वंचित बहुजन आघाडीत उभी फूट

वंचित बहुजन आघाडीत उभी फूट

वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडली असून, नाराज लक्ष्मण माने यांनी राजीनामा दिला आहे.

विधायक राष्ट्रवादाची हाक
कोरोना – छोट्या देशांचे मोठे धडे
लोकपालला स्वत:चे कार्यालय नाही

वंचित बहुजन आघाडीचे महासचिवपद गोपीचंद पडळकर यांना दिल्याने आघाडीत काम करण्यासारखे काही उरले नाही अशी नाराजी गुरुवारी आघाडीतील एक ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनाला मुलाखत देताना व्यक्त केली. लक्ष्मण माने यांच्या अशा राजकीय पवित्र्याने वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली असून माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा राजीनामाही मागितला आहे. या आघाडीत भाजप व संघपरिवाराच्या लोकांचे प्रस्थ वाढत आहे. त्यामुळे ही वंचित आघाडी बहुजनांची नव्हे तर उच्चवर्णीयांची झाली आहे असा आरोपही माने यांनी केला. माने यांनी पक्षाच्या संस्थापक सदस्यत्वाचा व संसदीय मंडळाचा राजीनामाही आंबेडकर यांच्याकडे पाठवला आहे.

वंचित आघाडीच्या महासचिवपदासाठी गोपीचंद पडळकर यांचं नाव आपण सुचवलं, पण ते अध्यक्षांनी आपणाकडून वदवून घेतलं होतं.  असेही माने म्हणाले. आपली लढाई तत्वाची आहे. गेली ५० वर्षे संघपरिवार, भाजप व उजव्या शक्तींिवरोधात लढलो. पण या लोकसभा निवडणुकीत त्यांना साथ देऊन आयुष्यातील मोठी चूक केली असेही माने म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर उभी होती. अशा आघाडीत भाजप व संघ परिवारातील माणसे पदाधिकारी बनतात. आपण त्यावर मते देत नसू आणि विरोधक आपल्याला भाजपची बी टीम म्हणत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय असा सवाल माने यांनी केला. आपल्या पक्षाच्या वर्तनाने भाजपला १०-१२ खासदार मिळाले पण आपल्या आघाडीला काय मिळाले, असा सवाल करत लोकसभेत स्वतंत्र लढण्याचा पक्षाचा निर्णय चुकीचा होता, ती चूक आता विधानसभा निवडणुकात व्हायला नको, अशी कबुली त्यांनी दिली. वंचित आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, आरपीआयचे विविध गटांशी सामंजस्य ठेवून भाजपविरोधात लढले पाहिजे. एकट्याच्या बळावर आपण सत्तेत येऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

आपल्यामागे बहुसंख्य सदस्य असल्याचा दावा माने यांनी केला. आम्ही सर्वांनी प्रकाश आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निवडून दिले होते आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशाबद्दल आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत असेही माने म्हणाले.

‘मानेंना प्रदेशाध्यक्ष केले नाहीत म्हणून आरोप’

दरम्यान लक्ष्मण माने यांच्या आरोपावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण माने गेले दीड महिना वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद द्या म्हणून मागणी करत होते. पण त्यांच्या या मागणीला अनेकांचा विरोध होता. त्यातून त्यांनी अशी पावले उचलल्याचा पडळकर यांनी दावा केला आहे. आपण पूर्वी भाजपमध्ये होतो, आणि ते जगजाहीर आहे, संघातले आपले फोटो आहेत, भिडे गुरुजींशीही आपले संबंध होते. पण हे सर्व संबंध तोडून वंचित आघाडीला याची पूर्ण कल्पना देऊन आपण पक्षात आलो होतो आणि या सर्व गोष्टी लक्ष्मण माने यांना माहिती आहेत. आता या गोष्टींना काहीही महत्त्व नाही. माझ्या येण्याला त्यावेळी माने यांनी का आक्षेप घेतले नाहीत, तेव्हा ते घ्यायला हवे होते, असाही सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. लक्ष्मण माने यांचे राष्ट्रवादी पक्षाशी संबंध आहेत, त्यांच्या बोलण्यामागे हीच मंडळी आहेत असा आरोप पडळकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या एकूण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1