मोदींच्या वाराणसी भेटीआधी झोपड्या पाडल्या

मोदींच्या वाराणसी भेटीआधी झोपड्या पाडल्या

नवी दिल्लीः देवदिवाळीच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ वाराणसीत येत असून गंगा नदीच्या किनार्यानजीक असलेल्या सुजाबाद भागातील झोपड्या पालिका प्रशासनाने जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईने ६० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. ही कुटुंबे गेली ५ दशके या भागात राहात होती.

मोदींचे हेलिकॉप्टर सुजाबाद भागात उतरणार आहे. येथे सुमारे अडीचशे नागरिक राहात असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदींच्या वाराणशी दौर्याआधी काही कुटुंबांना प्रशासनाने तेथून हटकले होते. फेब्रुवारी महिन्यात दीनदयाळ उपाध्याय यांच्या एका पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मोदी आले होते, तेव्हा पालिकेने काही झोपड्यांवर कारवाई केली होती.

सुजाबाद भागात राहणारी बरीचशी कुटुंबे दलित समाजातील धारकर जातीतील असून अनेक दशके ही कुटुंबे बांबूच्या वस्तू, बांबूच्या टोपल्या व पंखे तयार करण्याचे काम करत आहेत.

आपल्या झोपड्यांवर कारवाई केल्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे व त्यावर याच जागेचा पत्ता देखील आहे. दरवेळी एखादा व्हीआयपीचा या भागात दौरा असला की आमच्या झोपड्या पाडल्या जातात असे रामविलास (नाव बदलले आहे) या रहिवाशाने द वायरला सांगितले. आमच्या घरांवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे, आम्हाला पोलिसांच्या दयेवर अवलंबून राहावे लागते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

रेश्मी (नाव बदलले आहे) यांनी सांगितले की, गेल्या वेळच्या कारवाईनंतर काहींनी दुसर्या गावात जाणे पसंत केले. आम्हाला मात्र उघड्यावर राहावे लागत आहेत. आम्हाला दुसरीकडे जागा नाही. पोलिसांनी एका ६० वर्षाच्या महिलेच्या भाजीपाल्याची गाडी तोडली तिला आता जगण्याचे साधन उरले नाही.

ही झोप़डपट्टी धुर्मी-पाडव हेलिपॅड रोड मार्गावर असल्याने कोणाही मंत्र्यांची वाराणसी भेट असली की त्यांच्यावर कारवाई केली जात असते. या झोपडपट्टीवासियांच्या मदतीला कोणीही लोकप्रतिनिधी येत नाही. या भागातले सरपंचही या कुटुंबांची जबाबदारी घेत नाही. मते मागायला सर्व येतात. स्थानिक पोलिस दमदाटी करत असतात. आमचे पुनर्वसन करा अशी मागणी गेली कित्येक वर्षे करूनही हाती काही मिळालेले नाही, असे रामविलास सांगतात.

या भागातील आरोग्य व स्वच्छता या विषयावर काम करणार्या इनर व्हॉइस फाउंडेशनचे सदस्य सौरभ सिंग सांगतात की, आम्ही प्रशासनाला येथील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची अनेक वेळा मागणी केली आहे. पण या कुटुंबांना भेटायला अद्याप कोणी आलेले नाही. एका वेळी उपजिल्हाधिकार्यांची भेट ठरली होती पण ते आलेच नाहीत. या भागाचे प्रशासनाने सर्वेक्षण करावे व तोडगा काढावा एवढीच आमची मागणी असल्याचे सिंग सांगतात.

लॉकडाऊनच्या काळात इनर व्हॉइस फाउंडेशनतर्फे या भागातील अडीचशे जणांना रेशन पुरवण्यात आले होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदींच्या वाराणशी दौर्यावेळी या कुटुंबांना एका देवळात राहण्याची जबरदस्ती करण्यात आली होती.

द वायरने या संदर्भात वाराणसीचे एसडीएम प्रमोद पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मूळ बातमी

COMMENTS