‘वेटिंग फॉर गोदो’ – सॅम्युएल बेकेट

‘वेटिंग फॉर गोदो’ – सॅम्युएल बेकेट

गोदो कोण हे बहुधा माणसाला कधीच समजणार नाही. जगण्याचा आटापिटा करताना आपण नेमके कशाची वाट पाहत असतो. सुख, द्रव्य, मोक्ष, अंतिम ज्ञान. की यांपैकी काहीच नाही? हे तरी मनुष्याला कुठे समजले आहे.

मिथकीय हिंसेचे रचनाशास्त्र
असहमतीचे आवाज
फसलेला पुस्तकी डाव

मागे एका लेखात युजीन आयनेस्कोच्या ‘राह्यनोसर्स’ या नाटकाची आणि त्या अनुषंगाने ‘The theatre of the absurd’ अर्थात ‘मिथ्यावादी रंगभूमी’ची चर्चा केली. मात्र ‘मिथ्यावादी रंगभूमी’ची चर्चा सॅम्युएल बेकेट आणि त्यांचे ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाचे नाव घेतल्याशिवाय पुरी होत नाही.

वस्तुतः ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकातून बेकेटनेच ‘मिथ्यावादी रंगभूमी’ला गती दिली. या प्रकारातील गोदो हे आद्य नाटक समजले जाते. ५ जानेवारी १९५३ रोजी पॅरिसमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तर १९५५ साली लंडनमध्ये इंग्रजी भाषेत तो प्रथम प्रदर्शित झाला. सुरवातीला नाटकाविषयी संमिश्र प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या मनात उमटत होत्या. खरेतर नाटकावर टीकाच अधिक प्रमाणात झाली. नाटक अर्थहीन आहे, दुर्बोध आहे, आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशा अर्थाची टीका त्यावर प्रामुख्याने होऊ लागली. पॅरिस, लंडन यांसारख्या महत्त्वाच्या शहरात या नाटकाचे प्रदर्शन होऊनही त्याला विखारी टीकेचा सामना करावा लागला.

पुढे १९५७ साली या नाटकाचा एक प्रयोग ‘सन क्वेन्टीन’ या तुरुंगात हजारहून अधिक कैद्यांसमोर सादर करण्यात आला. तुरुंगातील कैद्यांनी हे नाटक डोक्यावर घेतले. सुसंस्कृत समाजातील उच्चभ्रू लोकही कसे थिजल्या जाणिवेचे असू शकतात आणि समाजातील निम्न स्तरावर किंबहुना गुन्हेगारी जगतात वावरणाऱ्या जगातील लोकही प्रवाही जाणिवेचे असू शकतात याचा वस्तुपाठच जणू या घटनेतून पाहायला मिळतो.

मात्र ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाचे आणि त्यातून केलेल्या प्रयोगाचे सामर्थ्य गंभीर नाट्य समीक्षक आणि साक्षेपी प्रेक्षकांच्या ध्यानी आले होते. लवकरच त्याचा प्रभाव जागतिक रंगभूमीवर दिसू लागला. युजीन आयनेस्को, हेरॉल्ड पिंटर यांसारख्या महत्त्वाच्या नाटककारांच्या कृतीतून त्याचे पडसाद उमटू लागले. ‘वेटिंग फॉर गोदो’चे शेकडो प्रयोग त्या काळात जगभर झाले. १९९० साली ‘ब्रिटिश रॉयल नॅशनल थिएटर’ने ‘विसाव्या शतकातील सर्वाधिक महत्त्वाचे इंग्रजी भाषेतील नाटक’ या विषयावर सर्व्हे केला. त्यात मतदानकर्त्यांनी ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाला सर्वाधिक पसंती दिली.

सॅम्युएल बेकेट

सॅम्युएल बेकेट

वेटिंग फॉर गोदो’ हे दोन अंकी नाटक आहे. नाटकाची सुरवात होते तेव्हा स्टेजवर एक वठलेले झाड असते. ब्लादिमिर आणि एस्ट्रॉगान ही दोन पात्रे अवतीर्ण होतात. एस्ट्रॉगान आपल्या पायातील बूट ओढून काढण्याचा निकराचा आणि अयशस्वी प्रयत्न करत आहे. ब्लादिमिर आखूड पावले टाकत चालत आहे. सुरवातीला दोघे असंबद्ध बडबडत राहतात. एकमेकांना गोगो आणि दीदी या नावांनी संबोधित करत असतात. एस्ट्रॉगानने कालची रात्र कुठे काढली, त्याला पुन्हा मार खावा लागला का?, मारणारे लोक कोण होते? अशा प्रकारचे प्रश्न ब्लादिमिर विचारतो. यावर एस्ट्रॉगान कालची रात्र नेहमीसारखी खड्ड्यात काढली, मारणारे तेच नेहमीचे लोक होते असे सांगतो. गोगो आणि दीदी यांच्या संभाषणातून समोर घडत असलेल्या त्याच त्या घटना मागे अनेकवार घडल्या असून आज परत त्याच घटनांची पुनरावृत्ती होते आहे असे बेकेट सूचित करतात. मध्येच एस्ट्रॉगान आपण इथे काय करत आहोत असे विचारतो. ब्लादिमिर त्याला आपण गोदोची वाट पाहत आहोत असे सांगतो. त्यावर एस्ट्रॉगान अरे हो विसरलोच की असे म्हणतो. पण गोदो म्हणजे कोण अथवा काय याचा उलगडा होत नाही. गोदोची वाट पाहणेही त्यांच्यासाठी नवे नाही. गेले काही दिवस, काही महिने, अनेक वर्षे ते गोदोची प्रतीक्षा करत असावेत असेही नाटकातून सूचित होते. आपण फार पूर्वीच आत्महत्या करायला हवी होती असेही त्यांना वाटते. दोघांच्या असंबद्ध बडबडीतून नाटक पुढे जात राहते.

अखेरीस अजून दोन पात्रे तिथे प्रवेश करतात. पोझो आणि लकी. लकी पोझोचा गुलाम आहे. लकीच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे. दोरीचे दुसरे टोक पोझोच्या हातात आहे. लकी पोझोच्या तावडीतून सुटका का करून घेत नाही असा प्रश्न एस्ट्रॉगानला पडतो मात्र वस्तुस्थिती उलट असते. लकीला त्याचा मालक सोडून देईल अशी भीती वाटत असते तर पोझोला लकीपासून सुटका करून घ्यावीशी वाटत असते. पोझो आणि लकी दोघे निघून जातात. पुन्हा स्टेजवर ब्लादिमिर आणि एस्ट्रॉगान दोघे असंबद्ध बोलत राहतात. पहिल्या अंकाच्या शेवटी एक लहान मुलगा पळत पळत येतो आणि गोदोसाहेब आज येणार नाहीत. उद्या येतील असे सांगून निघून जातो.

दुसऱ्या अंकाला सुरवात होते तेव्हाही स्टेजवर तेच दृश्य दिसते. केवळ दुसरा दिवस उजाडलेला असतो. आणि झाडाला काही हिरवी पाने फुटलेली असतात. पुन्हा गोगो आणि दीदी मागील अंकाप्रमाणेच त्याच विषयांवर थोड्याबहुत फरकाने तेच तेच बोलत राहतात. पुन्हा एस्ट्रॉगानने मार खाल्लेला असतो. पुन्हा संभाषण आत्महत्येवर येते. आणि आपण येथे गोदोची वाट पाहत आहोत याची दोघे एकमेकांना पुन्हा आठवण करून देत राहतात. आदल्या दिवशी होते तसेच पोझो आणि लकी पुन्हा स्टेजवर येतात. मात्र यावेळी पोझो आंधळा आणि लकी मुका झालेला असतो. दोघेही एकमेकांवर विसंबून असतात. पुन्हा चौघे मिळून असंबद्ध बोलत राहतात. नाटकाच्या दुसऱ्या अंकात थोड्याफार फरकाने पहिल्या अंकाचीच पुनरावृत्ती होते. केवळ एका दिवसाचाच काय तो फरक असतो. जे काल घडले तेच आज घडते. नाटकाच्या दोन अंकात एका दिवसाचा फरक आहे असे पात्रांच्या बोलण्यातून जाणवते. मात्र तेही पुरेसे स्पष्ट होत नाही. या दोन अंकात एका दिवसापासून पन्नास वर्षांपर्यंत कितीही कालावधी गेला असणे शक्य वाटू लागते. दोन्ही अंकात लहान मुलांचे वर्णन तोच लहान मुलगा असे येते त्यावरून हा दुसरा दिवस आहे असे समजायचे. दुसऱ्या अंकातही तोच लहान मुलगा अंकाच्या अखेरीस येतो आणि आज गोदोसाहेब येणार नाहीत असे सांगून जातो. ब्लादिमिर आणि एस्ट्रॉगान स्तब्ध उभे राहतात आणि पडदा पडतो.

आशय :

‘वेटिंग फॉर गोदो’च्या आशयाची मुळं अल्बर्ट काम्युच्या ‘द मिथ ऑफ सिसिफस’ या निबंधात आहेत. ग्रीक पुराणात एक कथा आहे. सिसिफसला देवांनी शिक्षा दिलेली आहे. एक मोठा दगड पहाडावर ढकलत न्यायचा. उंचावर पोहचताच दगड खाली सोडून द्यायचा आणि पुन्हा तोच दगड पहाडावर ढकलत न्यायचा. असे अनंतकाळ करत राहायचे. अर्थहीन कृती करण्याचा श्राप माथी घेऊन सिसिफस जगत राहतो. मात्र केवळ सिसिफसच नव्हे तर सामान्य मनुष्याच्याही कपाळी असेच भोग आलेले आहेत. तेच ते निरर्थक काम अविश्रांत करत राहायचे. त्या कामाची निष्पत्तीही अर्थशून्य. हीच निरर्थकता ब्लादिमिर आणि एस्ट्रॉगानच्या एकसुरी जीवनात आलेली आहे. जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो अर्थ काय आहे हे त्यांना ठाऊक नाही. आपण कशाची वाट पाहत हे निरर्थक जगणे पुढे रेटत आहोत याचे भान नाही. अखेरीस ज्याची वाट पाहत आहोत ते प्राप्त होईल याची शाश्वती नाही. किंबहुना ते होणार नाही याची जाणीव झालेली आहे. तरी निरर्थक जगणे काही सुटत नाही. हेच जीवन आहे. कुणी येत नाही. कुणी जात नाही. काही घडतही नाही. विसंबून राहावे असा कुणी नाही. विश्वाला नियंत्रक नाही. या अफाट पसाऱ्यात भिरकावून दिलेले आपण क्षुद्र जीव आहोत. केवळ ‘सिसिफिअन एफर्ट्स’ करत काळ कंठावा लागतो. अशी भयप्रद जाणीव नाटक वाचल्यानंतर/पाहिल्यानंतर होते. दोन महायुद्धे भोगून झाल्यावर माणसाच्या वाट्याला आलेले असह्य एकटेपण बेकेटने ‘वेटिंग फॉर गोदो’मधून ताकदीने मांडले.

पण गोदो कोण हा प्रश्न तरीही उरतोच. कुणी त्याला देवाचे प्रतीक मानले. तर कुणी गोदो म्हणजे सुख असे म्हटले. अनेकांनी अनेक तऱ्हांनी त्याचे अर्थनिर्णय करण्याचे प्रयत्न केले. खुद्द सॅम्युएल बेकेटला विचारण्यात आले, ‘गोदो म्हणजे कोण’. यावर बेकेट म्हणाले, मला जर ते ठाऊक असते तर मी नाटकात तसे म्हटले असते.

गोदो कोण हे बहुधा माणसाला कधीच समजणार नाही. जगण्याचा आटापिटा करताना आपण नेमके कशाची वाट पाहत असतो. सुख, द्रव्य, मोक्ष, अंतिम ज्ञान. की यांपैकी काहीच नाही? हे तरी मनुष्याला कुठे समजले आहे. हे न समजलेले जे काही आहे, ज्याच्या प्रतिक्षेत काळाच्या विशाल पटावरून क्षुद्र मनुष्यजात जगण्याचा केविलवाणा यत्न करत राहते ते म्हणजेच गोदो आहे. काळ पुढे सरकत जातो तसे नाटकातील वठलेल्या झाडाला पालवी फुटावी तसे आशेचे चारदोन किरण आपल्याला कधीतरी दिसतात. दिवसाच्या अखेरीस आज गोदो येणार नाहीत. उद्या नक्की येतील असे एक लहान मुलगा सांगून जातो. उद्यावर भिस्त ठेवलेली अशी आशाच मनुष्याला पुढे जगत राहायला उद्युक्त करते. आयुष्य चालूच राहते. आपण जगत राहतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0