‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’

नवी दिल्लीः भारत–चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून केंद्रीय परिवहन व राज्यमार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केले. चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडली असून सरकार ते दरवेळी जाहीर करत नसते असे विधान केले. द हिंदूने हे वृत्त दिले आहे. भारत व चीनमध्ये सीमेवरून अनेक वर्षे वाद असल्याने सीमा निश्चिती झालेली नाही. दोन्ही देश प्रत्यक्ष ताबा रेषेच्या आपल्या दाव्यावर ठाम असतात. आपल्याला कुणालाही माहिती नसेल की अनेकवेळा भारतीय सैन्याने अतिक्रमण केले आहे. अशा घटना चीनची प्रसार माध्यमे देत नाहीत. पण जर चीनने १० वेळा घुसखोरी केली असेल तर भारताने कमीत कमी ५० वेळा घुसखोरी केली आहे, असे सिंग म्हणाले.

व्ही. के. सिंग यांनी या पूर्वी देशाचे लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

चीन आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशात तळ टाकून तेथील सैन्यबळ अधिक मजबूत करत आहे. यात चीन आपले नियंत्रण क्षेत्र वाढवतही आहे. पण चर्चेवेळी ते आपले सैन्य मागे घेत असतात. मात्र सध्याच्या सरकारने असे प्रयत्न होऊ नयेत म्हणून पावले उचलली आहे, असे सिंग म्हणाले. चीनने २०२०मध्ये लडाखमध्ये घुसखोरी केली तेव्हाच भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी दिली होती. आता भारताचे सैन्य तेथे तळ ठोकून बसल्याने चीन त्यामुळे नाराज आहे, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

गेल्या शनिवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत व चीनच्या सैन्याचे वरिष्ठ अधिकारी लडाखमधील सैन्य मागे घेण्याविषयी चर्चा करत असल्याचे विधान केले होते. अशा चर्चेच्या ९ फेर्या झाल्या असून भविष्यातही असा संवाद सुरू राहील. पण आजपर्यंत झालेल्या चर्चेतून फारसे काही साध्य झालेले नाही, असेही ते म्हणाले होते.

मूळ बातमी

COMMENTS