जामियातील दडपशाही : लखनौ, हैदराबाद, मुंबईतील विद्यार्थी रस्त्यावर

जामियातील दडपशाही : लखनौ, हैदराबाद, मुंबईतील विद्यार्थी रस्त्यावर

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलियातील विद्यार्थ्यांवर रविवारी दिल्ली पोलिसांनी केलेल्या दडप

दिल्ली जिंकण्यासाठी भाजप अस्वस्थ का?
‘अच्छे दिन’ जानेवाले है !
भाजप कार्यकर्त्यांचा केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलियातील विद्यार्थ्यांवर रविवारी दिल्ली पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचे पडसाद सोमवारी देशभरातील विद्यापीठांमध्ये दिसून आले. हैदराबाद, लखनौ, मुंबई, पुणे व कोलकाता सहित अनेक राज्यांतल्या विद्यापीठातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांचा निषेध केला पण त्यांनी मोदी-अमित शहा यांच्या कारभाराचाही निषेध केला.

कडाक्याच्या थंडीतही सोमवारी सकाळी जामियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आपल्या अंगावरचा शर्ट उतरवून दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. दिल्ली पोलिसांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली असून पोलिसांनी विद्यापीठातील स्वच्छतागृहे, ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात मोडतोड केल्याचा आरोप विद्यार्थी करत होते. पोलिसांनी महिलांनाही आपल्या लाठीमारातून सोडले नसल्याचे अनेक विद्यार्थी सांगत होते.

तर सकाळीच दिल्ली विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांनी जामिया मिलियातील विद्यार्थ्यांसोबत आपण आहोत असा नारा देत एकजुटता दाखवणारा मोर्चा काढला. या विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कारही घातला आहे. हे विद्यार्थी संध्याकाळी इंडिया गेटवर पोहचले व तेथे त्यांनी पोलिसांच्या दमनशाहीविरोधात तीव्र निदर्शने केली.

हैदराबादेत परीक्षांवर बहिष्कार

तेलंगणची राजधानी हैदराबाद येथील मौलाना आझाद उर्दू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जामियातील पोलिस कारवाईचा निषेध करत परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

बीएचयू, जाधवपूर, टीसमध्ये निदर्शने

वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठ, कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी पोलिसांच्या ‘गुंडगिरी’विरोधात तीव्र निदर्शने केली. त्यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचीही मागणी केली,

मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी ‘दिल्ली पोलिस शरम ठेवा’ अशा घोषणा देत सरकारविरोधात घोषणा दिल्या.

अलीगड विद्यापीठातही निदर्शने

रविवारी रात्री अलिगड विद्यापीठातील विद्यार्थी व पोलिसांमध्ये संघर्ष पेटला होता. सोमवारी येथे तणावपूर्ण शांतता होती. विद्यापीठ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाच जानेवारीपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना पाच जानेवारीपर्यंत आपल्या खोल्या खाली करण्यास सांगितले आहे. आता पाच जानेवारीनंतर परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

अलीगड, मेरठ, सहारनपूरमध्ये इंटरनेट बंद

जामियातील पोलिस कारवाईचे पडसाद उत्तर प्रदेशातील अलीगडसहित मेरठ व सहारनपूरमध्येही उमटले. या तीनही शहरांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळी नदवतुल उलेमातील काही विद्यार्थी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना रोखून धरले.

आयआयटीतील विद्यार्थी उतरले रस्त्यावर

आयआयटी कानपूर, आयआयटी मद्रास व आयआयटी मुंबईचे शेकडो विद्यार्थी रविवारी व सोमवारी जामियातील पोलिस दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरले होते.

जामियाच्या कुलगुरुंनी केली पोलिसांच्या चौकशीची मागणी

रविवारी रात्री जामिया मिलिया विद्यापीठात घुसखोरी करून दिल्ली पोलिसांनी जे वर्तन केले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जामियाच्या कुलगुरु नजमा अख्तर यांनी सोमवारी केली. जामिया विद्यापीठात पोलिसांची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. दिल्ली पोलिस कुलगुरुंच्या परवानगीविना विद्यापीठात घुसले. विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांना घाबरवण्यात आले. विद्यापीठाच्या संपत्तीचे मोठे नुकसान दिल्ली पोलिसांनी केले त्याची भरपाई कोण देणार असा सवाल त्यांनी केला.

पोलिसांनी विद्यापीठाच्या संपत्तीचे जेवढे नुकसान केले आहे त्याचा पंचनामा करून मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर ठेवण्यात येईल असेही नजमा अख्तर म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0