टीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश

टीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश

मुंबईः गेल्या वर्षीच्या टीआरपी घोटाळा प्रकरणी मंगळवारी मुंबई पोलिसांनी दुसर्या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांचे नाव समाविष्ट केले आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी सेशन कोर्टात टीआरपी घोटाळ्याचे १८०० पानांचे दुसरे आरोपपत्र दाखल केले, त्यात पहिल्यांदा अर्णव गोस्वामी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. पहिल्या आरोपपत्रात अर्णव यांचे नाव नव्हते.

आता दुस्या आरोपपत्रात अर्णव गोस्वामी यांच्यासह अन्य ७ नव्या आरोपींचे नाव आहे. यात रिपब्लिक टीव्हीच्यी सीओओ प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुलेकर, शिवा सुंदरम, बार्कचे सीईओ पार्थो दासगुप्ता व रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश आहे. या घोटाळ्यात एआरजी आउटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीही असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्वांवर फसवणूक व गुन्हेगारी कारस्थान रचणे अशा प्रकारचे आरोप लावले आहे.

टीआरपी घोटाळा नेमका काय होता?

गेल्या ऑक्टोबर महिन्यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवला असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्यावेळी पोलिसांनी ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्याच्या मालकांना अटक केली होती व त्यांच्याकडून ८ लाख रु.ची रक्कम जमा करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये आढळलेल्या या वाहिन्यांमधील प्रमोटरपासून कोणाही वरिष्ठ, कनिष्ठाची चौकशी केली जाईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशीही सुरू केली होती.

मुंबई पोलिसांच्या मते, ‘रिपब्लिक टीव्ही’च्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ यांनी हंसा या टीआरपी एजन्सीला हाताशी धरून आपला टीआरपी वाढवला होता. या एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांनी या वाहिन्या पाहाव्यात म्हणून त्यांना दर महिना ४०० ते ५०० रु. दिले जात होते. अशिक्षित घरांना इंग्रजी वाहिनी बघण्यास सांगितले जात होते. टीआरपीच्या आकडेवारीत बदल केले जात होते. या रॅकेटमध्ये ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ वाहिन्यांचे चालकही आढळल्याचा पोलिसांचा संशय होता. ‘रिपब्लिक टीव्ही’ने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले होते.

या वाहिन्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिले असून ती फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.

पण टीआरपी रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे नाव आल्यानंतर या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवरच आरोप करत सुशांत सिंह आत्महत्येच्या संदर्भातल्या चौकशीवरूनपरमबीर सिंग यांना सतत प्रश्न विचारल्याने त्यांनी असे आरोप केल्याचा आरोप केला. परमबीर सिंग यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे, असा इशारा गोस्वामी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता.

०० पानांचे आरोपपत्र

गेल्या नोव्हेंबर महिन्यात रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे होती. त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक व अन्य काही जणांचा समावेश आहे. या ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा आरोप जाहिरातदारांचा आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. पोलिसांनी आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.

COMMENTS