कोरोनानंतर काय होणार?

कोरोनानंतर काय होणार?

कोरोना ही काही अशा प्रकारची पहिलीच आपत्ती नाही. अशा अनेक मानवनिर्मित आपत्ती या आधीही आलेल्या आहेतच. मग आपण त्यातून धडे का घेत नाही? त्याच-त्याच चुका आपण वारंवार का करतो? आपल्याला आधीचं काही आठवत कसं नाही? स्मृतिभ्रंश झालेल्या अवस्थेत आपण का वावरतो? अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या यान लियांके (Yan Lianke) या चिनी लेखकाच्या एका भाषणाचं ओंकार गोवर्धन यांनी केलेले हे भाषांतर.

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आज आपलं पहिलंच ई-लेक्चर आहे. आपण सुरू करण्यापूर्वी मला थोड्या विषयांतराला परवानगी द्या. मी जेव्हा लहान होतो तेव्हा एकच चूक जर मी सलग दोन-तीन वेळा केली, तर माझे पालक मला त्यांच्या पुढ्यात उभा करायचे आणि माझ्या कपाळाकडे बोट दाखवून एक प्रश्न विचारायचे, “इतका कसा रे तू विसराळू?’’ माझ्या चीनी भाषेच्या वर्गात जेव्हा अनेकदा वाचलेला असूनही, मला एखादा उतारा पाठ म्हणता यायचा नाही तेव्हा माझे शिक्षक मला उभं करून संपूर्ण वर्गासमोर प्रश्न करायचे, “इतका कसा रे तू विसराळू?”

यान लियांके

यान लियांके

मित्रांनो, स्मरणशक्ती ही अशी जमीन आहे जिच्यात आठवणी वाढतात. आठवणी म्हणजे या जमिनीतून निघणारी फळं असतात. आठवणी असणं आणि स्मरणशक्ती असणं हाच माणूस व प्राणी आणि वनस्पती यांच्यातला मूलभूत फरक आहे. आपल्या वाढीची आणि प्रगल्भतेची ती सर्वात पहिली मागणी आहे. खाणं-पिणं आणि कपडे घालणं यापेक्षाही ती जास्त महत्वाची आहे, असं मला अनेकदा वाटतं. श्वासोच्छवासापेक्षाही; कारण जर आपण आठवणी गमावल्या तर आपण खाण्याची पद्धत विसरून जाऊ. शेतात पेरणी करायची आपली क्षमता आठवणी अभावी नष्ट होईल. आपले कपडे कुठे ठेवलेले होते, हे सकाळी उठल्यावर आपण विसरलेलो असू. राजा कपड्यांपेक्षा नागडाच चांगला दिसतो असं आपल्याला वाटायला लागेल.

पण आज मी ह्या सगळ्याबद्दल का बोलतोय? कारण कोव्हिड-१९ नावाची राष्ट्रीय आणि जागतिक आपत्ती अजूनही खऱ्या अर्थानं काबूत आलेली नाही; अजूनही अनेक कुटुंबं टरकावली जात आहेत. हुबेई, वुहान इथून अजूनही ह्र्दय पिळवटून टाकणारी आक्रंदनं ऐकू येत आहेत आणि तरीही केवळ आकडेवारी सुधारते आहे, या बळावर आधीच सर्वत्र विजयघोष घुमू लागलेले आहेत. मृतांची शरीरं अजून थंड पडलेली नाहीत, लोकं अजूनही दाट शोकात आहेत आणि तरीही गायनासाठी विजयगीत तयार आहे आणि लोकं घोषणेसाठी उतावीळ झालेली आहेत. “आम्ही किती बुद्धिमान आणि किती थोर! आमचा जयजयकार असो!”

कोव्हिड-१९ आपल्या आयुष्यात आल्यापासून ते आजपर्यंत  खरोखर किती लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, हे आपल्याला नक्की माहित नाही. इस्पितळात किती मेले?, इस्पितळाच्या बाहेर किती लोकांना मृत्यू आला? आपल्याला माहिती नाही. याबाबत तपास करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची संधी आपल्याला मिळालेली नाही. यातली आणखी वाईट गोष्ट अशी की जसजसा काळ जाईल तसे हे प्रश्न आणि हा तपास कदाचित आपोआपच संपेल आणि हे सर्व प्रकरण एक कायमस्वरूपी गूढ म्हणून राहील. आणि मग कोणाच्याही स्मृतीत नसणारा हा जीवन मृत्यूचा एक किचकट गुंता आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना ठेवा म्हणून बहाल करू.

‘पर्वतांमध्ये हिवाळ्यात खायला काही मिळत नसल्यामुळं जंगली प्राणी हिवाळ्यात इथं येतात एवढंच मला माहित होतं. पण ते उन्हाळ्यातही हेच करतील याची मला कल्पनाच नव्हती’ असं Aunt Xiaglin (Lu xun या लेखकाच्या कादंबरीमधलं एक सरंजामदारी काळात अडकून राहिलेलं गरीब आणि काहीसं वेडगळ पात्र) अखंड बडबडत राहते. हा संसर्ग जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्याला Aunt Xiaglin होणं परवडणार नाही आणि Ah QQ (आपण इतरांहून यशस्वी आणि श्रेष्ठ आहोत अशी स्वत:ची खोटी समजूत करून स्वत:लाच फसवणारं Lu xun च्या कादंबरीतलं एक पात्र) सारखं सतत मार खाऊन, अपमानित होऊन, मृत्यूच्या उंबरठयावर येऊनही आपणच विजयी असल्याचा डांगोरा पिटत राहणंही आपण करता कामा नये.

व्यक्ती, कुटुंब, समाज, कालखंड किंवा देश यांच्यावर, पूर्वीपासून ते अगदी आजपर्यंत, आपत्ती आणि शोकांतिका सतत एकामागून एक अशा का येऊन आदळत असतात?  दरवेळी या ऐतिहासिक आपत्तींची किंमत हजारो सर्वसामान्य मानवी जीवांच्या मृत्यूनंच का चुकवावी लागते? या प्रश्नांमागे आपल्याला माहित नसलेले, आपण न विचारलेले, विचारू नका असं सांगितलेले (आणि आपण आज्ञाधारकपणे ऐकलेले ) असे अगणित घटक आहेत. पण यातला एक महत्वाचा घटक म्हणजे आपण माणसं, किडे-मुंग्यांच्या संख्येनं असलेली आपली मानवजात, आपण सर्वजण विसराळू आहोत हा आहे.

आपल्या आठवणी नियंत्रित केल्या गेल्या आहेत, बदलल्या गेल्या आहेत आणि पूर्णपणे पुसून टाकण्यात आलेल्या आहेत. इतरांनी आपल्याला जे लक्षात ठेवायला सांगितलं तेच आपण लक्षात ठेवलेलं आहे आणि आपल्याला जे विसरायला सांगितलं गेलं ते आपण विसरून गेलो आहोत. हुकूम आला की आपण गप्प बसतो आणि आज्ञा झाली की आपण गाणी गातो. अशाप्रकारे बनावट सामूहिक आणि राष्ट्रीय आठवणी तयार केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी विसरायचा आदेश मिळाला आणि काही गोष्टी आठवायची परवानगी मिळाली. आठवण नावाचं त्या त्या कालखंडातलं अवजार हे या दोन्हीच्या मिश्रणातून तयार झालेलं आहे.

फार जुन्या पुस्तकांवरची धूळ झटकण्याची गरजच नाही. आपण गेल्या वीस वर्षांचीच उजळणी करू. ८० आणि ९० च्या दशकात जन्मलेल्या तुमच्यासारख्या प्रत्येकाला  SARS, AIDS सारख्या महाभयानक आपत्ती लक्षात असतील आणि आता कोव्हिड-१९ आलेलं आहे. ही संकटं मानवनिर्मित आहेत की निसर्गनिर्मित? Tangshan आणि Wenchuan मधल्या भूकंपांसारखी, निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाला हतबल करणारी ही संकटं आहेत का? मग या मानवनिर्मित संकटांमधले सर्व मानवी घटक कोणत्याही काळात जवळजवळ सारखेच कसे काय? सतरा वर्षांपूर्वी आलेला SARS आणि आजचा कोव्हिड-१९ ही ह्या दोन्ही नाटकांचा दिग्दर्शक एकच आहे असं वाटतं. तीच शोकांतिका आपल्यासमोर पुन्हा सादर होते आहे. आपण माणसं फक्त धुळीचे कण आहोत. आपण या नाटकांचा दिग्दर्शक शोधू शकत नाही. या नाटकांच्या लेखकाचे विचार, कल्पना आणि निर्मिती शोधून त्याचं एकत्रिकरण करण्याचं कौशल्य आपल्यात नाही. पण आज पुन्हा एकवार हे मृत्युनाट्य आपल्या डोळ्यांसमोर घडत असताना, आधीच्या नाटकाच्या आपल्या आठवणी काय होत्या हा प्रश्न आपण स्वत:ला विचारू नये का? आपल्या आठवणी पुसून आपली पाटी कोरी कोणी केली?

विसराळू माणसं ही रस्त्यावरच्या आणि मैदानातल्या धुळीच्या कणांसारखी असतात. त्यांवर कधीही पायताण टाच आणू शकतं. विसराळू माणसं ही ओंडक्यांसारखी असतात. जीवनरस देणाऱ्या झाडाशी त्याचं नातं तुटलेलं असतं. त्यांचं भवितव्य आता करवतींच्या आणि कुऱ्हाडीच्या मर्जीनुसार ठरणार असतं .

आपण लोक चीनी माणसांवर, चीनी व्यक्तिरेखांवर आयुष्यभर अवलंबून राहणारे आहोत. लेखनावरच्या प्रेमामुळे ज्यांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो त्या आपल्यासारख्या लोकांनीही आपल्या रक्तपाताच्या आणि जीवनाच्या आठवणी सोडून दिल्या तर लिहिण्यात अर्थ तो काय उरला? साहित्याचं मूल्य काय? समाजाला लेखकांची गरज का असते? तुमचं अव्याहत लिखाण, तुमचा व्यासंग, तुम्ही लिहिलेली अनेक पुस्तकं आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ यात मग फरक तो काय आहे? जर पत्रकारानं जे दिसतंय त्याचं वार्तांकन केलं नाही, लेखकानं त्याच्या आठवणींविषयी आणि भावनांविषयी लिहिलं नाही, समाजातले बोलणारे लोक आणि कसं बोलावं हे ठाऊक असणारे लोक हे सतत फक्त राजकीयदृष्ट्या योग्य असणाऱ्या गोष्टीच सांगू, वाचू, बोलू लागले तर मग एक जिवंत, हाडामांसाचा माणूस म्हणून या पृथ्वीवर जगणं म्हणजे काय, हे आपल्याला कोण सांगणार?

असं समजा, की फांग फांग ( Fang Fang)  ही लेखिका आजच्या वुहानमध्ये अस्तित्वात नव्हतीच. तिनं कुठल्याही नोंदी केल्या नाहीत किंवा आपल्या भावनाही लिहून ठेवल्या नाहीत. आपल्या मोबाईल फोन्स मधून मदतीचे हृदयद्रावक पुकारे करणारी Fang Fang सारखी हजारो माणसंही वुहानमध्ये नव्हतीच असं समजा आणि आता सांगा,  की मग आपण काय ऐकलं असतं, काय पाहिलं असतं?

माणसाच्या व्यक्तिगत आठवणींच्या लाटा, त्यांची गाज, त्यांचा दिसणारा फेस हा काळाच्या जोरदार प्रवाहामध्ये कायमच अनावश्यक समजला जातो. जणू त्या आठवणी कधी अस्तित्वात नव्हत्याच अशा पद्धतीनं त्यांना एकतर बेदरकारपणे बाजूला केलं जातं किंवा मोठ्या आवाजांनी आणि शब्दांनी त्यांना शांत बसवलं जातं. आणि त्या कालखंडाच्या समाप्तीबरोबर मग सगळंच विस्मृतीच्या गर्तेत जातं. पुसट होतं. रक्त, मांस, शरीर, आत्मा काहीही उरत नाही. सगळं छान सुरु होतं. फक्त जगाला उभारू शकणारा सत्याचा छोटासा टेकू कायमचा नष्ट झालेला असतो. यामुळे इतिहास ही हरवलेल्या आणि कल्पिलेल्या निराधार गोष्टींची दंतकथा बनून राहते. या दृष्टीनं विचार केला तर स्मरणशक्ती असणं, आपल्यापाशी आपल्या स्वत:च्या कधीही न बदलणाऱ्या अमीट आठवणी असणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. आपण जेव्हा, चिमुकलं का होईना पण सत्य बोलू तेव्हा आठवणी हीच गोष्ट आपल्या चिमुकल्या सत्याला किमान पुरावा आणि ठामपणा देणारी आहे. सर्जनशील लिखाण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे अधिकच महत्वाचं आहे. आयुष्यभर लिखाण करणं, सत्याचा शोध घेणं आणि एक माणूस म्हणून आपल्या आठवणींद्वारे जगणं हे आपल्यातल्या बहुतेकांचं भागधेय ठरून गेलेलं आहे. आपल्यासारख्या लोकांनीही आपल्या आठवणींना आणि आपल्यातल्या किमान अस्सलतेला तिलांजली दिली तर या जगात व्यक्तिगत आणि ऐतिहासिक अस्सलता असेल का? सत्य असेल का?

आपली स्मरणशक्ती, आपल्या आठवणी जग किंवा वास्तव बदलू शकणार नाहीत हे खरं आहे. पण त्यांच्यामुळे, आपण जेव्हा केंद्रित आणि नियंत्रित सत्याशी सामना करू तेव्हा त्यात काहीतरी सांगायचं राहून गेलंय ही भावना आपल्या मनात नक्की निर्माण होईल. “हे खरं नाही.” असं आपल्या आतला आवाज तेव्हा म्हणेल. तो आवाज मग भले कितीही छोटा असो. कोव्हिड १९ या उद्रेकाचं खरं निर्णायक वळण येण्यापूर्वीच जल्लोष आणि विजयगीतं सुरु झालेली आहेत. या कर्णबधीर कोलाहलात माणसांचे, कुटुंबांचे, गरिबांचे, मजुरांचे अश्रू, त्यांचे शोक, त्यांची फरपट आपल्याला ऐकू येण्याचं सामर्थ्य आठवणींमुळेच येऊ शकेल. आठवणी जग बदलू शकत नाहीत, पण त्या आपल्याला एक कनवाळू मन मात्र बहाल करतात.

आठवणी आपल्याला वास्तव बदलण्याची ताकद कदाचित देऊ शकणार नाहीतही , पण जेव्हा आपल्या समोर असत्य येईल तेव्हा आठवणी आपल्या मनात किमान एक प्रश्न तर नक्कीच उभा करतील. पुन्हा एकदा Great Leap Forward सारखं काही सुरु झालं आणि पुन्हा जर लोकं आपल्या परसात लोखंडाच्या भट्ट्या लावू लागले तर आपल्या आठवणी आपल्याला ‘वाळूतून पोलाद तयार होत नाही’ एवढं तरी किमान सांगू शकतील. अशाच आठवणी आपल्याला ‘एका गुंठ्यात ५०,००० किलो पीक येऊ शकत नाही’ हे ही सांगतील. हे सामान्यज्ञान असून यात ‘हवाच अन्न तयार करेल’सारखा कुठलाही आत्मिक चमत्कार नाही, हे ही आपल्याला मग लक्षात येईल. इथे पुन्हा एकदा सांस्कृतिक क्रांतीसारखं काही घडलंच तर या वेळी तरी आपण आपल्या पालकांना तुरुंगांत डांबणार नाही किंवा त्यांच्या माना गिलोटिनखाली देणार नाही, याची आपण खात्री देऊ शकू.

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण कलेचे विद्यार्थी आहोत. वास्तवाला आणि स्मृतींना भाषेतून व्यक्त करण्यामध्ये आपण बहुधा आपलं आयुष्य व्यतित करणार आहोत. सामूहिक स्मृती, राष्ट्रीय स्मृती, वांशिक स्मृती यांबद्दल आपण बोलूया नको. कारण इतिहास हा आपल्या राष्ट्रीय आणि सामूहिक स्मृतींवर एक आच्छादन घालून त्या बदलून टाकतो. आपण आपल्या व्यक्तिगत स्मृतींबद्दल बोलूया. कोव्हिड १९ ही तर अजून आपली स्मृती झालेली देखील नाही, पण तरीही आतापासूनच आपल्याला चहूकडून विजयगीतं आणि जयघोष ऐकू येता आहेत. कोव्हिड १९ या भयानक आपत्तीचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आपण स्मरणशक्ती शाबूत असणारी माणसं होऊ, आपल्या स्मृतीमधून आठवणी मिळवणारी माणसं आपण होऊ, अशी मी आशा करतो.

कोव्हिड १९ या आपत्तीविरूद्धचं राष्ट्रीय युद्ध जिंकल्याच्या थाटात आता नजीकच्या भविष्यात जल्लोष सुरु होतील. अगदी गीत संगीतासकट हे जल्लोष सुरु असताना आपण पोकळ आणि रिते राहून त्यांचा प्रतिध्वनी होऊ नये असं मला वाटतं. त्यावेळी आपण आपल्या आठवणींशी इमान राखून जगणारे लोक असू अशी माझी अपेक्षा आहे. जल्लोषाच्या त्या महानाट्यातले नट, सूत्रधार आपण नसू. नाटकात असल्यामुळे टाळ्या पिटाव्याच लागणाऱ्या रंगमंचावरच्या गर्दीतही आपण नसू. आपण खिन्न आणि एकाकी अवस्थेत रंगमंचावरच्या सर्वात लांब कोपऱ्यात मूकपणे उभे असू. आपले डोळे तेव्हा डबडबलेले असतील. आपली प्रतिभा, धैर्य आणि मानसिक ताकद जर आपल्याला Fang Fang सारखी साहित्यिक बनवू शकत नसेल तर आपण निदान, तिच्या हेतूंविषयी शंका घेणाऱ्या, तिची टवाळी आणि नालस्ती करणाऱ्या लोकांत तरी सामील होणार नाही. यथावकाश शांतता आणि सुबत्ता परतेल. विजयगीतांच्या तुफानी लाटा येतच राहतील. या कर्कश्श वातावरणात आपल्याला ‘कोव्हिड १९’चा मूळ स्रोत काय होता आणि त्याचा प्रसार कसा झाला?’ हा प्रश्न मोठ्यांदा विचारण्याची हिम्मत होईल की नाही माहित नाही. अशी हिम्मत झाली नाही तर मग आपण हा प्रश्न हळू आवाजात कुजबुजत आणि पुटपुटत राहूया. त्यातूनही आपला सदसद्विवेक आणि धैर्यच प्रकट होईल. Aushwitz छळ छावण्यांनंतर कविता लिहिणं हे क्रूरच होतं, पण आपण त्या यातना शब्दांतून, बोलण्यातून आणि आठवणीतूनही विसरायचं ठरवणं हे अधिक क्रूर आहे. हे नि:संशय जास्त क्रूर आणि भयावह आहे .

आपण तुतारी फुंकणारे नसू तर ती फुंकलेली तुतारी ऐकणारे तरी होऊया. आपण मोठ्यांदा बोलू शकत नसू तर कुजबुजूया. कुजबुजही शक्य नसेल तर आपण मूक लोक होऊया. फक्त आपली स्मरणशक्ती शाबूत राहू देऊ. कोव्हिड १९ ची नांदी, त्याचा भीषण हल्ला आणि त्याचा भयानक संसर्ग हे सर्व आपण अनुभवलेलं आहे. युध्द जिंकल्यावर जेव्हा लोकांचे कळप जल्लोषासाठी एकत्र येतील, तेव्हा आपण त्या कळपातून शांतपणे बाजूला होऊया. आठवणी कोरलेली थडगी मनात असणारी माणसं आपण होऊया. स्मरणशक्ती शाबूत असलेली आणि एके दिवशी त्या आठवणी पुढच्या पिढीकडे सुपूर्त करणारी माणसं आपण होऊया. धन्यवाद.

अनुवाद : ओंकार गोवर्धन

संदर्भ :

१.यान लियांके : हे चिनी लेखक आहेत. आजपर्यंत त्यांचे अनेक कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. The years, Months, Days; The Explosion chronicles, Lenin’s Kisses  ही त्यापैकी काही पुस्तकं. त्यांना फ्रान्स काफ्का पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. तसंच चीनमधल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या ते Hong Kong University of Science and Technology मध्ये चिनी संस्कृतीचे अध्यापक आणि अध्यासनाचे प्रमुख आहेत. प्रस्तुत भाषण हे त्यांनी २१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या पदवीधर विद्यार्थ्यांना दिलेलं  E- Lecture आहे.

२: फांग फांग ( Fang Fang) : ही एक चिनी लेखिका. कोरोनाच्या उद्रेकावेळी ही वुहानमध्ये होती. आपल्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि नोंदींवर आधारित Wuhan Diaries नावाचं पुस्तक तिनं लिहिलं. वुहानचं तिनं केलेलं चित्रण हे चीनी सरकारनं सांगितलेल्या चित्रापेक्षा वेगळं आहे. तिच्या या चित्रणावरून अनेक राष्ट्रवादी जहाल लोकांनी तिची नालस्ती केलेली आहे.

मूळ लेख ‘आपले वाङमय वृत्त’च्या जूनच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

COMMENTS