भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज

भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाने भारतामध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत भारताचा जीडीपी १.६ टक्के इतका खाली येऊ शकतो, अशी भीती गोल्डमॅन सॅश या बँकिंग समुहाने व्यक्त केली आहे. या समुहाने यापूर्वी २२ मार्च रोजी लॉकडाऊन पुकारण्याअगोदर भारताचा जीडीपी ३.३ टक्के इतका व्यक्त केला होता. पण आता त्यांनी आपला अंदाज आता बदलला आहे.

जीडीपी घसरण्यामागे वाहतूक, शिक्षण, हॉटेल व कारखानदारी क्षेत्राला लॉकडाउनचा जो फटका बसला आहे ते प्रमुख कारण असल्याचे गोल्डमॅन सॅशचे म्हणणे आहे.

गोल्डमॅन सॅशच्या मते भारतातील सध्याची परिस्थिती ही १९७०-८० च्या दशकातील आणि २००९ मधील आर्थिक मंदीसारखी आहे आणि सरकारने या महासंकटाला रोखणार्या आवश्यक अशा उपाययोजना केल्या नसल्याने जीडीपीवर त्याचा परिणाम झाला आहे.

भारताची जीडीपी पहिल्या तिमाहीत घसरेल असे अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले होते पण त्याला कारण देशातील आर्थिक धोरणे व जगात आलेली आर्थिकमंदी होते, त्यावेळी कोरोना महासाथीची पुसटशी कल्पनाही कोणाला आली नव्हती. पण जेव्हा कोरोना ही जगभर पसरणारी महासाथ आहे असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने जाहीर केले तेव्हा संपूर्ण देशात खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू व नंतर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता आणि जीडीपी घसरणार यावर शिक्कामोर्तब झाले.

गोल्डमॅन सॅशने दोन आठवड्यांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी १.८ टक्क्यांपर्यंत, अमेरिकेचा ६.२ टक्क्याने तर युरोझोनचा ९ टक्क्याने घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या मते भारताचा जीडीपी ४.८ टक्के

एकीकडे गोल्डमॅन सॅशने भारताचा जीडीपी १.६ टक्के इतका घसरेल असा अंदाज व्यक्त केला असताना संयुक्त राष्ट्राने भारताचा जीडीपी या आर्थिक वर्षांत ४.८ टक्के इतका राहील तर २०२१-२२मध्ये तो ५.१ टक्के राहील, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था वेगाने मंदीकडे जाऊन त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोना महासाथीमुळे पर्यटन, व्यापार व वित्तीय संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. हा अंदाज १० मार्च पर्यंत आलेल्या माहितीनुसार व्यक्त करण्यात आला आहे.

मूळ बातमी

COMMENTS