जयपूरः गायीच्या तस्करीवरून आपण पाच जणांना मारहाण करत ठार मारल्याचे वक्तव्य करणारे राजस्थानमधील भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांच्या विरोधात पोलिसा
जयपूरः गायीच्या तस्करीवरून आपण पाच जणांना मारहाण करत ठार मारल्याचे वक्तव्य करणारे राजस्थानमधील भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आहुजा यांनी राजस्थानमध्ये गायींच्या तस्करीचा संशय घेऊन आपण हत्या केल्याचा एक व्हीडिओ चित्रित केला होता. तो व्हीडिओ व्हायरल झाला होता.
आहुजा यांचे निकटवर्तीय ४५ वर्षीय चिरंजीलाल सैनी यांना गेल्या शुक्रवारी काही मुस्लिमांनी ट्रक चोरीच्या संशयावरून मारहाण केली होती. या मारहाणीने सैनी यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यातही घेतले होते. शुक्रवारी आहुजा हे सैनी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गोविंदगढ या ठिकाणी गेले होते. तेथे एका कार्यक्रमात आहुजा आपल्या समर्थकांसोबत बसले होते. तेव्हा त्यांनी सैनी यांच्या हत्येप्रकरणात आपण मोठे आंदोलन केले पाहिजे, असे आवाहन समर्थकांना करण्यास सुरूवात केली. यात आहुजा हे एका व्यक्तीला उद्देशून म्हणाले की, पंडितजी आपण आजपर्यंत पाच जणांना मारले आहे. लालवंडी येथे मारले. बहरोड येथे मारले, (जागेचे नाव अस्पष्ट उच्चार असल्याने समजले नाही) एका ठिकाणी मारले, आजपर्यंत पाच जणांना मारले आहे. या भागात पहिल्यांदाच त्यांच्या लोकांनी मारले आहे.’
आहुजा पुढे म्हणतात, की, ‘मी कार्यकर्त्यांना सरळ परवानगीच दिली आहे की, या सा***ना मारा, जे गायीची तस्करी करतात त्यांना मारा. मारणाऱ्यांना आपण जामीन मिळवून देऊ, आंदोलनाची रुपरेखा आखली पाहिजे.’
आहुजा यांनी उल्लेख केलेले लालवंडी व बहरोड हे संदर्भ २०१८मधील रकबर व २०१७मधील पहलू खान याच्या हत्येचे असल्याचे स्पष्ट समजते.
दरम्यान अलवर पोलिसांनी ज्ञानदेव आहुजा यांच्यावर १५३ अ अंतर्गत फिर्याद नोंद केली असून धार्मिक तेढ वाढवल्याच्या कारणावरून अन्य काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोण आहेत ज्ञानदेव आहुजा?
१९९८, २००८ व २०१३ मध्ये आहुजा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आहुजा वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत आले आहेत. त्यामुळेच त्यांना भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकांत तिकिट दिले नव्हते. त्यांना तिकिट देऊ नये, असे खुद्ध भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांचे म्हणणे होते.
तिकिट न मिळाल्याने आहुजा यांनी भाजपला रामराम ठोकला व अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी जाहीर केली. पण २०१८मध्ये भाजपने पुन्हा त्यांना राजस्थान भाजपचे उपाध्यक्ष पद देऊ केले, त्यानंतर आहुजा यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आहुजा यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांतही पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने त्यांना नकार दिला.
गेल्या वर्षी आहुजा यांच्यावर हेटस्पीच संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आहुजा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले जेव्हा त्यांनी २०१६मध्ये जेएनयूतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर आरोप करताना जेएनयूमध्ये ३ हजार कंडोम, गर्भपाताची औषधे व शेकडो दारुच्या बाटल्या सापडल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून त्यांची सोशल मीडियात टिंगलही करण्यात आली होती.
मूळ बातमी
COMMENTS