ब्रिटन, रशियाकडून कोविड लसीकरण मोहिमेस परवानगी

ब्रिटन, रशियाकडून कोविड लसीकरण मोहिमेस परवानगी

लंडनः ब्रिटन सरकारने फायझर व बायोनटेक या औषध कंपनीला त्यांनी विकसित केलेली कोविड-१९वरची लस वापरण्यास परवानगी दिली आहे. पुढील आठवड्यात ही लस ब्रिटनमध्ये वापरली जाणार आहे.

तर दुसरीकडे रशियानेही पुढील आठवड्यापासून देशात कोविड लसीकरण मोहीमेची घोषणा केली आहे. रशियाने कोरोनावर स्फुटनिक लस निर्माण केली असून या लसीचे पहिले २० लाख डोस पुढील आठवड्यात शिक्षक व आरोग्य सेवकांना द्यावेत, असे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले आहेत.

अशारितीने कोविड-१९वरची लस सार्वजनिक स्तरावर वापरण्याची परवानगी देणारे ब्रिटन व रशिया हे जगातले अग्रेसर देश ठरले आहेत. सरकारने दिलेल्या परवानगीमुळे आमच्यासाठी व विज्ञानासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रिया फायझर-बायोनटेकने दिली आहे.

फायझर व बायोनटेकने ब्रिटनच्या सरकारकडे कोविड-१९वरील लस वापरण्याची परवानगी मागितली होती. त्या आधी या लसीच्या परवानगीसाठी कंपनीने ब्रिटनच्या आरोग्य नियंत्रण संस्था – मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्लुलेटरीकडे-अर्ज केला होता. या संस्थेने कोविड-१९वरची फायझर-बायोनटेकने विकसित केलेली लस ९५ टक्के गुणकारी असून ती पुढील आठवड्यात वापरली जाण्यासाठी सुरक्षित आहे, असे शिक्कामोर्तब केल्यानंतर ब्रिटनने सरकारने लस वापरण्यास परवानगी दिली आहे.

ब्रिटनने या लसीचे ४ कोटी डोस अगोदर मागवून ठेवले होते. त्यानुसार अत्यंत गरजू कोरोना बाधित रुग्णांवर प्रथम या लसीने उपचार केले जातील. नंतर प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जाणार आहेत. थोडक्यात २ कोटी ब्रिटीश नागरिकांना कोरोनावरची लस दिली जाणार आहे.

कोरोना महासाथीचा उद्रेक झाल्यानंतर सुमारे १० महिन्यानंतर पहिल्यांदा अशी विकसित केलेली लस दिली जाणार आहे.

वास्तविक एखादी लस तयार करण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ जातो. पण कोरोनावरची लस युद्धपातळीवर विकसित केली गेली आहे.

पण कोरोनाची लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे, असे काही विशेषज्ञ सांगत आहेत.

दुसर्या कंपन्यांची लसही बाजारात येण्याच्या तयारीत

फायझर-बायोनटेक या कंपन्यांव्यतिरिक्त मॉडर्ना कंपनीची, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, एस्ट्राजेनेका कंपनीच्या लस बाजारात येण्याच्या तयारीत आहे.

ब्रिटनने या अगोदर मॉडर्नाच्या ७० लाख लसींची व ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका लसीच्या १० कोटी खुराकांची मागणी नोंदवून ठेवली आहे.

चीनने आपल्या लसीला मंजुरी मिळाली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट कोविड-१९वर लस विकसित करत आहे.

मूळ बातमी

COMMENTS