भाजप नेत्याच्या कार्यक्रमात चिथावणीखोर घोषणा

भाजप नेत्याच्या कार्यक्रमात चिथावणीखोर घोषणा

नवी दिल्लीः समान नागरी कायदा देशात लागू करण्याची मागणी करत मुस्लिम धर्माविरोधात चिथावणीखोर घोषणा देण्याचा प्रकार रविवारी जंतर मंतरवर भाजपच्या नेत्याने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिसून आला. ‘भारत जोडो आंदोलन’ असे या कार्यक्रमाने नाव देण्यात आले होते पण प्रत्यक्षात भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांच्या उपस्थितीत मंचावरून मुस्लिमांविरोधात चिथावणीखोर, भडकाऊ घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला त्यात काही जणांकडून मुस्लिमांना ठार मारायला हवे, असे दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एफटीआयआयचे माजी संचालक व भाजपचे नेते गजेंद्र चौहानही उपस्थित होते.

हा संपूर्ण कार्यक्रम दिल्ली पोलिसांच्या परवानगी विना, बेकायदा व कोविड-१९ प्रतिबंधक नियमांचा भंग करून घेण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी झाला व व्हीडिओ व्हायरल होऊनही दिल्ली पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नव्हती. पोलिसांनी गर्दीही जमू दिली.

दरम्यान, दिल्ली पोलिस या कार्यक्रमाचे जे व्हीडिओ व्हायरल झाले होते, त्यांची शहानिशा करून चौकशी करणार आहेत, असे नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी पोलिसांनी काही अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यास गेलेले नॅशनल दस्तक या यू ट्यूब चॅनेलचे वार्ताहर अनमोल प्रीतम यांना उपस्थित जमावाने घेरले व त्यांना जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या. या प्रसंगाचा व्हीडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. जमावातील काहींनी प्रीतम यांना जिहादी म्हणूनही संबोधले.

या एकूण घटनेबाबत अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की आमचा कार्यक्रम दुपारी १२ वाजताच संपला आणि घोषणाबाजी ही संध्याकाळी ५ वाजता झाला. आमचा कार्यक्रम रॅली पार्क हॉटेलच्या बाहेर होता तर घोषणाबाजी संसद हाऊस पोलिस ठाण्याच्या आसपास झाला.

अश्विनी उपाध्याय हे व्यवसायाने वकील असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून एक देश, एक कायदा हवा अशी मागणी केली होती. पण त्यांनी ही याचिका नंतर मागे घेतली आहे.

मूळ बातमी

COMMENTS