भारतातील आघाडीच्या व्हायरोलॉजिस्टपैकी एक तसेच प्रतिष्ठेच्या शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकाचे विजेते डॉ. शाहिद जमील यांच्या मते, आयसीएमआरने ११ जून रोजी
भारतातील आघाडीच्या व्हायरोलॉजिस्टपैकी एक तसेच प्रतिष्ठेच्या शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकाचे विजेते डॉ. शाहिद जमील यांच्या मते, आयसीएमआरने ११ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या सिरोलॉजिकल सर्वेक्षणाचा निष्कर्ष अचूक असेल तर याचा अर्थ भारतात आजघडीला १४-१५ कोटी लोकांना कोरोनाविषाणूचा संसर्ग झालेला आहे. वेलकम ट्रस्ट डीबीटी इंडिया अलायन्सचे सीईओ असलेले डॉ. जमील म्हणतात, “या संशोधनांवरून असे दिसत आहे की, एप्रिलच्या अखेरीस ०.७३ टक्के लोकसंख्येला (म्हणजे १ कोटी लोक) कोरोनाचा संसर्ग झालेला होता. भारतात दुपटीचा दर (डबलिंग रेट) २० दिवसांत गाठला जात आहे हे बघता, आज ही संख्या १४-१५ कोटींच्या घरात आहे.”
“द वायर”साठी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत डॉ. जमील यांनी प्रादुर्भाव झालेल्या लोकांची गणना करण्याचे तीन मार्ग स्पष्ट करून सांगितले. हे तीन मार्ग वेगवेगळ्या आकड्यांपर्यंत पोहोचतात.
पहिला मार्ग म्हणजे प्रादुर्भावामुळे झालेल्या मृत्यूदरावरून संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ठरवणे. भारतात आत्तापर्यंत २३,७२७ जण कोविड होऊन दगावले आहेत. याचा अर्थ कोरोनाचा संसर्ग ३० कोटी जणांना झाला आहे किंवा होऊन गेला आहे.
दुसरा मार्ग म्हणजे डॉ. जमील यांच्या शब्दांत ‘डेथ मॉडेल’. यात प्रादुर्भावाचा मृत्यूदर ०.५ टक्के गृहीत धरला जातो. यानुसार ८० लाख ते १ कोटी लोकांना संसर्ग झालेला आहे. आणखी एक पद्धत मिडलसेक्स विद्यापीठातील मुराद बामजी यांनी विकसित केली आहे. यानुसार संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या २ ते ५ कोटी असू शकते.
आयसीएमआरचा सिरोलॉजिकल सर्व्हे बघता, हा आकडा १४-१५ कोटी येतो, तर डेथ मॉडेलनुसार ८० लाख ते १ कोटी येतो. यातील प्रत्येक पद्धत डॉ. जमील यांनी मुलाखतीत स्पष्ट करून सांगितली आहे.
भारतात कोविड-१९ रुग्णांची संख्या १० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. दररोज ३ टक्के दराने रुग्णसंख्या वाढणे भारतासारख्या विशाल देशात चिंताजनक आहे, असे डॉ. जमील म्हणाले.
दिल्लीने दररोजची रुग्णसंख्या १३००च्या खाली आणण्यात चांगली कामगिरी केली असली, तरी अजून चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाही आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या दिल्लीत दर १० चाचण्यांपैकी एक पॉझिटिव येत आहे, दर २० चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव येईल एवढ्या चाचण्या वाढवायला हव्या आणि हे संपूर्ण भारताला लागू आहे, असे ते म्हणाले.
पुढील तीन महिन्यांत सरकारने चाचण्यांची संख्या वाढवणे, संपर्कात आलेल्यांना शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करणे यावर भर देणे आवश्यक आहे असे सांगतानाच डॉ. जमील यांनी विलगीकरण कसे करावे हे स्पष्ट केले. विलगीकरणाच्या सुविधा आरामदायी असाव्यात, अन्यथा लोक विलगीकरणास प्रतिकार करतील. ही धोरणे शहर स्तरावर ठरवली जावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोविड १९ या आजाराबद्दल डॉ. जमील म्हणाले की, हा आजार केवळ फुप्फुसांवर नाही, तर मेंदू, मूत्रपिंड आणि हृदयावरही परिणाम करतो असे अभ्यासांतून पुढे येत आहे. मात्र हा या आजाराचा थेट परिणाम असतो की अप्रत्यक्षपणे या इंद्रियांवर परिणाम होतो हे अद्याप आपल्याला माहीत नाही, असे ते म्हणाले.
कोविडमधून बरे होण्याची प्रक्रिया दीर्घ, संथ आणि त्रासदायक असू शकते असे आढळत आहे. हा विषाणू विचित्र लक्षणे दाखवत आहे, असे डॉ. जमील म्हणाले.
या प्रादुर्भावामुळे येणारी रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकणारी असण्याची शक्यता आहे. मात्र, यूकेतील एका संशोधनानुसार ती केवळ काही महिने टिकू शकते, असे डॉ. जमील यांनी सांगितले. हा विषाणू अत्यंत ‘नवीन’ असून यावर अभ्यास सुरू आहे.
अँटिबॉडीजद्वारे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीखेरीज शरीराचा स्मृतीआधारित प्रतिसाद हाही मुद्दा आहे, असे डॉ. जमील म्हणाले. विषाणूशी कसा लढा दिला होता हे आठवण्याची क्षमता मानवी शरीरात असते आणि गरज भासल्यास ते त्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा विषाणू हवेद्वारेही संक्रमित होणारा आहे अशा आशयाचे पत्र २३९ शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला लिहिल्याच्या मुद्दयावर डॉ. जमील म्हणाले की, विषाणू हवेद्वारे संक्रमित होत असल्याच्या मुद्दयाचा बाऊ केला जात आहे. विषाणूचे अगदी सूक्ष्म भाग मिनिस्कल एअरोसोल्सच्या स्वरूपात संक्रमित होऊ शकतात. मात्र, प्रादुर्भाव होण्यासाठी हे कण खूप मोठ्या संख्येने मानवी शरीरात शिरणे आवश्यक असते. त्यामुळे दोन मीटरचे अंतर राखले नाही तरीही मास्क वापरणे पुरेसे आहे, असे मत डॉ. जमील यांनी व्यक्त केले.
डॉ. शाहिद जमील यांच्या मुलाखतीचा हा काही अंश आहे. संपूर्ण मुलाखत ‘द वायर’वर उपलब्ध आहे. ती बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:
COMMENTS