प्रख्यात गायिका शुभा मुद्गल यांचा ‘लुकिंग फॉर मिस सरगम' हा कथासंग्रह कलाकारांभोवतीच्या वलयाला डोळसपणे जाणून घेण्याचा उत्तम प्रयत्न आहे. यात स्वप्ने आणि वास्तव यांच्यातील भयावह दरी आहे, पण ती दरी शुभा मुद्गल सहजतेने तरीही सखोलपणे मांडतात व आपल्याला विचार करायला लावतात.
कला आणि कलाकार यांच्याभोवती नेहमीच गूढरम्यतेचे वलय असते. याच्या परिघाबाहेर असणाऱ्या व्यक्तींच्या कलेविषयी आणि कलाकारांबद्दल काही एक धारणा पक्क्या झालेल्या असतात. कलाकार जोपर्यंत मोकळेपणाने एकूण कलाक्षेत्राविषयी- त्या कलेला जोपासण्यात येणाऱ्या अडचणी, त्यातून मिळणारा आनंद-दुःख-नैराश्य याविषयी खुलेपणाने बोलत नाही, तितके ते गूढरम्यतेचे वलय आणखी दाट होत जाते. परंतु तसे केले गेले तर मात्र कलाकार आणि रसिक यांच्यात मैत्रीपूर्ण बंध निर्माण होतो. असाच बंध तयार होतो तो शुभा मुद्गल यांचा ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ हा कथासंग्रह वाचल्यानंतर. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की यातील सगळ्या कथांमधील पात्रे ही संगीतक्षेत्रातील आहेत, त्यांच्यात सामाजिक आणि भाषिक वैविध्य आहे. बहुतेक कथांमध्ये वेदनेचा सूर आहे, पण तो सूर तुमच्या चेहऱ्यावर एक हसूही उमटवतो ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे वाचकाला पुस्तकाशी बांधून ठेवण्यात मुद्गल यशस्वी झाल्या आहेत.
‘स्टोरीज ऑफ म्युझिक अँड मिसऍडव्हेंचर’ या उपशीर्षकामुळे आपल्याला आत काय वाचायला मिळणार आहे याचा अंदाज येतो. थोडक्यात सांगायचे तर या कथा पारंपरिक नाहीत, गुरू शिष्य परंपरेची महती सांगणाऱ्या नाहीत, तसेच भारतीय संगीताच्या महान इतिहासाबद्दलही नाहीत. या कथा आजच्या आहेत- आजच्या कलाकारांच्या कलोपासनेबद्दलच्या, त्यांना येणाऱ्या खऱ्याखुऱ्या अडथळ्यांच्या व त्यातून त्यांनी शिकलेल्या धड्यांच्या आहेत. आजचे तंत्रज्ञान, संगीतक्षेत्रातील बदलते प्रवाह व स्पर्धा आणि सामाजिक-राजकीय घडामोडी यांची पेरणी प्रत्येक कथेत खुबीने केलेली आहे. म्हणूनच या सात कथांमधील कितीतरी प्रसंग आपण कुठेना कुठेतरी वाचल्यासारखे, अनुभवल्यासारखे वाटत राहते. त्यामुळे या गोष्टींशी आपण सामान्य वाचकही चटकन ‘रिलेट’ करू शकतो.
देश, धर्म, संस्कृती आणि कला
कला हे एक स्वतंत्र क्षेत्र आहे, धर्म-जात-देशाच्या सीमा यांच्या पलीकडे आहे अशाप्रकारची विधाने वेगवेगळ्या प्रसंगी सातत्याने ऐकू येतात. परंतु या सगळ्यांमध्ये आंतरसंबंध आहे हे नाकारता येत नाही. मुद्गलांच्या दोन कथांमधून हे प्रकर्षाने पुढे येते. पहिलीच कथा ‘अमन बोल’मध्ये पाकिस्तान आणि भारत या दोन देशांतील कलाकार एकाच व्यासपीठावर कला सादर करायला येतात. बड्या कॉर्पोरेट कंपनीने हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. त्यांच्या ‘अमन'(शांती)च्या संकल्पनेला अनुसरून संगीत समारंभाची चोख व्यवस्था केली जाते. परंतु जेव्हा कार्यक्रमात जुगलबंदी सादर करताना भारतीय कलाकाराची पाकिस्तानातील गायकासमोर पीछेहाट व्हायला लागते, तेव्हा मात्र त्याच्या परवानगीने त्याचा मॅनेजर ध्वनिक्षेपकामध्ये अफरातफर करतो, जेणे करून पाकिस्तानी गायकाचे गाणे पडेल. संगीत, जे खरे तर शांती प्रस्थापित करण्यासाठी सादर केले जात होते, त्यामुळेच गदारोळ उठून भांडणे सुरू होतात. ‘दोन्ही देशांत शांती वगैरे उभ्या जन्मात शक्य नाही’ हा आपल्या समाजाचा सर्वसाधारणपणे दिसणारा दृष्टीकोन इथेही प्रकटतोच. या साऱ्या गोंधळामध्ये ‘अमन बोल’ कधी विरून जातात कळतही नाही.
पुस्तकातील शेवटची कथा ‘ऍट द फीट ऑफ हिज मास्टर’ ही सद्यस्थितीचा अचूक वेध घेणारी आहे. यातील संगीतकार हा एका स्वघोषित योगिनीचा निस्सीम भक्त आहे. एका हॉलिवूड चित्रपटासाठी एकदा तो मीराबाईचे एक भजन संगीतबद्ध करतो व गातो. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याचे नाव संगीतकार म्हणून घेण्यात येत नाही, केवळ गायक म्हणून घेतले जाते. योग्य श्रेय न मिळाल्याच्या दुःखात तो असतानाच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतो. मीराबाईचे भजन चित्रपटात अनुचित जागी घातले म्हणून हिंदू संघटना त्यावर बंदी आणतात. तेव्हा मात्र हा संगीतकार या स्वघोषित धर्मरक्षकांपासून वाचण्यासाठी आपल्या स्वघोषित योगिनीचा आसरा घेतो व अभय मागतो. या विरोधाभासाची वाचकाला गंमत तर वाटते परंतु त्यामुळे विचारप्रवृत्तही व्हायला होते. शेवटी कोणाला तरी शरण जाणे, कोणाचा ना कोणाचा तरी सतत मानसिक आधार घेणे- ‘ऍट द फीट ऑफ हिज मास्टर’- हीच आपल्यातही भिनलेली संस्कृती आहे की काय असा प्रश्न पडतो.
स्वप्ने आणि वास्तव
कलाकारांनाही स्वतःच्या काही अपेक्षा, प्रलोभने आणि स्वप्ने असतातच. कलाकार ज्या देशाच्या, संस्कृतीच्या मुशीत वाढतो त्याचाही परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. असामान्य म्हणून नावाजल्या गेलेल्या कलाकारांची सर्वसामान्य स्वप्ने आणि मग कालांतराने त्यांना दुःखदरित्या झालेली वास्तवाची जाणीव याचे चित्रण मुद्गलांच्या दोन कथांमधून प्रामुख्याने दिसते.
‘फॉरेन रिटर्न्ड’ ही परदेशी जाऊन आपली कला सादर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका आसावरी नामक प्रथितयश शास्त्रीय गायिकेची कथा आहे. तिचे हे स्वप्न अनेक वर्षे पूर्ण होत नाही, सरकारी-बिगरसरकरी संस्थांकडूनही याबाबतीत नैराश्यच येत असते. परंतु नंतर एका सहवादकाच्या मदतीने अनेक वर्षांनी आसावरीचे हे स्वप्न साकार होते व तिला संगीत कार्यक्रमांसाठी अमेरिकेची वारी करण्याची संधी मिळते. परंतु हे स्वप्न जेव्हा वास्तवात येते, तेव्हा मात्र ते वाटले होते तितके रम्य नसल्याचे तिच्या लक्षात येते. या कथेत अगदी बारीक गोष्टी टिपल्या आहेत- जसे सर्वसाधारणपणे भारतीय कलाकारांचे परदेशातील वर्तन, त्यांच्याबद्दल परदेशस्थित भारतीयांच्या मनात असलेल्या धारणा, कलेच्या नावाखाली कुठल्याही उथळ गोष्टींना मिळत असलेला वाव, कलाकारांचे कलेव्यतिरिक्त अन्य गोष्टींच्या जाळ्यात अडकणे आणि फसणे इ. सगळे सोडून अचानक घरी परत यायची तिच्यावर वेळ येते. ‘फॉरेन रिटर्न्ड’ हा नाममात्र शिक्का बसलेला असला तरी त्यातला फोलपणा तिला कळून येतो.
‘मंझुर रेहमती’ ही कथाही अशाच एका स्वप्नाचा आढावा घेते. यातील नायक मंझुर हे नावाजलेले हार्मोनियम वादक असतात, ज्यांना पद्मश्री मिळवण्याची ओढ असते. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी शक्य ते सगळे करायला तयार असतात. त्यासाठी सरकार दरबारी वजन असलेल्या एका गायकाकडे ते मनधरणी करतात. बदल्यात ते मंझुर रेहमतींकडे त्यांच्याकडच्या दुर्मिळ बंदिशी आणि रचनांची मागणी करतात. हे सारे द्यायला रेहमती तयार होतात, केवळ पद्मश्री पुरस्काराच्या ओढीने! इतके केल्यानंतरही ते स्वप्न तर पूर्ण होत नाहीच, पण मानहानी आणि नैराश्य मात्र पदरी पडते. त्यांच्या दुर्मिळ रागांच्या रचना मात्र राजरोसपणे रेकॉर्ड होतात.
स्वप्ने आणि वास्तव यांच्यातील ही भयावह दरी मुद्गल सहजतेने तरीही सखोलपणे मांडतात, विचार करायला लावतात.
तत्वनिष्ठा आणि अपेक्षाभंग
कलाकारांसाठी कलेची जोपासना व आराधना करणे महत्त्वाचे असते, जे काहीएक तत्त्वांच्या आधारावर उभे असते. काही कलाकार असे असतात जे कोणत्याही कारणास्तव ही तत्त्वे वाकवण्यास राजी होत नाहीत. परंतु मग परिस्थितीच अशी निर्माण केली जाते जिथे ही तत्त्वे ते स्वतःतरी दूर सारतात किंवा त्यांच्यावरचा आजूबाजूच्या लोकांचा दबाव असहनीय घेऊन ते स्वतःच काही बाबी सोडून देण्यास तयार होतात. ही ओढाताण मुद्गलांच्या राहिलेल्या तीन कथांमधून दिसते. ‘तान कप्तान’मध्ये रिऍलिटी शोची खरीखुरी ‘रिऍलिटी’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मेरठमधील एका संगीत विद्यालयाचे संचालक सक्सेना सर ज्यांना मुळातच प्रसिद्धीची आणि सत्ताकेंद्राच्या जवळ असण्याची आस असते, त्यांना एक व्यक्ती रिऍलिटी शोमध्ये भागीदारीची स्वप्ने दाखवते. अर्थातच त्यातून त्यांना बरेच फायदे होतील असे दावे केले जातात. परंतु तो मनुष्य पैशाच्या लोभापायी जेव्हा नैतिकतेच्या सगळ्याच पातळ्या ओलांडायला लागतो तेव्हा मात्र सक्सेनांच्या मनात धडकी भरते, तरीही ते विश्वास टाकतात. प्रसंगी काही तत्वांना मुरड घालतात, काही कायदेशीर बाबींकडे आणि कराराकडे दुर्लक्ष करतात. यापायी नंतर त्यांना प्रचंड मानहानीला सामोरे जावे लागते. रिऍलिटी शोमध्ये होणारे स्पर्धकांचे आर्थिक आणि मानसिक शोषण, समाजातील झटपट प्रसिद्धी मिळवण्याची वृत्ती, संस्कृतीच्या नावाखाली चालणारे बेकायदा धंदे या सगळ्याबाबतची सूक्ष्म निरीक्षणे कथेत येतात.
‘तान कप्तान’मध्ये धंदेवाईक माणसांमुळे कलाकारांचा तेजोभंग कसा होऊ शकतो हे सांगितले आहे तर ‘अ फेअरवेल टू म्युझिक’ या गोष्टीमध्ये हीच भूमिका आई-वडिलांकडे आहे. सद्यस्थितीत पालकांच्या कलेबद्दल अनेकदा काही चुकीच्या धारणा असतात. या कथेतील पालक आधी आपल्या मुलाला संगीत शिकण्यास उत्तेजन देतात, परंतु त्याच क्षेत्रात जेव्हा तो पुढे ‘करिअर’ करण्याचे ठरवतो, तेव्हा मात्र वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून त्याला विरोध केला जातो. या सगळ्यामुळे त्या मुलाला हळूहळू नैराश्य येते. त्यावर उपाय म्हणून जेव्हा तो परत संगीतनिगडीत क्षेत्रात स्थिरावण्याचे ठरवतो, तेव्हा त्या म्युझिक कंपनीचा संगीताबद्दलचा हास्यास्पद आणि आत्यंतिक व्यवहारी दृष्टिकोन पाहून पुन्हा खचणेच त्याच्या नशिबी येते. त्यामुळे संगीताशी पुन्हा जवळीक साधण्याऐवजी आपली स्वप्ने व तत्वे या दोहोंना ‘फेअरवेल’ देण्याचा पर्याय त्याला अधिक रास्त वाटतो.
‘द मॅन हू मेड स्टार्स’ ही कथा शास्त्रीय संगीत आणि बॉलिवूड यांच्या नात्यावर भाष्य करते. यातील नायिका आत्यंतिक तत्त्वनिष्ठ अशी कलाकार आहे. एका चित्रपटासाठी तिने संगीतबद्ध केलेली आणि गायलेली गाणी वापरण्याची तिला पृच्छा होते. हे विचारणारा दिग्दर्शक हा प्रथितयश असतो, परंतु त्याच्या एकूण वागणुकीत आपण या गायिकेवर प्रचंड उपकार करत असल्याची भावना असते. औपचारिक करार करण्यासही तो उदासीन असतो. हे सगळे ऐकल्यावर कथेची नायिका त्याला खडे बोल सुनावून प्रस्ताव फेटाळते. परंतु कालांतराने सत्तेचा, पैशाचा आणि उन्मादाचा वर्षानुवर्षे जपलेल्या तत्वनिष्ठतेसमोर कसा विजय होतो हे कटू सत्य पुन्हा एकदा आपल्याला समजते. पैशाने कला आणि कलाकार जणू सहज विकत घेतले जाऊ शकतात या सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या वृत्तीवरही प्रकाश टाकला जातो. ही कथा बौद्धिक संपदा अधिकारांवर गंभीर चर्चा होत असल्याच्या या काळात कलाकारांचे हक्क (Performer’s Rights) कसे दुर्लक्षिले जातात याचे उदाहरण देते.
शुभा मुद्गलांच्या या कथांची प्रामुख्याने तीन वैशिष्ट्ये नमूद करता येतील. पहिले म्हणजे यात केलेला सौम्य उपरोधाचा वापर, ज्याने कथांचा बाज आणखी रंजक झाला आहे. खरेतर प्रत्येक कथेला दुःखाची, हतबलतेची अथवा पराजयाची किनार आहे. त्या आपल्याला खोटी आशा लावत नाहीत वा खोटे वास्तव दाखवत नाहीत. पण उपरोधाच्या वापरामुळे हे सारे किंचित सुसह्य होते हे नक्की. दुसरे म्हणजे कथनाची भाषा इंग्रजी असूनही प्रत्येक कथेत प्रादेशिक भाषांतील शब्दांचा आणि लहेजाचा वेळोवेळी केलेला सुयोग्य वापर. त्यामुळे वाचणाऱ्याना या गोष्टी आपल्या वाटतात. तिसरे म्हणजे यातल्या काही कथांमध्ये ‘मिस सरगम’ या व्यक्तीचा केलेला गूढ उल्लेख. ‘मिस सरगम’ ही एकेकाळची यशस्वी पण आता सगळ्यांच्या विस्मरणात गेलेली कलाकार आहे. अगदी अडचणीच्या वेळेस कथेतील पात्रांना ‘मिस सरगम’ची आठवण येते, अन्यथा ती पडद्याआडच राहते. कदाचित ती एका अशा कलेचे, कलाक्षेत्राचे आणि मूल्यांचे प्रतीक आहे जे काळाच्या ओघात विरत चालले आहे. सद्यस्थितीत त्यांना मानाचे स्थान मिळणे दुरापास्त झाले आहे.
या ‘मिस सरगम’ चा शोध घ्यायचा प्रयत्न शुभा मुद्गलांसारख्या संगीतक्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कलाकाराने घेणे कौतुकास्पद आहे. विशेषतः तरुण कलाकारांना आणि प्रेक्षकांना आजूबाजूला पाहायला उद्युक्त करणारे, विचारप्रवृत्त करणारे हे लिखाण आहे. कलाकारांभोवतीच्या वलयाला डोळसपणे जाणून घ्यायचे असल्यास हे पुस्तक एक चांगली सुरुवात ठरू शकते.
लुकिंग फॉर मिस सरगम : स्टोरीज ऑफ म्युझिक अँड मिसऍडव्हेंचर
शुभा मुद्गल
प्रकाशक: स्पिकिंग टायगर
पृष्ठे: २०८, किंमत: ४९९ रुपये
COMMENTS