युद्धभूमीच्या आठवणी – व्हिएतनाम भाग १  

युद्धभूमीच्या आठवणी – व्हिएतनाम भाग १  

काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती, की कोरोनामुळे अमेरिकेतील झालेल्या मृतांची संख्येने, व्हिएतनाम युद्धात बळी पडलेल्या अमेरिकन सैनिकांच्या संख्येला मागे टाकले.’ कुठल्या गोष्टीची कुठे तुलना होईल हे सांगता येत नाही. मात्र यामध्ये मृत्यू हा समान घटक आहे. मागील वर्षी आम्ही व्हिएतनाम या देशाला भेट दिली, त्याच्या सगळ्या आठवणी जागा झाल्या.

व्हिएतनामला भेट द्यायची, हे जाणीव पूर्वक ठरवले होते. तिथला इतिहास, निसर्ग आणि सांस्कृतिक, सामाजिक जडण घडण, बहुचर्चित विविध बुद्ध विहारं, हे सगळं पहायचं होतं. व्हिएतनाम दक्षिण चीनच्या बाजूला असलेला एक लांबलचक (लंबुकळा) देश. या देशात ७३ टक्के लोक कुठलाही धर्म पाळत नाहीत, साधारण १२ टक्के लोक बुद्ध धर्म पाळतात. ८ टक्के लोक ख्रिश्चन आहेत. तेथील प्रमुख नेता कोण, राजकीय सामाजिक परिस्थिती नेमकी काय आहे, भौगोलिक दृष्ट्या हा देश कसा आहे, लोक आणि तेथील लोकांची मानसिकता कशी आहे इत्यादी, माहिती आम्ही अगोदरच वाचली होती.

बँकॉक वरून हो ची मिन्ह या शहरासाठी विमान बुक केले आणि एका अद्भुत देशाच्या सफरीवर निघालो. हो ची मिन्ह म्हणजे पूर्वीचे सायगाव. अजूनही या शहराला येथील अनेक लोक सायगाव असेच म्हणतात. व्हिएतनाम जेंव्हा स्वतंत्र झाला, तेंव्हा या शहराला साम्यवादी हो ची मिन्ह या क्रांतिकारी नेत्याच्या नावाने संबोधण्यात आले.

या शहरात पोहचलो आणि जाणवला, कमालीचा उत्साह! लोक रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसले, दुचाकीच्या रांगा किंवा गर्दी ही आपल्यासारख्या भारतीयांना, पाश्चिमात्य देशांसारखी नवीन नाही. परंतु दुचाकी चालवत असताना पाळली जाणारी शिस्त ही कमालीची होती. सर्व चालक एकाच वेगाने वाहतूक नियमांचे पालन करून पुढे जात होते. गाडीचा वेग हा मानसिकतेवर अवलंबून असतो असे म्हणतात. आपल्या इथेही अनेक जण दुचाकी चालवतात परंतु प्रत्येकाचा वेग हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाला दुसऱ्याला बाजूला करून पुढे जायची घाई असते, इथे मात्र चित्र नेमके उलटे होते. सर्वांच्या मानसिकतेमध्ये  समानता आणि संयम, चेहऱ्यावरील भाव अतिशय शांत.

या देशावर एकेकाळी फ्रान्सने अतिक्रमण केले होते. त्याची चिन्हे अजूनही विविध इमारती, चर्च, पोस्ट ऑफिसेस या वास्तूंच्या निमित्ताने आपल्याला दिसतात. या जुन्या वास्तू आता पर्यटनाच्या जागा झालेल्या आहेत. फ्रेंच संस्कृतीचा मोठा प्रभाव येथील लोकांवर, बाजारपेठांत, खाद्यपदार्थांत दिसून येतो. अनेक विक्रेते पर्यटकांना मदाम (मॅडम) असे फ्रेंच नावाने पुकारत्तात.

‘हो ची मिन्ह’मध्ये इंडिपेंडन्स पॅलेसला भेट दिली, त्यालाच रियुनीफिकेशन पॅलेस असेही म्हणतात. इथे जाण्यापूर्वी असे वाटले, की आपल्या येथे जसा राजस्थान महाराष्ट्रात असतो, तसा हा राजवाडा भव्य दिव्य असेल, परंतु आम्ही तिथे पोहचताच आम्हाला वेगळे चित्र दिसले. कुठलाही बडेजाव नाही. एक साधी बॉक्स पद्धतीची ‘आरसीसी’ची साधी इमारत. गेटजवळ युद्धातील भला मोठा रणगाडा, आवारात एक कारंजे. आत जाताच पहिल्या मजल्यावर काही फोटो प्रदर्शने, दुसऱ्या मजल्यावर बैठकीच्या विविध खोल्या. त्यात युद्धात नेमकी कुठली रणनीती वापरायची हे ठरवणारा एक मीटिंग हॉल, एक हॉल असा की जो परदेशातून आलेल्या राजदूताना भेटण्यासाठी वापराला जायचा, एक हॉल राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी आणि मुलांना वावरण्यासाठी, एक हॉल जेवणासाठी, एक बेडरूम राष्ट्राध्यक्ष आणि कुटुंबासाठी. अगदी सगळे साधे सूधे. कुठलाही श्रीमंतीचा लवलेश नाही. हा महाल फक्त देशाला शत्रूपासून वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या रणनीतीसाठी तयार करण्यात आल्याचे जाणवत होते. सर्वात वरच्या मजल्यावर एक जुने हेलिकॉप्टर ठेवले होते. ते अमेरिकेचे होते आणि एकेकाळी युद्धात वापरले गेले होते.

संपर्क करण्यासाठी टेलिफोनीक यंत्रणा, मोर्स कोडस यंत्रे तळघरात होती. कठीण प्रसंगी महाल सोडता येईल, अशा चोरवाटा दिसल्या, राष्ट्राध्यक्षांनी युद्ध प्रसंगी सतत सैन्याच्या संपर्कात राहावे म्हणून त्यांना झोपण्यासाठी एक स्वतंत्र खोली होती. त्यात दोन फोन, एक काळा फोन तो फक्त पत्नी किंवा कुटुंबीय संपर्क करू शकतील अशांसाठी आणि एक फोन युद्धप्रसंगी काही मेसेज येणार असेल तर त्यासाठी होता. तळघरात विशेष म्हणजे छोटे चित्रपटगृह आहे. इथे पर्यटकांना व्हिएतनाम मुक्तिसंग्राम नेमका कसा होता, या विषयावरील भरपूर फिल्म्स पाहता येतात. त्या पाहत पाहत तुम्ही पूर्ण दिवस तिथे काढू शकता.

हो ची मिन्ह शहरापासून दोन तासांच्या अंतरावर कूची टनेल्स आहेत. हे बोगदे भूलभुलैया सारखे आहेत. अमेरिकेचे आणि व्हिएतनामचे जेंव्हा युद्ध सुरू होते, तेंव्हा व्हिएतनामच्या सैनिकांनी विशिष्ट प्रकारचे बोगदे, गुहा तयार केल्या होत्या. अमेरिकेचे सैन्य जंगलात हवाई हल्ले करत असत, त्यासाठी जमिनीच्या पृष्ठ भागापासून काही खोल अंतरावर गुहा खोदण्यात आल्या होत्या. या गुहा आणि बोगद्यांचा उपयोग अमेरिकेवर लपून हल्ला करण्यासाठी करण्यात आला. गनिमीकावा पद्धतीने अमेरिकी सैन्याला कसे थोपवता येईल, या दृष्टीने हे बोगदे (टनेल) बांधण्यात आले होते. साधारण एक माणूस एकाच वेळी या बोगद्यातून जाईल अशी संरचना केलेली होती. असं जवळपास अडीचशे किमी बोगद्यांचे जाळेच तयार करण्यात आले होते. व्हिएतनामला गनिमीकावा करून अमेरिकेला पळवून लावण्याशिवाय पर्याय नव्हता. अमेरिकेसारखं युद्ध तंत्रज्ञान, शस्त्र सामुग्री व्हिएतनामकडे नव्हती. आपला देश मुक्त करणे ही एकमेव धडपड आणि ध्येय बाळगून व्हिएतनामी लोक सर्व शक्ती लावून लढत होते. त्यात शेतकरी, स्त्रिया, लहान मुले, मजूर अशा सगळ्यांनी योध्यांची भूमिका साकारली होती. हातात येईल ते अगदी विळा, कोयता, दगड धोंडे, कुऱ्हाड यांची शस्त्रे केली होती. या बोगद्यातच राहायचे तिथेच शिजवायचे तिथेच खायचे. हे योद्धे काही गोष्टी ठराविक वेळेसच करत. अन्न पहाटेच शिजवत जेणेकरून चुलीचा धूर हा बोगद्याच्या चिमणी वजा छोट्याश्या भोकातून पहाटे बाहेर पडल्यास शत्रूला समजणार नाही आणि धूर धुक्यामध्ये मिसळून जाईल. आहारामध्ये कासावा (रताळे सारखे मूळ) नावाचे गोरिल्ला खाद्य होते. ते उकडून खाल्ले जाई आणि विशिष्ट पद्धतीचा उत्तेजीत करू शकणारा चहा असे. काहीही करून गोरिल्ला पद्धत वापरून देश मुक्त करायचा, हेच ध्येय्य असल्याने त्यानुसार अनेक गोष्टी तयार झाल्या. ही पद्धत म्हणजे शत्रूला घायाळ करून घालवून लावण्यासाठी होती. जवळ जवळ ७५ हजार व्हिएतनामी स्त्री पुरुषांनी या बोगद्यातून युद्ध करताना आपले प्राण गमावले.

उदाहरण दाखल एक बोगदा पर्यटकांना खुला होता. उसने अवसान घेऊन शंभर मीटर बोगद्यातून चालताना नाकी नऊ आले. प्रत्येकी वीस मीटर, चाळीस मीटर, साठ मीटर अंतरावर बाहेर जाण्याचे मार्ग होते. आम्ही तर वीस मीटर चालून भेदरलो आणि धापा टाकत बाहेर पडलो.

या युद्धाचा रक्तरंजित इतिहास सांगणारे एक म्युझियम हो ची मिन्ह शहरामध्ये आहे ज्याचे नाव ‘वॉर रीमनन्टस’ (War Remanants Museum) आहे. इथे पहिल्या इंडो चायना आणि व्हिएतनाम युद्धाचे फोटो प्रदर्शन आणि वस्तुसंग्रहालय आहे. म्युझियममध्ये गेल्या गेल्याच त्या आवारात लढाईत वापरली गेलेली विविध विमाने, शस्त्रे, रणगाडे दिसतात. आतमध्ये फोटो प्रदर्शन आहे. युद्धामध्ये नेमकी परिस्थिती कशी होती याचा फोटोंमध्ये अंदाज येतो. अमेरिकी हल्ल्यामुळे झालेली देशाची दुरवस्था, मृत्युमुखी पडलेले सर्व वयोगटातील लोक, जखमी जनता फोटो यांचे लावलेले आहेत. या युद्धाचा निषेध करणारे जगभरातून अनेक वेगवेगळे पत्रकार, कलाकार, नेते यांच्या पेपरमध्ये आलेल्या बातम्याही लावलेल्या आहेत. यामध्ये अमेरिकेतील मानवतावादी विचार मांडणाऱ्या लोकांचीही मनोगते मांडण्यात आलेली आहेत. या युद्धाविरूद्द जगभरात अनेक निदर्शने झाली. त्याचीही कात्रणे इथे लावलेली आहेत. सर्वात भयंकर म्हणजे अमेरिकेने गोरिल्ला पद्धतीला मोडीत काढण्यासाठी एजंट Orange नावाचे मिशन राबवले. ही एक केमिकल युद्ध पद्धत होती. या मध्ये केशरी रंगाच्या ड्रम मध्ये घातक रसद्रव्ये भरून ती विमानातून शेती आणि नद्यांमध्ये फेकली जात असत, त्यातून जमिनी नापीक व पाणी विषारी होत असे. या मिशन मुळे भविष्यातील अनेक पिढ्या निकृष्ट पैदा होतील आणि लोक मरतील हे अमेरिकेचे उद्दिष्ट होते. भोपाळमध्ये जो युनियन कार्बाईडचा अपघात झाला होता तसा हा केमिकल हल्ला होता. आजही या केमिकलचा विपरीत परिणाम होऊन अनेक बालके अपंग जन्माला आलेली दिसतात.

व्हिएतनामी संगीत, लोककला खूप समृध्द आणि संवेदनशील आहेत. संगीत ऐकण्यासाठी आणि एका छोट्याश्या गावाची सैर करण्यासाठी आम्ही बोटीतून मेकॉंग नदीतून एका गावात पोहचलो. मेकोंग ही नदी जवळ पासच्या सहा देशांमधून वाहते. व्हिएतनाममध्ये ठिकठीकाणी पाण्याचे प्रवाह असून, त्याच्या बाजूने गावांची रचना आहे. जेवढे आपण गावांकडे जातो, तेव्हढा बोटीने प्रवास करावा लागतो. छोटे छोटे कॅनल मोठ्या मेकोंग नदीला येऊन मिळतात. मधमाशी पालन, मासेमारी, खोबऱ्याच्या गोड वड्या, चिक्की किंवा इतर पदार्थ असे लघुउद्योग इथे पाहायला मिळतात. स्नेक वाइन नावाचा प्रकारही पाहायला मिळाला. तिथेच आम्ही चिकू, ड्रॅगन फ्रूट खात खात व्हिएतनामी लोककला गीतांचा कार्यक्रम पाहिला. थोई सोन कॅनल मधून एक तासाची सफर केली. इथे बायका होड्या चालवतात. एक पन्नाशीची अतिशय मृदू स्वभावाची बाई आमची होडी चालवत होती.

व्हिएतनामी लोकं ही स्वभावाने खूप शांत, प्रेमळ आहेत. अनेक दशके या देशात सतत राजकीय सामाजिक उलथापालथ घडत होती, आता या सर्व संघर्षातून बाहेर पडून एक साधे आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना लोकं दिसतात. आलेल्या पर्यटकांना चांगली सेवा देणे, त्यांचा अपमान न करणे, गोड व हळु आवाजात बोलणे या प्रमुख बाबी आणि पुरुषांबरोबर स्त्रिया ही बरोबरीने कष्ट करताना दिसत होत्या. इथला नागरिक एक शिस्तप्रिय जीवन जगताना दिसतो.

उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा तीन भागांमध्ये व्हिएतनाम विभागलेला दिसतो. हो ची मिन्ह हे शहर दक्षिणेला आहे. या शहराचे तापमान थोडे दमट आणि उष्ण असते. या शहराकडून आम्ही उत्तर दिशेला म्हणजे व्हिएतनामची राजधानी हनोई या शहराकडे निघालो.

क्रमशः

धनंजय भावलेकर, हे सिने-नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सावनी विनिता, माध्यमविषयक अभ्यासक असून, सेंट मीरा महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या व्याख्यात्या आहेत.

COMMENTS