प्रेमाची आर्त गोष्ट

प्रेमाची आर्त गोष्ट

प्रेम ही काही जडवस्तू नाही. कोणी म्हटलं, दाखवा प्रेम तर ती कुणाला दाखवता यायची नाही. ही जाणण्याची गोष्ट आहे. जसं निसर्गातलं आत्मतत्त्व सचेतन होतं आणि त्यातून आपल्याला हवा वा वाऱ्याची अनुभूती होती. तसंच हे प्रेम. वारा दाखवता येत नाही. पण तो सृष्टी व्यापून असतो. तसंच प्रेमही मानवी जीवन व्यापून असतं. स्पर्शातून, नजरेतून, गंधातून ते माणसामाणसांना अदृश्य धाग्याने गुंफतं. ते जितकं शारीर असतं, त्याहीपेक्षा ते अशारीर अधिक असतं. व्यक्तापेक्षा अव्यक्त अधिक असतं. आजचा कोरोना काळही त्याला अपवाद नाही आणि कधी काळी काम्यूने अनुभवलेला प्लेगचा काळही अपवाद नव्हता. विविध रुपांत भेटणार्‍या या प्रेमभावनांची संगती लावण्याचा हा प्रयत्न. ‘व्हॅलेंटाइन डे’ हे निमित्तमात्र...

प्रेमाला कुठल्याही भाषेची गरज नसते. ते कुठल्या भाषेत अडकूनही रहात नाही. शेक्सपिअर म्हणून गेला आहे,

Love is not love

Which alters when it alteration finds,

O no! it is an ever-fixed mark

That looks on tempests and is never shaken;

It is the star to every wandering bark…

कोरोनाने जेव्हा सागळीकडेच कहर माजला होता तेव्हा वाटणारी धास्ती अजूनही कमी नाही झालेली, पण एव्हाना आपण सगळेच कोरोना सोबत जगायला मात्र सरावलो आहोत. यात पहिला आघात स्पर्शावर होता. स्पर्शाची भाषा आपण जन्माला येतो तेव्हापासून शिकत असतो. पण या काळात हे जरासे अवघड झाले. जगात बरीच उलथापालथ होत असताना या नव्याने उभे राहिलेल्या भयामुळे घराघरात अनेक संघर्ष उभे राहिले. माझा एक मित्र बडोद्यात गेली कैक वर्षे चांगल्या पदावर नोकरी करत होता. कोरोना काळात सगळे बंद झाले, तेव्हा याची कंपनी पण बंद झाली. सुरुवातीला हा महिन्यात एखादा दिवस घरी यायचा, घरातले पण खुश असायचे. कायमस्वरूपी घरी आल्यावर मात्र नात्यात संघर्ष सुरू झाले. सक्ती आली की आसक्ती संपते, तसेच काहीसे होत गेले. पाब्लो नेरूदा म्हणतो Tonight I can write the saddest lines, I loved her, and sometimes she loved me too.. असेही असेल पण ते समजून घ्यायला हवे. आज एकांताच्या काठावर तो जगतो आहे. हे मी प्रातिनिधिक सांगतो आहे, असे अनेक घरात घडत गेले असणार. सततचा सहवास पण जाचत राहतो.

सवाल हा नाही की कसली पडझड होते आहे

सवाल हा आहे कुणाकुणाची परवड होते आहे…

व्यक्त-अव्यक्ताची बदलती तऱ्हा

खूप मोठी मोठी माणसे जवळची, दूरची, नात्यातली या काळात दगावली. त्यांच्या अंतिम क्षणाला बऱ्याच जणांना उपस्थित राहता नाही आले. आपल्याच माणसांना शेवटचा निरोपही देता आला नाही. म्हणजे प्रेम नव्हते किंवा कमी होते, असे नव्हे तर ते व्यक्त करण्याची पद्धत मात्र बदलून गेली आहे.

या काळात जगण्याचा वेग आणि पाठोपाठ गुंता अफाट वाढला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, असलेल्यांचे पगार आटले, खर्च बेसुमार वाढले, बँकेच्या ठेवींवरचे व्याज कमी झाले, येणारे पैशाचे स्रोत कमीत कमी आणि खर्चाला मात्र दहा तोंडे अशी परिस्थिती निर्माण झाली. आर्थिक काच वाढत असतानाच, लहान घरातील लोकांना आंतर सोवळे पाळणे देखील अवघड होते, पण लोकं हरली नाहीत, आपसातले नातेसंबंध जपत राहिली. लगेच कुणाला भेटायला जाता नाही आले तरीही संधी मिळेल तेव्हा भेटून आली.

कोरोनाने लोकांच्या मनात सर्वात जास्त भय आणि अनिश्चितता निर्माण करून ठेवली. उद्या काय होईल याची कुणालाच शाश्वती वाटेना. या भयामुळे आत्मलिप्तता वाढत गेली. लोकं स्वार्थी, स्वतःपुरती विचार करू लागली. अशा वेळी लोक बिथरतात, पण त्यांना सावरले ते आपसातील प्रेमानेच. प्रेम केवळ मनात ठेवून चालत नाही, ते वेळोवेळी व्यक्त करत रहावे लागते आणि ते निव्वळ स्पर्शातूनच होते असे नाही तर नेत्रस्पर्श, ध्वनिस्पर्श समोरच्याला बघून गहिवरून येणे या प्रकारे देखील व्यक्त करता येतेच की. पूर्वी आपण एकमेकांना पत्रे लिहायचो, आताशा शब्दांनी व्यक्त होणे थांबले आहे त्याची जागा चित्रभाषेने घेतली आहे. म्हणजे प्रेमाचे अविष्करण बदलले, त्याची घुसमट झाली पण ते कमी नाही झाले. 

कर्तव्यभावनेतून प्रेम जागले

या काळात एका परदेशातील डॉक्टरांनी सुरक्षितता म्हणून स्वतःचा दवाखाना बंद केला. नंतर त्यांच्या लक्षात आले की आपली आपल्या भोवतालच्या लोकांना खूप गरज आहे, ते वरिष्ठ नागरिक असूनही त्यांनी आपला दवाखाना पुन्हा सुरू केला, याच्या तळाशी असलेली प्रेमाची भावना कशी नाकारणार? माझी सखी परिचारिका म्हणून या काळात काम करताना कधी खचलेली, घाबरलेली नाही वाटली. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी येणारे प्रत्येक काम अगदी आस्थेने आणि न घाबरता केले, तेव्हा अल्बेर काम्यूच्या ‘द प्लेग’ कादंबरीमधल्या डॉक्टर बर्नार्डची आठवण येत गेली. तो एके ठिकाणी म्हणतो, मरण मला कधी मिठी मारेल ते माहिती नाही आणि त्याचा विचार करायलाही मला वेळ नाही, पण आता माझी या लोकांना गरज आहे आणि मी ती पूर्ण करायला हवी एवढेच मला कळते. प्लेगच्या साथीत पटापट मरणारी माणसे बघून तो असेही म्हणतो की काळ कितीही कठीण आला तरीही माणसांनी एकमेकांवर प्रेम करत राहणे महत्त्वाचे आहे. माझ्या एका मित्राला बरोड्याहून त्याच्या एका ओळखीच्याचा फोनवर मेसेज आला, ‘बहोत मुसिबत मे हूँ’ याचा अर्थ त्याला तिथे कुठलीही मदत सहज मिळत नव्हती. याने कसलाही विचार न करता त्याला ताबडतोब पैसे, कपडे पाठवलेच पण संपूर्ण बंदीच्या काळात दर महिना जमेल तशी आर्थिक मदत करत राहिला. ज्या क्षणी तो बडोद्यात गेला तेव्हा पुढील काही महिने पुरेल इतके रेशन कसलाही गाजावाजा न करता भरूनही दिले, हेही प्रेमच होते की. समोरच्याला दिलासा देता येणे हाही एक प्रेमाचा आविष्कारच आहे. 

मैत्रभावाला पूर्णत्व देणारं प्रेम

मराठीतले प्रसिद्ध लेखक माधव मोहोळकर (गीत यात्रीचे लेखक) आणि य. दि. फडकेंची अफाट दोस्ती होती. मोहोळकर प्रेमाने यदींना बाळ म्हणायचे. मोहोळकरांच्या मुलीच्या लग्नात यदींना यायला उशीर झाला तसे मोहोळकर अस्वस्थ होत गेले. अचानक कुणीतरी त्यांना यदी आल्याची बातमी दिली तेव्हा ते म्हणाले आता बाळ आलाय ना म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. यदी पैसे घेऊन आले होते आणि हे मोहोळकरांना माहिती होते, हा जो दिलासा देणे आहे तो प्रत्येक वेळी शब्दांत व्यक्त करता येईलच असे नाही.

अमृता प्रीतम-इमरोजचे नाते शरीरापासून आत्म्यापर्यंत टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले. ती एक साधनाच होती. दोघेही एकमेकांना दिलेल्या अवकाशात समृद्ध होत गेले, तिला प्रतिष्ठेचे पद्मविभूषण मिळाले त्याच काळात इमरोजची पण चित्रकार म्हणून ख्याती वाढत गेली. अमृता रात्रभर एका आवेगाने लेखन करत असायची तिला चहा हवा असायचा, इमरोज न चुकता रात्री दीडचा गजर लावून उठायचा, तिच्यासाठी चहा करून टेबलवर अलगद ठेवून परत आपल्या खोलीत झोपायला निघून जायचा. आपल्या सखीची लेखनतंद्री भंग न करता, हे तो नित्यनेमाने करायचा.

आपले मराठीतले प्रसिद्ध लेखक शं. ना. नवरे दिवसभर मुंबईत शूटिंग वगैरे आटपून रात्री उशिरा घरी यायचे. दादरला त्यांना शेवटची लोकल मिळायची ती डोंबिवलीत रात्री ०१.४० ला पोचायची. स्टेशनसमोरच त्यांचा बंगला होता. त्यांची बायको आठवणीने दीडचा गजर लावून झोपायची, परत गजराच्या आवाजाने सासूबाईंची झोपमोड होऊ नये म्हणून अगोदरच उठायच्या. कंदिलाच्या दिव्यांच्या दिवसांत ती शन्ना दरवाजात येण्यापूर्वीच दार उघडून त्यांचे स्वागत करायची, शन्ना म्हणायचे मला हे कोडे बरेच दिवस उलगडले नव्हते की हिला कसे कळते मी आलोय ते. प्रेमाची भावना शारीर भाषेच्या पलीकडे घेऊन जाणे इतके सोपे नसते. 

प्रेमभावनेचे आविष्कार

द.आफ्रिकेत असताना फिनिक्सच्या आश्रमासाठी रात्री-अपरात्री गांधी स्टेशनवर उतरून चालत निघायचे तेव्हा भोवताली राहणारी गरीब वस्तीतली मंडळी आठवणीने त्यांच्या वाटेवर दिवे लावून ती वाट उजळवून टाकायचे. हाही प्रेमाचा आविष्कारच होता.

मराठीतील प्रसिद्ध ललित लेखक पु. भा. भावेंचे नागपुरात एका हॉटेलमध्ये नेहमीच येणे-जाणे होते. त्यांना चहा अगदी कपातून बशीत ओथंबलेला हवा असायचा. निघताना तिथल्या वेटरशी ते अगत्याने, प्रेमाने बोलायचे आणि वर भरपूर टीपसुद्धा द्यायचे. तिकडे दिल्लीत नथुराम नावाच्या माथेफिरूने गांधीजींची छातीवर गोळ्या झाडून हत्या केली. देशात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्या दाबातून जी धरपकड झाली सामान्य, प्रतिष्ठित अशा सर्व स्तरातल्या संघ सहानुभूतीदारांचे अटकसत्र सुरू झाले, त्यात भावेंनाही अटक झाली होती. पोलिसांनी चक्क बेड्या घालून त्यांना नेत असताना भावेंनी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच हॉटेलमध्ये त्याच वेटरने नेहमीप्रमाणेच कपातून पार बशीमध्ये ओथंबलेला चहा बेड्या घालून असलेल्या मळक्या कपड्यातल्या भावेंना दिला. चहा घेऊन निघताना भावे त्याला म्हणाले, आज तुला टीप देता येणे शक्य नाही, तो न बोलता स्तब्ध झाला आणि नेहमी करायचा त्यापेक्षा कडक सलाम त्याने भावेंना केला. हे पण प्रेमच होते की. 

ममता आणि प्रेम

ममता आणि राजेंद्र कालिया हे दोघे हिंदीतील प्रस्थापित साहित्यिक आणि नवरा बायको देखील. दोघांचा आपापल्या क्षेत्रात चांगलाच दबदबा. इलाहाबाद मधे असताना ममता एक दिवस घरातल्या आर्थिक तंगीला आणि राजेंद्रच्या दारुच्या व्यसनाला वैतागून दुपारच्या वेळी आत्महत्या करायला गंगेच्या घाटावर पोचते. तिथे अनेक पंडे, मल्ला गप्पा टप्पा करत बसलेले असतात. तिच्या मनात पहिला विचार हा येतो की समजा मी गंगेत उडी मारली तर या अनोळखी माणसांचे स्पर्श माझ्या अंगभर रेंगाळतील, नको नको ती माणसे मला स्पर्श करतील आणि घरी लहान मुले आहेत, सासू आहे, त्यांचे काय होईल? ती चटकन मागे फिरते. घरी खुर्चीवर नुकताच झोपेतून उठलेला नवरा निवांत बसून तिला न्याहाळत बसलेला बघून हिच्या डोक्यात एक सणक जाते. राजेंद्र तिला अगदी बेफिकीरपणे विचारतो कुठे गेली होतीस? ती रागातच खरे तेच सांगते म्हणते, गंगेच्या घाटावर मरायला गेले होते. तो तितक्याच शांतपणे विचारतो मग परत का आलीस? तिच्या डोळ्यात पाणी येते. म्हणते, तुला काहीच कसे वाटत नाही? लहान मुले आहेत, म्हातारी सासू आहे त्यांचा विचार करून परत आले. राजेंद्र छानपैकी बाहु फैलावत तिला म्हणतो सरळ सांग ना, माझ्या प्रेमापोटी परत आलीस ते ये! माझ्या कुशीत तुझा सगळा राग काढून टाकतो. या अशा प्रेमाची छटा अगदीच निराळी.

अशीच पुस्तकाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसांच्या कथा, किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. नुकतेच निर्वतलेले हिंदीतले मोठे कवी मंगलेश डबराल एकदा पंकज त्रिपाठींच्या घरी पोचले. भर दुपारची भणभणती वेळ. घरात पाय ठेवला तेव्हा ते खूपच थकलेले होते. त्यांना पंकजजींनी हात धरून बसवले, पाणी वगैरे पाजले, मंगलेशजींना चांगलीच धाप लागलेली. पंकजजी हैराण आता काय करायचे, डॉक्टरांकडे न्यावे की काय या संभ्रमात असताना त्यांना मंगलेशजींचा आवाज कानावर पडला, ते विचारत होते, तू पुस्तके कुठे ठेवतोस? त्यासाठी वेगळी अभ्यासिका वगैरे आहे का? मला ताबडतोब तिथे घेऊन चल.

आणि ज्या क्षणी ते पुस्तकाच्या संपर्कात आले, त्याच्या पुढच्या क्षणी ते नॉर्मल होऊ लागले आणि पुढे म्हणाले खूप वेळ नजरेला जर पुस्तके दिसली नाही म्हणून मी अस्वस्थ होतो. पुस्तकांवरच्या प्रेमाचीच ही साक्ष होती. 

अक्षय्य भावना

प्रेमाची भावना अक्षय्य असते. ती आपल्याप्रमाणे मुक्या जनावरातही असते. चाळीसगावचा महर्षी चित्रकार केकी मूसच्या आश्रयाला आलेला कुत्रा आपल्या मालकाच्या शोधात आयुष्यभर गाडीच्या मागे धावत राहतो आणि तिथेच प्राण सोडतो, तेव्हा केकी मूस त्याचे दफन प्रेमाने आपल्या बंगल्यातच करतो या प्रेरणा कुठल्या असतात, याच्या तळाशी प्रेमच असते ना.

पाब्लो नेरूदा म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतोय कारण मला यातून बाहेर पडण्याचा दुसरा कुठला मार्गच दिसत नाही, हेच आपला थोरो वेगळ्या शब्दात म्हणतो की – प्रेमावर उतारा म्हणून प्रेमच करावे लागते!

(लेखक रेल्वे अभ्यासक तसेच साहित्य-संगीताचे जाणकार आस्वादक आहेत.)

मूळ लेख मुक्त संवादच्या १ फेब्रुवारी २०२२च्या अंकातून साभार.

COMMENTS