बदल्यांमध्ये गैरव्यवहारः जितीन प्रसाद यांच्या ओएसडीला हटवले

बदल्यांमध्ये गैरव्यवहारः जितीन प्रसाद यांच्या ओएसडीला हटवले

नवी दिल्लीः काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व उ. प्रदेशच्या आदित्य नाथ सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले जितीन प्रसाद यांचे ओएसडी पैसे घेऊन बदल्या करत असल्य

एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप
ड्रग्ज प्रकरणे हाताळण्याचा एनसीबी ‘पॅटर्न’
देश कठीण परिस्थितीतून जातोय – सरन्यायाधीश

नवी दिल्लीः काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व उ. प्रदेशच्या आदित्य नाथ सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले जितीन प्रसाद यांचे ओएसडी पैसे घेऊन बदल्या करत असल्याच्या आरोपात अडकलेले आहेत. जितीन प्रसाद यांच्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते असून या खात्यातल्या इंजिनिअरच्या बदल्यांसाठी त्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) अनिल कुमार पांडेय पैसे घेत असल्याची बाब पुढे आली आहे. या कारणास्तव मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अनिल कुमार पांडेय यांना ताबडतोब पदावरून हटवले आहे. तर सार्वजनिक खात्याच्या प्रमुखांबरोबर अन्य पाच अधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी निलंबित केले आहे.

पांडेय यांना केंद्रात पुन्हा पाठवले जाणार असून त्यांच्याविरोधात व्हिजिलेंस व शासकीय नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू होईल असे राज्य सरकारने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

जितीन प्रसाद यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रिपद देण्यात आले. गेले वर्षभर ते या खात्याचे काम पाहात आहेत. जितीन प्रसाद व अनिल कुमार पांडेय यांचे जुने संबंध असून केंद्रात यूपीए सरकार सत्तेवर असताना ते प्रसाद यांच्या सोबत होते, सध्या ते प्रतिनियुक्तीवर लखनौला आले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यात पैसे देऊन बदल्या होतात व अनेक कामांमध्ये अनियमितता आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १२ जुलैला चौकशीचे आदेश दिले होते. या संदर्भातला अहवाल १६ जुलैला मुख्यमंत्र्यांना पाठवला त्यानंतर पांडेय यांची नियुक्ती रद्द करत त्यांना केंद्रात पाठवले आहे.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जून महिन्यात १५० हून अधिक बदल्या झाल्या, या बदल्या मनमानी पद्धतीने, नियम वाकवून, नियमांचा भंग करून झाल्या असे दिसून आले. काही इंजिनिअरना एकाच पदावर अधिक काळ ठेवण्यात आले तर काही इंजिनिअरकडे एकाहून अधिक डिव्हिजनचा चार्ज देण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान या विषयासंदर्भात जितीन प्रसाद हे लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याची शक्यता आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0