‘आपले काम हीच आपली ओळख’

‘आपले काम हीच आपली ओळख’

‘मिळून साऱ्याजणी’ने ३० व्या वर्षात पदार्पण केले, तेंव्हा अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्याची संधी मिळाली.

विद्याताई हे नाव पहिल्यांदा मी अंगणवाडीच्या मासिक मिटींगमध्ये ऐकले. माझी अंगणवाडी सेविका म्हणून १९८५ मध्ये नेमणूक झाली. पहिले चार महिने ट्रेनिंगमध्ये गेले. नंतर तीन छोटे उजळणी कोर्स झाले. त्यानंतरच्या एका मिटिंगच्यावेळी विद्याताई भेटल्या. त्यांना त्यावेळी स्त्रियांसाठी मासिक सुरु करायचे होते, पण ते संध्या टांकसाळे यांनी सुरु केले आणि विद्याताई यांनी आपला प्रकल्प पुढे ढकलला. पुढे विद्याताई यांनी ग्रामीण महिलांसाठी महिला मंडळ सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. मी नवीन असल्याने थोडी घाबरले कारण महिला मंडळ चालू करण्यासाठी खर्च करावा लागला, तर आपली ऐपत नाही, या विचारांनी मी गप्प बसले. पण माझ्या गावाच्या शेजारील ‘सोळू’ गावात गावची कार्यकर्ती कमल ठाकूर हिने तिच्या गावी महिला मंडळ सुरु केले. तिथे ‘जागृती’ महिला मंडळाची स्थापना झाली.

यानंतर प्रत्येक गावात एक महिला मंडळ असावे, असा शासनाने नियमच काढला व त्यासाठी १०००/- रुपये महिना आर्थिक मदत देऊ केली. त्यानंतर विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली मरकळ (महादेव वाडी)  येथे सुसंस्कार महिला मंडळाचे काम सुरु झाले. पण महिला मंडळाच्या बैठका कशा घ्यायच्या, याची मला काहीच माहिती नव्हती. पण विद्याताई जेव्हा सोळूला यायच्या तेव्हा त्यांचे विचार ऐकायला, मी आवर्जून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या एका वाक्याने मनात वीज चमकून गेली. “आपली ओळख केवळ कोणाची कन्या, बहिण, पत्नी, आई, अशी न रहाता आपले काम हीच आपली ओळख झाली पाहिजे.” त्यानंतर माझ्या कामाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल झालेला मलाच जाणवले.

ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणीचा’ पहिला अंक प्रकाशित झाला. त्यावर गोधडीचे कव्हर होते. त्याचे प्रकाशनही ‘सोळू’च्या महिलांच्या हस्तेच झाले. तिथे नियमित अंक येऊ लागला. मला वर्गणी भरणे शक्य नव्हते, पण मी नियमितपणे तो कमल ठाकूरकडून, नेऊन वाचून परत देऊ लागले. कमल आणि मी जेव्हा मासिक मिटींगला भेटायचो तेव्हा अंकातील लिखाणाबद्दल चर्चा करायचो, ती ताईपर्यंत पोहोचवायचो. त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची मैत्री वाढत गेली.

पुढे पुण्यात अनेक परिषदा होत गेल्या. अपरिजीतांची परिषद, कुटुंब जीवन परिषद या दोन दिवसांच्या परिषदांमध्ये महिलांचे कार्यक्रम कसे घ्यायचे, एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो महिला मंडळांकडून कसा सोडवायचा? या बाबत पाच मिनिटांत नाटक बसवून, ते स्टेजवर सदर करायला ताई सांगायच्या. त्या सगळ्या कार्यकमात ‘सोळू’च्या महिलांसोबत मला जायची संधी मिळाली. आम्ही ‘नळावरचे भांडण’ हा विषय घेऊन प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर ‘सोळू’तील प्रकल्प संपला. पण कमल आणि मी नियमित अंकाच्या वाढदिवसाला जायचो. मी माझ्या शाळेत त्याना कार्यक्रमाला बोलवायचे. हेतू हा, की त्यांचे विचार माझ्या गावातील महिलांनाही ऐकायला मिळावेत.

पुढे अरविंद व क्लेरीज या दांपत्याने विद्याताईंच्या मध्यस्थीने ‘सोळू’ येथे डोम उभे करून मुलींसाठी इयत्ता ८वी ते १० वीचे वर्ग सुरु केले. त्यांचा प्रकल्प पाच वर्षांचा होता. त्यांनी त्यादरम्यान महाबळेश्वर, प्रताप गड, वाई, पाचगणी अशी दोन दिवसांची सहल आयोजित केली होती. मी मरकळच्या काही महिला व माझ्या दोन्ही मुलांसह त्यात सहभागी झाले होते. ती शाळा आजही तिथे सुरु आहे. पुढे मुलींची संख्या घातल्याने ग्रामस्थांनी मुला मुलींची शाळा वेगळी केली.

मी ताईंच्या सतत संपर्कात होतेच. नारी समता मंचाचा जागृती स्वच्छता व आरोग्य प्रकल्प एक वर्षासाठी मरकळमध्ये माझ्याच गावात सुरु झाला. या प्रकल्पाचे काम साधना दधीच व शशी भाटे पाहत होत्या. प्रकल्पाचे उद्घाटन विद्याताईंच्या हस्ते झाले होते. त्या एक वर्षाच्या काळात त्या पाच ते सहा वेळा मरकळला आल्या. महिलांशी संवाद साधला. सहज सोपी भाषा, प्रश्न सोडविण्याची कला. एखाद्या व्यक्तीचे दुर्लक्षित काम, सगळ्यांसमोर आणण्याची धडपड हे सगळंच खूप जवळून अनुभवायला मिळाले. त्या मला माझ्या आईप्रमाणे वाटू लागल्या. मरकळमधील प्रकल्प संपला तरी आमची एकमेकींवरची माया अखंड राहिली. मला मिळून ‘साऱ्याजणी’चा अंक नियमित मिळू लागला. त्यातील ‘संवाद’ व ‘मैतरणी ग मैतरणी’, ही सदरं मला विशेष आवडायची. अनेक संकटांवर मात करणाऱ्या लढवय्या स्त्रियांचा प्रवास वाचून माझ्या आयुष्यावरही त्याचा खूप चांगला परिणाम झाला. अनेक संकटांमध्ये ताईंची मदत झाली. एक फोन केला तरी त्यांचे मार्गदर्शन मिळायचे. ‘नारी समता मंचा’च्या माध्यमातून देहूच्या डॉ. मापुसकरांच्या शौचालय प्रकल्पाला, यवत येथील गांडूळ प्रकल्पाला तसेच राळेगण सिद्धीला भेट दिली. त्यामुळे मरकळ येथे बचत गटाची चळवळ रुजण्यास व ती वाढण्यास मदत झाली.

माझ्या मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण ‘सेवासदन’ संस्थेत झाले. पण बारावीनंतर मरकळ ते पुणे रोजचा प्रवास खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे एखादा शिवणकामाचा कोर्स देऊन तिचे शिक्षण थांबविण्याचा विचार होता. पण विद्याताई वा साधनाताईंनी धीर दिला. मुलीचे उच्चशिक्षण कर म्हणाल्या. पुष्पा रोडे (आता त्या हयात नाहीत) यांच्या मदतीने पुण्यात ‘विद्यार्थी सहायक समिती’मध्ये तिला प्रवेश मिळाला. तिने ‘कमवा शिका’ योजनेत भाग घेऊन शिक्षण पूर्ण केले. पुढे एसएनडीटी महिला महाविद्यालयातून एमए पूर्ण करून, आता ती स्वत:चे क्लिनिक चालवते. या सगळ्याचे विद्याताईंनी कायमच कौतुक केले.

‘मिळून साऱ्याजणी’ने ३० व्या वर्षात पदार्पण केले, तेंव्हा अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्याची संधी मिळाली. त्यादिवशी महेश एलकुंचवार, मिलिंद बोकील, गीतालीताई, विद्याताई या सगळ्यांबरोबर उभे राहण्याचा मान मला मिळाला. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.

अंगणवाडीतून २०१४ साली मी स्वेच्छा निवृत्ती घेतली व आळंदी येथे रहायला आले. पण इतके वर्ष मुलांमध्ये काम करण्याची सवय होती. ती स्वस्थ बसू देत नव्हती. मग नवीन ठिकाणी रोज एक तास मुलांना गोष्टी सांगायला सुरुवात केली. ही माहिती जेव्हा ताईंना दिली तेव्हा, त्यांनी ‘अक्षर वेल’च्या माध्यमातून मुलांसाठी पुस्तक पेटी सुरु करण्याचे सुचविले. त्यानुसार आळंदी व चऱ्होली ठाकर वस्तीची जिल्हा परिषदेची शाळा, येथे पुस्तक पेटी सुरु करून मुलांना वाचण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले.

डिसेंबर २०१९ मध्ये नेहमीप्रमाणे ताईंना फोन केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी समजले, त्या आजारी असून, रुग्णालयात दाखल आहेत. पण भेटण्याची परवानगी नव्हती. अखेर २९ जानेवारीला भेटण्याची परवानगी मिळाली. माझी मुलगी व मी हॉस्पिटल शोधून त्यांना भेटायला गेलो. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. ताई लवकरच बऱ्या होतील या आशेने आम्ही निघालो. पण दुसऱ्या दिवशीच ताई गेल्याची बातमी समजली, खूप वेळ विश्वासच बसत नव्हता. कमल ठाकूर आणि मी लगेच निघालो व ‘नचिकेत’ गाठलं. शांत स्वभावाच्या, हळव्या मनाच्या ताईंनी गांधी पुण्यतिथीच्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेतला.

इतक्या वर्षांत त्यांच्याकडून जे शिकलो, त्याचे गाठोडे आम्हाला कायमच उपयोगी पडेल. विद्याताई विचार रूपाने कायमच आमच्याबरोबर असतील….

सुषमा जानवेकर, या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.

लेखाचे छायाचित्र प्रीती करमरकर यांच्या फेसबुकवरून 

शब्दांकन – गौरी जानवेकर

COMMENTS