्तात ‘सीसीपी.’ची बाजू मांडण्यात आली होती.
मायकल- गोर्बाचेव्ह भेट आणि विद्यार्थी आंदोलन
१९५० च्या दशकात चीनबरोबर फिसकटलेले राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह १५ ते १८ मे च्या दरम्यान बीजिंगला भेट देणार होते. ‘सीसीपी.’ने गोर्बाचेव्ह यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. तीआनमेन चौकात त्यांचे जंगी स्वागत होणार होते. चौकातच अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते, मात्र

बीजिंग: येथे चौकात विद्यार्थ्यांनी केलेली निदर्शने. फोटो- शिये सानताय, तैपेई.
विद्यार्थ्यांनी चौकातच ठाण मांडल्याने चिनी सरकारची विशेषतः सर्वोच्च नेते देंग-शाओपिंग यांची मोठी कुचंबणा झाली. संपूर्ण जगातील पत्रकार या सायनो-सोव्हियत परिषदेसाठी आले होते. मात्र परिषदेऐवजी बऱ्याच पत्रकारांनी या आंदोलनाला अधिक महत्व देत ते जगात पसरवलं. १५ मे ला गोर्बाचेव्ह यांचं स्वागत विमानतळावरच औपचारिकरित्या करून परिषद कशीबशी गुंडाळण्यात आली आणि यामुळे देंग-शाओपिंग यांचा पारा चढला होता.
१९ मे ला ‘सीसीपी.’चे नवे महानिर्देशक चाओ-झियांग हे विद्यार्थ्यांना भेटले व सरकारने तुमच्या आंदोलनाची घेतलेली दखल ही उशिरा होती व याबद्दल मी माफी मागतो असं सांगून आंदोलन मागे घेण्याची मागणी केली, जी विद्यार्थ्यांनी फेटाळून लावली. खरंतर चाओ-झियांग यांचं हे शेवटचं सार्वजनिक भाषण ठरलं. कारण त्यांनी गोर्बाचेव्ह यांच्याशी झालेल्या संवादात आंदोलन हाताळण्यात आलेल्या अपयशाचं सारं खापर देंग-शाओपिंग यांच्यावर फोडलं होतं, आणि विद्यार्थ्यांप्रती अनुकूलता व्यक्त केली होती. यामुळे देंग-शाओपिंग यांनी चाओ-झियांग व त्यांच्या गटाला ‘सीसीपी.’तून बाहेरचा रस्ता दाखवत त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली. वास्तवात हे आंदोलन हाताळण्यात आलेलं अपयश हे ‘सीसीपी.’तीलच अंर्तगत दुफळीचं कारण आहे असं खुद्द देंग-शाओपिंग यांनी एकदा म्हटलं होतं, असं “हावलिन्ग-१९८९” या सानताय शिये यांच्या पुस्तकात नमूद आहे.. चाओ-झियांग यांची हकालपट्टी करून त्यांच्याजागी जियांग- चमिन यांची वर्णी लावण्यात आली. पुढे जाऊन जियांग चमिन हे चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले ती गोष्ट वेगळीच.
मार्शल लॉ आणि क्रूरतेची सीमा
१९ मे ला ‘सी.सी.पी’तील कट्टर कम्युनिस्टांनी सूचित केलेला “मार्शल लॉ” तत्कालीन चायनीज पंतप्रधान ली पेंग यांनी जाहीर केला. या मार्शल लॉ मुळे जे हत्याकांड घडलं त्यामुळे ली-पेंग यांना “बीजिंगचा खाटीक” असं नाव पडलं. मार्शल लॉ जाहीर केल्यापासून बीजिंगसहित आजूबाजूच्या प्रांतामध्ये कडक बंदोबस्त आणि सैन्य पाठविण्याचा निर्णय देंग-शाओपिंग, पंतप्रधान ली पेंग

तीआनमेन चौक घटनेचं प्रतिक ठरलेला हाच तो टॅंक मॅन.
यांच्यासहित एका संयुक्त समितीने घेतला. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना तीआनमेन चौकात मनाई करण्यात आली. तसेच कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ चित्रण किंवा फोटोग्राफीला बंदी घालण्यात आली. पंरतु या मार्शल लॉ मुळे परिस्थिती अधिकच चिघळत गेली आणि लाखो विद्यार्थी चौकात जमू लागले. यावेळी पेकिंग आणि चिंग-व्हा विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी चौकात उपस्थिती दर्शविली. अनेक कामगार संघटना, डॉक्टर संघटना देखील आंदोलनात सामील झाल्या. चौकात विद्यार्थ्यांनी “लोकशाही देवतेचा (Goddess of Democracy)” पुतळा उभारला. या आंदोलनातून अनेक विद्यार्थी नेते उदयास आले, ज्यांचं जगणं आंदोलन मोडीत काढल्यानंतर मुश्किल झालं आणि त्यांना चीन सोडून दुसऱ्या देशांचा आधार घ्यावा लागला.
२ जून १९८९ ला देंग-शाओपिंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘पॉलिट-ब्युरो स्टँडिंग कमिटी (पी.एस.सी.)’ ची सभा झाली. ज्यात ४ जूनच्या पहाटे ६ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत चौक खाली करण्याचा निर्णय झाला. मार्शल लॉ लागू असल्याने सैन्याला सर्वाधिकार देण्यात आले होते. चौक खाली करताना कोणी अडथळा आणल्यास सैन्याला स्वसंरक्षणासाठी कोणताही मार्ग वैध ठरवला गेला होता. गोळीबार करण्याचा आदेश जरी नसला तरी ‘कोणताही मार्ग’ हा शब्द त्या आदेशाची पूर्तता करणारा होता. ‘पी.एल.ए’च्या २७, ६५ आणि २४ व्या बटालियनला बीजिंगमध्ये घुसण्याचे आदेश दिले गेले. ३ जूनच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सैन्याच्या तुकड्या शहराच्या वेशीत दाखल झाल्या होत्या. नागरिकांनी सैन्याला रोखू पाहिलं, मात्र चवताळलेल्या ‘पी.एल.ए’ ने अडवणाऱ्या नागरिकांवर देखील अंदाधुंद गोळीबार करून क्रूरतेची सीमा गाठली आणि शहरात प्रवेश मिळवला.
बीजिंगच्या मुख्य रस्त्यावरून सैन्याची वाहने, शस्त्रधारी सैन्य, रणगाडे आणि टाईप-६३ आर्मर्ड पर्सनल कॅर्रीयर्स मुख्य चौकाकडे कूच करत होते. ४ जूनच्या पहाटे १ वाजता सैन्य तीआनमेन चौकात पोहचलं आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आंदोलकांनी प्रत्युत्तर दिल्याने सैनिकांनी थेट गोळीबार करत चौकात रणगाडे घुसवत लोकशाही देवतेचा पुतळा, विद्यार्थ्यांचं सामान, सायकली व दिसेल त्यावर रणगाडे चालवले. सैन्याने केलेल्या गोळीबारात अंदाजे २७०० नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मृत्य झाला. यात दगावलेल्यांचा आकडा सरकारने कधीच जाहीर केला नाही.
सुमारे २ लाख ५० हजार इतकं जम्बो सैन्य त्यावेळी बीजिंगमध्ये आणण्यात आलेलं होत. ५ जून १९८९ ला बीजिंगमधून सैन्याचे रणगाडे माघारी फिरत असताना एक माणूस थेट या रणगाड्यांसमोर उभा राहिला, त्याला काही जणांनी नंतर बाजूला केलं. मात्र हा माणूस कोण होता?, त्याच नंतर काय झालं? हे सारे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. हा माणूस टॅंक मॅन म्हणून ओळखला जातो. टॅंक मॅन आणि त्याच्या समोरचा तो राक्षसी रणगाडा या घटनेचं प्रतीक बनून गेला. या आंदोलनात भाग घेतलेल्या हजारोना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटले दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केली गेली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या जाळपोळीत खाक झालेले पी.एल.ए. चे रणगाडे आणि गाड्या.
या घटनेनंतर अमेरिकेने चीनवर मानवी हक्काचं उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक निर्बंध घातले. चीनने मात्र वारंवार या घटनेची माहिती जगाला मिळू नये यासाठी प्रयत्न केले. सध्या चीनमध्ये असलेल्या baidu.com या सर्च इंजिनवर या घटनेची काहीही माहिती उपलब्ध नाही. या घटनेचा वृत्तांत सांगणाऱ्या पुस्तकांवर देखील चीनमध्ये बंदी आहे. जे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होते त्यांची मोस्ट वाँटेड यादी आजही चीन आपल्या जवळ बाळगून आहे. चीनमधून बाहेर पडत ज्यांनी जीव वाचवला त्यांच्यासाठी आजही चीनचे दरवाजे कायमचे बंद आहेत. ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता, त्यांचं जगणं चीनने मुश्किल केलं होत आणि आजही करत आहे. मात्र ४ जून हा दिवस आजही हाँग-काँग आणि तैवान या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मरला जातो.
आज चीन उद्योगधंदे, इलेक्ट्रॉनिक्स, औषधें आणि स्वस्त वस्तूंचा पुरवठादार झाला आहे. हा बदल तीआनमेन चौक घटनेनंतर अधिक प्रमाणात घडून आला. या घटनेत सर्वस्व गमावलेल्या लोकांच्या जीवावर आजची चिनी पिढी उभी आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. चीनने आपली भूमी जागतिक व्यापार आणि उद्योगधंदे यासाठी मोकळी केली. अनेक कंपन्यांनी आपली औद्योगिक आस्थापने चीनमध्ये स्थलांतरित केली. चीन जगाला कच्चा माल आणि पक्का माल पुरवठा करणारा एक महत्वाचा देश बनला. या घटनेनंतर ‘सीसीपी.’ अधिक बळकट झाली. जियांग चमिन आणि देंग-शाओपिंग या जोडगोळीने १९९७ ला हॉंगकॉंगचं ब्रिटिश सत्तेकडून कम्युनिस्ट चीनकडे काही अटींवर हस्तांतरण घडवून आणलं, तो एक वेगळाच इतिहास आहे. मात्र सध्या जे काही हॉंगकॉंग मध्ये घडतंय त्यावरून चीनमधलं भविष्य काय असेल, हे सांगणं खरंच कठीण आहे. ‘हॉंगकॉंग’मधील चळवळ अजून एक तीआनमेन हत्याकांड होऊ शकत किंवा ‘सी.सी.पी’ बदलू शकते.
COMMENTS