उत्तरप्रदेशात डेंग्यूची साथ; आकडे लपवल्याचे आरोप

उत्तरप्रदेशात डेंग्यूची साथ; आकडे लपवल्याचे आरोप

वाराणसी: उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेकडील भागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. फिरोझाबाद जिल

कहाणी ‘नासा’च्या ‘पर्सिवरन्स’ची
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात – रघुराम राजन
सिएटल कौन्सिलचा सीएए आणि एनआरसी विरोधात ठराव

वाराणसी: उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेकडील भागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. फिरोझाबाद जिल्ह्यामध्ये  रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. १४ सप्टेंबरला दिवसभरात ६८ जणांना डेंग्यू चे निदान झाले आणि व्हायरल तापामुळे जिल्हाभरात तब्बल ६० जणांचा मृत्यू झाला, असे जिल्ह्याच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात मृत्यू झालेल्यांपैकी केवळ पाच जणांच्या डेंग्यू चाचणीचे निकाल पॉझिटिव आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात रुग्णवाहिका, रुग्णालयातील जागा व मनुष्यबळाची कमतरता आहे अशा स्वरूपाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येत आहेत पण वैद्यकीय अधिकारी या बातम्यांचे खंडन करत आहेत.

उत्तरप्रदेशात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंप्रमाणेच डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद केली जात नसल्याच्या बातम्याही स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. १३ सप्टेंबर रोजी फिरोझाबाद जिल्ह्यात किमान १२,००० रुग्ण व्हायरल तापाची तक्रार घेऊन आले आणि ११४ जणांचा मृत्यू झाला, असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीत नमूद आहे.

फिरोझाबादमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याचा दावा स्थानिक काँग्रेसनेते संदीप तिवारी यांनी केला आहे. लहान मुलांसोबतच कारखान्यात तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनाही डेंग्यू ची लागण होत आहे आणि त्यातील निम्म्यांहून अधिक केसेसची नोंदच केली जात नाही आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मथुरा जिल्ह्यातील एका ३,००० लोकवस्तीच्या खेड्यातील प्रत्येक कुटुंबात व्हायरल तापाचा रुग्ण आहे पण बोटावर मोजण्याएवढ्या रुग्णांचीच डेंग्यूसाठी चाचणी करण्यात आली, असा आरोप गावकरी करत आहेत.

उत्तरप्रदेशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दुर्लक्षित आहे असे निरीक्षण एपिडेमिओलॉजिस्ट चंद्रकांत लहरिया यांनी नोंदवले आहे. कोविड-१९ रुग्णांची संख्या दडवण्याचे प्रकारही राज्यात बरेच घडल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डेंग्यूची चाचणी सरकारी रुग्णालयांत मोफत आहे. मात्र, निकाल येण्यास खूप दिवस लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांतील लोकांनाही खासगी रुग्णालयात चाचण्या करवून घेणे भाग पडत आहे. ग्रामीण भागात निदानाच्या सुविधाच अपुऱ्या असल्याने डेंग्यू चे निदानच होऊ शकत नाही ही समस्या आहे.

व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने अनेक महिने वाढ झाल्यानंतर काही भागांत स्थानिक यंत्रणांनी दलदलीच्या जागा व उघडी गटारे स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे, असे नागरिक सांगत आहेत.

उत्तरप्रदेशात पसरत चाललेल्या आजाराचे नाव ३ सप्टेंबरपर्यंत पुढे आले नव्हते. फिरोझाबादमध्ये डेंग्यू चा संसर्ग वाढल्याचे राज्य सरकारने अखेर ३ सप्टेंबरला मान्य केले. मात्र, ऋतूबदलानंतर होणाऱ्या आजारांनी दरवर्षी मृत्यू होतात. यात नवीन काहीच नाही, असा दावाही राज्य सरकारने केला. फिरोझाबादमधील मृत्यूंमागील कारण डेन-टू सेरोटाइपचा डेंग्यू असल्याचे, त्यानंतर सहा दिवसांनी, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिल्ली येथे सांगितले. या सेरोटाइपमध्ये रुग्णाला हेमोऱ्हेजिक ताप येतो आणि रक्तदाब अचानक घसरून मृत्यू होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. डेंग्यूने गंभीर स्वरूप धारण केले की त्याचा परिणाम वेगाने होत जातो. त्यामुळे डेंग्यू चे वेळेत निदान होणे महत्त्वाचे आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

“लहान मुले डासांची पैदास होणाऱ्या भागात खेळतात. त्यामुळे त्यांना डास  चावण्याची व परिणामी डेंग्यू होण्याची शक्यता अधिक असते,” असे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सयद हैदर मेहदी हुसैनी यांनी सांगितले.

फिरोझाबाद प्रशासनाने जलाशयांमध्ये सुमारे २५,००० गप्पी मासे सोडले आहेत. मात्र, हा उपाय मलेरियासाठी उपयुक्त आहे, डेंग्यू साठी नव्हे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

“गप्पी मासे मोठ्या जलाशयांमधील डासांची लोकसंख्या कमी करतात व त्यामुळे मलेरिया आटोक्यात आणण्यात मदत होते. मात्र डेंग्यू ला कारणीभूत ठरणारे डास हे प्रामुख्याने बादल्या, वॉटर कूलर्स, भांडी यांमध्ये साठवलेल्या पाण्यात होतात. त्यामुळे गप्पी मासे सोडण्याचा उपाय डेंग्यूसाठी लागू पडत नाही,” असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फिरोझाबादमध्ये पाणीपुरवठा दोन-तीन दिवसांतून एकदा होत असल्याने नागरिकांना पाणी साठवणे भाग पडते व या पाण्यात डासांची पैदास होते, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला डेंग्यू चा धोका आहे. दरवर्षी सुमारे १०० ते ४०० दशलक्ष जणांना डेंग्यू ची लागण होते. सध्या हा आजार ११२ देशांमध्ये होत आहे. यावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

उत्तरप्रदेशात २०१६ मध्ये डेंग्यूची मोठी साथ आली होती. यात १५,०३३ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर ४२ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेशातील कोणत्याही सरकारला डेंग्यू  नियंत्रणात आणणे जमलेले नाही. यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अस्वच्छता व कमकुवत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही कारणे आहेत, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0