विदुषकांच्या हाती जगाची दोरी

विदुषकांच्या हाती जगाची दोरी

भवताल-समकाल - कधीकाळी अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या आणि सध्याच्या काळात जॅम आणि लोणच्याचा मोठा उत्पादक असलेल्या ब्रिटनची गेल्या चार वर्षाची अवस्था पाहिल्यास आलम दुनियेकडे छद्मीपणाने पाहता पाहता हा देश उर्वरीत जगासाठी हास्यास्पद होऊ लागला आहे.

इंग्लिश माणसाची विनोदपद्धती हा तसा अभ्यासाचा आणि फार जुना विषय आहे. ब्रिटिश विनोद हा शक्यतो कोरडेपणा आणि आत्मधिक्काराने भरलेला असतो. त्यात एरव्ही निषिद्ध समजल्या जाणाऱ्या लैंगिक नात्यांच्या उल्लेखांचा मुक्तहस्ताने वापर केलेला असतो. इथे-तिथे उच्च दर्जाचे अवघड विनोदी शब्द भरलेले असतात आणि एखादा इंग्लिश माणूस बोलत असतांना तो गांभीर्याने बोलतो आहे की विनोदाने की गंभीर-विनोदाने हे बाहेरच्या एखाद्याला लवकर कळून येत नाही, किंबहुना बाहेरच्या कुणाला ब्रिटनचे काय कळते? अशी आत्मप्रौढीही तिथल्या अनेक राजकारण्यांना असते.

बहुतांश ब्रिटिश राजकारण्यांचा उरलेल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असू शकतो. या जगातले काही देश कधीकाळी आमचे गुलाम होते हे ब्रिटिश लोक अजून विसरलेले नाहीत. जगातल्या काही देशांतल्या लोकांना कधीकाळी साधे मॅनर्सही नव्हते आणि हे मॅनर्स आम्हीच त्यांना शिकवले आहे असा दावा करायला अनेक ब्रिटिश मंडळी मागेपुढे पाहत नाहीत.

कधीकाळी अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या आणि सध्याच्या काळात जॅम आणि लोणच्याचा मोठा उत्पादक असलेल्या ब्रिटनची गेल्या चार वर्षाची अवस्था पाहिल्यास आलम दुनियेकडे छद्मीपणाने पाहता पाहता हा देश उर्वरीत जगासाठी हास्यास्पद होऊ लागला आहे. ब्रिटनची व्यवस्था हास्यास्पद होण्याचे मुख्य कारण आहे ब्रेक्झिटचा निर्णय आणि या निर्णयामागे असलेली कॉर्पोरेटधार्जिणी दोनचार डोकी ज्यांच्यामध्ये सर्वात वरती नाव येते ते बोरिस जॉन्सन यांचे.

या जॉन्सन महाशयांचे कर्तृत्व डोनाल्ड ट्रम्प महाशयांच्या तडकभडक व्यक्तिमत्वाशी इतके मिळतेजुळते की त्यांना माध्यमांतले अनेक लोक ब्रिटनचा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. एरव्ही ही काजव्याची तुलना सूर्याशी झाली असती पण जॉन्सन यांची राजकीय अराकतेत वाढत जाणारी झळाळी पाहिली तर हे महाशय उथळपणा आणि किरकिरेपणात लवकरच ट्रम्प महाशयांना मागे टाकतील. सध्या जुजबी इंग्रजी सोडून कुटनीतीसाठी आवश्यक असणारे इंग्रजी शिकण्यासाठी अठरा अठरा तास रॅपिडेक्स इंग्लिश स्पिकिंग कोर्सची पारायणे करणाऱ्या काही आत्मकेंद्री आशियाई नेत्यांसाठी बोरिस जॉन्सन हे जळफळाटाचे कारण ठरत आहेत. जगभर लोकप्रियतानुनय वाढल्यानंतर निवडून आलेल्या अनेक उजव्या राष्ट्रप्रमुखांसाठी अख्खे जग हे स्थानिक न्यायाने चालणाऱ्या एखाद्या वस्तीसारखे झाले असून आपण आपल्या गल्लीचे भाई कसे आहोत आणि आपली गल्ली भारी असल्याने वस्तीवरही आपलीच हुकुमत कशी चालविता येईल या प्रयत्नांत सध्या अनेक भाईलोक व्यस्त आहेत. या भाईलोकांच्या वाढत्या लोकप्रियतेला भूलुन त्यांचे अनेक ‘पंटर’ लोक आपापल्या गल्लीच्या भाईसाठी रात्रंदिवस सोशल मीडियामध्ये जीवाचे रान करीत असतात.

चार वर्षांपूर्वी याच महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या रॅलीला कोण येणार? हा प्रश्न तसा अवघड होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीतर्फे नामांकनासाठी आणखी १६ लोक इच्छुक होते आणि या सगळ्यांत ट्रम्प यांचे नाव बरेचसे खाली होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या पहिल्या रॅलीसाठी मोफत टी-शर्टस् आणि प्रत्येकी ५० डॉलर मोबदला देऊन गर्दी जमा करण्यात आली.

अमेरिकेची लोकसंख्या तशी कमी असल्याने ट्रम्प महाशयांना ट्रक भरभरून लोक आणून त्यांच्यासमोर गळ्याच्या शिरा ताणत भाषण देण्याचा मोह टाळावा लागला, एरव्ही असे काही करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. तर अशा ५० डॉलर देऊन घडवून आणलेल्या सभा माध्यमांसाठी आणि सामान्य मतदारांसाठीही हास्यास्पद गोष्ट होती. हळूहळू दिवस जाऊ लागले तसे ट्रम्प आपल्या पक्षाच्या अंतर्गत शर्यतीत वेगाने पुढे सरकू लागले. लवकरच रिपब्लिकन पक्षातर्फे तेच उमेदवार होणार हे स्पष्ट झाले. गेली सहा महिने आपण ज्या शक्यतेला हसण्यावारी नेत होतो ती समोर घडतांना पाहून अमेरिकेच्या उदारमतवाद्यांना काळजी वाटू लागली. उमेदवार म्हणून ट्रम्प असले तरी प्रत्यक्ष अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही व्यक्ती निवडून येणार नाही, असे तिथल्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना आणि समर्थकांना वाटत राहिले.

प्रत्यक्ष मतदानाच्या आठवड्यापर्यंत प्रचार शिगेला गेला. दरम्यान तत्कालीन एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ओबामा प्रशासनात असताना केलेल्या काही चुकांची माहिती ऐनवेळी प्रसार माध्यमांना दिली. हिलरींचा निवडणुकीत पराभव झाला आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले. जेम्स कॉमी यांनी ऐनवेळी अवसानघात केला नसता तर हिलरी क्लिंटनच निवडून आल्या असत्या असा समज त्यांच्या समर्थकांनी आणि माध्यमांनी करून घेतला.

लवकरच या निवडणुकीत रशियन हॅकर्सने ट्रम्प यांच्या विजयासाठी सोशल मीडियामध्ये फेरफार केल्याची माहिती समोर आली. पुढच्या टप्प्यात हे प्रकरण आणखी खोलवर मुरले असल्याचे निदर्शनास आले. मतदानात  फेरफार केले गेल्याची माहिती समोर आली. नेमके कुठल्या मतदारसंघातली मतदानयंत्रे हॅक झाले होते याची माहिती लोकप्रतिनिधींना असूनही त्यांनी ती आपल्या जनतेला दिली नाही. या निवडणुकीत गैरप्रकार झाले आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना देखील ट्रम्प यांच्याविरोधात अद्याप महाभियोगाची कार्यवाही झाली नाही. ती तशी कधी होईल याची शक्यताही आसपास नाही.

ट्रम्प यांच्या प्राथमिक प्रचाराच्या समांतर काळात युरोपात राजकीय वातावरण तापत होते आणि ब्रिटनमधल्या एका वर्गाने ब्रिटनला युरोिपयन महासंघातून वेगळे करण्यासाठी नव्याने कंबर कसली होती. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे ही मागणी तशी बरीच जुनी होती. ब्रिटन वेगळे झाल्यास त्यातून होणाऱ्या संभाव्य फायद्यांच्या चर्चा अनेक ठिकाणी वरचेवर घडवून आणल्या जात होत्या. २०१५च्या अखेरीस ब्रेक्झिटच्या मागणीने जोर धरला आणि हा प्रश्न मतपेटीतून सोडविण्यासाठी तयारी सुरू झाली. ब्रेक्झिटचा निर्णय ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी बायनरी परिस्थिती आणून ‘लीव्ह’ आणि ‘स्टे’ अशा दोन कॅम्पेन रचल्या गेल्या. ‘ऊन ऊन भात, त्यावर गरम तूप आणि वेगळं होण्यात भलतचं सुख’, या विसूभाऊ बापटांच्या कवितेप्रमाणे ब्रिटन युरोपियन महासंघातून काय काय सुखे मिळणार आहेत याची मोठी यादीच लीव्ह कँपेनच्या नेत्यांनी केली. ज्यात बोरिस जॉन्सन यांचे नाव अगदी वरती होते.

जॉन्सन यांची विभाजनवादी भाषणे आणि त्यातून येणाऱ्या संभाव्य सुखांच्या आश्वासनांना भुलून ब्रिटिश जनतेतल्या निम्म्याहून थोड्याशा जास्त लोकांनी ‘लीव्ह’ पर्यायाला मतदान केले आणि ब्रिटनच्या युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले.

वरवर पाहता ही निवडणूक अतिशय चुरशीची होती आणि ज्यात शेवटी ‘लीव्ह’ कॅम्पेनचा निसटता विजय झाला असा निष्कर्ष ‘स्टे’ कॅम्पेनच्या समर्थकांनी आणि माध्यमांनी काढला. पुढे लवकरच या निवडणूकीतही रशियन हॅकर्स आणि अधिकाऱ्यांनी फेरफार केल्याचे निदर्शनास आले. आणखी काही काळानंतर हे प्रकरण बरेच खोलवर गेलेले असून त्यामागचे मुख्य सूत्रधार शोधणे अवघड असल्याचे दिसून आले.

ब्रेक्झिटच्या निमित्ताने ब्रिटनमधील जनमत  निवडणूक प्रचाराच्या कंपन्यांनी कसे फिरवले यासंबंधीचा ‘Brexit: The Uncivil War’ हा चित्रपट जरूर पाहावा.  

ब्रेक्झिटच्या निकालानंतर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी राजीनामा दिला आणि तिथल्या बहुमतातल्या पुराणमतवादी पक्षाच्या सदस्यांनी थेरेसा मे यांना नेता बनवून त्यांची पंतप्रधानपदी निवड केली. पंतप्रधानपद स्वीकारल्याच्या दिवसापासून थेरेसा मे यांची एकमेव जबाबदारी होती ती युरोपियन महासंघासोबत ब्रेक्झिटचा वाटाघाटीचा करार करणे.

हा करार नेमका काय असावा, महासंघातून बाहेर पडल्यानंतर युरोपियन महासंघासोबत आणि त्यातल्या इतर देशांसोबत काय व्यापार धोरण असावे, आर्थिक व्यवहार कसे केले जावेत, नागरिकत्वाचे प्रश्न, सीमेवर सैन्य असावे की नसावे, असल्यास कशा पद्धतीचे असावे अशा असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांभोवती ब्रेक्झिटचा मुद्दा येऊन अडकला. त्यावर थेरेसा बाईंनी कधी असे तर कधी तसे बोलून आणि कधी सरळ समजणारच नाही अशी विधाने करून ब्रेक्झिटचा मुद्दा किचकट करून टाकला.

हळूहळू पुराणमतवाद्यांचा थेरेसा मे बाईंवरचा विश्वास उडू लागला, वरचेवर त्यांना नेतेपदावरून आणि पर्यायाने पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी मतदाने घेतली जाऊ लागली. या सगळ्यांतून कसाबसा तग धरून जेरीस आलेल्या थेरेसा मे यांनी सात जून रोजी अखेरीस राजीनामा दिला. त्यानंतर पुढचा नेता निवडण्यासाठी पुराणमतवाद्यांनी नव्याने अंतर्गत निवडणुका घेण्याचे ठरविले आणि त्यात पुन्हा दहा इच्छुकांची नावे समोर आली. या दहा इच्छुंकामध्ये एक नाव बोरिस जॉन्सन यांचेही होते आणि ज्याप्रमाणे ट्रम्प यांच्या विजयाबद्दल लोक साशंक होते त्याप्रमाणेच जॉन्सन यांच्या बाबतीतही साशंक राहिले.

हळूहळू अंतर्गत निवडणुकांत जॉन्सन यांची सरशी होऊ लागली आणि हा लेख लिहिला जात असतांना बोरिस जॉन्सन हे पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ उमेदवार ठरले आहेत.

जून २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारी जाहीर केल्यानंतर लगेचच हा माणूस आता काही केल्या शांत बसणार नाही आणि निवडूनच येईल अशी शक्यता काही लोकांनी व्यक्त केली होती. गेली तीन वर्षे ब्रिटमध्ये चाललेल्या सावळ्यागोंधळादरम्यान जॉन्सन यांची वक्तव्ये पाहता हा माणूस एक दिवस ब्रिटनचा पंतप्रधान होईलच अशी शक्यता अनेक माध्यमतज्ज्ञांनी अगोदरच वर्तवून ठेवली आहे.

बोरिस जॉन्सन कुठल्याही प्रकारे पंतप्रधान होणार नाहीत यासाठी ब्रिटनच्या पुराणमतवादी पक्षातला एक गट प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. ट्रम्प यांचा अमेरिकेत विजय होत असतांना तसे होऊ न देण्यासाठीही हाच गट प्रयत्नशील होता. या गटामुळे त्यावेळी ट्रम्प यांचे काहीही बिघडले नाही, जॉन्सन यांचेही काही बिघडेल असे दिसत नाही. त्यांच्या पंतप्रधान होण्यावर काहींनी अगोदरच शिक्कमोर्तबही करून टाकले आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या निवडीनंतर या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जगाचे राजकारण ढवळून निघणार आहे. या ढवळून जाणाऱ्या राजकारणाकडे पाहताना फ्रेंचमधल्या माझ्या एका गरीब मित्राने अजब तर्कट लावले आहे.

जुगार किंवा मनोरंजनासाठी जगभरात अनेक लोक पत्ते खेळतात. या पत्त्यांच्या डेकमधल्या एकूण पत्त्यांची संख्या मानकांनुसार अनेक देशांत वेगवेगळी असते तरीही सर्वात लोकप्रिय पत्त्यांचा डेक हा ५२ पत्त्यांचा आहे आणि या पद्धतीचा डेक हा फ्रेंचांनी शोधला आहे. या डेकमध्ये ५२ पत्त्यांशिवाय आणखी एक पत्ता असतो जो इतर कुठल्याही पत्त्याची जागा घेऊ शकतो, त्याला जोकरही म्हटले जाते. योगायोगाने या पत्त्याला ट्रम्प कार्डही म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमित्ताने जगाला एक जोकर अगोदरच मिळाला आहे, क्वचित काही डेकमध्ये एकऐवजी दोन जोकर ठेवायचीही पद्धत असते. जॉन्सन यांच्या रुपाने जगाला हा दुसरा जोकर लवकरच मिळणार आहे.

या शिवाय आणखी काही खेळांमध्ये गुलाम, राजा, राणी या तीन पत्त्यांनाही ट्रम्पकार्ड बनवून वापरले जाते. दोन जोकरशिवाय डेकमध्ये असे एकूण १२ चेहरे असलेले पत्ते असतात ज्यात एकूण ४ राजे असतात. एरव्ही राजा समजले जाणारे हे पत्ते काही खेळांमधले जोकर असतात. ट्रम्प आणि जॉन्सन यांच्या निमित्ताने जगाला दोन विदूषक मिळालेच आहेत, शिवाय ब्राझिलचे जाईर बोल्सेनॉरो, इस्रायलचे बेंजामिन नेत्यान्याहू, रशियाचे ब्लादिमीर पुतीन आणि वाडीया प्रजासत्ताकाचे जनरल अ‍ॅडमिरल अलादीन हे चार विदूषक या डेकमध्ये सामील होत आहेत.
एकूण जगाचे भवितव्य आता जुगार बनले असून अशा परिस्थितीत फ्रेंचाची अवस्था या ५४ पत्यांखेरीज ५५व्या निरुपयोगी वॉरंटी कार्डसारखी झाली आहे. वाडीया प्रजासत्ताकाच्या नागरिकांनी या सगळ्या प्रकाराकडे कसे पाहावे याबद्दल मात्र माझ्या मित्राने काहीही सांगितलेले नाही.

राहुल बनसोडे, मानववंश शास्त्राचे अभ्यासक असून सॉफ्टवेअर क्षेत्रात आहेत.

COMMENTS