राज्यसंस्थेच्या बेदरकार कृत्याचा प्रतिकार करण्यास कोणत्याही प्रकारचे कायदेशीर उपाय नाहीत कारण सर्वच संस्था कोलमडल्या आहेत अशावेळी आपण ह्या तरुण मुलींच्या साहसाचे आणि धैर्याचे स्वागत केले पाहिजे.
आज देवांगना आणि नताशा नरवाल या दोन तरुण स्त्रियांना तुरुंगात टाकल्याला सहा महिने झाले आहेत. आपण त्यांना संदेश देवून त्याच्या बरोबर उभे राहुयात.
पण मी जेंव्हा हा निरोप लिहित आहे त्या वेळी मी विचार करते आहे की: आपण आत्ता जिथे आहोत तिथे कसे पोहचलो?, दिल्ली जी आपली राजधानीत आहे, तिथे तरुण स्त्रियांना उचलले जाते आणि तुरुंगात टाकले जाते ? त्यांना एका कारणासाठी जमीन मिळाल्या मिळाल्या, लगेच बेकायदेशीर कृत्य ह्या भयानक कायद्याखाली पुन्हा अटक होते, ज्या अंतर्गत जामीन मिळणे नुसते अवघड नाही तर अशक्यप्राय असते.
मी जिने आणिबाणीच्या काळातील स्नेहलता रेड्डी ह्यांच्यावर माहितीपट बनवण्यासाठी त्याकाळावर संशोधन केले त्याच काळाची मला आत्ता आठवण झाली, ज्यात असे म्हणले जायचे, की ‘वकील नाही, कोणतीही सुनावणी नाही आणि कोणतेही आव्हान नाही’ जणू याची पुष्टीच झाली. स्नेहलता रेड्डी जशा तुरुंगात गेल्या तशा तुम्हीही गेलात. एका कायद्याखाली कधी सोडले जाते आणि लगेच दुसर्या कायद्याखाली अटक केली जाते जे आत्ताही झाले. आणिबाणीच्यावेळी त्या विरोधात उभे राहिलेले अनेक पुरुष हे बंगलोरच्या तुरुंगात होते आणि स्नेहलता रेड्डी एकट्या फक्त एकांतवासात होत्या. कारण त्या एकट्या स्त्री-राजकीय कैदी होत्या. कालांतराने आजारांनी त्यांना घेरले, त्यांना वैद्यकीय सेवा न मिळाल्याने आणि दम्याचा त्रास असल्याने त्यांचे निधन झाले. त्या कदाचित आणिबाणीच्या काळात एकच कैदी असतील ज्यांचा मृत्यु झाला.
आपण पुन्हा त्या काळात गेलो आहोत का! राज्य संस्थेच्या कोणत्याही बेदरकार कृत्याला कोणतेही कायदेशीर उत्तर नाही. कारण सर्वच संस्था या कोलमडलेल्या आहेत, जरी त्या वेळेसारखे आत्ता नागरी हक्कांचे अधिकृत निलंबन झालेले नसले तरी. असे देसून येते की औपचारिक अशी एक व्यवस्था आहे ज्यात न्यायालयात वकील नेमणे, सुनावणी आणि अपील हे सगळे असते परंतु अनेकवेळा ते हक्क नाकारले जातात जे वृद्ध किंवा ज्यांच्या कैदेविषयी साशंकता आहे त्यांना सुद्धा असा हक्क खरं म्हणजे दिला जातो, पण अनेकदा तो त्यांना मिळत नाही.
मी सध्या अत्यंत उद्विग्न आणि नैराश्यात आहे: १५ ऑगस्ट १९४७ ला याच भारताला आपण अस्तित्वात आणले का! ज्यासाठी अनेक लोक अगणितवेळा तुरुंगात गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या त्यादिवशी मी शाळेत होते. नवा ध्वज फडकावून नव्या राष्ट्राच्या जन्माची घोषणा केली जात होती त्या समारंभात मी सामील झाले होते. आम्हाला सगळ्यांना मिठाई देवून तो दिवस साजरा केला गेला.
आणि आता सात दशकानंतर आपण संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकत आहोत. पर्यायानी आपण त्यांना सर्व नागरिकांना समान हक्क मिळवून देणाऱ्या देशासाठी संघर्ष करण्यास भाग पाडत आहोत.
मी तशी भावनिक व्यक्ती नाही पण मी माझ्या इतिहासात घडलेली स्त्री आहे; त्याच प्रमाणे मी इतिहासाचे चाळीस वर्ष अध्यापन केलेली शिक्षिका असल्याने आणि तरुण पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकवले असल्याने विद्यार्थ्यांना माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आणि विशेष असे स्थान आहे.
मिरांडा हाउस हे माझे महाविद्यालय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सात महिन्यात स्थापन झाले आणि ते मुलींसाठी एक अग्रणी अशी संस्था म्हणून नावारूपाला आले. माझ्या काही विद्यार्थिनी या लोकशाही आणि स्त्री चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. याच महाविद्यालयातून देवांगनाने पदवी घेतली.
या महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी आणिबाणीच्या विरोधातही उभे राहिले होते. काही समाजवादी साथिना भूमिगत व्हावे लागले, जे त्यामुळे निर्माण झालेल्या शारिरीक आणि मानसिक तणावातून कधीच बाहेर येऊ शकले नाहीत. म्हणूनच ह्या विद्यार्थिनींबरोबर जे घडते आहे त्यामुळे माझी खूप तळमळ होते आहे. जेंव्हा या तरुण मुली त्यांचे समानतेवर, धर्मनिरपेक्ष आणि मानवतेवर आधारीत असे जग ज्यामध्ये सर्वजण मन ताठ करून जगू शकतात हे स्वप्न त्या वास्तवात उतरवू पाहतात त्यावेळी त्यांना कैदेत टाकले जाते आणि राजकीय होण्यामुळे दंडित केले जाते. हा क्षण खूप नैराश्य आणणारा आणि भारावून टाकणारा आहे.
थांबा कदाचित हा क्षण उत्साहात साजरा करण्याचासुद्धा असू शकतो. साफ्फुरा, गुल्फिशा फातिमा आणि पिंजरा तोड गटातील अनेक तरुण मुली आपल्याला काही तरी सांगत आहेत. (ज्यांच्या बरोबर मी वसतीगृहासंदर्भात काम केले. जिथे तरुण मुलीना लहान बालीकांप्रमाणे वागवले जाते, “त्याच्या भल्यासाठी” असे म्हणून त्यांना वसतीगृहात कुलुपात ठेवले जाते. त्यांच्यासाठी मी स्त्री चळवळीच्या इतिहासावर काही व्याख्याने दिली)
स्त्रियांना फक्त पंचायत राज्य व्यवस्थेत सामील करून भागणार नाही. आपण स्त्रियांच्या राजकारणातील सहभाग यावर आत्तापर्यंत खूप चर्चा केली. याउलट आपण अशा स्त्रिया तयार करायला पाहिजेत ज्या न्याय्य भारतासाठी निडरपणे लढतील.
त्या आपल्याला आठवण करून देत आहेत, हा एक असा नवा क्षण आहे की ज्यात स्त्रियांना पिंजऱ्यात बंद करण्याचे, त्यांची मुस्कटदाबी करून दहशत निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.
या नैराश्य आणणाऱ्या क्षणात हे आपण साजरे करायला हवे. आपण देवांगना आणि नताशा दाखवत असलेल्या धैर्याला सलाम केला पाहिजे. त्या आपल्याला सांगत आहेत की चांगल्या भारताच्या आपल्या स्वप्नासाठी आपण लढले पाहिजे, जरी त्याचा अर्थ हा सध्या राज्य संस्थेकडे असणाऱ्या सत्तेशी संघर्ष असा का असेना!
देवांगना, नताशा आणि त्यांच्या सारख्या इतर तरुण स्त्रियांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याला ही खात्री नक्की आहे की त्या आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे नेत आहेत जरी आत्ता आपल्याला त्याचे स्वरूप कायअसेल याची संपूर्ण कल्पना नसली तरीही ….
उमा चक्रवर्ती, या स्त्रीवादी इतिहासकार असून त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस, दिल्ली या महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे.
मूळ लेखाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘स्त्री अभ्यास केंद्रा’तील प्राध्यापिका स्वाती देहाडराय यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे.
COMMENTS