फटाक्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील १०५ गावातील ग्रामस्थांनी फटाके विरहित दीपावली साजरी करण्याचा निर्णय घेतला असून तो स्तुत्य आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी देशातील जवळपास सर्वच राज्यांनी फटाके विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. पण यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर संपत असताना नागरिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. निर्बंध मुक्तीमुळे यंदा सरकारने फटाके विक्रीवर बंधन घातले नसल्याने यंदाच्या दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आवाजाचा दणदणाट ऐकावयास मिळण्याची शक्यता आहे.
प्रदूषणकारी आणि मोठ्या आवाजाच्या फटक्यावर बंदी असून हरित फटाक्यांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन करण्यात आले असले तरी त्याला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता कमी आहे. नवी दिल्लीमध्ये यंदाही फटाके विक्री आणि ते वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर फटाक्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील १०५ गावातील ग्रामस्थांनी फटाके विरहित दीपावली साजरी करण्याचा निर्णय घेतला असून तो स्तुत्य आहे.
राज्य सरकारने यंदा मागील वर्षी प्रमाणे फटाके विक्रीवर थेट बंदी घातली नसली तरी प्रमाणित आणि हरित फटाके यांचीच विक्री करावी असा नियम घालून देण्यात आला आहे. पण असे असले तरी अनेक ग्राहकांना अद्यापही हे हरित फटाके कोणते यांचीच माहिती नाही. परिणामी कोणतेही फटाके विकत घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. विक्रेतेही हरित फटाके विकण्याबद्दल फारसे आशावादी दिसत नसल्याने त्यांच्याकडूनही ग्राहकाना हरित फटाके आणि त्या बद्दल माहिती देण्यात येत नाही. यंदा फटाक्यांच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फटाक्यांच्या उत्पादन किंमतीत झालेली वाढ आणि मर्यादित पुरवठा यामुळे या किंमती वाढल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट दाट असतानाही फटाक्यांच्या खरेदीमध्ये कोणतीही घट दिसून आली नव्हती. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच बाजारातील सर्व फटाके संपले होते. या वर्षीही फटाक्यांमुळे चांगली कमाई होईल, असा विश्वास विक्रेत्यांना आहे. सुमारे १०० ते १५० कोटी रुपये फटाक्यांच्या विक्रीतून मिळतील, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी फटाक्यांच्या किंमतीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, फटाक्यांच्या उत्पादन किंमतीत झालेली वाढ आणि मर्यादीत उपलब्धतेमुळे फटाक्यांची किंमत ५ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे चेन्नई फायरवर्क्स डिलर वेलफेअर असोसिएशनचे प्रेसिडेंट टीएस काझा मोहिदीन यांचे म्हणणे आहे.
देशभरातील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. विशेषतः उत्तरेकडील राज्यात हिवाळ्यात जमिनीच्या मशागतीसाठी शेतात अनेक पिके जाळली जातात. त्यामुळे होणाऱ्या धुराचा परिणाम दिल्ली, हरियाणा या राज्यांना बसतो. त्यातच दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः श्वसन यंत्रणेवर याचा थेट परिणाम होतो.
सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला असताना जर दिवाळीत फटाक्यांच्या वापरामुळे त्यातून निघालेला धूर हा कोरोनाची साथ पसरवण्यास कारक ठरेल, असे राष्ट्रीय हरित लवाद समितीने म्हटले आहे. दीपावली काळात भारतात किती फटाके फोडले जातात आणि त्यामधून होणारे वायू प्रदूषण याबाबत एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार या काळात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे हवेत सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साइड आणि मोनो ऑक्साइड आणि काही घातक पदार्थ हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदू यावर जादा होतो. विशेषतः लहान मुले तसेच आजारी व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती या मुळे बाधित होतात. फटाक्यांमध्ये असणारे अनेक लहान शिशाचे तुकडे हे थेट परिणाम करतात. सध्याच्या कोरोना काळात हे प्रदूषण अजिबात परवडणारे नाही. आधीच काही मायक्रो मिलिमीटर तुकड्यांमध्ये हवेतील खालच्या थरात हा विषाणू पसरत असल्याने धोका कायम आहे. फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषण स्तर आणखी खालावून कोरोना उसळी मारण्याची शक्यता एम्समधील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच यंदा पुन्हा दिल्ली परिसरात फटाके विक्री वर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. दीपावलीमध्ये फटाके विक्रीमधून किमान ४ ते ५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. यावर अनेक कुटुंबे आपली रोजी रोटी कमावत असल्याचे फटाका विक्री संघटनेचे म्हणणे आहे.
तामिळनाडू येथील शिवकाशी हे फटाका निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. येथून संपूर्ण देशात फटाके विक्रीसाठी पाठवले जातात. काही हजार कोटी रुपयांची उलाढाल दीपावली काळात येथून होते. राज्यातील अनेक घाऊक फटाका विक्री करणाऱ्या लोकांनी येथून आधीच फटाके विक्रीस आणले आहेत आणि ते किरकोळ व्यापार्यांनी खरेदी केले आहेत. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आणि त्यातच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषण हे कोरोना विषाणूला फायदेशीर ठरण्याची भीती या सावटात यंदाची दीपावली दणदणाटी आवाजात होणार? हरित फटाके खरंच लोक स्वीकारणार का? की स्वयंस्फूर्तीने कोल्हापूरमधील गावांचा आदर्श घेऊन यंदा कोणीही फटाकेच फोडणार नाही? याचे उत्तर कोणाकडे नाही.
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.
COMMENTS