कोण म्हणतं लोकशाही आहे…?

कोण म्हणतं लोकशाही आहे…?

लोकशाहीत शासन, प्रशासन आणि न्यायपालिका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात परंतु याच व्यवस्थेवर हेतू परस्पर हल्ला चढविला जात आहे. यात साम-दाम, दंड, भेद या शस्त्राचा वापर करून देश चालविला जात आहे त्यामुळेच लोकशाही धोक्यात आली आहे.

सुदानमध्ये लोकशाहीची पहाट होणार का?
वाळू वेगाने खाली यावी…
‘फाटा’ची लोकशाहीकडे वाटचाल : ७० वर्षानंतर निवडणुका

भारतात लोकशाही मूल्याला तडे गेले आहेत. आपण सर्व मेंढराच्या कळपासारखे हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. भारतात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोच आहे पण त्यासोबतच धार्मिक उन्माद एवढा वाढला आहे की, त्या आगीत दलित, मुस्लिम आणि आदिवासी होरपळून निघत आहेत. या मागच्या कारणांचे विश्लेषण करायचे झाल्यास तर आपल्याला स्पष्टपणे कळून येईल की, यामागे मोठी राजकीय आणि धार्मिक शक्ती कार्यरत आहे.

सध्या केंद्रात भाजपाचे सरकार बहुमताने सत्तेत आहे आणि त्यासोबतच बहुतांश राज्यात सुद्धा भाजपाची सत्ता आहे. भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि त्याच संघाला या देशात संविधान नको आहे. त्यांना फक्त मनुस्मृति संविधान म्हणून मान्य आहे आणि याच मनुस्मृतीनुसार त्यांना वर्णव्यवस्था लागू करायची आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत लागू असलेले भारताचे संविधान नष्ट करून त्या जागी मनुस्मृति लागू करण्यासाठी ही व्यवस्था झपाट्याने कार्यरत आहे. त्यामुळेच कधी संभाजी भिडे मनुस्मृतीचे गुणगान गाताना दिसतात तर कधी मनुस्मृतीमुळे स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे असे वक्तव्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश करतात.

२०१४ पासून भारताचे सनातन हिंदुत्वकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळेच लोकशाहीच्या स्तंभाचे पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले आहे. लोकशाहीत साहित्य संस्थांना खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा स्वायत्त संस्थावर हुकुमी पद्धतीने कब्जा मिळवला जात आहे. लोकशाहीत शासन, प्रशासन आणि न्यायपालिका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात परंतु याच व्यवस्थेवर हेतू परस्पर हल्ला चढविला जात आहे. यात साम-दाम, दंड, भेद या शस्त्राचा वापर करून देश चालविला जात आहे त्यामुळेच लोकशाही धोक्यात आली आहे.

नुकत्याच बिल्किस बानो या मुस्लिम महिलेवर बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या कुटुंबाची हत्या करणाऱ्या ११ आरोपींना गुजरात सरकारने शिक्षा माफ करून तुरुंगातून मुक्त केले आहे. मानवी मूल्याची हत्या करणारी ही घटना आहे. बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपींना सोडून दिले जाते आणि समाज त्यांना पुष्पहार घालून या कृतीचे स्वागत करते तेव्हा आपण विवेक नसलेल्या समाजात जगत आहोत हे ओळखले पाहिजेत. यात भाजपाच्या एका आमदाराने वक्तव्य केले आहे की, ते आरोपी ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे ते संस्कारी आहेत याच कारणामुळे त्यांची शिक्षा माफ करण्यात आली, अशी वकिली त्या आमदारांनी केली. मुळात आरोपींना कोणतीच जात किंवा धर्म नसतो हे वारंवार का सांगावे लागत असेल ? मुद्दा पुन्हा तोच येतो की, इथे उच्चवर्णींयांनी घोडचूक जरी केली असेल तरीही त्यांच्या वेळेस दयाभाव दाखविला जातो आणि दुसरीकडे आनंद तेलतुंबडे सारख्या चळवळीतल्या माणसाला साधा जामीनही मिळत नाही. इतकेच काय असे कितीतरी निरपराध लोक तुरुंगात जामीन-विना पडून आहेत तेव्हा न्यायव्यवस्थेला दिसत नाहीत. भाजपा मुस्लिम द्वेष्टी आहे त्यामुळेच पीडित बिल्किस बानो ह्या मुसलमान असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय केला गेला. सरकार पूर्णपणे पक्षपाती धोरण वापरत आहे त्यामुळे उच्चवर्णीयांना एक न्याय आणि इतर जातींना दुसरा न्याय दिला जातो. अशा घटनावरून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत आहे. यातच आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लक्षवेधी विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच, असे नाही’ याचा सरळ अर्थ असा होतो की, न्यायालय (सरकार) हे निःपक्ष राहिली नाहीत. काही भ्रष्ट व्यक्तीमुळे न्यायालय स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहे. न्याय ही कोण्या एका धर्माची किंवा जातीची मक्तेदारी नाही हे भारतीय संविधान सांगते पण संविधानच टिकलं नाही तर न्याय कोणाकडे मागणार ?

दुसरीकडे, इंद्रकुमार मेघवाल नावाच्या दलित मुलाने उच्चवर्णीय शिक्षकाच्या माठातून पाणी पिले म्हणून शिक्षकाने त्याला मारले आणि त्याच्या मारामुळे मुलाचा मृत्यू झाला. अत्यंत संतापजनक व भयावह ही घटना म्हटली पाहिजे. जे पाणी निसर्गातून फुकट मिळते त्यावरही उच्चवर्णीय लोक आपला हक्क सांगतात. अवघ्या ९ वर्षाच्या मुलाला जातीयता काय उमलणार ? म्हणूनच त्याने त्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या चाकोरी मोडू पाहणाऱ्या प्रयत्नांनी त्याचा जीव घेतला. हिंदू धर्मात प्राण्याला श्रेष्ठ मानतात. त्यांचे मूत्र प्यायला धर्म समजतात पण माणसाने पाणी पिले तर धर्म त्याला परवानगी देत नाही. ही विषमता आता लहान मुलांचे जीव घेत आहे. दलितांसाठी पाण्याचा संघर्ष तसा नवा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याच्या हक्कासाठी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. महाडच्या सत्याग्रहाचा इतिहास हा आजही जिवंत आहे आणि इंद्रकुमार सारख्या दलित मुलाच्या हत्येच्या वेळी त्याची आठवण सातत्याने होते. आपण या अशा घटनावरून काय बोध घ्यावा ? पुढच्या पिढीला कोणता इतिहास सांगावा ? भारतात सनातन हिंदूच राज्य आणण्याचा संकल्प सनातन्यांनी बांधला आहे, ही त्याचीच सुरुवात आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाणे येथील दहिहंडी आयोजित कार्यक्रमात सनातन हिंदु धर्म की जय असा नारा देतात. पाण्यासारखे मूलभूत प्रश्न आपण आजही सोडू शकलो नाही, या अपयशाची कारणे आपण शोधायला हवी. जेव्हा ही कारणे आपण शोधण्याचा प्रयत्न करू तेव्हा जातीयता सारखी समस्या किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येईल. जातीयवाद आजही आहे मग भारताने स्वातंत्र्य मिळवून काय कमावले? स्वातंत्र्य नेमके कोणासाठी होते ? पाणी हे बेरंगी असते हे साफ खोटं आहे. कित्येक जातीयतेच्या रंगाऱ्यांनी पाण्याला आपल्या रंगात रंगवून टाकलं आहे. पाणी भगवं होते, पाणी हिरवं होते, पाणी निळे होते, अजूनही कित्येक रंगात पाणी वाहत जाते पण ते पाणी माणूसपण बहाल करत नाही. त्यामुळेच महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक स्वातंत्र्याची मागणी केली त्यासाठी आयुष्यभर लढत राहिले.

मूळ मुद्दा आहे तो लोकशाहीच्या अस्तित्वाचा. भारतात दलितावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत, मुस्लिमावर हल्ले होत आहेत, याची आकडेवारी खूप जास्त आहे पण काही वेळेस गुन्हा दाबला जातो, काही वेळेस गुन्हा लपवला जातो आणि बहुतांश वेळा गुन्ह्याची नोंदच होत नाही. न्यायदानाची प्रकिया खूपचं संथ आहे त्यामुळे जुनी माणसं सांगून गेली की, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण जर कोर्टाची पायरी चढलीच नाही तर न्याय कसा मिळणार ? हा विचार लोकांच्या मनात जागृत झाला पाहिजेत. पूर्वीच्या राजेशाहीत गुलाम पद्धती होती. तीच परिस्थिती आताच्या लोकशाहीत आणण्याचा डाव सुरू आहे. याला भाजपा, आरएसएस खतपाणी घालत आहेत. मुळात या कल्पनेची जननी तेच आहेत. त्यामुळेच तर त्यांना हवा तसा निकाल लावून घेतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबरी मशीद प्रकरण होय. बाजू काहीही असो निकाल त्यांच्याच बाजूने लावून घेतला जातो. स्वातंत्र्याचा सूर्य अंधारतोय त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाहीसाठी झगडत राहिले पाहिजेत.

शेवटचं…’ डोन्ट लुक अप ‘ ( Don’t look Up ) या इंग्लिश सिनेमा मध्ये सरकार विचारवंतांचं ऐकत नाही आणि उद्योगपतीच्या नादाला लागून पूर्ण पृथ्वी नष्ट करते. मानवजाती नष्ट करते. त्यावेळेस विचारवंत लोकं नारा देतात की, ‘लुक अप’ ( Look Up ) म्हणजे वरती बघा. संकट वरतून येत आहे, संकटाकडे बघा. वरती बघा. तेव्हा सरकार विचारवंतांना बाजूला सारून लोकांना मूर्ख बनवण्यासाठी उलटा नारा देते. सरकार म्हणते डोन्ट लुक अप म्हणजे वरती बघू नका. विचारवंताचं ऐकून वरती बघू नका. तेव्हा लोकं सरकारच्या भ्रमात ऐकतात आणि आपला घात करून घेतात. तेव्हा सगळी पृथ्वीच नष्ट होते पण सरकार आणि उद्योगपती पलायन करतात. तशीच परिस्थिती भारतात आता आहे. त्यामुळे आपण “डोळे उघडा आणि सत्य बघा ” हा नारा दिला पाहिजेत. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे त्यामुळे आता ‘भारतात ‘ कोण म्हणतो लोकशाही आहे…? ‘

(छायाचित्र प्रतिकात्मक स्वरूपाचे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0