ड्रग्ज पार्टी : एनसीबीच्या धाडीत भाजपचा कार्यकर्ता

ड्रग्ज पार्टी : एनसीबीच्या धाडीत भाजपचा कार्यकर्ता

मुंबईः कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड घालताना बॉलीवूड अभिनेता शाह रुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ज्या व्यक्तींनी ताब्यात घेतले त्या व्यक्ती अमली पदार्थ नियंत्रण विभागाशी (एनसीबी) संबंधित नव्हत्या तर त्या व्यक्तींपैकी एक भाजपचा एका उपाध्यक्ष मनीष भानुशाली व दुसरी व्यक्ती के. पी. गोसावी असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या आरोपामुळे एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहात असतानाच काही वेळा नंतर एनसीबीने मलिक यांचे आरोप फेटाळून लावले पण बुधवारी रात्री आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचे मनीष भानुशाली याने जाहीरपणे कबुल केले. साम टीव्हीशी बोलताना त्याने, क्रूझवरील या पार्टीची माहिती एनसीबीला देण्यासाठी आपण तिथं गेलो होतो. तसेच या कामामुळं आता आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

भानुशाली यांनी सांगितले की, ” मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. मुंबईत ड्रग्ज पार्टी होणार असल्याची मला माहिती मिळाली होती. ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केली. आपले तरुण या नरकात ढकलले जात आहेत हे थांबवण्यासाठी मी हे पाऊल उचललं. पण या गोष्टीमुळं माझ्या जीवाला ड्रग्ज तस्करांपासून धोका निर्माण झाला आहे. कारण मी एनसीबीला त्यांच्या कारस्थानांची माहिती देऊन त्यांचा भांडाफोड केला आहे.

आमच्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खूपच चांगलं काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे दोन-तीन इनपूटही आले होते त्याच्या आधारे त्यांनी ही धाड टाकली. यामुळे जे आरोपी आहेत ते सर्वजण पकडले गेले आहेत. २ ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशी मी एनसीबीच्या कार्यालयात गेलो आणि त्यांना ही खबर दिली. यावेळी त्यांनी याची आम्हाला संपूर्ण माहिती द्या असं सांगत त्यांच्यासोबत घेऊन गेलो असे भानुशाली यांनी सांगितले.

२०१० मध्ये मनीष भानुशाली यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे.

सध्या माझ्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही त्यामुळे मी साधा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाचा कार्यकर्त्या असण्यापूर्वी मी देशाचा सजग नागरिक असून देशात चुकीच्या कारवायांबाबत माहिती मिळाल्यानं ती शेअर करणं गरजेचं समजतो, असेही भानुशाली यांनी सांगितले.

प्रकरण नेमके काय आहे?

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली. या कारवाईवर राष्ट्रवादीने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले, त्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले, तो व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्या व्यक्तीचे फोटो भाजपच्या नेत्यांसाबत आहेत, असा गौप्यस्फोट केला.

एनसीबीच्या कारवाईवेळी तेथे दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे के. पी. गोसावी, भानुशाली अशी असून त्यांनी संशयित आरोपींना हाताळले. गंभीर बाब म्हणजे भानुशालीचा भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत. या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत याचा खुलासा करावा आणि त्यांनी संशयित आरोपींना दोघांनी का हाताळलं, असा सवाल मलिक यांनी केला. शाहरुखचा मुलगा आर्यन सोबत सेल्फी घेणारा व्यक्ती कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.  ड्रग्ज पार्टी म्हणजे रचलेली गोष्ट आहे, असाही त्यांनी आरोप केला.

नवाब मलिक म्हणाले, “एएनआयने असा व्हीडीओ रिलीज केला की ज्यामध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दिसून आलं. पहिल्या व्यक्तीचं नाव आहे के. पी. गोसावी तर मनीष भानुशाली हे दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तोही एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर तो भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचा फोटो देशाच्या पंतप्रधानासोबत फोटो आहे, अमित शहांसोबत आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. गुजरातच्या अनेक नेत्यांसोबत आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत आहे. एनसीबीने हे स्पष्ट करावं की, हे दोघे कोण आहेत आणि यांचा तुमच्याशी काय संबंध आहे?”

एनसीबीचे स्पष्टीकरण

मलिक यांच्या आरोपानंतर एनसीबीने तातडीने पत्रकार परिषद घेत आमही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच ही कारवाई केली आहे. क्रूझवरील पार्टीतून ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, असे सांगितले. मलिक यांनी ज्या दोन व्यक्तींची नावे घेतली होती ते दोघेही या कारवाईत साक्षीदार असल्याचे नमूद करताना त्यात काहीही गैर नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘एनसीबीच्या कारवाईबाबत जे आरोप करण्यात आले आहेत ते निराधार आहेत. आम्हाला जी खबर मिळाली होती त्याआधारेच आमच्या टीमने क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत क्रूझवरून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून ड्रग्ज आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात आली. आमचा तपास अजूनही सुरू आहे’, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. कारवाईवर कुणाला शंका असल्यास ते कोर्टात जाऊ शकतात. आम्ही तिथे आमचे म्हणणे मांडू, असेही सिंह यांनी नमूद केले. भाजप पदाधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीचा कारवाईत सहभाग होता, असा मलिक यांचा आरोप होता तोही सिंह यांनी फेटाळला. ही जी नावे घेण्यात आली आहेत ते साक्षीदार होते. त्यांच्यासह आणखीही काही व्यक्ती होत्या. तशी तरतूद कायद्यात आहे. त्यात काहीही गैर नाही, असे सिंह म्हणाले.

COMMENTS