काँग्रेस-डाव्यांनी तृणमूलचा प्रस्ताव फेटाळला

काँग्रेस-डाव्यांनी तृणमूलचा प्रस्ताव फेटाळला

भाजपसारख्या धर्मांध व फुटीरतावादी पक्षाच्या मुकाबला करण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आमची साथ द्यावी असे आवाहन तृणमूल काँग्रेसने बुधवारी केले. पण तृणमूलचे हे आवाहन दोन्ही पक्षांनी साफ फेटाळत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला आमच्यातच विलिन व्हावे असे उत्तर दिले आहे. तर भाजपने तृणमूलचे हे आवाहन राज्यात भाजपचा जनाधार वाढत असल्याचा दावा केला. तृणमूलचे हे आवाहन हताशेतून आले असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वक्तव्य केले.

बुधवारी तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी डावे पक्ष व काँग्रेस तृणमूलच्या साथीस आल्यास भाजपसारख्या धर्मांध व देशात फूट पाडणार्या पक्षाचा पराभव शक्य असल्याचे म्हटले.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प. बंगालमध्ये भाजप मजबूत होण्यामागे तृणमूलचे राजकारण जबाबदार असल्याचा आरोप केला. आम्हाला तृणमूलशी युती करण्याची गरज वाटत नाही. गेले १० वर्षे काँग्रेसचे आमदार तृणमूल खरेदी करत होते, आता आमच्या पक्षात यांना का रस वाटू लागला असा सवाल चौधरी यांनी केला. ममता बॅनर्जींना भाजपशी लढायचे असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. कारण काँग्रेस हा एकमेव पक्ष धर्मवादी राजकारण व फुटीरतावादी राजकारणात लढत आहे, असे ते म्हणाले.

माकपचे नेते सुजान चक्रवर्ती यांनी तृणमूलच्या या आवाहनावर आश्चर्य व्यक्त करत डावे पक्ष राजकारणात अजून महत्त्व धरून आहेत व काँग्रेसच्या मदतीने भाजपा व तृणमूल या दोघांचा आम्ही पराभव करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या लोकसभा निवडणुकांत प. बंगालमध्ये डाव्या पक्षांना एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेसनेही केवळ २ जागा मिळवल्या आहेत. पण भाजपने जोरदार मुसंडी मारत १८ तर तृणमूलने २२ जागा जिंकल्या होत्या.

तर २०१६च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-डाव्यांच्या युतीला २९४ जागांमधील ७६ जागा तर तृणमूलला २११ जागा मिळाल्या होत्या.

मूळ बातमी

COMMENTS