वाढत्या कर्करोगाचे कारण काय?

वाढत्या कर्करोगाचे कारण काय?

आपण – एक प्रजाती (species) म्हणून – दीर्घायुष्याची किंमत चुकवत आहोत.

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबाची मुंबईत राहण्याची सोय
भारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक
कर्कविज्ञानाची सखोल गोष्ट

माझ्या मामांनी मला विचारले, “आजकाल आपल्या आजूबाजूच्या अनेकांना कर्करोग का होतो आहे? त्याच्यावर काही हमखास उपाय शोधून काढण्याच्या जवळपास तरी तुम्ही पोचला आहात का?” मला उत्तर देण्याची संधीदेखील न देता माझ्या मामांनी त्यांचा अंदाज सांगून टाकला. ते म्हणाले, “मला वाटते हे सगळे प्रदूषणामुळे आणि पिझ्झा, बर्गर अशा पाश्चात्य अन्नपदार्थांमुळे घडते आहे.”

मी त्यांना दोष देऊ इच्छित नाही. त्यांची बहीण म्हणजेच माझ्या आईने नुकतीच केमोथेरपीची शेवटची फेरी पूर्ण केली होती आणि त्यामुळेच ते मला हे सगळे प्रश्न विचारत होते.

भारतात लहानाचे मोठे झालो असल्याने आपल्याला मलेरिया आणि डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांबाबत शिकवले गेले आहे आणि हृदयविकाराबाबत सगळ्यांनाच माहिती असते. काहीजणांच्या बाबतीत कर्करोग झाल्याचे लवकर समजत नाही एवढेच आपल्याला कळत असते.

१९९०च्या सुरुवातीस आपल्याकडे काळजी करावी असे आणखी मोठे विषय होते. पोलिओसारखे संसर्गजन्य रोग हे मृत्यूचे प्रमुख कारण होते. भारतातील सार्वजनिक आरोग्यविषयक धोरण त्यानुसार योग्य त्या गोष्टींवर भर देत होते. मला आठवते, अधूनमधून एखाद्या नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाल्याचे कानावर पडायचे. गेल्या दशकात मात्र कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मग गेल्यावर्षी एकेदिवशी मला हादरवून टाकणारी बातमी समजली. माझ्या आईला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता.

मी जेव्हा आईला भेटायला गेलो तेव्हा मित्र आणि कुटुंबियांनी सुद्धा माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असल्याने अमेरिकेतही प्रत्येकाच्या जवळचा कुणीतरी कर्करोगाशी झुंजतो आहे याची जाणीव मला होती.

भारतात कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण आधीपेक्षा वाढले आहे?  का निदान करण्यासाठीची आधुनिक आणि परवडण्याजोगी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हे घडते आहे?

आपण भारतासारख्या विकसनशील देशातील कर्करोगाचे प्रमाण आणि अमेरिकेसारख्या उच्च-उत्पन्न देशातील प्रमाणाची तुलना करणे उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये संशोधकांनी असा अंदाज व्यक्त केला होती की अमेरिकेतील तीन पैकी एका व्यक्तीला कर्करोगाचे निदान होईल. भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. १.२ अब्ज लोकसंख्येत केवळ दहा लाख कर्करुग्ण आढळतात.

मात्र, १९९० आणि २०१६ या कालावधीतील दोन्ही देशातील आकडेवारीवर नजर टाकली तर मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्याधींच्या यादीमध्ये, भारतात कर्करोगाने तीन पायऱ्या वरच्या दिशेने कूच केले आहे. अमेरिकेत या यादीत बदल झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात भारतात कर्करुग्णाची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे.

निओप्लाझम कर्करोगासाठी म्हटले आहे. सौजन्य: इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रायसेस अँड इव्हॅल्युएशन(आयएचएमई), सीएटल; युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, २०१७. http://vizhub.healthdata.org/gbd-compare येथे उपलब्ध.

अर्थात हे काही पूर्ण चित्र नाही. कर्करोगाचे वाढते रुग्ण आणि मृत्यू यामागे माझे मामा सांगतात त्याप्रमाणे, पाश्चिमात्य खाद्यपदार्थांचे सेवन हे काही प्रमुख कारण नाही. लाल मांसाच्या सेवनापेक्षाही धूम्रपानामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. आयुर्मान आणि कर्करोगाला रोखणे यातील परस्परसंबंध आपण समजावून घेण्याची गरज आहे. मूलतः कर्करोग म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत आपल्याला मिळालेल्या गुणसूत्रांची जीवनशैलीमुळे होणारी हानी! जगताना आपल्या शरीरातील अवयवांमधील पेशी आणि पेशींनी बनलेला भाग सतत नव्याने तयार होत असतो. पेशींचे विभाजन होते आणि पुन्हा तशीच गुणसूत्रे असलेल्या पेशी तयार होत असल्याने हे शक्य होते. प्रत्येक वेळी पेशीचे विभाजन होते आणि तंतोतंत तशीच गुणसूत्रे असलेली पेशी तयार होते. त्यातून एकसारख्या गुणसूत्रांची रचना होत राहते. एका कुठल्यातरी टप्प्यावर त्यामध्ये चुकीची गुणसूत्रे घुसू शकतात. कायमस्वरुपी झालेल्या या बदलाला उत्परिवर्तन (mutation) असे म्हटले जाते.

अनेकदा हे उत्परिवर्तन कुठलीही हानी पोचवणारे नसते आणि त्यावर शरीरातील अनेक जैविक यंत्रणांद्वारे नियंत्रण ठेवले जाते. काही वेळा मात्र पेशींच्या विभाजनावर नियंत्रण रहात नाही आणि या पेशी मरत नाहीत. या पेशी कर्करोगाच्या पेशी ठरतात. कर्करोगाच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीचा आपल्या अवयवांना धोका निर्माण होतो. आपल्या अवयवांसाठी आवश्यक असलेले घटक या पेशी वापरू लागतात. त्यामुळे अवयवांच्या सुरळीत चालणाऱ्या कामात व्यत्यय येऊ लागतो. कर्करोगाच्या स्वार्थी पेशी अन्य जीवांवर मात करून जिवंत राहतात हा त्यातला सर्वात दुर्दैवी भाग आहे.

सजीव जितका अधिक जगतो तितकी त्याच्या काही गुणसूत्रांमध्ये कर्करोगाला पूरक उत्परिवर्तन होण्याचीशक्यता अधिक असते. माणसाच्या शरीरात एकूण सुमारे ३७ खर्व (ट्रिलियन) पेशी असतात. त्यामुळे वाढत्या वयानुसार कर्करोगाची शक्यता वाढणे अपेक्षितच आहे. ही काही मूलगामी किंवा नवीन कल्पना नाही. आपल्याला १९५० पासून याची माहिती आहे. भारतात त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

१९९० ते २०१६ या कालावधीत भारतीयांच्या आयुर्मानात आश्चर्यकारक वाढ झाली. ही वाढ पन्नासच्या दशकानंतर आणि सत्तरच्या मध्यापर्यंतही होतच होती. त्याची प्रमुख कारणे म्हणजे संसर्गजन्य रोगांमध्ये झालेली घट, नवजात बालकाची काळजी घेण्यासंदर्भातील अधिक चांगल्या उपाययोजना, चांगले आरोग्य आणि सांडपाण्याची विल्हेवाट, पोलिओविरोधी लसीकरणाप्रमाणे लसीकरणाच्या अनेक यशस्वी मोहिमा! सरासरी आयुर्मानात वाढ झाल्याने विकसित देशांमध्ये कर्करुग्णांची वाढलेली संख्या दिसू लागली आहे. थोडक्यात सांगायचे तर आपण – एक प्रजाती म्हणून –दीर्घायुष्याची किंमत चुकवत आहोत.

1990 ते 2016 या काळात भारतातील सरासरी आयुर्मान. Credit: IHME

1 990-2016 मध्ये भारतातील संक्रमण आणि नवजात रोगांवरील मृत्यूची टक्केवारी. क्रेडिटः HIME

त्यामुळे कर्करोगावरील संशोधन आणि उपचारासाठी जो पर्य़ंत भारत गुंतवणुकीला सुरवात करत नाही तो पर्यंत पुढील दशकात कर्करुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसतच राहणार. कर्करोगाचे निदान आणि उपचारात आणखी विकास होईपर्यंत हे असेच घडत राहणार.

भविष्यात आपण यासाठी मोठी गुंतवणूक (शब्दशः आणि आकड्यांच्या भाषेतही) केली नाही तर कर्करोगाचा आलेख वाढतच राहील. पाश्चिमात्य देशांमध्ये कर्करोगाचा आलेख वाढत जाणे आता थांबले आहे आणि कर्करोगातून मुक्त होऊन जगणाऱ्यांचे प्रमाण गेल्या २५ वर्षात २० टक्क्यांवर पोचले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कर्करोगाचे निदान आणि उपचाराच्या क्षेत्रात झालेल्या प्रमुख सुधारणा.

भारताने पुढाकार घेऊन कर्करोगाच्या उपचार पद्धतींवर गुंतवणूक केली, (जसे सध्या चीन करत आहे) एचपीव्हीसारख्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवला (ज्यात आपण खेदकारकरित्या मागे आहोत) आणि कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी गुंतवणूक केली तर येत्या दशकात आपण अनेक जीव वाचवू शकतो. त्याबरोबरच भारत कोट्यावधी करदात्यांचे पैसे या मार्गाने वाचवू शकतो, कारण कर्करोगाचे उपचार दिवसेंदिवस महागडे होत चालले आहेत.

माझ्या आईला गर्भाशयाचा पहिल्या टप्प्यावरील कर्करोग झाला होता – हा दुर्मिळ परंतु उपचार होऊ शकेल असा होता. कारण त्याचे लवकर निदान झाले होते. शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर आता वर्ष झाले; ती कर्करोग मुक्त जीवन जगते आहे. आम्हाला खासगी रुग्णालय, चांगले उपचार परवडणारे होते. भारतातील अनेकांना ते परडवत नाहीत. मला अशी आशा आहे की भारतातील आरोग्य आणि कल्याण मंत्रालय, आपले शास्त्रज्ञ पुढच्या काही वर्षातील कर्करोगाशी वाढत्या घटनांशी लढा देण्यास सज्ज असतील. त्यासाठी आत्ता कृती करण्याची गरज आहे.

श्री कृष्ण हे अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील शस्त्रक्रिया केंद्रात संशोधक म्हणून काम करतात. ट्विटरवर @tellkrishया नावाने त्यांचे अकाऊंट आहे. त्यांनी मांडलेले विचार त्यांचे स्वतःचे आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ किंवा अमेरिका सरकारशी ते मिळतेजुळते असतीलच असे नाही.

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1