बीजिंग/तैपैईः अमेरिकेच्या काही कायदा प्रतिनिधींच्या तैवान दौऱ्यावर प्रतिक्रिया म्हणून चीनने सोमवारी तैवानच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात नौदल प्रात्यक्ष
बीजिंग/तैपैईः अमेरिकेच्या काही कायदा प्रतिनिधींच्या तैवान दौऱ्यावर प्रतिक्रिया म्हणून चीनने सोमवारी तैवानच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात नौदल प्रात्यक्षिके केली. अमेरिकेचे पाच कायदा प्रतिनिधी तैवानच्या दौऱ्यावर आले होते आणि तैवानचे अध्यक्ष सै इंग वेन यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी तैवानमधील परिस्थिती स्थिर राहावी अशी अपेक्षाही या कायदा प्रतिनिधींनी व्यक्त केली. हे प्रतिनिधी मंडळ लगेचच तैवानहून रवाना झाले.
अमेरिकेच्या या पावलावर सोमवारी चीनच्या नौदलाने प्रतिक्रिया देत तैवाननजीकच्या पेंगशू बेटांच्या परिसरात प्रात्यक्षिके केली. हे बेट तैवानच्या आखातात आहे व हा प्रदेश सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. चीनची १५ लढाऊ विमानांने तैवानच्या खाडीत प्रवेश केला असा दावा तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा वादग्रस्त दौरा केला होता. त्यावेळी चीनने काही लष्करी प्रात्यक्षिके करून अमेरिका-तैवानच्या संबंधांवर नाराजी व्यक्त केली होती. चीनने आपले लष्करही सज्ज ठेवल्याच्या बातम्या येत होत्या. अमेरिकेच्या युद्धनौकाही रेड अलर्टवर होत्या.
सोमवारी अमेरिकेच्या कायदा प्रतिनिधींचा तैवानचा अधिकृत दौऱा होत असताना चीनने या दौऱ्यावर आपली तीव्र नापसंती व्यक्त केली. अमेरिकेच्या कायदा प्रतिनिधींचे असे दौरे चीनच्या सार्वभौमत्वावर व प्रादेशिक सीमांवर हल्ले असून अमेरिका या प्रदेशातील शांतता व स्थिरता भंग करत असल्याचा आरोप चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. आमचे सैन्य आमच्या सीमारेषांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून तैवानमधील कोणत्याही फुटीरवादी शक्तींचा आम्ही पाडाव करू अशी धमकीही संरक्षणमंत्र्यांनी दिली.
अमेरिकेचे तैवानशी थेट राजनयिक संबंध नाहीत पण अमेरिकेचे एक तथाकथित दुतावास तैपैईमध्ये आहे. या कार्यालयाकडून चीनच्या कोणत्याही अधिकारशाहीला थेट उत्तर दिले जाईल, तैवाने कोणाशी मैत्रीचे संबंध ठेवायचे याचा सल्ला चीनची अधिकारशाही देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया आली आहे.
मूळ वृत्त
COMMENTS