ज्युलियन असांजेच्या प्रत्यार्पणास इंग्लंडची मंजुरी

ज्युलियन असांजेच्या प्रत्यार्पणास इंग्लंडची मंजुरी

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ५० वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, त्याविरोधात अपील करण्यासाठी असांज यांच्याकडे १४ दिवसांचा अवधी आहे. २०१० आणि २०११ मध्ये हजारो गुप्त लष्करी आणि राजनैतिक दस्तऐवज प्रकाशित केल्याप्रकरणी असांज अमेरिकेला हवा आहे.

भारतीय वाहनविषयक माहिती जर्मन कंपनीला मिळाली
संघराज्य संबंधांना आव्हान देणारे एनआयए
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हतीः काही कुटुंबियांचा खुलासा

लंडन: युके सरकारने शुक्रवारी (१७ जून) इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांशी संबंधित गोपनीय दस्तऐवज फोडल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजेचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली.

गृह मंत्रालयाने सांगितले, की गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ५० वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

अमेरिकेत जाण्यापासून वाचत राहिलेल्या असांजेच्या अनेक वर्षांपासून चाललेल्या कायदेशीर लढाईत हे एक महत्त्वाचे वळण आहे. मात्र, असांजेच्या प्रयत्नांचा हा शेवट नसून याविरोधात अपील करण्यासाठी त्याच्याकडे १४ दिवसांचा अवधी आहे.

असांजेच्या कायदेविषयक टीमने केलेल्या अपीलमुळे कायदेशीर लढाईची दुसरी फेरी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

युकेच्या गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले, “१७ जून रोजी, मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांचा विचार केल्यानंतर, ज्युलियन असांजेला अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याचा आदेश देण्यात आला. असांज यांच्याकडे अपील करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी आहे. प्रत्यार्पण कायदा २००३ नुसार, आदेशाला स्थगिती देण्याचे कोणतेही कारण नसल्यास, प्रत्यार्पणाच्या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. न्यायाधीशांनी विविध बाबी लक्षात घेऊन त्यावर निर्णय दिल्यानंतरच प्रत्यार्पणाची विनंती गृहमंत्र्यांकडे पाठवली जाते. युके न्यायालयांना असे आढळलेले नाही, की असांजेचे प्रत्यार्पण जाचक, अन्यायकारक किंवा प्रक्रियेचा गैरवापर आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले.

ते म्हणाले की असांजेचे प्रत्यार्पण त्याच्या मानवी हक्क, न्याय्य अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध असेल किंवा त्याला अमेरिकेत चांगली वागणूक दिली जाणार नाही, असे न्यायालयांना आढळले नाही.

आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे असांजे म्हणत आहे. २०१९ मध्ये इक्वेडोरच्या दूतावासातून ताब्यात घेतल्यापासून त्याला लंडनच्या बेलमार्श तुरुंगात ठेवण्यात आले आहे. जामीन अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

त्याने इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. स्वीडनमधील लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांना सामोरे जाण्याचे टाळण्यासाठी आणि प्रत्यार्पण टाळण्यासाठी असांजे २०१२ पासून दूतावासात राहत होता. त्याने लैंगिक गुन्ह्यांचे आरोप नाकारले होते आणि अखेरीस त्याच्याविरुद्धचे हे आरोप वगळण्यात आले.

विकिलिक्सने ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की  “लढा संपलेला नाही. ही केवळ नव्या कायदेशीर लढाईची सुरुवात आहे. आम्ही कायदेशीर यंत्रणेद्वारे अपील करू.”

वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि ब्रिटिश लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन नागरिक असांजेने या वर्षी मार्चमध्ये तुरुंगात असताना दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या ३८ वर्षीय स्टेला मॉरिसशी लग्न केले. या जोडप्याला ४ वर्षांचा गॅब्रिएल आणि २ वर्षांचा मॅक्स असे दोन मुलगे आहेत.

मॉरिस यांनी शुक्रवारच्या निर्णयानंतर सांगितले, की “या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी घेणाऱ्या कोणालाही लाज वाटली पाहिजे, की गृह मंत्र्यांनी ज्युलियन असांजेच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे, ज्या देशाने त्याची हत्या करण्याचा कट रचला होता.”

त्या म्हणाल्या, “ज्युलियनने काहीही चुकीचे केले नाही. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि तो गुन्हेगार नाही. तो पत्रकार आणि प्रकाशक आहे आणि त्याचे काम केल्याबद्दल त्याला शिक्षा होत आहे.”

डिसेंबर २०२१ मध्ये, ब्रिटनमधील लंडन उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि ज्युलियन असांजेला अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याचा मार्ग खुला केला.

एका दशकापूर्वी विकिलिक्सने गुप्त लष्करी दस्तऐवज प्रकाशित केल्याच्या संदर्भात हेरगिरीच्या आरोपांचा सामना करत असलेल्या असांजेच्या प्रत्यार्पणाची अमेरिकेची विनंती कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जानेवारी २०२१ मध्ये नाकारली होती.

५० वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक ज्युलियन असांजे हा २०१० आणि २०११ मध्ये हजारो गुप्त लष्करी आणि राजनैतिक दस्तऐवज प्रकाशित केल्याप्रकरणी अमेरिकेत हवा आहे.

असांजेवर अमेरिकेत हेरगिरीचे १७ आरोप आणि संगणकाच्या गैरवापराचा एक आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांमध्ये दोषी आढळल्यास, त्याला जास्तीत जास्त १७५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0