ट्रम्प आणि ‘चौघीजणी’

ट्रम्प आणि ‘चौघीजणी’

अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ, रशिदा तलैब, अयाना प्रेसली आणि इलहान ओमर या ट्रम्प यांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या लोकप्रतिनिधींमधील समान दुवा म्हणजे त्यापैकी कोणीही ‘गोऱ्या’ नाहीत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये या सगळ्या निवडून आल्या आहेत. यातील प्रत्येकीने आपल्या जागेवरून निवडून येताना इतिहास घडवलेला आहे.

गेल्या १०-१२ दिवसांपासून सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांवर वर्चस्व गाजवत आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी काँग्रेसमधील (संसद) चार महिला सदस्य यांच्यातील तुंबळ वाक् युद्ध. ट्विटरवरून आणि सार्वजनिक कार्यक्रमातून ट्रम्प या चौघींवर खरमरीत टीका करत आहे, त्या ज्यूविरोधी आणि अल-काईदा पाठिंबा देणाऱ्या आहेत असे आरोप करत आहेत, त्यांचे अमेरिकेवर प्रेम नाही व म्हणून त्या देश सोडून जाऊ शकतात असे इशारे देत आहेत. यावर या चौघीजणी आणि उदारमतवादी तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते उत्तरेही देत आहेत. ट्रम्प यांच्या विधानांची पाठराखणही काही रिपब्लिकन नेते हिरीरीने करत आहे. एकंदरीत कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला शोभणार नाही अशी मल्लिनाथी सोशल मीडियावरून चालली आहे, हे तर ट्रम्प यांचे ट्विट्स व त्यावर येणाऱ्या कमेंट्सवर नजर फिरवल्यावर लगेच स्पष्ट होते.

अर्थात तो मुद्दा नंतरचा झाला. मुळात ट्रम्प या चार लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र सोडण्यामागील कारणे व त्या चौघींची पार्श्वभूमी हे प्रथम व अधिक विचार करण्याजोगे मुद्दे आहेत.

मुळात अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ, रशिदा तलैब, अयाना प्रेसली आणि इलहान ओमर या ट्रम्प यांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या लोकप्रतिनिधींमधील समान दुवा म्हणजे त्यापैकी कोणीही ‘गोऱ्या’ नाहीत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये या सगळ्या निवडून आल्या आहेत. यातील प्रत्येकीने आपल्या जागेवरून निवडून येताना इतिहास घडवलेला आहे. यातील इलहान ओमर वगळता अन्य तिघींचा जन्म व पालनपोषण अमेरिकेत झाले आहे. या सगळ्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत (यातील अयाना प्रेसली या वयाने सर्वांत मोठ्या म्हणजे ४५ वर्षांच्या आहेत) आणि अत्यंत उदार विचारसरणीच्या आहेत. ट्रम्प यांच्या इमिग्रेशनविषयक धोरणांचा या सगळ्या सदस्य कायमच समाचार घेत आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या गर्भपातासंदर्भातील धोरणांवर यातील काही सदस्यांनी टीका केली आहे.

स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्याशी या सगळ्या सदस्यांचे गेल्या काही आठवड्यांत वारंवार खटके उडत आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकी काँग्रेसने बॉर्डर बिलाला मंजुरी दिल्याबद्दल या चारही सदस्यांनी टीकेची झोड उठवली. या विधेयकामुळे ट्रम्प प्रशासनाला दक्षिणेकडील सीमाभागात ४.५९ अब्ज डॉलर्स खर्च करण्याची परवानगी मिळाली आहे. हा कायदा म्हणजे स्थलांतरित मुलांना वाटेल तसे वागवण्यासाठी व्हाइट हाउसला मिळणारे  कोलीत ठरेल असा आरोप या सदस्यांनी केला.

बॉर्डर बिलासाठी मत देणे म्हणजे मुलांना पिंजऱ्यात कोंडण्यासाठी तसेच स्थलांतरित समुदायांना दहशतीखाली ठेवण्यासाठी मत देणे आहे, अशी टीका मिनेसोटाच्या प्रतिनिधी इलहान ओमर यांनी केली.

जर या सिनेट बिलाकडे एक पर्याय म्हणून बघितले जाणार असेल, तर याचा अर्थ आपला मूलभूत मानवी हक्कांवर विश्वास नाही, असे मत मिशिगनच्या प्रतिनिधी रशिदा त्लैब यांनी व्यक्त केले. अन्य दोघींनीही या विधेयकाचा खरपूस समाचार घेतला.

यावर स्पीकर पेलोसी यांनीही या चार सदस्यांच्या टीकेला फारसा अर्थ नाही. त्यांच्या मागे फारसे कोणी नाही. आम्हाला ट्विटरवर लढाया करायच्या नाहीत, तर समस्यांवर तोडगा काढायचा आहे व यासाठी हे विधेयक आहे, अशी भूमिका घेतली.

यावरही या चार सदस्यांनी टीका केली. या टीका आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये ट्रम्प यांनी १५ जुलै रोजी ट्विटरवरून या चार सदस्यांना लक्ष्य केले. काही सदस्य आपल्यावर व अमेरिकेवर विखारी टीका करत असून, त्यांनी अमेरिका सोडून जावे. स्पीकर पेलोसी त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय आनंदाने करतील अशा आशयाचे ट्विट ट्रम्प यांनी या सदस्यांच्या नावांचा थेट उल्लेख न करता केला होता.

त्यात पुन्हा या डेमोक्रॅट सदस्य मूळ ज्या देशांतील आहेत, तेथील सरकारे पूर्णपणे अनागोंदी असलेली, अत्यंत वाईट, प्रचंड भ्रष्ट आणि अयोग्य पद्धतीने चालवली जात आहेत आणि हे सदस्य आम्हाला, जगातील सर्वांत महान व शक्तिशाली राष्ट्राला, सरकार कसे चालवावे हे शिकवत आहेत, अशी टिप्पणीही ट्रम्प यांनी केली होती.

ट्रम्प यांच्या या ट्विटवर अनेक स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. इंग्लंडच्या तेव्हाच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी तर ट्रम्प यांचे विधान स्वीकारण्याजोगे नाही, अशी टीका केलीच पण ज्या स्पीकर पेलोसींची पाठराखण म्हणून ट्रम्प यांनी हे ट्विट केले होते, त्यांनीही ट्रम्प यांच्या ट्विटवर खरमरीत टीका केली. या सदस्यांना आपल्या देशात परत जा, असे सांगून ट्रम्प देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सदस्यांना परत पाठवून त्यांना अमेरिका ‘गोऱ्यांचे राष्ट्र’ करायचे आहे का? मात्र, आमचे वैविध्य ही आमची शक्ती आहे, अशी भूमिका पेलोसी यांनी घेतली आहे.

ज्या सदस्यांना ट्रम्प यांनी लक्ष्य केले होते, त्यांनी तर अशा टिप्पणीबद्दल ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग बसवण्याची मागणी केली. या ट्विटनंतर लगेचच ट्रम्प यांनी आपल्याला यातून कोणतीही वांशिक टिप्पणी करायची नव्हती, असा पवित्रा घेतला आणि या सदस्यच ‘रेसिस्ट’ आहेत असा कांगावा केला. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात इलहान ओमर यांच्यावर ट्रम्प यांनी टीका केली. यावेळी उपस्थित जनता ‘सेंड हर बॅक’ अशा घोषणा देत होती. आपण या घोषणेशी सहमत नाही, असे सांगत ट्रम्प यांनी हात झटकले, मात्र, त्या घोषणा देणाऱ्यांचा सच्चे राष्ट्रवादी या शब्दांत गौरव करून त्यांनी आपला दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट केली.

मुळात एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखाने त्याच्या प्रशासकीय धोरणांवर टीका करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देशाबाहेर जा असे सांगणे कमालीचे बेजबाबदार आहे. अर्थात ट्रम्प यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन होण्याची ही पहिली वेळ नाही.

अमेरिकी काँग्रेसमध्ये ‘स्क्वाड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्व सदस्यांची पार्श्वभूमी बघितली तर ट्रम्प यांच्या विधानांकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे, हे पटेल.

त्या चौघी कोण?

इलहान ओमर गेल्या नोव्हेंबरमध्ये मिनेसोटातून हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्हवर निवडून आल्या आहेत. मूळच्या सोमालियन असून, तेथील यादवीत १९९७ साली, त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. २००० मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले. ३७ वर्षीय ओमर या अमेरिकेतील पहिल्या सोमाली-अमेरिकी लेजिस्लेटर (लोकप्रतिनिधी) आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकी काँग्रेसवर प्रथमच निवडून जाणाऱ्या दोन मुस्लिम स्त्रियांपैकी त्या एक आहेत. संसदेत गेल्या १८१ वर्षांपासून, डोके झाकण्यावर असलेली बंदी उठवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यात यश मिळवत स्वत: हिजाब घालून सदस्यत्वाची शपथ घेतली.

‘मुस्लिम आता या देशात दुसऱ्या वर्गातील नागरिकाचा दर्जा सहन करून थकले आहेत आणि त्यांच्या धर्मातील काही व्यक्तींनी काही चुकीचे केले म्हणून आम्हाला आमचे नागरी हक्क सोडावे लागले आहेत’, असे इलहान एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यांनी अल-कैदाची प्रशंसा केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. मात्र, इलहान यांनी तो आरोप फेटाळून लावला आहे.

अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कोर्टेझ (यांचा उल्लेख सहसा एओसी असा केला जातो) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये पक्षाच्या न्यूयॉर्क डिस्ट्रिक्टमधील प्राथमिक निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते जो क्रोली यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षात वादळ निर्माण केले होते.

स्थलांतर, दारिद्र्य किंवा वंशभेद अशा कोणत्याही मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच थेट भूमिका घेतलेली आहे. पर्यावरणविषयक धोरणांबाबत त्या कायमच आग्रही राहिल्या आहेत. ट्विटरवर त्यांचे ५० लाख फॉलोअर्स आहेत.  ग्रीन न्यू डील रिझोल्युशनच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत. ओकॅशिओ-कार्टेझ यांनी ट्रम्प यांच्यावर ते ‘रेसिस्ट’ आहेत अशी टीका कायम उघडपणे केली आहे.

रशिदा त्लैब यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात मिशिगनमध्ये मिळवलेला विजयही अनेक अंगांनी ऐतिहासिक होता. काँग्रेसचे सदस्यत्व मिळवणाऱ्या त्या पहिल्या पॅलेस्टिनी-अमेरिकी स्त्री आहेत. त्यांचा जन्म मिशिगनमधील डेट्रॉइटमध्ये झाला असून, त्यांचे आईवडील पॅलेस्टिनी स्थलांतरित आहेत. त्यांची आजी आजही वेस्ट बँकमध्ये वास्तव्य करत आहे.

१४ भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या असलेल्या त्लैब त्यांच्या कुटुंबातील शाळा-कॉलेज पूर्ण करणाऱ्या पहिल्याच. अमेरिकी संसदेवर निवडून येणाऱ्या पहिल्या दोन मुस्लिम स्त्रियांपैकी त्या एक आहेत. (दुसऱ्या इलहान ओमर).

निवडून आल्यापासून त्या ट्रम्प यांच्यावर टीका करण्यास डगमगलेल्या नाहीत. मी सत्य बोलण्यास कचरणार नाही, असे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.

४५ वर्षांच्या अयाना प्रेसली याही मॅसॅच्युसेट्समधून अमेरिकी काँग्रेसवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकी-अमेरिकी स्त्री आहेत. २००९ साली त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. बोस्टन सिटी कौन्सिलवरील जागा जिंकून त्या सिटी कौन्सिलच्या १०० वर्षाच्या इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय (कलर्ड) स्त्री सदस्य ठरल्या.  प्रेसली यांनीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच १० वेळा निवडून आलेले मायकल कॅप्युआनो यांचा पराभव करून ओकॅशिओ-कोर्टेझ यांच्याप्रमाणेच डेमोक्रॅटिक पक्षात वादळ निर्माण केले होते.

काँग्रेसवर निवडून आल्यापासून त्या गर्भपाताच्या हक्काचे समर्थन करत आहेत. स्वत: लैंगिक छळाच्या अनुभवातून गेलेल्या प्रेसली यांनी अशा प्रकारांना बळी पडलेल्यांसाठी अधिक चांगल्या संरक्षणाची मागणी केली आहे. आपण ट्रम्प यांना ‘अध्यक्ष’ मानूच शकत नाही. ते केवळ व्हाइट हाउसचे ‘ऑक्युपंट’ आहेत अशी टीका प्रेसली यांनी केली आहे.

एकंदर या सर्व सदस्यांची पार्श्वभूमी हा या वादातील कळीचा मुद्दा आहे. आपण रेसिस्ट नाही असा दावा ट्रम्प यांनी कितीही केला, तरी त्यांचे वर्तन या दाव्याला सुसंगत नाही हे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. ट्रम्प यांना अमेरिकी संसद पुन्हा एकदा पूर्णपणे ‘व्हाइट’ झालेली हवी आहे आणि म्हणून ते आम्हाला लक्ष्य करत आहेत, असा आरोप इलहान ओमर, रशिदा त्लैब, अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ आणि अयाना प्रेसली या सगळ्यांनी केला आहे. आपण अमेरिकेच्या नागरिक आहोत. तसेच या देशावर अन्य नागरिकांइतकेच प्रेम आपणही करतो. मात्र, ट्रम्प यांच्या वर्णभेदी दृष्टिकोनामुळे ते आम्हाला लक्ष्य करत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात अधिकृत पाऊल उचलत प्रतिनिधीगृहाने (हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) अध्यक्षांची या चार सदस्यांविरोधातील टिप्पणी वर्णभेदाची तसेच भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करणारा ठराव मांडला. मात्र, १७व्या शतकातील एका नियमाचा दाखला देत रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.

या सर्व गोंधळात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नॉर्थ कॅरोलिना प्रांतात घेतलेल्या प्रचार रॅलीमध्ये इलहान ओमर यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवत ‘लव्ह इट ऑर लव्ह इट’ असा इशारा अमेरिकेबाबत त्यांना दिला. या लोकप्रतिनिधींना ‘अमेरिकेवर प्रेम करण्याची’ ‘तंबी’ देण्यापूर्वी त्यातील प्रत्येक जण अमेरिकेच्या सुमारे साडेसहा लाख लोकांचे प्रतिनिधित्व करते हे ट्रम्प यांनी लक्षात घेतले पाहिजे. तरुण वयात अत्यंत धडाडीने या सर्व स्त्रियांनी हे स्थान मिळवले आहे. त्यांचे मूळ देश, तथाकथित वर्ण, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहेत.  कारण, अमेरिकेतील जनतेमध्ये आज या सर्व देशांचे, वर्णांचे, धर्मांचे लोक आहेत. एकंदर आक्रमक राष्ट्रवादाची समस्या आता सर्वत्र हातपाय पसरू लागली आहे आणि या आक्रमक राष्ट्रवादाला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जाणे आवश्यक झाले आहे.

COMMENTS