भाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव

भाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव

कोलकाताः तृणमूल काँग्रेसच्या विरोधात हवा असल्याच्या कारणावरून भाजपात उडी मारलेल्या तृणमूल काँग्रेस, डावे व काँग्रेसच्या १९ आमदारांचा निर्णय साफ चुकला असे आता आकडेवारीवरून दिसून येत आहे. या तीन पक्षांच्या १९ आमदारांनी राज्यात विधानसभा निवडणुकांच्या घोषणा होताच भाजपमध्ये उडी मारली होती, त्या पैकी केवळ ६ जण विजय मिळवू शकले.

या विजयी आमदारांची नावे नंदिग्राममधून सुवेंदू अधिकारी, नताबारीहून मिहीर गोस्वामी, राणाघाट नॉर्थवेस्टहून पार्थ सारथी चटर्जी, बागदा येथील बिस्वजीत दास अशी असून हे आमदार तृणमूलमध्ये होते. माकपचे हल्दीयामधून तापसी मंडल व काँग्रेसचे पुरुलिया येथील सुदीप मुखर्जी यांनी विजय मिळवला आहे.

विजयी आमदारांपेक्षा पराभूत झालेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. यात अनेक बडे नेते समाविष्ट आहेत. भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे नेते व राज्यातले एक मंत्री राजीव बॅनर्जी यांचा दोमजूर मतदारसंघात ४२,६२० मतांनी पराभव झाला. याच बॅनर्जी यांनी २०१६च्या निवडणुकांत १ लाख ७ हजार मतांनी विजय मिळवला होता.

तृणमूलमध्ये पूर्वी असलेले पण भाजपची वाट धरणारे एक बडे नेते मुकुल रॉय यांचा मुलगा सुभ्रांषू रॉय यांनाही पराभव पत्करावा लागला. पण मुकुल रॉय यांनी नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर उत्तरेतून विजय मिळवला. पण सुभ्रांषू रॉय हे दोन वेळा आमदार झाले होते. त्यांचा या वर्षी पराभव १३,३४७ मतांनी झाला. गेल्या वर्षी ते ४७,९५४ मतांनी निवडून आले होते.

पूर्वाश्रमीचे तृणमूलचे आणखी एक वजनदार नेते पण पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले ८९ वर्षांचे सिंगूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनाही २५,९२३ मतांनी पराभव पत्करावा लागला.

त्यानंतर कोलकातानजीक बिधान नगरचे महापौर सब्यसाची दत्ता यांनाही ७,९९७ मतांनी पराभव पत्करावा लागला. दत्ता यांनी या पूर्वी दोन वेळा आमदारकी मिळवली आहे. पण २०१९मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

प्रबीर घोषाल ३५ हजार मतांनी हरले. २०१६च्या निवडणुकात त्यांनी तृणमूलच्या तिकिटावरून १२ हजार मतांनी विजय मिळवला होता. डायमंड हार्बरचे आमदार दीपक हलधर यांनी पक्ष तिकीट देणार नाही म्हणून भाजपची वाट धरली, त्यांना १७ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. बॅलीच्या बैशाली दालमिया, मंतेश्वरच्या सैकेत पांजा, कालनाच्या  बिस्वजीत कुंदू यांनी भाजपची वाट धरली होती, त्यांचाही पराभव झाला.

भाजपमध्ये वाद सुरू

विधानसभा निवडणुकांत पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वादविवाद उफाळून येण्यास सुरूवात झाली आहे. पक्षाने तृणमूलच्या अनेक नेत्यांना पक्षप्रवेश दिला व त्या सोबत तिकीटही दिले, त्याची नाराजी कार्यकर्त्यांमधून दिसून आल्याचे आता म्हटले जाऊ लागले आहे.

२०१९मध्ये भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तृणमूलमधून नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा जो ओघ आहे तो थांबवला पाहिजे असे भाजप नेत्यांना सांगितले होते. तृणमूलच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे व अन्य गुन्ह्याचे गंभीर आरोप असल्याने अशा नेत्यांना प्रवेश दिल्याने त्याच्या प्रतिक्रिया समाजात नकारात्मक जातात असे संघाचे म्हणणे होते. पण या इशार्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे एका भाजपच्या नेत्याने सांगितले

नंदिग्राममधून सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर विजय मिळवला असला तरी गेले दशकभर त्यांच्या ताब्यात असलेला पूर्व मिदनापूर जिल्हा मतदारसंघ तृणमूलने आपल्याकडे खेचून घेतला आहे. या जिल्ह्यातल्या १६ जागांपैकी १० जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. या जिल्ह्यातले दोन खासदार अधिकारी कुटुंबातले आहेत.

या निकालांच्या पार्श्वभूमीवर रविवारी ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षातील जे नेते भाजपकडे गेले आहेत, त्यांना पक्षात यायचे असेल तर स्वागत असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मूळ लेख

COMMENTS