दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!

दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!

कोहली ज्या क्रिकेटपटूंना बघत मोठा झाला, ते पुरस्कार करत असलेल्या संयम, औचित्य वगैरे मध्यमवर्गीय मूल्यांची त्याने कधीच पत्रास बाळगली नाही. त्याच्या उद्दाम अविर्भावामध्ये आणि टोकाच्या आत्मविश्वासामध्ये, देशाला नव्याने सापडलेल्या मर्दानी राष्ट्रवादाच्या छटा, प्रकर्षाने दिसत होत्या. कोहलीच्या मैदानावरील आक्रमक पवित्र्याकडे मोठ्या कौतुकाने ‘नवभारता’चे प्रतीक म्हणून बघितले जात होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत केपटाउनमध्ये झालेल्या तिसऱ्या व निर्णायक सामन्याच्या चौथ्या दिवशी लंच ब्रेक झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयासाठी केवळ ४१ धावा हव्या होत्या. अर्थात क्रिकेटमध्ये बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे भारताला नशिबापुढे गुडघे टेकण्यापूर्वी काहीतरी करणे भाग होते. त्या क्षणाला फारशा युक्त्या वगैरे लढवण्याची संधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे उरलेली नव्हती.

भारतातील क्रिकेटप्रेमींना, १९९९ मध्ये चेन्नई कसोटीत, वसीम अक्रमने त्याच्या नव्या दमाच्या संघापुढे दिलेले जोशपूर्ण भाषण आठवत असेल. केवळ ५० धावांचा खेळ शिल्लक असला, तरी एका खिंडाराच्या मदतीने आपण गडाला सुरूंग कसा लावू शकतो हे अक्रमने सांगितले होते. कोहलीच्या नेतृत्वशैलीमुळे किंवा किमान त्या शैलीबद्दल रचल्या जाणाऱ्या कथांमुळे, तोही भारतीय संघात असेच चैतन्य भरले जाणार आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पुढील प्रत्येक धावेसाठी झुंजवणार असे सगळ्यांना वाटत होते. खेळ सुरू झाल्यानंतर जे काही घडले, त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाबद्दल प्रस्थापित झालेला लोकप्रिय समज कायमचा बदलून गेला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज आता बुमरा आणि शमीच्या तालावर नाचणार असे दृश्य बघण्यासाठी जनता सज्ज झालेली असताना, कोहलीने बॉल अश्विन आणि उमेश यादवच्या हातात दिला. या दोन कच्च्या दुव्यांचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेने केवळ आठ ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य पार केले.

यातील कशालाच काही अर्थ नव्हता. कोहलीसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये (इंग्लंड मालिका अद्याप पूर्ण झालेली नाही) लागोपाठ मिळवलेल्या विजयांवर कळस चढवण्याची ही संधी होती. स्लिपमधले घट्ट कोंडाळे आणि प्रत्येक बॉलनंतर टाकले जाणारे फुत्कार यांतून कोहलीची पूर्वी कधीच दिसली नव्हती एवढी असोशी दिसत होती. आता वाचवण्यासारखे काहीच उरले नव्हते.

मात्र, कोहलीने केलेली गोलंदाजांची निवड आणि भारताने ज्या सहजतेने कसोटी हातातून जाऊ दिली ते बघता ही मानहानी संपणारी नव्हती. कोहलीच्या नेतृत्वात भारत यापूर्वीही हरला आहे, दणदणीत फरकाने हरला आहे. मात्र, या पराभवात जी निराशा होती, ती आत्तापर्यंत कधीच दिसली नव्हती. आक्रमकतेचा बादशहा समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीने शस्त्रे टाकून दिली होती. या पराभवानंतर २४ तासांच्या आतच त्याने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. भारतीय क्रिकेटमधील एक अव्वल जागा त्याने सोडून दिली.

भारतीय क्रिकेटला समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक घडणीच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न न चुकता होत आला आहे. सचिन तेंडुलकरचा सनसनाटी उदय हा उदारीकरणानंतरच्या भारतातील बदलांशी जोडून बघितला गेला आहे. कोहली हा नक्कीच तेंडुलकरनंतरचा भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार आहे. कोहली ज्या क्रिकेटपटूंना बघत मोठा झाला, ते पुरस्कार करत असलेल्या संयम, औचित्य वगैरे मध्यमवर्गीय मूल्यांची त्याने कधीच पत्रास बाळगली नाही. त्याच्या उद्दाम अविर्भावामध्ये आणि टोकाच्या आत्मविश्वासामध्ये, देशाला नव्याने सापडलेल्या मर्दानी राष्ट्रवादाच्या छटा, प्रकर्षाने दिसत होत्या. कोहलीच्या मैदानावरील आक्रमक पवित्र्याकडे मोठ्या कौतुकाने ‘नवभारता’चे प्रतीक म्हणून बघितले जात होते. यात हर्ष भोगले यांच्यासारख्या आदरणीय माध्यम प्रतिनिधींपासून स्टारनेटवर्कच्या अतिउत्साही टीमपर्यंत सर्वांचा सहभाग होता. यातूनच कर्णधार कोहलीची दंतकथेसारखी प्रतिमा तयार झाली. खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण करणे, खडतर काळात त्यांना मदतीचा हात देणे यांसारख्या नेतृत्वाची मूलभूत तत्त्वे जणू काही नव्यानेच अवतरली आहेत अशा थाटात बोलले जाऊ लागले. सध्याच्या मुक्त बाजारपेठेच्या युगात कसोटी क्रिकेट तग धरून आहे ते केवळ कोहलीच्या दयेपर्यंत असा सूर लावण्यापर्यंत समालोचकांच्या फौजांची मजल गेली. दर दुसऱ्या सेकंदाला कोहलीवर स्थिरावरणारा कॅमेरा त्याचे कसोटी क्रिकेटवर किती ‘प्रेम’ आहे याची आठवण करून देत राहिला. कोहलीभवती तयार झालेल्या वलयामध्ये एक समांतर विश्व निर्माण झाले आणि या विश्वात कितीतरी लोक, कित्येक ब्रॅण्ड्स अनेक वर्षे पोसले गेले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वेगाने बदलत जाणाऱ्या नात्याचा वेध घेतला गेला, तर त्यातून गहन अर्थ निघतो.

बीसीसीआयमध्ये एक सरंजामशाही व्यवस्था खोलवर रुजलेली आहे. राजकारणातील दिग्गज जिचा कारभार चालवतात, अशी ही अंतर्बाह्य सनातनी संस्था आहे. बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणजे, विळ्या-भोपळ्याचे नाते जगणाऱ्या संस्थेतील दोन आघाड्यांनी, मान्य केलेला उमेदवार आहे. या खेळाचा पडद्यामागील सूत्रधार देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांना सचिवपदावर बसवण्यात आले आहे. बीसीसीआयवर भाजपची सत्ता येण्यापूर्वी ती सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे चालवली जाणारी एक नखे काढलेली संस्था होती. या समितीच्या कार्यकाळातील पोकळीचा फायदा घेऊन कोहलीने सत्ता स्वत:च्या हातात घेतली होती. त्याच्या पूर्वी कर्णधारपद सांभाळलेल्यांनी असे करता येऊ शकते याची कल्पनाही केली नसेल. अनिल कुंबळेची भारताचा प्रशिक्षक म्हणून गुणवत्ता काय होती हा मुद्दा बाजूला ठेवला, तरी भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एकाला नियुक्तीपासून केवळ एक वर्षाच्या आत पदावरून दूर करून कोहलीने त्याचा प्रभाव दाखवून दिला होता. गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या समितीचा निर्णय कोहलीने धाब्यावर बसवला होता. कुंबळेला काढून टाकल्यानंतर बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी दिलेली मुदतही वाढवून दिली व कोहलीला हव्या असलेल्या रवी शास्त्री यांचा अर्ज स्वीकारला.

हे वर्चस्व आणि प्रभाव कोहलीने स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवले होते असेही बरेच जण म्हणतील. मात्र, बोर्ड जेव्हा आपल्या पूर्वपदावर गेला तेव्हा झालेला सत्तास्थित्यंतराचा प्रभाव कदाचित कोहलीला नीट समजला नाही. तसेच एक खेळाडू म्हणून स्वत:ची अपयशी ठरण्याची संभाव्यताही त्याने पुरती लक्षात घेतली नसावी. एका टप्प्यात पडणारा रन्सचा पाऊस कधीतरी सुकणार होता. नेमका तो सुकला तेव्हाच बीसीसीआयने आपले पूर्वीचे स्वरूप पुन्हा धारण केले होते हा योगायोगच.

एकदिवसीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अपयश आले पण जोवर त्याचा स्वत:चा फॉर्म खणखणीत होता, तोवर याचा फारसा गाजावाजा झाला नाही. टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होऊन कोहलीने, भारतीय क्रिकेटची महाकाय छाया, कमी करण्याची संधी बोर्डाला पुरवली. मात्र, २०२३ सालच्या वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त करणाऱ्या कोहलीकडून वनडे क्रिकेट संघाचे कर्णधारपद बोर्डाने काढून घेतले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकसमानता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तांत्रिक कारण बोर्डाने दिले. कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये यासाठी बोर्डाने पाठपुरावा केल्याचा दावा करणाऱ्या गांगुलीला कोहली प्रसारमाध्यमांपुढे खोटारडा म्हणाला. मात्र, गांगुलीच्या दाव्याला निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दुजोरा दिल्यामुळे सामना दोन विरुद्ध एक असा तर झालाच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे भारतीय कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष यांच्यातील संबंध आणखी बिघडले.

मोहम्मद शमीवर झालेल्या सांप्रदायिक स्वरूपाच्या चिखलफेकीवर कोहलीने घेतलेली भूमिकाही सध्या भारतीय क्रिकेटचा गाडा हाकणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना फारशी पचनी पडली नसणार यात तर वादच नाही. मात्र, कोहलीला राजकारणाचा बळी म्हणून उभा करणे रंजक व प्रभावी वाटले, तरी यातील तथ्ये कंटाळवाणीच आहेत, त्यातून चांगली स्टोरी उभी राहू शकेल अशा ताकदीची नाहीत. कोहलीने आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांचा पोस्टरबॉय म्हणून आनंदाने पोझेस दिल्या आहेत. अनेक सरकारी उपक्रमांसाठी आपल्या प्रतिमेचा वापर करू दिला आहे. त्याने मोठ्या निर्णयांचा पुरस्कार केला आहे, मोहिमांमध्ये भाग घेतला आहे आणि खुद्द पंतप्रधानांशी त्या जवळीक राखली आहे.

कोहली आज ज्यातून जात आहे ते सत्तेचे अगदी नैसर्गिक चक्र आहे. यात एका बिंदूला व्यक्तीचा प्रभाव बेसुमार वाढला तरी अखेरीस संस्थात्मक शक्तीच मुसंडी मारते. आणि बीसीसीआयसारख्या संस्थेला कवेत घेणे एखाद्या खेळाडूच्या आवाक्यातील नाही. हे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर किंवा कपिल देवलाही जमलेले नाही.

वनडे संघाच्या कर्णधारपदावरून झालेल्या उचलबांगडीच्या रूपाने कोहलीने हा कडवटपणा यापूर्वीच अनुभवलेला आहे. पूर्वीची कामगिरी कितीही दमदार असली, तरी आपले कसोटी कर्णधारपदही वादातीत नाही हे त्याने कदाचित ओळखले असावे.

कोहली अजूनही भारताचा सर्वांत महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे आणि बाजारपेठा त्याच्या लोकप्रियतेचा लाभ उचलणे तूर्त सुरूच ठेवतील. मात्र, एक खेळाडू म्हणून करिअरच्या अखेरच्या टप्प्याकडे जसा जाऊ लागेल, तसा तो गोष्टी सोडून देणे शिकेल. संघनिवड व व्यूहरचनेवरील कमी होत गेलेला प्रभाव, कॅमेरा फारसा जात नाही अशा ठिकाणांवर फिल्डिंग, बॅटिंगच्या क्रमांकात बदल वगैरे. स्थित्यंतर फार सोपे नसेल पण अलीकडील काळातच हे अनुभवलेल्या एका व्यक्तीचा मैत्रीपूर्ण सल्ला कोहली नक्कीच घेऊ शकतो. या व्यक्तीचा उल्लेख कोहलीने राजीनाम्याच्या पत्रातही केला आहे.

मूळ लेख:

COMMENTS