नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवत असताना केंद्रीय आरोग्य खात्याने देशातील १३० जिल्हे रेड झोन, २८४ जिल्हे ऑरेंज झोन व ३१९ जिल्हे ग्री
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवत असताना केंद्रीय आरोग्य खात्याने देशातील १३० जिल्हे रेड झोन, २८४ जिल्हे ऑरेंज झोन व ३१९ जिल्हे ग्रीन झोन म्हणून शुक्रवारी घोषित केले.
हे झोन कोविड-१९ संसर्गाचे रुग्ण, लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधितांची वाढलेली संख्या, कोरोना चाचण्यांची क्षमता व एकूण देखरेख यंत्रणा यावरून पाडण्यात आले आहेत.
रेड झोनमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळुरु, अहमदाबाद अशी महानगरे आहेत.
रेड झोनमध्ये दिल्लीतील ११ जिल्हे असून महाराष्ट्राचे १४ जिल्हे, गुजरातचे ९ जिल्हे, म. प्रदेशचे ९, राजस्थानचे ८, उ. प्रदेशचे १९, तामिळनाडूचे १२, तेलंगणचे ६, आंध्रचे ५, प. बंगालचे १० जिल्हे आहेत.
महाराष्ट्रात १६ जिल्हे ऑरेंज व ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये सामील आहेत.
गोवा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, मिझोराम ही राज्ये पूर्णपणे ग्रीन झोनमध्ये आहेत.
लॉकडाऊन १८ मे पर्यंत
लॉकडाऊनची मर्यादा १८ मे पर्यंत राहील असे सरकारने स्पष्ट केले आहे.
देशातील कोरोना संसर्गाची एकूण परिस्थिती पाहता, उपाययोजनांचे स्वरुप, आरोग्य व्यवस्था पाहून लॉकडाऊन वाढवल्याचे गृहखात्याने सांगितले.
या वाढलेल्या लॉकडाऊनमध्ये पूर्ण देशातील हवाई सेवा, रेल्वे, मेट्रो, रस्ते यावर वाहतूक बंद राहील. सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, हॉटेल, मॉल, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम बंद राहतील. रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत नागरिकांच्या सर्व हालचालींवर बंदी असून या काळात १४४ कलम पुकारण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारनी द्यावेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
६५ वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षाखालील मुलांनी जरूरी असेल तर घराबाहेर पडावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
अडकलेल्यांसाठी रेल्वेसेवा देण्यास सरकारची मंजुरी
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, भाविक, पर्यटकांसाठी रेल्वे सेवा वापरण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. या संदर्भात रेल्वे बोर्ड व राज्यांकडून व्यवस्था केली जाणार आहे. नोडल अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत विशेष रेल्वे सेवा सुरू करता येईल, असे केंद्र सरकारने सांगितले. रेल्वे सेवा देताना प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
विशेष ट्रेन धावली
तेलंगणमधील लिंगमपल्ली येथे फसलेल्या १२०० प्रवाशांना घेऊन एक विशेष ट्रेन शुक्रवारी झारखंडमधील हटियाकडे धावली. या ट्रेनमध्ये २४ डबे होते व ती शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी हटियाकडे रवाना झाली. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात ७४ आसने असतात पण शारीरिक विलगीकरणामुळे प्रत्येक डब्यात ५४ प्रवासी बसले होते.
मूळ बातमी
COMMENTS