डॉ.गेल ऑमव्हेट समजून घेताना!

डॉ.गेल ऑमव्हेट समजून घेताना!

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची नव्या पद्धतीची मांडणी करणाऱ्या संशोधक -लेखिका, कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांच्या योगदानावर दोन दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावर पुस्तक संपादित करण्याचे काम सुरू आहे. प्रस्तुत लेख हा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर आधारित आहे.

…तू बुद्धाचा माग काढत आलीस
चंगळवादी स्वदेश सोडून!
तू आमच्या लढ्याचा भाग झालीस.
तू चोखोबाची हाडं गोळा केलीस,
तू तुकोबाची गाथा शोधलीस.
तू नामदेवांची पताका ऊंच केलीस आम्हाला दिसेलशी
आणि एका प्राच्यबिंदूपासून, मध्ययुगीन भक्ती चळवळीपासून ते
आधुनिक काळापर्यंतचे समतेचे वारकरी वाद प्रतिवाद करत
पण हातात हात घालून आणलेस बेगमपुऱ्यात
… धम्मसंगिनी!

डॉ. गेल ऑमव्हेट यांनी सामाजिक विचार आणि तत्वज्ञानाकडे चळवळ म्हणून पाहिले. तत्वज्ञान समाजान्मुख असावे, अशी त्यांची धारणा होती. सामान्य माणसांबद्दल त्यांच्या मनात खोल कणव होती. त्याच्या उत्थानासाठी जे जे करता येईल, ते ते त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या चिंतनाचा व कार्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. शुष्क तत्वचिंतनामध्ये त्यांना स्वारस्य नव्हते.

डॉ. गेल ऑमव्हेट यांचे भाषण ऐकताना व्यासपीठावर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम.

डॉ. गेल ऑमव्हेट यांचे भाषण ऐकताना व्यासपीठावर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम.

भारताची स्वातंत्र्यलढयातून पुढे येऊन एका दिशेने वयातच सुरू होती. त्या दृष्टीने होणारी जागृती, प्रेरणा, उत्साह या गोष्टींनी निर्माण झालेले वातावरण प्रभावी होते. चळवळी, आंदोलने, घडामोडी, उलथापालथी यांचा तो काळ होता. १९७० नंतरचा काळ हा समस्या व संघर्ष यांनी भरलेला, भारलेला होता. त्यामुळे केवळ विविध प्रकारच्या तीव्र कृतीच त्यात नव्हत्या तर विविध प्रकारचे विचार, सिद्धांत, तत्वे यांचा अभ्यास व ऊहापोह होत होते. या गोष्टी समाजात एकित्रितपणे व समाजाच्या विशिष्ट उद्देशासाठी होत असल्याने याविषयीचे वाद, संवाद, विवाद, चर्चा या गोष्टीही होत होत्या. याकाळात विचार, कृती, चळवळी यांचे वैविध्य होते त्यांच्यात संघर्ष होते. याकाळात एकूण जगात मार्क्सच्या विचारांचे प्राबल्य होते, त्यामुळे मार्क्सवादाचे वाचन, अध्ययन या गोष्टी वेगवेगळया अंगांनी होत होत्या. मार्क्सवादाने एक सामाजिक जाणीव जागृती केली होती. आणि सामाजिक प्रगतीसाठी एक दृष्टी, एक गती, एक उत्साह आणि स्फूर्ती दिली होती.

प्रा.गेल ऑमव्हेट याच काळात मार्क्सवाद, फुले-आंबेडकरवाद, स्त्रीवाद, समाजवाद, सामाजिक सिद्धांतांवरील वाचन, मनन करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विचाराला खोली गांभीर्य, ठामपणा व व्यापकता प्राप्त होत गेली. त्यांच्या कार्यातून जसा त्यांचा विचार फुलत गेला तसेच त्यांच्या जीवनातून त्यांचे कार्य वृद्धींगत होत गेले. विचार व कार्य यांचा परस्परावलंबी संबंध त्यांच्या जीवनात व्यक्‍तीमत्वात सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या चळवळ स्वरुपाच्या होत्या. त्यातील प्रत्येक गोष्टीला वैचारिक अधिष्ठान होते. यातूनच त्यांच्या व्यक्‍तीमत्वाची तात्विक बैठक घडत गेली. विकसित होत गेली आणि निष्ठांच्या स्वरुपात अभिव्यक्‍त होत राहिली. भारतीय सामाजिक विचार आणि तत्वज्ञानाला समजून घेणारी दृष्टी व भूमिका त्यांच्या वैचारिक साहित्यातून मिळते. त्यांचे प्रत्येक विचार हे आशयघन आणि सामाजिक, राजकीय समस्यांवरची समग्र प्रतिक्रिया आहे.

अफाट वाचनशक्ती, आणि भरपूर जगभर फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल ऑमव्हेट या सर्वत्र फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकार आणि सहभाग घेत राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात त्या नेहमीच पुढे राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या.

डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली, ‘ द हिंदू’ या वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. ‘द हिंदू’मधील लेख वाचून चक्क विरप्पन सुद्धा प्रभावीत झाला होता.

डॉ. गेल यांची कल्चरल रीवोल्ट इन कलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्हल्युलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेन्ट इन इंडिया अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ७० पेक्षा जास्त पुस्तक परीक्षणे त्यांनी अंतरराष्ट्रीय नियतकालिकांत लिहिली आहेत.

प्रा. गेल ऑमव्हेट भारताला देशाच्या सर्वांगीण्‍ विकासाच्या दृष्टीने बघतात. मार्क्स, फुले, आंबेडकरांवर सर्वत्र संशोधन होत आहे, पण अमेरिकेतून भारतात येऊन रस्ता, मोर्चा, मंच, वृत्तपत्र, पुस्तक संशोधन संस्थांमध्ये त्यांना  सर्वांनी  पहिले आहे. त्यांचे हे वादळी व्यक्‍तीमत्व हजारो लाखो देश-विदेशी शोधकर्त्यांना व सामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत होते.

भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार ऑमव्हेट यांनी मांडला. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली. भारतात सुरु असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीने भारावून गेलेल्या गेल यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न घेऊन कष्टकरी जनतेच्या लढ्यात झोकून देऊन, झपाटून काम केले. डॉ गेल यांचे संशोधन, त्यांचे लिखाण, त्यांचा कष्टक-यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातुन केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला.

प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुण साभार.

प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार.

प्रा. गेल ऑमव्हेट यांच्या अभ्यासाची व्याप्ती आणि आवाका खूप मोठा आणि व्यापक आहे. आज अनेक विषयांत अंतिम निष्कर्षावर पोचण्यापूर्वी किंवा काही शंका असेल तर डॉ. गेल ऑमव्हेट काय म्हणतात, हे बघितले जाते. डॉ.गेल ऑमव्हेट या आधुनिक भारतातील सर्वात जैविक विचारवंतांपैकी एक विद्वान आणि महान स्त्रीवादी अंतर्दृष्टी असलेली व्यक्ती होती. येथी अनेक प्रस्थपित विचारवंताना  त्यांनी आव्हान दिले. कॉ. बी. टी. रणदिवे, अरुंधती रॉय, ते बालगोपाल यांचा त्यात समावेश होतो . जात, वर्ग, लिंगभाव, धर्म, वंश, रंगभेद व त्याबाबत मार्क्स, फुले-आंबेडकरी तत्वज्ञान याचे आंतरशाखीय आकलन त्यांच्या संशोधनातून त्यांनी अभ्यासकांना करुन दिले. विविध राजकीय सामजिक भूमिकाचा चिकित्सक मागोवा घेतला. हे करीत असतांना अनेकदा त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल बरेच वाद-विवाद निर्माण झाले. उदाहरणार्थ आरक्षण किंवा शेतकरी संघटना याबाबत गेल ऑमव्हेट यांच्या भुमिका.

भारतातील बहुजनांनी केलेला संघर्ष व बळी राज्य वा बहुजन राष्ट्र वा बेगमपुरा निर्मिती वा बौद्ध धम्म शोध यामागील प्रेरणा, व बीजे पेरणा-या बहुजन नायक -नायिकांचे ऐतिहासिक योगदान गेल ऑमव्हेट यांनी सखोल संशोधनाद्वारे बाहेर आणले. त्यांच्या या संशोधनाचा पाया या देशातील बहुजन वा ब्राह्मणेतर जातींमधील स्त्री-पुरुषांचा राजकीय, आर्थिक, जातीय तसेच पुरुषसत्तेशी झालेल्या संघर्ष व चळवळीतेील सहभागाची योग्य दखल घेणे आहे. कारण गेल स्वत: परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय राहिल्या.

ज्यावेळी येथील संशोधक मंडळी ब्राह्मणवादी संस्कृतीच्या पायावरच नवराष्ट्र व राष्ट्रवादाची उभारणी करीत होते. तेव्हा गेल ऑमव्हेट, रोझालिंड ओ-हँन्लो्न, एलिनोर झेलिएट, पौलिन कोलेंडा या भारताबाहेरील विदुषी भारतातील बहिष्कृत वर्गाचे वास्तव समोर आणत होत्या. जिथे बहुजनांची व स्त्रियांची गणना शूद्रात केली गेली होती.  त्या बहिष्कृत बहुसंख्यांक भारतीय जनतेच्या योगदानाचा, त्यांच्या श्रमावर उभ्या राहिलेल्या अब्राह्मणवादी संस्कृती व ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या संघर्षाचे ऐतिहासिक, वर्तमान आकलन गेल ऑमव्हेट यांच्या लेखनात आढळते. तसेच शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, कष्टकरी उत्पादक जाती, हिंदुत्ववादाविरोधी दलित-बहुजन पर्यायी संस्कृती या संदर्भातील संपूर्ण जगभरात प्रकाशित होत असलेल्या पुस्तके, निबंध, प्रबंध यांची चिकित्सक समीक्षा इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली सारख्या मासिकातून सुमारे ७० च्या आसपास समीक्षापर लेख गेल यांनी लिहिलेले दिसतात.

‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड प्राध्यापक’ या डॉ.गेल ओम्वेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचे नाव “Cultural Revolt in Colonial society in Non Brahmin movement  in western India  1873-1930” हे आहे. कॉ.पि.डी. दिघे यांनी १९८७  त्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. आणि १९९५ साली सुगावा प्रकाशनातर्फे ते पुस्तक मराठीत पहिल्यांदा प्रकाशित झाले. इंग्रजी पुस्तक ‘सायंटिफिक सोशालिस्ट एज्युकेशन ट्रस्ट’ यांच्या मार्फत प्रकाशित झाले होते. या पुस्तकात महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचा इतिहास आहे. त्याच्या चळवळीचा लेखाजोखा आहे. तो त्या कष्टकरी समाजासमोर आला. हे पुस्तक एका विशिष्ट कालखंडातील वस्तुस्थितीशी संबंधित माहितीचा खजिनाच आहे. वर्गवादी आणि वर्णवाद विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रबोधन व्हावे आणि समतावादी चळवळीचा पाया मजबूत व्हावा हा त्याचा उद्देश आहे. त्या मोठ्या झाल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत हा त्याचा हेतू आहे. जात वर्ग विरोधी कार्यकर्त्यांसमोर एक प्रकारचा कष्टकऱ्यांचा जो वस्तुनिष्ठ इतिहास आहे तो समोर यावा असा एक प्रयत्न या पुस्तकाच्या भाषांतरामागे आपल्याला दिसतो. या पुस्तकांमध्ये त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे लाल निशाण पक्षाचे संस्थापक एस के लिमये, कॉ. यशवंत चव्हाण यांचाही सहभाग राहिला आहे.

१०७०-७१ मध्ये ऑमव्हेट यांनी सत्यशोधक चळवळीची दुर्मिळ कागदपत्रे गोळा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्या काळातील अनेक विचारवंत लेखक यांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्रातून आशिया आणि भारताच्या संदर्भामध्ये एकूण जो काही अभ्यास झालेला आहे, त्यात शेतकरी चळवळ, ब्राह्मणेतर आंबेडकरवादी चळवळी, वर्गवादी चळवळी आहेत. त्यांची मूळ साधने तपासत, त्याचा संदर्भ देत या अस्सल कागदपत्रांमधून हा विषय पुढे जातो. हा बहुजन समाजाचा कष्टकरी समाजाचा वेगळा इतिहास आहे.

त्या काळामध्ये श्रमिक मुक्ती दलासारखी संघटना काम करते. त्यानंतर मागोवा नावाचा ग्रुप जो अतिशय बुद्धिवादी आणि कठोर चिकित्सा करणारा होता. तो सुद्धा या पुस्तकाच्या प्रेरणेतून निर्माण झाला आहे असे आपल्याला दिसते.

मार्क्सवादानुसार वर्ग ही एकमेव शोषणाची व्यवस्था आहे पण अपारंपरिक मार्क्सवाद्यांनी ‘बेसिक स्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर’ ही मांडणी खोडून काढली. मार्क्सवादाचा विस्तार केला. बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद याची मांडणी केली. वर्ग जाती प्रमाणेच पुरुष सत्ता ही बहुतेक शासनाची संस्था आहे असे त्यांनी मानले.

महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीने वासाहतिक समाजांतर्गत असणाऱ्या जातीय शोषणाचा प्रश्न पुढे रेटला आणि जनतेच्या लोकशाही आकांक्षांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला पण भारतातील मध्यमवर्गीय व एक जाती गटातून आलेल्या कम्युनिस्ट नेत्यांनी या चळवळीशी सांधा जोडायच्या ऐवजी त्यांनी विरोध केला. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट चळवळीत येऊ शकणारा ब्राह्मणेत्तरांचा आणि दलितांचा गट चळवळीपासून फटकून राहिला व त्या कारणांमुळे महाराष्ट्रात जागतिक चळवळ कमजोर राहिली. भारतीय परिस्थितीत वर्गाबरोबर जातीय शोषण हे महत्त्वाचे आहे. हा मुद्दा महाराष्ट्रातील कम्युनिस्ट नेत्यांनी लक्षात घेतला नाही असा त्यांच्या प्रतिपादनाचा रोख आहे. या पुस्तकानंतर कॉम्रेड डांगे, कॉम्रेड सरदेसाई, कॉम्रेड कोल्हटकर व कॉम्रेड रणदिवे यांच्यावर जातीय अहंकारग्रस्त नेते म्हणून टीका होऊ लागली.

प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुण साभार.

प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार.

ब्राह्मणेत्तर व सत्यशोधक चळवळीचा वारसा सांगून मार्क्सवादाचा विकास करण्याचा प्रयत्न डॉ.गेल ऑमव्हेट त्यांच्या संशोधनानंतर पुढे आला. नंतर बाबा आढाव याची सत्यशोधक कष्टकऱ्यांची चळवळ, डॉ. भारत पाटणकारांची ‘श्रमिक मुक्ती दल’, इतर सत्यशोधक चळवळी यांनी या विचारानुसार चळवळी चालवल्या. डॉ.गेल ऑमव्हेट यांनी मार्क्सवादाचे भारतीयीकरण केले. मार्क्स आणि आंबेडकर आणि बुद्ध- तुकोबा अशी मांडणी केली.

धर्म-जातीसंघर्षाचे सूत्र सांगताना डॉ. आंबेडकर हे धर्म-जातीसंघर्ष हा अपरिहार्यपणे आर्थिक व राजकीय सत्तासंघर्षाच्या दिशेने प्रवाहीत होतो हे दाखवून देतात. म्हणून जाती अंतासाठी त्यांनी सामाजिक-धर्मिक व आर्थिक समग्र क्रांतीची आवश्यकता आहे, असे सांगितले आहे. जातीच्या उतरंडीत कोणती जात कोणाशी संघर्ष करते हे कळायला मार्ग नाही. जरी ब्राह्मण व दलित (त्यांच्यातील पोटजातींची उतरंड लक्षात न घेता) या टोकाच्या जातींना शोषक व शोषित म्हटले तर मधल्या जाती, ज्या दोन्हींच्याही संपर्कात असतात, त्यांचे या दोन्ही जातींशी परस्परसंबंध येतात त्यांचे काय? या जाती शोषित म्हणायच्या की शोषक? ऑमव्हेट लिहितात : “कोणत्याही शोषित गटाने काही मूलभूत प्रश्न विचारायचे असतात : आपले शोषक कोण? सर्व शोषितांना संघटित करून मुक्तीच्या दिशेने आपण कसे संघटन उभारणार? आणि शोषणाची संरचना व तिचा शोषणमुक्तीच्या दिवाने वाटचाल करण्याच्या ऐतिहासिक शक्यतांशी नेमका संबंध काय?”

ऑमव्हेट या समाजशास्त्रीय चर्चाविश्वात जातीच्या प्रश्नाला अधोरेखित करणाऱ्या पहिल्या फळीच्या अभ्यासक विचारवंत आहेत, असे डॉ. योगेंद्रसिंग हे दाखवून देतात. दलितांच्या इतिहासावर संशोधन करण्याचा डॉ.गेल ऑमव्हेट यांनी मार्ग दाखविला. डॉ. गेल ऑमव्हेट यांनी सिद्धांताला व्यवहाराची जोड दिली वेळोवेळी वैचारिक स्थित्यंतर आणि सैद्धांतिक विकास केला. एका बाजूने हिंदुत्वाची चिकित्सा करताना आपली डावी विचारधारा न सोडता जागतिकीकरणाबाबत त्या स्वागतशील भूमिका घेतात. जागतिकीकरणाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर डॉ.बालमुरली नटराजन यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

डॉ. गेल ऑमव्हेट सक्रियपणे शेतकरी चळवळीत कार्यरत होत्या. त्यांच्यामुळे अनेकांना स्त्रीमुक्ती चळवळ चालविण्याची प्रेरणा मिळाली. स्वतः गेल यांनी परित्यक्ता, विधवा स्त्रियांच्या, जमीन व घरांचे हक्कांसाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात विशेष कार्य केले आहे. पर्यावरण चळवळीत काम करताना त्यांनी भांडवलशाहीचा निसर्गावर होणार्‍या दुष्परिणामांविषयी महात्मा फुले यांच्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे.

१९८० च्या दशकातील गेल यांचे काम टाळणे अशक्य आहे. आंबेडकरांचे विचार मुख्य धारेत येण्यापूर्वीच त्यांनी वाचले होते. त्यांचे महत्त्व जाणले होते. त्यांनी समकालीन दलित प्रश्नाबाबत आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता पाहण्यास मदत केली. त्यांच्यामुळेच  आंबेडकरांनाही प्रमुख विचारसरणीमध्ये संदर्भित करण्याचे कार्य केले. गेल्या अनेक दशकातील स्त्रिया दलित व कामगारांचे राजकारण आणि त्यांच्या चळवळी समजून घेण्यात त्यांच्यामुळे मदत झाली.

दलित राजकीय चळवळ आणि वर्ग, जाती, लिंग यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव गेल  ऑमव्हेट यांनी  मांडला आहे. १९९० च्या दशकातील वैविध्यपूर्ण बहुजन आणि दलित सांस्कृतिक आणि राजकीयविश्व डॉ. गेल त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे मांडतात. डॉ.गेल ऑमव्हेट यांचे आयुष्य भारतीय समाजासाठी प्रतिबद्ध होते. त्यांच्या लिखाणाचा विचार करताना, जीन ड्रेझ, रोहिणी हेंसमन,शीला भल्ला आणि करोल उपाध्याय इत्यादींची नावे पुढे येतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विरोधाभासावरून ऑमव्हेट यांचा के. बालगोपाल यांच्याशी त्यांचा वादविवाद  झाला.

ऑमव्हेट यांचा बुद्ध तत्वज्ञान आणि तुकारामांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास हा भारतीय तत्त्वज्ञानाची नवी ओळख करून देणारा आहे. ‘सिकिंग बेगमपुरा’मधून असे दिसून येते की युरोपमध्ये प्रबोधन होण्यापूर्वीच भारतात पूर्वजांनी आधुनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे पुस्तक वाचल्यानंतर आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांनी बुद्ध धर्म आणि भारतीय इतिहास आणि समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि त्यावर मोठ्या प्रमाणात लिखाण केले. थॉमस पेनच्या विचारापासून महात्मा फुले प्रेरित झाले आणि महात्मा फुलेंपासून डॉ.गेल ऑमव्हेट प्रेरित झाल्या.

बहुजन राष्ट्र निर्मितीसाठी झालेले ऐतिहासिक व वर्तमानातील सांस्कृतिक संघर्ष, विविध जन आंदोलनं व व ज्ञान निर्मिती संदर्भातील बहुजनांचे योगदान याबाबत गेल यांनी केलेल्या लेखनाचे महत्व स्त्रीवाद्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जाती आणि वर्गाबाबत त नेहमी लिंगाभावासह बोलले पाहिजे असे त्या म्हणत . नागरी हक्क आणि 1960 च्या डाव्या आणि स्त्रीवादी राजकारणामध्ये तिच्या विद्वानांसह असे स्कॉलर … तिच्यासारखा आणखी एक विद्वान आणि विवेकी आणि क्षमतावान विचारवंत तयार करण्याची वेळ आता आली आहे.त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरील एलेनॉर झेलियटचे काम पुढे नेले आणि महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या आणि विचारांच्या संदर्भात त्याच्या एकेरीपणाकडे लक्ष वेधले.त्यांनी आम्हाला जातीला केवळ भौतिक बाब  आणि विचारधारा म्हणूनच  नव्हे तर भौतिक शक्ती म्हणून पाहण्यास प्रवृत्त केले. हा एक संवाद होता जो स्त्रीवाद्यांनी आणि डाव्यांनी पुढे नेला पाहिजे पण दुर्दैवाने आम्ही तिच्या विचारांच्या योग्यतेनुसार ते काम पुढे  घेऊन गेलो  नाही.

डॉ.गेल ओम्वेट यांचे त्यांचे लेखन परिपूर्ण आहे, त्याला ज्याला जगाने मानले आहे. गेल ऑमव्हेट या महान विचारवंत वचनबद्ध आणि कटिबद्ध क्रांतिकारक होत्या.  त्यांच्यात बहुजनाप्रती  बुद्ध फुले आंबेडकर आणि येशू ख्रिस्तला पाहता येते.  डॉ.गेल ऑमव्हेट सक्रीयपणे शेतकरी चळवळीत कार्यरत होत्या. त्यांच्यामुळे अनेकांना स्त्री मुक्ती चळवळ चालविण्याची प्रेरणा मिळाली स्वतःडॉ. गेल ओम्वेट  त्यांनी परित्यक्त्या व विधवांच्या स्त्रियांच्या जमीन व घरांचे हक्कांसाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात विशेष कार्य केले आहे पर्यावरणवादी चळवळीत काम करताना त्यांनी भांडवलशाहीचा निसर्गावर होणार्‍या दुष्परिणामांविषयी माणसाने फुले यांच्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. १९८० च्या दशकातील गेल यांचे विपुल काम टाळणे अशक्य आहे. आंबेडकरांचे विचार मुख्य धारेत येण्यापूर्वीच त्यांनी वाचले होते त्यांचे महत्त्व जाणले होते गेले आम्ही त्यांनी आपणाला समकालीन दलित प्रश्नांबाबत आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता पाहण्यास मदत केली गेली आम्ही यांनी आंबेडकरांनाही प्रमुख विचारसरणीमध्ये संदर्भित करण्याचे कार्य केले तर इतर राजकीय चळवळ आणि वर्ग जाती लिंग यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव गेला भेट यांनी मांडला आहे.  गेल्या अनेक दशकातील स्त्रिया दलित व कामगारांचे राजकारण आणि त्यांच्या चळवळी समजून घेण्यात त्यांनी आपणास मदत केली कॉ.बी.टी. रणदिवे यांच्याशी प्रतिवाद केला तर  अरुंधती रॉय यांच्या लेखनाची गेल यांनी केलेली टीका बऱ्याच लोकांना अस्वस्थ करते १९९० च्या दशकातील वैविध्यपूर्ण बहुजन आणि दलित  सांस्कृतिक आणि राजकीय विश्व गेल यांनी स्पष्टपणे मांडले आहे.

भारतातल्या शोषितांची नेमकी अवस्था त्यांनी सखोल अभ्यासातून जगापुढे मांडली. त्यामुळे अनेक मुद्यांवर समाजालाही भान आले. आणि कार्यकर्त्यांनाही नेमकी भूमिका घेणे सोयीचे ठरले. प्रा. गेल ऑम्व्हेट यांनी भारतीय समाजाचा सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहास तपासला आहे. त्यांनी भारतातील सगळ्या विचारधारांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. समाजहिताचे नवे विचार मांडले आहेत. भारतातील जातीसंघर्ष धर्म व संस्कृतीच्या परिघातही कार्यरत होतात. भारतामध्ये जात्योन्नतीच्या मार्गानेच वर्गोन्नती घडत राहिली. भारतामध्ये आधुनिकता जातीच्या पायानेच विस्तार पावल्यामुळे परिवर्तन, प्रबोधन, विकास, लोकशाही यांचा विस्तार जातीच्या आधारानेच होत राहिला, हे समजण्यासाठी प्रा. गेल ऑमव्हेट यांच्या योगदानातून आपणास यासंदर्भात अधिक स्पष्टता येण्यास मदत होते.

गेल ऑमव्हेट आणि भारत पाटणकर. प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुण साभार.

गेल ऑमव्हेट आणि भारत पाटणकर. प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुण साभार.

प्रा. सुरेंद्र जोंधळे म्हणतात, “डॉ.गेल ऑमव्हेट यांचे योगदान चिकित्सक मार्क्स, चिकित्सक आंबेडकर असे करण्यामध्ये आहे. म्हणजे आजच्या समाजामध्ये चिंतन, विश्लेषण हे प्रतिकूल आहे. संवेदनशील, प्रगतीशील, कृतिशील विचारांचा मागोवा आपण येथे घेणार असून हे फार मौलिक आहे. असे आहे, की आजच्या चर्चाविश्वामध्ये राष्ट्रवादाच्या कोणत्याही मुद्द्यांमध्ये चर्चा करता येऊ शकत नाही? आधुनिकतेची चर्चा करायची झाली झाली तरी ती करणे हे चुकीचे ठरत आहे, कठीण गोष्ट झाली आहे. लिहिताना प्रागतिकता वगैरे शब्दांचा सुद्धा अर्थ कसा घ्यायचा, याचा सुद्धा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर लोकशाही या शब्दाबद्दल सुद्धा काही बोलायचे झाले, तर ती कोणती लोकशाही? कोणाची लोकशाही? अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे डॉ. गेल यांचे मार्क्‍सवादी असणे, जाती आणि भारतातल्या वर्गाबद्दल बोलणे, दलित-शेतमजूर- स्त्रियांच्या बद्दल बोलणे आणि त्या बोलण्यावर आणि त्या लेखनावर आपण चर्चासत्र घेणे हे अतिशय चांगले आहे.

गेलच्या वैचारिक योगदानाची चर्चा जर आपल्याला करायची झाली तर आपण मार्क्सवादाबद्दल बोलणार, आपण समाजवादाबद्दल बोलणार, आपण जात-वर्ग आणि त्यांच्या प्रश्नाबद्दल बोलणार, आपण क्रांतीबद्दल बोलणार, आपण या समोरच्या जगाकडे कसं पाहायचं? कोणत्या शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं? आणि हा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन हा मार्क्सवादी आंबेडकरवादी फुलेवादी दृष्टिकोन आहे का? असू शकतो का? याच्या बद्दल असा आग्रह व्यक्त करणे याची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे. अपरिहार्य आहे आणि याची चर्चा अतिशय सशक्तपणे केली आहे, त्याचा धांडोळा घेतला आहे हे महत्त्वाचे आहे. आज अनेक प्रश्न जगाच्या पाठीवर आहेत. युरोपमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये आहेत, भारतामध्येही आहेत आणि अशा वेळेस अशा गोष्टींचे वर्तमान कसं समजून घ्यायचं आणि विशेषतः भारतामध्ये ते कसं समजून घ्यायचे हा मुद्दा आहे. इथे जातीचे प्रश्न आहेत, वर्गाचे प्रश्न आहेत, लिंगभेदाचे प्रश्न आहेत तसेच गरिबीची प्रश्न आहेत, असमानतेचे आहेत, पाण्याचे, जमिनीचे आणि सामाजिक प्रतिष्ठा असे अनेक प्रश्न आहेत. हे सारे प्रश्न हे गेलच्या अभ्यासाचे, चिंतनाचे प्रश्न राहिले आहेत. हे प्रश्न केवळ त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे राहिले नाहीत तर ते प्रश्न संघर्षामधून, जनसमूहाच्या हालचालीमधून कसे सोडवता येतील याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आहे.”

प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांचे इतिहासातील सैध्दांतिक कार्य समाजाचा तळगाळ पहाणारे आहे. यासाठी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व तत्वज्ञान या विद्याशाखांचे परिप्रेक्ष्य त्यांनी एकत्रित केल्यामुळे त्यांचे संशोधनकार्य आंतरविद्याशाखीय आहे. संशोधकांचा दृष्टीकोन प्रज्ञा, शील आणि करुणा यातून घडलेला असला पाहिजे. प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांच्याकडे हे सर्व आहे.

ज्ञानसाधना प्राप्त करण्यासाठी डॉ. एलिनॉर झेलियट यांच्याप्रमाणे त्याची फलनिष्पती होइपर्यंत ऑमव्हेट आयुष्य वेचत होत्या. एलिनॉर झेलियटप्रमाणेच प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांनी भारतीय संशोधकांना अनेक महत्वाची संशोधने दिली. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा उलगडा कसा करायचा आणि त्याचे विश्लेषण कसे करायचे यापेक्षाही तपश्चर्या नेमकी कशी करावी आणि त्यासाठी आपली संपूर्ण क्षमता कशी वापरावी हे त्यांच्याकडून शिकता येते.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया ज्या पती पत्नीने घातला, ते म्हणजे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. जोतिबाच्या प्रत्येक कृतीला सावित्रीची  साथ होती तर सावित्रीच्या प्रत्येक गोष्टीला जोतिबाची शाबासकीची थाप होती. अगदी तसचं डॉ गेल आणि डॉ भारत यांच्याबद्दल म्हणता येईल. मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून डॉ गेल आणि डॉ भारत पाटणकर यांनी आपले आयुष्य वेचले. सावित्री-जोतिबा यांच्याप्रमाणे परस्परांना समजून घेत समाज बदलाची चळवळ नेटाने सुरु ठेवली. कठीण प्रसंगामध्ये परस्परांना साथ दिली. हे पाटणकर यांच्या ‘सखी’ या कविता संग्रहातुनही दिसते. आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली नऊ दहा जिल्ह्यांमध्ये कष्टक-याची चळवळ उभी आहे, त्या पाठीमागे डॉ गेल यांचे योगदान खुपच मोठे आहे. डॉ गेल यांचे संशोधन, त्यांचे लिखाण, त्यांचा कष्टक-यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातुन केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. परंतु इतके असूनही  डॉ.गेल ऑमव्हेट यांनी स्वतःच्या लेखनाची त्यांनी कधीच जाहिरात केली नाही.

डॉ. भारत पाटणकर यांच्या ऑमव्हेट यांच्याविषयीच्या कवितांमधून प्रेमातल्या रोमांचकारी भावनांचा, समृद्ध सामाजिक जाणिवांचा आणि परिवर्तनाचा ध्यास याचा प्रत्यय येतो.

डॉ.भारत पाटणकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात ,

सखी

आषाढातल्या वीजेसारखी आलीस लवलवत
दुथडी भरून वाहणार्‍या नदीसारखी आलीस
मी ही आलो कृष्णा-कोयनेच्या महापूरासारखा
आपण हातात हात घालून
वादळ झालो
एकाच वेळी व्यक्ती आणि समष्टी
बुद्ध अनुचरून चारिका केली
पायांना भिंगरी बांधून
तीन पिढ्यांचा वारसा दिला
चौथ्या पिढीला
मानव मुक्तीचा ….. नव्या सूर्योदयाकडे जाणारा
आता तू चाललीस हरवत स्वतःला
माझ्या हाती देवून हात घट्ट
आपला प्रवास आता चालला
समष्टीत पूर्ण विलीन होण्याकडे
इतिहासातून, विचारातून, पुस्तकातून, आठवणीतून जीवंत राहण्याकडे
चल सखी…. या संध्याकाळी आता
प्रेमाची गाणी गाऊ.

भारताच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीला समर्पित केलेले जीवन म्हणजे डॉ. गेल ऑमव्हेट यांचे जीवन आणि कार्य होय.

त्यांना अखेरचा जय भीम आणि अभिवादन!

प्रा. संजयकुमार कांबळे, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘लिंगभाव आणि स्त्रीअभ्यास’ विभागात प्राध्यापक आहेत.

COMMENTS