‘डार्नेला’चा व्हिडीओ आणि सिटीझन जर्नलिझम

‘डार्नेला’चा व्हिडीओ आणि सिटीझन जर्नलिझम

मिनियापोलिस पोलिस विभागाने जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या संदर्भात केलेले सगळे दावे खोटे ठरले. नंतर जॉर्ज फ्लॉईडच्या खुनाच्या खटल्यात डार्नेलाचा हा व्हिडीओ महत्त्वाचा पुरावा ठरला आणि डार्नेलाने साक्षही दिली. डार्नेला म्हणाली की मी जेंव्हा फ्लॉईडचा विचार करते, तेंव्हा मला त्याच्यामध्ये माझा भाऊ, माझे वडील, किंवा माझा काका दिसतो.

काळ्यांना क्रूरपणे वागवलं जातं, म्हणजे नेमकं काय होतं?
प्रेरक डेस्मंड टूटू
वुई आर सॉरी!

डार्नेला फ्रेझियर (Darnella Frazier )या मुलीला यावर्षीचा पुलित्झर सायटेशन पुरस्कार मिळाला. अमेरिकेतील वृत्तपत्रं, मासिकं, ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचनेतील कामगिरीसाठी हा  पुरस्कार दिला जातो.

डार्नेला फ्रेझियर

डार्नेला फ्रेझियर

पुरस्कार समिती आणि ज्यूरींना जर आवश्यक वाटले, तर सायटेशन पुरस्कार दिला जातो. सलग तीन वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. मात्र त्यापूर्वी २०१० मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. २००८ मध्ये हा पुरस्कार गायक बॉब डिलन यांना मिळाला होता.

१५ हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सायटेशन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी हा पुरस्कार डार्नेला फ्रेझियर या अमेरिकन मुलीला देण्यात आला, तो तिच्या असामान्य धैर्यामुळे आणि तिने केलेल्या एका व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे.

पुलित्झर पुरस्कार हा १९१७ मध्ये सुरू झाला. पत्रकार आणि वृत्तपत्र प्रकाशक ज्योसेफ पुलित्झरच्या मृत्यूपत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या रकमेतून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. कोलंबिया विद्यापीठाद्वारे हे पुरस्कार विविध एकवीस श्रेणींमध्ये दरवर्षी दिले जातात.

डार्नेला फ्रेझियरने २५ मे २०२० रोजी जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तिचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ जगभर पोहोचला. त्यानंतर जगभरात ६० देशांमध्ये निदर्शने झाली. डेरेक शॉविन आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांवर फ्लॉईडच्या खुनाचा खटला चालला आणि त्यांना शिक्षा झाल्या. डेरेक शॉविनला साडेबावीस वर्षांची शिक्षा झाली. मिनियापोलिस पोलिस विभागाला, फ्लॉईडच्या कुटुंबीयांना २७ मिलियन अमेरिकन डॉलर देण्याचे मान्य करावे लागले.

फ्लॉइडच्या मानेवर डेरेक शॉविन गुडघे दाबून असलेला

फ्लॉइडच्या मानेवर गुडघे दाबून असलेला डेरेक शॉविन

२५ मे २०२० रोजी संध्याकाळी डार्नेला तिच्या नऊ वर्षांच्या चुलतभावासोबत कप फूड्स किराणा दुकानात गेली होती. मिनिसोटाच्या, मिनियापोलिसमध्ये पावडरहॉर्न पार्क या भागात ३८ व्या रस्त्यावर शिकागो एव्हेन्यूच्या चौकाजवळ हे किराणा दुकान आहे. डार्नेलाच्या भावाला स्नॅक्स खरेदी करायचे होते.

त्याचवेळी जॉर्ज फ्लॉईड या ४६ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्तीला २० डॉलरची बनावट नोट वापरल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती.

स्टोअरमध्ये जाण्याच्या अगोदर डार्नेलाला दिसले की पोलिस जॉर्ज फ्लॉईडला रोखत होते. तिने भावाला आत दुकानात पाठवले आणि तिने आपल्या फोनवरून समोर चाललेल्या घटनेचे चित्रीकरण सुरू केले. तिने चित्रीकरण सुरू केल्याच्या वीस सेकंदांनंतर, फ्लॉईड म्हणाला, ‘मी श्वास घेऊ शकत नाही’, व्हिडीओमध्ये फ्लॉइडच्या मानेवर डेरेक शॉविन गुडघे दाबून असलेला दिसतो. फ्लॉईड मरेपर्यंत आणि त्याचा निर्जीव झालेला मृतदेह स्ट्रेचरवरुन घेऊन जाईपर्यंत रेकॉर्डिंग आहे. दहा मिनिटे आणि नऊ सेकंद चालणाऱ्या या व्हिडीओमध्ये फ्लॉईड मदत मागत असल्याचे दिसते. “माझे पोट दुखत आहे. माझी मान दुखत आहे. सर्व काही दुखत आहे. मला थोडे पाणी हवे आहे, कृपया.” “ते मला मारणार आहेत,  ” मला मारू नका ” असे सगळे रेकॉर्ड झाले. डार्नेलाने रात्री पावणेदोन वाजता व्हिडीओ फेसबुकवर टाकला. तो क्षणात जगभर पसरला. दुसऱ्या दिवशी अमेरिकेत आणि जगभर निदर्शने सुरू झाली. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’, ही चळवळ सुरू झाली. लोकांच्या तोंडी घोषणा होती, ‘मी श्वास घेऊ शकत नाही’(आय कान्ट ब्रीद).

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा प्रसंग घडला, तेंव्हा डार्नेला १७ वर्षांची होती. तिचा जन्म २३ मार्च २००३ मध्ये सेंट पॉल इथे झाला आणि तिचे शिक्षण मिनियापोलिस इथे रुजवेल्ट हायस्कूलमध्ये झाले आहे. ती चुलते लिनीयल फ्रेझियर यांच्याबरोबर राहत होती. आता ती १८ वर्षांची आहे. ६ जुलै २०२१ रोजी तिच्या चुलत्यांचा मृत्यू झाला. मिनियापोलिस पोलिस एका दरोडयाच्या प्रकरणात वेगात जाणाऱ्या एका कारचा पाठलाग करत असताना, पोलिसांच्या कारने लिनीयल फ्रेझियर यांच्या कारला धडक दिली. पोलिसांचे म्हणणे आहे, की चुकून धडक लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.

डार्नेला फ्रेझियर (Darnella Frazier )या मुलीला यावर्षीचा पुलित्झर सायटेशन पुरस्कार मिळाला.

डार्नेला फ्रेझियर (Darnella Frazier )या मुलीला यावर्षीचा पुलित्झर सायटेशन पुरस्कार मिळाला.

मिनियापोलिस पोलिस विभागाने जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या संदर्भात केलेले सगळे दावे खोटे ठरले. नंतर जॉर्ज फ्लॉईडच्या खुनाच्या खटल्यात डार्नेलाचा हा व्हिडीओ महत्त्वाचा पुरावा ठरला आणि डार्नेलाने साक्षही दिली. डार्नेला म्हणाली की मी जेंव्हा फ्लॉईडचा विचार करते, तेंव्हा मला त्याच्यामध्ये माझा भाऊ, माझे वडील, किंवा माझा काका दिसतो.

पुलित्झर पुरस्कार समितीने डार्नेलाला पुरस्कार देताना म्हंटले आहे, की ‘डार्नेला फ्रेझियरने फ्लॉईडच्या हत्येची धैर्याने नोंद केली. तिचा व्हिडीओ पोलिसांच्या क्रूरतेविरोधात जगभरातील निषेधांना उत्तेजन देणारा असून, सत्य आणि न्याय यामध्ये पत्रकारीतेत असणाऱ्या नागरिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा आहे. ”

कोलंबिया विद्यापीठाच्या पुलित्झर पुरस्कार समितीचे प्रवक्ते एडवर्ड क्लीमंट म्हणाले, की हा पुरस्कार इतर बक्षिसांशी सुसंगत असाच आहे.

डिसेंबर २०२० मध्ये, फ्री स्पीच अॅडव्होकसी ग्रुप ‘पेन अमेरिका’ यांनी फ्रेझियरला त्यांचा ‘बेन्सन साहस पुरस्कार’ प्रदान केला. हा पुरस्कार प्रदान करताना ‘पेन अमेरिका’ समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुझान नॉसेल म्हणाल्या, “सेल फोन आणि निर्भीडपणा यातून डार्नेला हिने या देशातील इतिहासाचा मार्ग बदलला.

यावर्षीचा ब्रेकिंग न्यूजसाठी पुलित्झर पुरस्कारही मिनियापोलिसच्या ‘स्टार ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला देण्यात आला. २५ मे २०२० रोजी झालेली फ्लॉईडची हत्या आणि त्यानंतर झालेली परिस्थितीच्या बातम्यांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. एकूणच अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे जगणे, यानिमित्ताने पुढे आले. जगभरातील शोषितांच्या चळवळींनी त्याच्याशी स्वतःला जोडून घेतले.

डिजिटल मीडिया कंपनी ‘डेली डॉट्स’ने डार्नेला फ्रेझियर हिला ‘इंटरनेट पर्सन ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिला. त्यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी म्हंटले, “त्या दिवशी, डार्नेला फ्रेझियर ही सिटीझन जर्नलिस्ट आणि कार्यकर्ता अशी दोन्ही बनली.”

बराक ओबामा यांच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे पिटर सूझा म्हणाले, की डार्नेला फ्रेझियर हिने देशाला कायमचे बदलून टाकले.

अमेरिकेतील लेखक रॉय पिटर क्लार्क यांनी डार्नेला फ्रेझियर हिचे नाव पुलित्झर पुरस्कारासाठी समितीला सुचवले होते. त्यांनी लिहिले आहे, “डार्नेला फ्रेझियरचा व्हिडीओ हा पत्रकारितेच्या मूल्यांशी जुळणारा होता. त्याशिवाय त्यात सामाजिक आणि नैतिक हेतू होता. आवाज नसलेल्या लोकांना आवाज देणे, सत्तेसमोर सत्य बोलणे, भ्रष्टाचारी लपवत असलेले रहस्य उघड करणे. संकटाच्या क्षणी भक्कमपणे उभे राहणे आणि वास्तवाचे दस्तऐवजीकरण होते. ”

गेल्या वर्षी पुलित्झर पुरस्कार समितीने सायटेशन पुरस्कार इडा बी वेल्स यांना मरणोत्तर दिला होता. त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या झुंडबळींवर प्रकाश टाकणाऱ्या वृत्त मालिका लिहिल्या होत्या. इडा बी वेल्स ही अमेरिकेतील स्वतंत्र पत्रकार होती.

‘मी श्वास घेऊ शकत नाही’

‘मी श्वास घेऊ शकत नाही’

डार्नेला फ्रेझियर ही जरी पत्रकार नसली तरी तिने पत्रकार करतात तेच महत्त्वाचे काम केले. व्यावसायिक पत्रकार नसलेले नागरिक हे वेबसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडिया वापरून माहिती प्रसारित करतात, त्यांना सिटीझन जर्नलिस्ट (नागरिक पत्रकार) म्हणतात. असे सिटीझन जर्नलिस्ट आता अनेक देशांत महत्त्वपूर्ण काम करताना दिसतात. सोशल मिडियाच्या वाढत्या प्रसाराबरोबरच नागरिकांचे माहिती प्रसारण करण्याचे प्रमाण वाढत आहे.

सिटीझन जर्नलिस्ट असण्यासाठी ‘त्या क्षणी सुचणे’, ‘उस्फुर्तता’ आणि ‘एखादी गोष्ट टिपण्यासाठीचा धोका घेण्याची तयारी’ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

अब्राहम झप्रूडर यांचा कॅमेरा.

अब्राहम झप्रूडर यांचा कॅमेरा.

अब्राहम झप्रूडर हा अमेरिकेतील पहिला सिटीझन जर्नलिस्ट मानला जातो. अब्राहम झप्रूडर हा युक्रेनियन वंशाचा अमेरिकन वस्त्रनिर्माता होता. त्याच्याकडे बेल आणि हॉवेल कंपनीचा ८ मिमी लेन्सचा घरगुती वापरांसाठीचा व्हिडीओ कॅमेरा होता. डलास टेक्सस येथे २२ नोव्हेंबर १९६३ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी दौऱ्यावर आले होते. ते त्यांच्या लिमोझिन गाडीतून लोकांचे अभिवादन स्विकारत निघाले होते. त्याचे अब्राहम झप्रूडर चित्रीकरण करत होते. मोटारींचा ताफा जात असताना केनेडी यांची दुरवरून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचे चित्रीकरण अब्राहम झप्रूडर यांच्या कॅमेऱ्याने टिपले होते. २६.६ सेकंदांचा हा व्हिडीओ नंतर खूप महत्त्वाचा पुरावा ठरला.

वेल अब्बास बिलाल

वेल अब्बास बिलाल

वेल अब्बास बिलाल, हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा इजिप्शियन पत्रकार, ब्लॉगर आणि मानवाधिकार कार्यकर्ता आहे. इजिप्तमधील नागरिकांचा आवाज म्हणून तो काम करतो. हा ‘मिस्र डिजिटल’ नावाचा ब्लॉग चालवतो. महिलांचा जमावाने छळ केल्याच्या घटना आणि पोलिसांच्या क्रूरतेचे अनेक व्हिडिओ त्याने प्रसारित केले आहेत. त्याच्यामुळे अनेक पोलिसांना अत्याचारासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. इजिप्तच्या सरकारने त्याला भरपूर त्रासही दिला, त्याचे यूट्यूब चॅनेल बंद करण्यास भाग पाडले. फेसबुकने वायलचे अकाउंट डिलीट केले. मात्र नंतर यूट्यूबने त्याचे खाते पुन्हा चालू केले. फेसबुकनेही पुन्हा अकाऊंट सुरू केले. त्याला बीबीसी, सीएनएन आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट या संस्थांनी पुरस्कार देऊन त्याच्या कामाला मान्यता दिली आहे.

९/११ च्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील दहशतवादी हल्ल्यांचे अनेक प्रत्यक्षदर्शी नागरिक पत्रकारांकडून चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पत्रकारीतेमध्ये मोलाची भर पडली. २००४ मध्ये त्सुनामीचे छायाचित्रणही एका दर्शकाने केले होते आणि विकिमीडिया कॉमन्सवर अपलोड केले होते.

एका बाजूला फेक न्यूज आणि चिथावणीखोर गोष्टी वाढत असल्या तरी काही नागरिक आपआपल्या परीने माहिती देत आहेत. त्यामुळे पत्रकारिता समृद्ध होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0