वुई आर सॉरी!

वुई आर सॉरी!

युरोप-अमेरिकन कितीही ‘कल्चरलेस’ लोक असले तरीही, वर्तमानातल्या असोत वा भूतकाळातल्या, घडलेल्या चुकांची किमान जाहीर माफी मागण्याचे सामाजिक शिष्टाचाराला धरून असलेले सभ्यतेचे संकेत अजूनही जपून आहेत. जॉर्ज फ्लॉइडनामक कृष्णवर्णीयाचा एका गोऱ्या अधिकाऱ्याने गळ्यावर गुडघा दाबून खून केला, तेव्हा अमेरिकी पोलिसांनी नागरिकांपुढ्यात गुडघे टेकून सॉरी म्हटले. अलीकडे तोच सभ्यतेचा तोच कित्ता ५० वर्षांपूर्वी सिफिलिस रोगावरील संशोधनासाठी मदतनिधी पुरवलेल्या न्यूयॉर्कस्थित मिलिबँक फंड या संस्थेने गिरवला. कारण, या संस्थेच्या पैशांतूनच एकेकाळी कृष्णवर्णीयांची फसवणूक करून त्यांना मरणाच्या दारात लोटले गेले होते. त्याचीच ही कहाणी...

साधारणपणे १९३० पासून पुढे तब्बल ४० वर्षे अमेरिकेतल्या अलाबामा राज्यात सिफिलिस या रोगावर सरकारपुरस्कृत संशोधन सुरू होते. या संशोधनासाठी गिनिपिग उपलब्ध होत राहावेत असा कुटिल हेतू मनात ठेवून सिफिलिसवर उपचार घेऊ इच्छिणाऱ्या कृष्णवर्णीय रुग्णांना अगदी जाणीवपूर्वक मरण दिले गेले होते. कारण स्पष्ट होते, रुग्ण मरण पावल्यानंतरच या संशोधकांना आपले इच्छित संशोधन पुढे रेटणे शक्य होते. कमाल तर ही होती, ज्या न्यू यॉर्क स्थित संस्थेने या संशोधनास आर्थिक सहाय्य पुरवले होते, त्याच संस्थेने मृत कृष्णवर्णीयांच्या दफनविधीसाठी मृतकांच्या नातेवाईकांना पैशांची सोय करून दिली होती. हेही खरेच होते की, गरिबी आणि वंशभेदाचा अखंड सामना करीत आलेल्या कृष्णवर्णीयांना तग धरून राहण्यासाठी ते पैसे बुडत्याला लाभलेल्या काठीच्या आधारासम भासले होते.

संशोधकांच्या स्वार्थासाठी

तसे पाहावयास गेले तर संस्थेने हे पैसे देताना मोठाच उदारतेचा आव आणला होता. म्हणजे काय, तर प्रत्येकास त्या काळी १०० डॉलरचे धनादेश देण्यात आले होते. आणि काय मोठे उपकार केलेत, असा त्या संस्थेचा भाव होता. परंतु ते काही मोठ्या मनाने केलेले दान नव्हतेच. तर ते सारेच एका छुप्या योजनेचा भाग होते. संस्थेकडून अंत्यसंस्कारासाठी १०० डॉलरची मदत हवी असेल तर मृतांच्या मागे राहिलेल्या विधवांना वा इतर नातेवाईकांना डॉक्टरांच्या नावे, मृतदेहाची चिरफाड करण्यास आमची हरकत नाही, असे हमीपत्र द्यावे लागत असे. ते दिले की, संबंधित डॉक्टर मृतकाच्या शरीराचे विच्छेदन करून मेलेल्यास जडलेल्या रोगावर संशोधन करीत असत आणि त्या नातेवाईकांना जे गेले ते ‘बॅड ब्लड’मुळे म्हणजेच वाईट चालीमुळे गेले असे सांगितले जात असे.

त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी बदनाम झालेला हा टस्कगी सिफिलिस संशोधन प्रकल्प जनतेसाठी खुला करण्यात आला. नुसताच खुला करण्यात आला नाही, तर त्याला स्थगितीही दिली गेली. या धक्कादायक प्रकारानंतर प्रकल्पात सामील असलेली आणि मुख्यतः संशोधकांच्या स्वार्थासाठी मृतकांच्या दफनविधीचा खर्च करणारी मिलबँक मेमोरियल फंड ही संस्था पुढे आली. या संस्थेने संशोधन प्रकल्पात जाणीवपूर्वक दाखवल्या गेलेल्या हलगर्जीपणामुळे बळी गेलेल्या मृतकांच्या वारसांच्या पुढ्यात अलिकडेच जाहीरपणे माफी मागितली. या माफीच्या कृतीला २०२० नंतर अमेरिकेत वंशभेदविरोधी जनजागृतीचा ताजा संदर्भ आहे. नव्हे, या कृतीचे मूळ जॉर्ज फ्लॉइडप्रकरणानंतर ब्लॅक लाइवज् मॅटर चळवळीत आहे, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

क्षमायाचनेची तयारी

‘जे घडले होते, ते अक्षम्य होते. आम्हाला आमच्या एकेकाळच्या नीतिहिन भूमिकेची लाज वाटते आहे. आम्ही मनापासून क्षमायाचना करीत आहोत…’ हे उद्गार आहेत, मिलबँक फंडचे अध्यक्ष ख्रिस्तोफर ए. कोलर यांचे. त्यांची ही क्षमायाचना घडली, व्हॉइसेस फॉर अवर फादर्स लेगसी फाउंडेशन या संस्थेच्या टस्कगी येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने गतकाळातील कृत्यांबद्दल जाहीर माफी मागण्यात आली आणि लेगसी फाउंडेशन या संस्थेला देणगीही देण्यात आली. या कार्यक्रमास सिफिलिस संशोधनादरम्यान नाहक बळी गेलेल्यांचे वारसदार, मुले-मुली आदी उपस्थित होते.

ज्या संस्थेने सिफिलिस संशोधन प्रकल्पात खलनायकी भूमिका बजावली, ती मिलबँक फंड ही संस्था १९०५ मध्ये आकारास आलेली. एलिझाबेथ मिलबँक अँडरसन ही या संस्थेची पुरस्कर्ती. अत्यंत श्रीमंत आणि न्यूयॉर्कच्या सामाजिक-राजकीय वर्तुळात मोठीच पहुँच असलेली ही एकेकाळची प्रभावी स्त्री. अमेरिकेत ज्या काही खासगी मदतनिधी पुरवणार्‍या संस्था उदयास आलेल्या, त्यातल्या पहिल्या काही प्रभावी संस्थांपैकी एक संस्था असा मिलबँक फंडचा त्यावेळचा लौकिक होता. बाल कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. सद्यकाळात ही संस्था राज्य पातळीवरच्या आरोग्यविषयक धोरणांवर आपले लक्ष केंद्रित करून आहे.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोलर खजिल मनाने बोलते झाले. म्हणाले, १९३० मध्ये आमच्या संस्थेतल्या पदाधिकार्‍यांनी इतका मुर्दाडासारखा कसा निर्णय घेतला, याचे पटणारे स्पष्टीकरण तरी कसे देता येईल. या पदाधिकाऱ्यांनी संशोधकांच्या स्वार्थ्यासाठी मात्र आव उदारतेचा आणत मृतांच्या नातेवाईकांना पैसे कसे पुरविले आणि जे घडले ते न्याय्य कसे ठरवले, हे माझ्या तरी आकलनापलीकडचे आहे. एका बाजूला कोलर यांचा हा कबुलीजवाब तर दुसरीकडे अजूनही काही आफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या मनामध्ये अमेरिकी सरकारच्या आरोग्य योजनांविषयी अजूनही दबा धरून असलेले भय. याला कारण अर्थातच ‘टस्कगी इफेक्ट’ या नावाने अनेक पिढ्या बदनाम झालेली सिफिलिस संशोधन मोहीम.

बदनाम मोहिमेचे फलित

या बदनाम मोहिमेंतर्गत काय म्हणून घडले नव्हते. १९३२ च्या सुरुवातीला ग्रामीण अलाबामा भागात कार्यरत सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी हेतूतः सिफिलिस रोगावर उपचार देणे थांबविले. यामागचे हेतू दोन. एक म्हणजे डॉक्टरांना पुरुषाला झालेल्या सिफिलिस रोगाचा माग काढता यावा आणि दुसरा हेतू म्हणजे, उपचार थांबविल्यानंतर यथावकाश हे रुग्ण मरणार. ते एकदाचे मरण पावले की, त्यांच्या शरिराचे विच्छेदन करता यावे. त्या संशोधन मोहिमेदरम्यान ६२० पुरुषांच्या एकूण आरोग्यस्थितीचा आढावा घेतला गेला. त्यातल्या साधारण ४३० जणांना सिफिलिस रोग जडला होता. त्यानंतर जे काही घडले त्याचा शोध रिव्हरबाय या संशोधनपर संस्थेने घेतला. त्यात संस्थेने असे नोंदले की, त्या वेळी २३४ जणांचे शवविच्छेदन केले गेले, त्यासाठी मिलबँक संस्थेने जवळपास २०हजार १५० डॉलर्स एवढी रक्कम वाटली.

तद्नंतर असोसिएट प्रेसने उघड केलेल्या वृत्तानुसार १९७२ मध्ये सिफिलिस संशोधन प्रकल्प संपला. या प्रकल्पात सामील लोकांवर न्यायालयीन खटले भरले गेले. न्यायालयाने घेतलेल्या दखलीनंतर तडजोडीचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार संबंधितांनी ९० लाख डॉलर्स इतकी नुकसान भरपाई बळींच्या नातेवाईकांना देणे अपेक्षित होते. परंतु मृतांचे वारस या नियोजित रकमेतून अजूनही नुकसान भरपाई मिळवू पाहात आहेत. मुळात ही जी काही रक्कम होती, तीच मुळात अत्यंत तुटपुंजी होती, त्यामुळे नुकसान भरपाई या शब्दालाही या प्रकरणात फारसा अर्थ उरलेला नव्हता, अशी नोंद त्यावेळी न्यायालयीन कामकाजात झाली होती.

(लेखक असोसिएट प्रेसचे प्रतिनिधी आहेत. मूळ लेख ११ जून रोजी ‘इंडियन एक्स्प्रेस’, वॉशिंग्टन पोस्ट आदी दैनिकांमध्ये प्रकाशित झाला होता. त्याचा हा साभार अनुवाद आहे.)

१ जुलै २०२२ रोजी प्रकाशित मुक्त-संवाद नियतकालिकातून साभार.

COMMENTS