उत्तर-दक्षिणेतील वैर व संपर्काचा अभाव

उत्तर-दक्षिणेतील वैर व संपर्काचा अभाव

हिंदू-मुस्लिम संवाद - मौर्यांनी अखिल भारतीय साम्राज्य निर्माण करताना उत्तर आणि दक्षिणेला जोडण्यासाठी जशी संपर्कव्यवस्था निर्माण केली तशा कुठल्याही संपर्कव्यवस्थेचा अभाव हे एक फार मोठे वैगुण्य या संपूर्ण मध्ययुगातील मुसलमानपूर्व भारतात आढळते. पूर्व टोकाला बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये काय घडते आहे? याचा पश्चिम भारतात फारसा पत्ताच नसायचा. दक्षिणी राज्ये तर खूपच दूर होती.

मागील दोन लेखांमध्ये आपण इसवी सनाच्या ६ व्या शतकानंतर ज्याला अखिल भारतीय म्हणता येईल असे एकही साम्राज्य निर्माण होऊ शकले नाही हे बघितले. भारतात राजकारणाचा, राज्यव्यवस्था आणि राज्य प्रशासनाचा पुरेसा अभ्यास झाला नव्हता असे काही अतिशय सुरुवातीच्या ब्रिटिश संशोधकांचे मत होते. परंतु नंतर ख्रिस्तपूर्व असणाऱ्या मौर्य साम्राज्याचे पुरातत्त्वीय पुरावे संपूर्ण भारतभर सापडायला लागले.

२०व्या शतकाच्या सुरुवातीला कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या सुप्रसिद्ध संहितेचा शोध लागला आणि भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांना भारतातील दोन हजार वर्षे जुन्या असणाऱ्या राज्यशास्त्राच्या प्रगतीविषयी निर्विवादपणे बोलता येऊ लागले.

हर्षाच्या साम्राज्यानंतर अखिल भारतीय स्वरूप असणारे उत्तर भारतीय वा दक्षिण भारतीय साम्राज्य उभे राहू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण भारताचा विचार करता इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकात एकूण ४० क्षत्रिय घराणी उदयाला आली होती हे आपण मागील लेखात बघितले. भारतीय उपखंडाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन अगदी वैदिक काळापासून आपल्याला दिसते. उत्तरेकडील राज्यकर्ता सहसा दक्षिणेत जायला तयार नसतो. त्याचप्रमाणे दक्षिणेतील राजा उत्तरेत जायला तयार नसतो. संपूर्ण भारत असा विचार करून भारतात एकात्मिक राज्यव्यवस्था निर्माण करण्यामध्ये सर्वप्रथम मौर्य आणि नंतर काही प्रमाणात गुप्त यशस्वी झाले असे म्हणता येते. सार्वभौमत्व आणि मांडलिकत्व या विषयीच्या कल्पनाही सातत्याने प्रवाही राहात होत्या. राजाने आपल्या सरंजामदारांना, मांडलिकांना आणि देवसंस्थानांना, मंदिरांना मोठ्या मोठ्या जमिनी मालकीहक्काने दिल्याने केंद्रीय सत्तेचे अधिकार आकुंचित होतात. असे जरी असले तरी भारतभर हीच व्यवस्था प्रचलित झाली. या व्यवस्थेत या मध्यस्थांनी ठरलेल्या पद्धतीनुसार विशिष्ट महसूल केंद्रीय सत्तेकडे सुपूर्द करायचा असे. यामुळे भारताच्या विशाल भूभागावर असंख्य राज्ये निर्माण होत होती. या पैकी काही वाढत. काही प्रगती करत. तर ही प्रगती करीत असताना, अशा प्रगती करणाऱ्या राज्याच्या आजूबाजूची राज्ये किंचित आकुंचन पावत. क्वचित निष्क्रीय होत असत.

उत्तर भारतात राजस्थानात इ. स. ८ वे ते अगदी १४-१५ वे शतक सुरू होईपर्यंत राजपूत राजे राज्य करीत असत. ११ व्या शतकात जेव्हा गझनीचा मेहमूद पूर्व भारतात दिल्ली परिसरात आणि गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्याला लागून हल्ले करीत होता तेव्हा दिल्ली परिसरात चौहान घराणे राज्य करीत होते. सुप्रसिद्ध पृथ्वीराज चौहान याच चौहान घराण्याचा. या राजांचा पराभव होत असताना जे काही घडले ते आपण जर तपासले तर येणारे मुसलमान या भूमीत परके आहेत आणि आपण आपसात शत्रू असलो तरी स्वकीय आहोत. आणि आपल्या वैरामध्ये या परक्याला आपण मध्ये आणता कामा नाही, इतकेही राजकीय आकलन त्या वेळचा एकही राजा दाखवू शकला नाही.

गुजरात आणि माळव्यात या सुमारास गुर्जर-प्रतिहार घराणे राज्य करीत होते. बंगालच्या बाजूला पाल आणि सेन ही दोन महत्त्वाची राज्ये होती. गंगा आणि यमुना नद्यांच्या दुआबात छोटे छोटे राजे राज्य करीत होते. मुसलमानी आक्रमणे कमी बळासह आणि तुकड्या तुकड्यांनी जेव्हा पुढची २०० वर्षे होत होती तेव्हा संपूर्ण उत्तर भारताने जो एकसंघ प्रतिसाद आणि प्रतिकार करायला हवा होता. तसा तो झाला नाही. हे खरे कारण होते पश्चिमेकडे पूर्वेकडे संधी मिळताच सातत्याने होणाऱ्या मुसलमानी आक्रमणांचे.

मौर्यांनी अखिल भारतीय साम्राज्य निर्माण करताना उत्तर आणि दक्षिणेला जोडण्यासाठी जशी संपर्कव्यवस्था निर्माण केली तशा कुठल्याही संपर्कव्यवस्थेचा अभाव हे एक फार मोठे वैगुण्य या संपूर्ण मध्ययुगातील मुसलमानपूर्व भारतात आढळते. पूर्व टोकाला बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये काय घडते आहे? याचा पश्चिम भारतात फारसा पत्ताच नसायचा. दक्षिणी राज्ये तर खूपच दूर होती.

सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी तळमळीने घेतलेले कष्ट, सर्वतऱ्हांचे प्रयत्न आपल्याला ठाऊक असतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या सुमारास चोळांची सत्ता होती. हे नौकानयनात खूप पुढारलेले होते. भारत सोडून इतरत्र हिंदू धर्माचा प्रसार जर कुणी केला असेल तर तो या चोळ राजवटीने केला. आग्नेय आशियात इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा इथपर्यंत यांनी सागरी मोहिमा आखल्या. त्या देशातील राजांना लढायांमध्ये हरवून मांडलिकत्व पत्करायला लावून हिंदू धर्माचा प्रसार झाला तो याच २०० वर्षांत! या सुमारास या देशांमधून झालेला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार ही इतकी महत्त्वाची गोष्ट होती की या संपूर्ण आग्नेय आशियात असणारे हिंदू वर्चस्व हे या ११व्या, १२व्या आणि १३व्या शतकातील चोळराजांनी केलेल्या सागरी मोहिमांचे फलित आहे.

अजून गंमतीचा भाग हा की या संपूर्ण काळात वर उल्लेख केलेल्या एकाही उत्तरी राजाला या विषयी फारशी माहिती होती असे आढळत नाही. काळाच्या बृहृदपटावर अशा सागरी मोहिमांमुळे होऊ शकणारा धर्मप्रसार या विषयीचे आकलनच नसणे हा जास्त दुर्दैवी भाग आहे. पश्चिम किनाऱ्यावरून पश्चिमी चालुक्य अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापाराला प्रोत्साहन देत होतेच. गंमतीचा भाग म्हणजे पश्चिमेकडून सागरी मार्गाने पहिले मुसलमान इसवी सनाच्या ७व्या, ८व्या आणि ९व्या शतकात म्हणजे मेहमूद ग़झनीच्या ३००-४०० वर्षे आधीच भारतात दख्खनमध्ये पोहोचले होते. यांचाही मूळ उद्देश धर्मप्रसार हाच होता. परंतु धर्मविचार इथल्या जनतेला ठाऊक करून देणे याच्या फार पुढे हा धर्मप्रसार जाऊ शकला नाही.

ज्या वेळी मूळचे हिंदू नसणाऱ्या माणसांना हिंदू बनवण्यासाठी आक्रमक प्रयत्न केले जात होते, त्याच वेळी देशाच्या दुसऱ्या टोकाला बाहेरून येणारा धर्म स्वतःसोबत घेऊन येऊन इथल्या लोकांचे धर्मांतर करणे आणि स्वतःचे राज्य स्थापन करणे या उद्देशाने भारतावर आक्रमणे होत होती. बाहेर जाऊन हिंदू धर्मप्रसार करण्याऐवजी एतद्देशीय हिंदू मुसलमान बनू नयेत म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे हा विचार चोळ राजवटीपर्यंत पोहोचविण्याचेही कुणाला सुचले नाही. भारताचा पूर्व किनारा आणि आग्नेय आशियातील देश यांमधील अंतर तपासले तरी लक्षात येईल की भारतात अगदी जुन्या काळापासून नौकानयन आणि सागरी मोहिमा ही दोन्ही तंत्रे खूप प्रगत होती. चोळ राजे स्वतःला आर्यकुळ म्हणवत असत. चोळांच्या अनेक राजधान्यांपैकी महत्त्वाची राजधानी तंजावर. तर पश्चिमी चालुक्यांची राजधानी वातापि किंवा बदामी. बृहदीश्वर हे चोळांनी बांधलेले मंदिर आणि जगदीश्वर हे चालुक्यांनी बांधलेले मंदिर हे पुरातत्त्वीय पुरावे दोन्ही राजवटींच्या संपन्नतेविषयी बरेच काही सांगतात.

भारतातले उत्तर दक्षिण वैर हे पूर्वापार आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्त्रकात या राजकीय दुफळीमुळे काय काय घडत गेले? हे आपण योग्य वेळी पाहाणारच आहोत. इथे लक्षात एवढेच ठेवायचे की सलग २०० वर्षे हप्त्याहप्त्याने होणारी आक्रमणे रोखायला उत्तर भारताला दक्षिण भारताची काहीही मदत झाली नाही. आणि ते ही अशा वेळेला की स्वतः दक्षिण सागरी मोहिमा आखून भारतीय भूमीपासून खूप दूर आक्रमणे करून हिंदू धर्माचा प्रसार करीत होती.

दिल्ली सल्तनतींनी इथले राजकारण कसे शिकून घेतले? त्यात कोणते बदल केले? भारताला सर्वस्वी नवा असणारा काही राजकीय विचार दिला का? राज्यव्यवस्था, महसूल व्यवस्था, लष्कर व्यवस्था, कायदे, कायदे व्यवस्था आणि तिची अंमलबजावणी या बाबत काय काय बदल घडले? हे यापुढे पाहू. म्हणजे नंतर विस्ताराचा विचार करता भारतातील सर्वात मोठ्या मुघल साम्राज्याने या क्षेत्रात काय केले ते समजावून घेणे सोपे होईल.

राजन साने, हे हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS