केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची पत्रकारांवर दादागिरी

केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची पत्रकारांवर दादागिरी

नवी दिल्लीः उ. प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने लखीमपुर खेरी हत्याकांड हे सुनियोजित असल्याचा ठपका आपल्या मुलावर आल्यानंतर अस्वस्थ झालेले केंद्रीय गृहराज्यम

विज्ञान कॉंग्रेसमधील मूर्खपणा
‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’
आरक्षण, भागवत आणि संघ

नवी दिल्लीः उ. प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने लखीमपुर खेरी हत्याकांड हे सुनियोजित असल्याचा ठपका आपल्या मुलावर आल्यानंतर अस्वस्थ झालेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मानसिक तोल एबीपी न्यूजच्या एका पत्रकाराच्या प्रश्नाने गेला. बुधवारी मिश्रा लखीमपुर खेरी येथे ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी एका पत्रकाराने एसआयटीच्या चौकशी अहवालात तुमचा मुलगा आशिष मिश्राविरोधात अजून गुन्हे दाखल करण्याची शिफारस केल्याचा प्रश्न अजय मिश्रा यांना विचारला असता, अजय मिश्रा यांचा तोल गेला आणि त्यांना संबंधित पत्रकाराला हे असले मूर्खासारखे प्रश्न विचारू नका, तुमचे डोके फिरलेय का, असा सवाल केला. मिश्रा यांनी यावेळी उपस्थित वार्ताहरांना त्यांचे मोबाइल कॅमेरे व माइकही बंद करण्यास सांगितले व पत्रकारांना चोर म्हटले. एवढेच नव्हे तर संतप्त झालेल्या मिश्रा यांनी एका पत्रकाराची कॉलरही पकडण्याचा प्रयत्न केला. मिश्रा उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून शिवीगाळही करताना दिसले. नंतर उपस्थितांनी मध्यस्थी करून मिश्रा यांना बाहेर काढले.

अजय मिश्रांची दादागिरी या पूर्वीही शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान दिसून आली होती. शेतकरी आंदोलनावर टीका करताना मिश्रा यांनी शेती कायद्याला १०-१५ शेतकर्यांचा विरोध असून त्यांना ठिकाणावर आणण्यास दोन मिनिटे पुरेसे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

या दादागिरीनंतर काही दिवसांनी लखीमपुर खिरी येथे त्यांच्याच मुलाने आशिष मिश्राने आंदोलक शेतकर्यांच्या मोर्चावर आपली कार नेत त्यात ३ शेतकर्यांना चिरडून ठार मारले होते.

मंगळवारी उ. प्रदेशमधील लखीमपूर खिरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट होता, असे या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीने म्हटले होते.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात लखीमपूर खेरी जिल्ह्यात अजय मिश्रा यांच्या मुलाने आपली कार आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर नेली होती. या घटनेत दोन शेतकरी चिरडून ठार झाले होते व नंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार तर शेकडो जखमी झाले होते. या वेळी संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या होत्या. मृतांमध्ये ४ शेतकरी असल्याचे नंतर उ. प्रदेश सरकारने स्पष्ट केले होते. अजय मिश्रा यांनी आपला मुलगा गाडीत नसल्याचा दावा केला होता. पण अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष गाडीत असल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर आशिषला पोलिसांनी ताब्यात घेतले. आशिष या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

या घटनेचा तपास करणार्या उ. प्रदेश एसआयटीने मंगळवारी न्यायालयाला एक पत्र लिहून मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांच्याविरोधातल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. आशिष मिश्रावर खूनाचा प्रयत्न व अन्य आरोप लावणे गरजेचे आहे, असेही एसआयटीचे म्हणणे होते. आशिष मिश्रा व त्यांचे १३ साथीदार यांनी शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा कट रचला होता. हा कट सुनियोजित व जाणूनबुजून तयार करण्यात आला होता, हा निष्कर्ष घटनास्थळी मिळालेले पुरावे व साक्षीदार्यांच्या जबानीतून आल्याचा एसआयटीचे म्हणणे होते. एसआयटीने या सर्वांवर नवे आरोप लावावे यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आशिष मिश्राकडून गुन्हा होऊनही मोदी सरकारने अजय मिश्रा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0