अफगाणिस्तानातून सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या सैन्याची माघार

अफगाणिस्तानातून सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या सैन्याची माघार

वॉशिंग्टनः येत्या ११ सप्टेंबरच्या आधी अफगाणिस्तानात तैनात केलेले अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो ब

कंदहार, हेरातमधील भारतीय दुतावासांवर तालिबानचे हल्ले
खनिज समृद्ध पण गरीब अफगाणिस्तान
मुल्ला ओमरचे युद्धग्रस्त जग

वॉशिंग्टनः येत्या ११ सप्टेंबरच्या आधी अफगाणिस्तानात तैनात केलेले अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी बुधवारी केली.

न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त झाल्याच्या घटनेला येत्या ११ सप्टेंबर रोजी २० वर्षे पूर्ण होत असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात तैनात असलेले नाटोसोबतचे अमेरिकेचे सैन्य मायदेशी येईल, असे बायडन यांनी व्हाइट हाउसमधील एका कार्यक्रमात सांगितले.

सैन्य माघारी घेण्याची योजना १ मे पासून सुरू होईल. सध्या अफगाणिस्तानात अमेरिकेचे २,५०० सैन्य तैनात आहे.

बायडन यांनी आपल्या भाषणात अफगाणिस्तानात लोकशाही व शांतता प्रस्थापित राहण्यासाठी व या देशाचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी भारत, पाकिस्तान, रशिया, चीन व तुर्कीची भूमिका महत्त्वाची आहे व पुढे राहील असेही म्हटले. सैन्य माघारीचा निर्णय आपले सहकारी, सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर संघटनांमधील वरिष्ठ अधिकारी, राजदूत, सामरिक तज्ज्ञ, अमेरिकेचे उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून घेतल्याचेही बायडन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील हे प्रदीर्घ युद्ध होते. ते संपवण्याची आता वेळ आली असून सैन्याने घरी यावे, अशी आपली इच्छा असल्याचे बायडन म्हणाले.

अमेरिका आपले सैन्य माघारी बोलावत असले तरी तेथील मानवता कार्य चालूच राहील, अफगाणिस्तानाच्या विकासात अमेरिकेची मदत भविष्यात कायम राहील, असेही बायडन यांनी स्पष्ट केले.

मी अमेरिकेचा चौथा अध्यक्ष असून ज्याच्या कार्यकालात अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. दोन रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष व दोन डेमोक्रेट पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. आता याची जबाबदारी मी पाचव्या अध्यक्षावर सोडू इच्छित नाही असेही बायडन म्हणाले.

बायडन यांनी आपला हा निर्णय जाहीर करण्याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा व जॉर्ज बुश यांच्याशी चर्चा केली होती.

योग्य निर्णयः ओबामा

बायडन यांनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर ओबामा यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा बायडन यांचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे म्हटले. गेली दोन दशके अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात कार्यरत आहे. अमेरिकेच्या सैन्याने या काळात खूप नुकसान सोसले आहे, आता सैन्याला माघारी बोलावण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अफगाणिस्तानात तैनात असलेले ८० सैनिक ऑस्ट्रेलियानेही माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम सप्टेंबर अखेर राहणार आहे.

अफगाणिस्तानात नाटो सैन्य तैनात करण्याचा निर्णय झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे १५ हजार सैन्य सामील झाले होते. आता केवळ ८० सैनिक उरले असून गेल्या २० वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या ३९ हजार सैनिकांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी युद्धात आपली कामगिरी बजावली आहे. या कामात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचे ४१ सैनिक ठार झाले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0