इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला, कंपनी खटला भरणार

इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला, कंपनी खटला भरणार

एका पत्रात, इलॉन मस्क यांनी म्हटले आहे, की ट्विटरने कराराच्या संदर्भात आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन केले नाही आणि बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या देखील उपलब्ध करून देण्यात अयशस्वी झाले, ज्यामुळे करार रद्द करण्यात आला. दुसरीकडे ट्विटरने हा करार कायम ठेवण्यासाठी मस्कवर खटला भरणार असल्याचे सांगितले.

सॅन फ्रान्सिस्को: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी शुक्रवारी (८ जुलै) ट्विटरच्या बोर्डाला सांगितले की ते खरेदी करार रद्द करत आहे. यानंतर ४४ अब्ज डॉलर्समध्ये मायक्रोब्लॉगिंग साइट खरेदी करण्याचा त्यांचा करार अडचणीत सापडला आहे.

मस्क म्हणाले की कंपनी ट्विटरवरील बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पुरेशी माहिती देऊ शकली नाही, ज्यामुळे त्यांनी करार रद्द केला.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला लिहिलेल्या पत्रात, मस्क म्हणाले, की ट्विटरने या कराराच्या संदर्भात आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन केले नाही आणि बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या उघड करण्यातही अयशस्वी झाले.

दुसरीकडे, ट्विटरने सांगितले की ते करार चालू ठेवण्यासाठी टेस्लाच्या सीईओवर दावा दाखल करतील.

गेल्या महिन्यात, ट्विटरच्या संचालक मंडळाने मस्कचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याच्या करारास मान्यता देण्याची शिफारस केली होती.

तथापि, मस्कने ट्विटर विकत घेण्याची ऑफर ज्या किंमतीला दिली होती त्या तुलनेत सोशल मीडिया कंपनीच्या शेअरची किंमत लक्षणीयरीत्या घसरली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर हा खरेदी करार पूर्ण झाला असता, तर कंपनीच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रत्येक शेअर्सवर १५.२२ डॉलरचा भरीव नफा झाला असता. मस्कने प्रति शेअर ५४.२० डॉलर  या दराने कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची ऑफर दिली होती.

मस्कचे वकील माईक रिंगलर यांनी ट्विटरच्या बोर्डाला लिहिलेल्या पत्रात तक्रार केली आहे, की त्यांच्या आशिलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट किंवा स्पॅम खात्यांचा प्रसार मोजण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा डेटा मागितला होता. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, ट्विटर ही माहिती देण्यात अपयशी ठरले आहे किंवा त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कधी ट्विटरने मस्कच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे, कधी अयोग्य वाटणाऱ्या कारणांमुळे ती नाकारली आहे, तर कधी मस्कला अपूर्ण माहिती देऊन त्याचे पालन केल्याचा दावा केला आहे.

मस्क म्हणाले की ही माहिती ट्विटरच्या व्यवसायासाठी आणि आर्थिक कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि करार पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, मस्कच्या वकिलाचे म्हणणे आहे की, ट्विटरने त्या करारातील अनेक तरतुदींचे भौतिक उल्लंघन केले आहे. असे दिसते की त्यानी (ट्विटरने) खोटे आणि दिशाभूल करणारे चित्र सादर केले होते, ज्यावर मस्कने समझोत्यात विश्वास ठेवला होता.’

मस्कने असेही सांगितले की तो या करारातून माघार घेत आहे कारण ट्विटरने सध्याची व्यवसाय स्थिती कायम ठेवण्याचे म्हटले असतानाही, त्यांनी अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना काढून टाकून कर्तव्याचे पालन केले नाही.

पत्राच्या उत्तरात, ट्विटरच्या बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी ट्विट केले की बोर्ड मस्कसोबत किंमत आणि अटींवर सहमत आहे आणि करार पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. विलीनीकरणाच्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार मंडळ करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

८ जुलै रोजी ट्विटरचे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरून ३६.८१ डॉलरला आले. दरम्यान, टेस्लाचे शेअर्स २.५ टक्क्यांनी वाढून ते ७५२.२९ डॉलरवर पोहोचले.

व्यवसाय विश्लेषक डॅन इव्हस यांनी गुंतवणुकदारांना दिलेल्या समालोचनात लिहिले, की ही ट्विटर आणि त्याच्या बोर्डासाठी एक आपत्ती आहे. करार पुनर्संचयित करण्यासाठी किंवा १ अब्ज डॉलरची नुकसान भरपाई शुल्क प्राप्त करण्यासाठी ट्विटरला दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागेल.

मूळ वृत्त

COMMENTS