अमेझॉन प्राइमची ‘तांडव’वरून माफी

अमेझॉन प्राइमची ‘तांडव’वरून माफी

नवी दिल्ली: वेबसीरिज ‘तांडव’मध्ये "उत्तर प्रदेश पोलिस कर्मचारी, हिंदूंची दैवते यांचे अनुचित वर्णन केल्याच्या तसेच पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेचे वाईट च

शर्जिल इमामवर न्यायालयाकडून देशद्रोहाचे आरोप निश्चित
माजी न्या. सीएस कर्णन यांच्यावर गुन्हा
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा

नवी दिल्ली: वेबसीरिज ‘तांडव’मध्ये “उत्तर प्रदेश पोलिस कर्मचारी, हिंदूंची दैवते यांचे अनुचित वर्णन केल्याच्या तसेच पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेचे वाईट चित्रण केल्याच्या” प्रकरणात मंगळवारी अमेझॉन प्राइमने माफी मागितली आहे. ‘तांडव’ वेबसीरिजमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसंगातून कोणाचाही अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, आम्हाला प्रेक्षकांचा तसेच समाजातील विविधता व त्यांच्या श्रद्धांचाही आदर असून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर विनाशर्त आम्ही माफी मागत असल्याचे स्पष्टीकरण अमेझॉन प्राइमने प्रसिद्ध केले आहे. आमची टीम विषयवस्तूंवर विचारविनियम करत असते व प्रेक्षकांना केंद्रस्थानी धरून त्यांचे निखळ मनोरंजन करणे याला आमचे प्राधान्य असते. आम्हाला भारतीय कायदे मान्य असून या देशातील सांस्कृतिक, धार्मिक विविधता व श्रद्धा यांचा आदर असल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तांडवमधील वादग्रस्त प्रसंग वगळण्यात येतील असेही कंपनीने जाहीर केले आहे.

नेमके प्रकरण काय होते?

गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने वेबसीरीज तांडवविरोधात आलेल्या १० तक्रारींच्या सुनावणीत “बहुसंख्याकांच्या नावांचा तसेच त्यांचा विश्वास असलेल्या आदर्शांचा वापर पैसा कमावण्यासाठी करण्यात आल्याचे” निरीक्षण नोंदवत अमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडिया ओरिजिनल्सच्या अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

वेबसीरिज तांडवमध्ये “उत्तर प्रदेश पोलिस कर्मचारी, हिंदूंची दैवते यांचे अनुचित वर्णन केल्याच्या तसेच पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेचे वाईट चित्रण केल्याची” तक्रार करत पुरोहित यांच्यावर अनेक गुन्हे नोंदण्यात आले होते. या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि अलाहाबाद न्यायालयाने हा निर्णय नोएडामध्ये दाखल फिर्यादीसंदर्भात दिला होता.

आपल्या आदेशात न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी नमूद केले होते की, “पाश्चिमात्य चित्रपटकर्तेही लॉर्ड जीझस किंवा प्रेषिताची टिंगल करणे टाळतात पण हिंदी चित्रपटकर्ते अत्यंत निर्लज्जपणे हिंदू देवदेवतांची टिंगल पुन्हापुन्हा करत आले आहेत. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘पीके’ आणि ‘ओह माय गॉड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये हिंदू देवदेवतांचा अनादर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ‘पद्मावती’सारख्या ऐतिहासिक तसेच काही पौराणिक व्यक्तिरेखांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्नही चित्रपटकर्त्यांनी केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ही प्रवृत्ती वाढत आहे आणि तिला वेळीच आवर घातला नाही, तर भारतातील सामाजिक, धार्मिक आणि सांप्रदायिक व्यवस्थेवर विध्वंसक परिणाम होतील.”

पुरोहित यांना अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या आदेशात कॉमेडियन मुनावर फारुखीचा संदर्भही घेण्यात आला होता.

“गुजरातमधील मुनावर फारुखी नावाच्या एका कॉमेडियनने इंदोरमध्ये नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदू देवदेवतांवर टिप्पणी केली आणि या प्रकऱणात अटकेला निमंत्रण देऊन प्रसिद्धी मिळवली यातून परिस्थिती किती वाईट होत चालली आहे हे दिसून येते. हा प्रवाह चित्रपटांमधून कॉमेडी शोंमध्ये येत आहे हेही यातून दिसून येते,” असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले होते.

मुळात फारुखीने प्रत्यक्षात शोमध्ये कोणत्याही हिंदू देवदेवतेचे नाव घेतले नाही हे इंदोर पोलिसांनीच नमूद केले आहे. तो धार्मिक भावना दुखावणारी विधाने “करणार होता” या आधारावर त्यांनी अटकेचे समर्थन केले होते. न्यायालयाने मात्र ‘हे लोक देशाच्या उदार व सहिष्णू परंपरेमागे लपून बहुसंख्याकांच्या देवतांची नावे पैसा कमावण्यासाठी करतात’ अशी टिप्पणी यावर केली होती.

तांडव ही वेबसीरिज ही फिक्शनल कलाकृती आहे आणि कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश यामागे नाही, अशी भूमिका पुरोहित यांच्या अर्जात घेण्यात आली होती. मात्र, “अर्जदार पुरेशा दक्ष राहिल्या नाहीत व बेजबाबदारपणे वागल्या. देशातील बहुसंख्याक नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधातील चित्रपटाच्या स्ट्रीमिंगला परवानगी देऊन त्यांनी फौजदारी कारवाईला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन व स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण अटकपूर्व जामीन मंजूर करून केले जाऊ शकत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

पुरोहित यांना लखनौमध्ये दाखल झालेल्या एका केसमध्ये तात्पुरते संरक्षण मंजूर करण्यात आले आहे पण तेथे त्या तपासासाठी सहकार्य करत नाही आहेत, असेही न्यायमूर्ती म्हणाले होते. ‘फिक्शनल शो करतानाही दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ हा शो फिक्शनल आहे असा डिसक्लेमर देऊन कोणताही आक्षेपार्ह काँटेण्ट स्ट्रीम करता येणार नाही’ असे न्यायालयाने नमूद केले होते.

न्यायालयाने शोच्या तांडव या शीर्षकावरही टीका केली होती. हा शब्द भगवान शंकराच्या विशिष्ट कृतीशी निगडित आहे आणि भगवान शंकर सर्व मानवजातीचे निर्माते, संरक्षक व संहारक मानले जातात. त्यामुळे आपल्या देशात हा शब्द शीर्षक म्हणून वापरल्यास अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही न्यायालयाने म्हटले होते.

या वादग्रस्त वेबसीरिजप्रकरणी देशभरात १० फिर्यादी व चार फौजदारी तक्रारी दाखल झाल्या होत्या, या कारणावरून उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता.

या प्रकरणात ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशु कृष्ण मेहरा, लेखक गौरव सोळंकी आणि अन्य यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांना तात्पुरते संरक्षण मंजूर करण्यास नकार दिला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0