गाव आणि गांधी

गाव आणि गांधी

गांधी समजून घेताना - आज उजव्या शक्ती जगभर सत्तेत येऊ लागल्या आहेत. मॉब लिंचिंगसारख्या घटनांना ऊत आलाय. आपल्या मुलांना आपण कोणत्या प्रकारचे जग देऊन जाणार याची काळजी वाटायला लागली आहे. गावातलं ते आश्वासक वातावरण कुठं हरवलं त्याचा शोध घ्यावासा वाटू लागल्यावर मग पुणे करार आणि त्यात गांधींची भूमिका तपासावी वाटू लागली. त्यावर गांधीवादी विचारवंतांनी आपापली मांडणी करायला घेतली आहे. मीही माझ्यापरीने उत्खनन केलं आहे.

सत्तरीत जन्मलेल्या माझ्या पिढीने सुरुवातीची काही वर्षे नकळतपणे गांधी जगला. आज याच पिढीला गांधी कळतपणे समजून घेणे आवश्यक झाले, असे वाटायला लागले आहे.

माझ्या आयुष्याची पहिली पाच वर्षे अमरावती जिल्ह्यातल्या लेहेगावात गेली. नंतर वडिलांच्या नोकरीमुळे माझं बाहेर गावी शिक्षण झालं, तरी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टया आमच्या गावातच गेल्या. मला आजही आठवतं की माझ्या खादीधारी आजोबांचे बोट धरून मी गावातल्या महारवाड्यात होणाऱ्या लग्नांमध्ये जायची, पंगतीत जेवायची. खूप मित्र मैत्रिणी दलित वस्तीतल्याच होत्या. त्याचं काहीच विशेष वाटलं नाही. आमच्या बनसोड अण्णांचं घर गावातल्या कुणब्यांच्या घराला लागून आहे, आणि आमच्या घरातले सर्व कार्य-प्रसंग त्यांच्या कृतिशील सहभागाशिवाय पार पडलेले नाहीत, ते अण्णा दलित आहेत याचं गेल्या आठ-दहा वर्षांतच आश्चर्य वाटायला लागलं आहे. गावातलं मंदिर उघडून प्रार्थनेत पेटी, तंबोरा वाजवणारे, तीर्थ प्रसाद वाटणारे गणेश मेश्राम, अनिरुद्ध तंत्रपाळे, प्रल्हाद ढोणे हे दलित आहेत, याचं सुद्धा हल्ली कौतुक वाटायला लागलं आहे. हे आमच्या गावातलं ‘सनातन’ सत्य, कुणाला तरी सांगावसं वाटणं, हे पूर्वी कधीही घडलं नव्हतं. एरवी या गोष्टी माझ्या चुलत- बहीण भावांच्या पिढीच्या ‘सहज’ म्हणून इतक्या अंगवळणी पडल्या होत्या की त्यात काही क्रांतिकारत्व होतं हे आम्हाला उमगलंच नाही.. आमच्या जन्माच्या आधीपासून त्या तशाच होत्या आणि नेहमीसाठी तशाच राहणार होत्या, असं आम्हाला वाटत होतं.

पण गेल्या आठ-दहा वर्षांत परिस्थिती खूप बदलली होती. ‘माझी विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरी’ असे सांगितले की एक प्रश्न माझ्याकडे, गेल्या आठ- दहा वर्षांतच कुठूनतरी येऊ लागला होता. तो प्रश्न असतो, “पुणे कराराबद्दल तुझं काय मत आहे?” माझा पुणे कराराबद्दल विशेष अभ्यास नव्हता. “बाबासाहेबांनी तो केलाय, म्हणजे विचारपूर्वकच केला असणार”, माझं उत्तर असे. “पण गांधींनी तो करावा म्हणून उपोषणाचं दबावतंत्र वापरलं, त्यांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ नाकारला, मात्र मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदार संघाचं स्वागत केलं, सायमन कमिशन दलितांना शिक्षण देण्यासाठी येणार होतं, त्याला गांधी आणि काँग्रेसने विरोध केला, ही आमच्यासोबत गद्दारी होती…..’ वगैरे, हे वारंवार कानावर पडत गेले. हे विचार सुद्धा आपण ‘असतं एकेकाचं म्हणणं’ म्हणून सहजपणे स्वीकारले. कधी चौकसपणे खोलात जाऊन त्याचा अभ्यास करावासा वाटला नाही. राजकीय भूमिका घेतांना, आंबेडकरनिष्ठा सिद्ध करतांना गांधीद्वेष करावा लागत असेल, किंवा आपापल्या ‘लोकेशन’मुळे आपणच गांधींवरच्या प्रश्नकर्त्याचा राग समजून घेऊ शकत नाही, असतात आपापल्या विचारधारा वेगवेगळ्या, त्याने काय फरक पडतो? अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी आणि शेतकरी चळवळीत आंदोलनं करण्यासाठी पुणे करार कशाला अभ्यासावा लागतो? त्यामुळे ‘गांधी-आंबेडकर’ द्वंद्व हे प्रकरण फारच कानावर यायला लागले तरी ते कायमच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ होते!

पण हे सहजच होत नाही आहे, या मागे व्यवस्थित कुठली तरी योजना आहे, हे कळायला वेळ लागला. आज उजव्या शक्ती जगभर सत्तेत येऊ लागल्या आहेत. मॉब लिंचिंगसारख्या घटनांना ऊत आलाय. आपल्या मुलांना आपण कोणत्या प्रकारचे जग देऊन जाणार याची काळजी वाटायला लागली आहे. गावातलं ते आश्वासक वातावरण कुठं हरवलं त्याचा शोध घ्यावासा वाटू लागल्यावर मग पुणे करार आणि त्यात गांधींची भूमिका तपासावी वाटू लागली. त्यावर गांधीवादी विचारवंतांनी आपापली मांडणी करायला घेतली आहे. मीही माझ्यापरीने उत्खनन केलं आहे. सायमन कमिशन आणि पुणे करार मुळातून न वाचताच त्यावर तावातावाने काही ‘सत्यशोधक'(!) मतं मांडतांना पाहिलं आहे. गांधींचा दलितांचे मारक म्हणून जो प्रचार केला जात आहे तो तथ्यांवर आधारित नसतो हे लक्षात आलंय. पण आज ‘फेक प्रॉपोगांडा’ला आवरणे हे काम सोपं राहिलेलं नाही. तो एका राजकीय सत्तेच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलाय. ते राबवत असलेल्या अवाढव्य प्रॉपोगंडा यंत्रणेशी आपला सामना होऊच शकत नाही. आपणही फक्त सत्याचा आग्रहच करत राहू शकतो! माझ्या शोधयात्रेमुळे गांधी आणि आंबेडकर एकाच दिशेने एकमेकांना सहकार्य करीत देशाला पुढे नेत होते, याबाबतीत माझं समाधान झालं असलं तरी ते पुरेसं नाही. याची जाणीव झाल्यावर माझ्या गावाला गांधी विचारांच्या स्पर्श केव्हा कसा झाला, आणि तो कोणत्या रुपात प्रकट होतो त्याचे निरीक्षण मन करायला लागले. इतर गावांहून आपलं गाव काही बाबतीत वेगळं का दिसतं, याचा शोध मला घ्यावासा वाटला.

माझे आजोबा आणि गावातली बरीचशी मंडळी खादीधारी होती. माझे आजोबा, ह. भ. प. बाबुरावदादा पाटील, हे पहाटे पहाटे घरासमोरची गल्ली या टोकापासून त्या टोकापर्यंत झाडून काढत असत, हे सुद्धा त्यावेळी अंगवळणी पडलेले रुटीन होते. ते शंभर एकराचे मालक होते, आणि हभप म्हणून त्यांना चहूकडे मान असून ते हे करत याचे आश्चर्य आता वाटते. त्या गल्लीत कुठे विष्ठाही पडलेली असे. रात्री बेरात्री एखाद्या म्हाताऱ्याला शौचास लागली, किंवा एखाद्या खोडकर लहान मुलाने खेळण्याच्या नादात आवरता न येण्यापर्यंत धरून ठेवली तर गल्लीतच कुठेतरी शी केलेली असायची. किंवा एखाद्या कुत्र्याची विष्ठा असे. पहाटे गल्ली झाडायला निघताना ते ही सर्व घाण उचलायला खापर घेऊन जायचे. गल्ली झाडून, विष्ठा उचलून झाल्यावर ते मातीचे भांडे खराट्याने साफ धुवून ठेवत. हे सर्व करताना “हरी मुखे म्हणा…” चा गजर चालू असे.  जातीनुरूप श्रमव्यवस्था मोडण्यात त्यांना अशा पद्धतीने हातभार लावायचा होता. हा दिनक्रम त्यांनी त्यांचे हातपाय नीट चालत होते तोवर, म्हणजे त्यांच्या ऐंशीत असेपर्यंत चालू ठेवला. ९३व्या वर्षी ते वारले. विनोबांच्या भूदान यज्ञातही त्यांनी त्यांची २० एकर शेतीची आहुती दिली होती. ते आमच्या साऱ्या गावाचे ‘बाप्पू’ होते! (सरकारने ‘दलित मित्र’ म्हणून त्यांचा सन्मानही केला होता.)

जुन्या आठवणीत आमचे बाप्पू रमायचे तेव्हा सांगत की, गांधीजींची आणि त्यांची पहिली भेट केव्हा आणि कशी झाली. गांधी-इरविन करार तेव्हा बहुतेक झालेला होता. गांधी बापू तेव्हा आमच्या गावावरून कुठे तरी जात होते. अमरावती-मोर्शी आणि तिवसा- चांदूरबाजार रस्त्यांच्या चौफुलीवर असल्यामुळे लेहेगावच्या स्टँडवर प्रत्येक गाडी थांबायचीच. गांधी असे स्टँडवर आलेले. तेव्हा सर्व गावकरी झाडून त्यांना बघायला गेले. तेव्हा आमचे बाप्पू अकरा-बारा वर्षांचे होते. गांधी बापूंच्या साधेपणाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता. पुढच्याच वर्षी पुण्याच्या येरवडा जेल मध्ये गांधीजींचे उपोषण अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या इंग्रजांच्या खेळी विरोधात सुरू झाले. देशभरातल्या त्यांच्या अनुयायांनीही मग उपोषण सुरू केले होते. गांधी बापूंनी यापुढे देशातील जनतेला अशी शपथ घ्यायला सांगितले की ते पुन्हा कधीही अस्पृश्यता पाळणार नाहीत. एका झटक्यात या देशातल्या गावा गावातल्या विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या झाल्या होत्या, सहभोजनाचे कार्यक्रम होऊ लागले होते. गांधीबापूंसोबत उपोषण करणारे आणि येरवाड्यातून दिलेली ती शपथ घेणारे तेव्हा आमचे तेरा वर्षांचे बाप्पूही होते! ते जरा मोठे झाल्यावर त्यांच्या हाती जेव्हा कारभार आला, तेव्हा त्यांनी गावतल्या स्टँडला लागून असलेल्या शेतात एक विहीर खणली. ज्यातले पाणी अर्थात स्टँडवर उतरणारा कोणताही प्रवासी पिऊ शकणार होता. आमच्या बाप्पूंनी खादी हे व्रत आयुष्यभर जपले. अर्थात गावातल्या अनेकांवर गांधीजींचा प्रभाव होता आणि आपापल्या परीने ते सर्व गांधीगिरी करीत होते. त्यातल्या एक पार्वताबाई तट्टे माधानलाच राहायला गेल्या होत्या.

“अहिंसा, सत्य, असतेय, ब्रह्मचर्य, असंग्रह…….’ मला याच गावातल्या विठोबा-रखुमाईच्या मठात नित्य नेमाने होणाऱ्या प्रार्थनेत पाठ झाले. सोबतच रामकृष्ण मिशनच्याही प्रार्थना होतात. मुख्य म्हणजे फुले-आंबेडकर यांची पहिली तोंड ओळख मला बाप्पूंच्याच छोट्या लायब्ररीतली पुस्तकं वाचून झाली होती! कर्मयोग, सत्याचे प्रयोग, श्यामची आई, शेतकऱ्यांचा आसूड, ते शूद्र कोण होते असा सारा इंद्रधनुष्य बाप्पूंचे ते लाकडी कपाट उघडले की आतून डोकावायचा. त्यात काही अंतर्गत संघर्ष आहे असं तेव्हा, त्या न कळत्या वयात तरी वाटत नव्हते. सर्व रंग एकमेकांना उठाव देणारेच भासत. सर्वांबद्दल चर्चाही होत असत. बाप्पू त्यांचे कीर्तन करायला उभे राहिले की त्यात रामायण महाभारत सांगता सांगता वृक्ष लावा, गाव स्वच्छ ठेवा, दारू सोडा, अंधश्रद्धा बाळगू नका, अस्पृश्यता तर अगदीच नको वगैरे संदेश नकळत देत असायचे.

आज एखादी बातमी येते की कोण्या एके गावात दलित नवरदेवाला लग्नात सवर्णांनी घोड्यावर बसू दिले नाही. या दलित नवरदेवात ‘आपणही माणूस आहोत, आपले संवैधानिक अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजेत’, अशी चेतना बाबासाहेबांनी चेतवलेली असते. पण त्या गावातल्या सवर्णांना गांधींच्या विचारांचा स्पर्श कधी झालेला नसतो. म्हणून सवर्ण त्याला घोड्यावर बसू देत नसावेत. नाहीतर त्या गावातही आमच्या गावातल्या सारखं घोड्यावरच्या दलित नवरदेवाला संपूर्ण गावच्या आया-बहिणींनी ओवाळलं असतं. हे आमच्या गावात होत असलेलं मी माझ्या बालपणापासून ‘सनातन’ सत्य असावं तसं बघत आलेय. आपलं गाव काही वेगळं आहे, हे तेव्हा वाटलं नव्हतं. पण आज वाटतंय. आंबेडकरंपर्यंतचा मार्ग आमच्या गावात तरी गांधींवरून गेल्याचे दिसते आहे.

हे काहीतरी वेगळं आणि आजच्या उजव्या शक्तींना नको असलेलं होतंय याची मला झालेली जाणीव मात्र ‘नवीन’ आहे.

COMMENTS