२९ जानेवारी २०१९ रोजी, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, नाटककार, कलावंत, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांनी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दडपशाही विरोधात मुंबईमध्ये एकत्र येऊन, ‘आम्ही घाबरत नाही’ याची ठाम प्रचिती दिली. महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरलेल्या या कार्यक्रमाच्या विचारमंचावर, ‘तुम्ही लिहित रहा, आम्ही निर्भयपणे अपलोड करू’, असे सांगत ‘द वायर मराठी’चे प्रकाशन झाले.
मुंबई: ‘आम्ही सत्तेच्या दहशतीला घाबरत नाही; तुमच्या दडपशाहीविरूद्ध गप्प बसणार नाही; स्वतंत्र असण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.’, असा इशारा देत, साहित्यिक, कलावंत, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत, ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नारा बुलंद केला. २९ जानेवारीला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या जन्मदिनी दादरच्या शिवाजी मंदिरात गर्दीने खचाखच भरलेल्या या उस्फुर्त आणि अभूतपूर्व कार्यक्रमात ‘द वायर मराठी’ सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आले.
नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावून नंतर, राजकीय दबावापोटी त्यांचे निमंत्रण परत घेऊन केलेल्या अवमानाची परतफेड या कार्यक्रमात करण्यात आली. नयनतारा यांचा महाराष्ट्रात अपमान झाल्याची सल महाराष्ट्रातल्या अनेक जागृत कलाकार, साहित्यिकांच्या मनात होती. त्याचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही दबले जाणार नाही, असा सत्ताधाऱ्यांना संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नयनतारा यांच्यासह, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, बंडखोर सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रेष्ठ गायक टी. एम. कृष्णा, ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे, लेखक-प्रकाशक रामदास भटकळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाटककार शफाअत खान, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, कवी गणेश विसपुते, ‘द वायर‘ चे संस्थापक-संपादक सिद्धार्थ वरदराजन, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अभिनेते विजय केंकरे, नाटककार जयंत पवार, अतुल पेठे, सुनील शानबाग, लेखक प्रवीण बांदेकर, प्रज्ञा पवार, मुकुंद टांकसाळे, संदेश भंडारे, येशू पाटील, पत्रकार सचिन परब, समीना दलवाई यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
नेहमीच्या ठराविक साच्याप्रमाणे या कार्यक्रमाला अध्यक्ष वा स्वागताध्यक्ष नव्हते. स्वागत, भेटी आणि सत्कार नव्हते, तर शब्द, विचार आणि सादरीकरणाची अभिव्यक्ती होती. या कार्यक्रमामुळे व्यासपीठाचे रुपांतर, विचारमंचामध्ये झाले होते.
सुरुवातीला गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांची, ‘चित्तो जेथा भयशून्यो… उच्छो जेथा शिर…’ ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकारा करणारी बंगाली कविता श्रोत्यांच्या कानी पडू लागली आणि अंधारातून रंगमंचावर ठेवलेल्या मोकळ्या खुर्चीवर प्रकाशझोत स्थिर झाला. रंगमंच हळूहळू प्रकाशमान होत मागे पडद्यावर लाल मानवी चेहरा, एक बाजूचा डोळा आणि दुसऱ्या बाजूचे ओठ झाकलेला आणि बाजूला “चला, एकत्र येऊ या’, असे रंगवलेला फलक दिसू लागला आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोकळ्या खुर्चीच्या रूपकातून नयनतारा यांना डावलले गेल्याची सल प्रकर्षाने जाणवून दिली गेली.
दक्षिणेतले बंडखोर गायक टी.एम. कृष्णा रंगमंचावर आले ते टागोर यांची कविता इंग्लिशमध्ये सादर करीत! दोन महिन्यांपूर्वी एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने हिंदुत्ववाद्यांच्या भीतीने दिल्लीतला त्यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला होता. प्रस्थापित सत्तेच्या विरोधात आवाज उठवतात, म्हणून सत्तासमर्थक देशभक्तांनी आयोजकांना धमक्या दिल्या होत्या आणि आयोजकांनी माघार घेऊन कार्यक्रम रद्द केला होता. कृष्णांच्या हजेरीमुळे त्या घटनेविरुद्धचा निषेधही या कार्यक्रमात ठळकपणे नोंदवला गेला.
कृष्णा यांनी बसवण्णा, तामिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांची ‘मदुरो बागान’ ही कविता आणि शेवटी सुब्रमण्यम भारती यांची अभिव्यक्तीचा उद्घोष करणारी रचना गायली.
भारलेल्या वातावरणात नयनतारा सहगल रंगमंचावर आल्या. “९३ वर्षांच्या सहगल, दुर्धर आजार असूनही, हजार मैल पार करून एकटीनेच कुणाचाही आधार न घेता इथे आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला नवी आशा मिळाली आहे.” या शब्दात डॉ. गणेश देवी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांना “जय महाराष्ट्र” म्हणत अभिवादन करून सहगल बाईंनी महाराष्ट्राचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “माझे न झालेले भाषण, महाराष्ट्रात, भारतात, भारताबाहेरही पोहोचले. हे असे कुठेच घडले नव्हते. बहोत बहोत शुक्रिया.” स्वातंत्र्याचा अर्थ सांगत, खंत व्यक्त करीत मुंबईत असणाऱ्या सिनेसृष्टीला, सत्ताधाऱ्यांना शरण गेलेल्या बॉलीवूड नायक-नायिकांना त्यांनी सवाल केला. त्या म्हणाल्या. “डेहराडूनमध्ये बसून, मी नसिरुद्दीन शहा, यांचा दुःखी स्वर ऐकला. पण इथे राहणाऱ्या अनेक मोठ्या तारे-तारकांना त्यांचा आवाज ऐकू गेला नाही का?”
श्रोत्यांचे अभिवादन स्वीकारत त्यांनी निरोप घेतला आणि प्रेक्षकांमध्ये व्हीलचेअरवर बसलेले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जाऊन भेटल्या.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे प्रकृती अस्वास्थामुळे व्हिलचेअरमध्ये बसूनच विचारमंचावर आल्या. त्यांना अमोल पालेकर व्यासपीठावर घेऊन आले. त्या म्हणाल्या, “ही नयनतारांप्रती महाराष्ट्राच्या वतीने केली गेलेली क्षमायाचना आहे.” (पुष्पा भावे यांनी यावेळी केलेले भाषण ‘द वायर मराठी’वर उपलब्ध आहे.pl give the link here.) पालेकर यांनी यावेळी एक महत्त्वाचा खुलासा केला. “आम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना आमंत्रण दिले होते. पण कार्यबाहुल्यामुळे जमत नसल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे यवतमाळमध्ये जुळून न आलेला योग इथेही साधता आला नाही.”
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते ज्येष्ठ नाट्यलेखक, कथाकार समीक्षक जयंत पवार व्यासपीठावर आले. त्यांचे लिखित भाषण (द वायर मराठीवर हे भाषण उपलब्ध आहे. नाटककार अतुल पेठे यांनी ते वाचून दाखवले. त्यांनी आमंत्रणवापसीला कारण ठरलेल्या उन्मादी शक्तींविरोधात सहेतूक निष्क्रिय राहिलेल्या, डॉ. आनंद तेलतुंबडेंसारख्या बुद्धिवादी लेखकावर शहरी नक्षल असा शिक्का मारणाऱ्या, आणि लेखक-कलावंतांवर पोलीस संरक्षणात राहण्याची वेळ आणणाऱ्या राज्य सरकारचा तीव्र आणि स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला.
या समेवर पोहोचलेल्या वातावरणात ‘द वायर’ चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी ‘द वायर मराठी’, या वेबपोर्टलची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. वरदराजन म्हणाले, “सत्तेवर कोणीही असो, पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत.” ठिकठीकाणी पत्रकारांना अटक झाल्याचा उल्लेख करून, ते म्हणाले, “प्रस्थापित सत्तेला प्रश्न विचारणा-यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणणाऱ्या ‘द वायर’च्या सत्तासमर्थक व्यावसायिकांनी आजवर ११ हजार ४६० कोटींचे बदनामीचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत.”
अनेक वर्षांची ‘द वायर’ मराठीमध्ये आणण्याची मागणी होती, ती पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘द वायर मराठी’च्या टीमने व्यासपीठावर ‘द वायर मराठी’चे डिजिटल प्रकाशन केले. ‘तुम्ही निर्भयपणे लिहा, आम्ही निर्भयपणे अपलोड करू’, असे टीमच्या वतीने यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
अखेरच्या सत्रामध्ये लेखिका -प्राध्यापिका समीना दलवाई, पोलीस संरक्षणात वावरणारे कोकणवासी लेखक प्रवीण दशरथ बांदेकर, कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार, दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर, गायक-संगीतकार टी.एम. कृष्णा विचारमंचावर चर्चेसाठी आले. त्यांच्याशी संगीत-नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त नाट्यलेखक सुनील शानभाग आणि पत्रकार अलका धुपकर यांनी संवाद साधला.
बांदेकरांना प्रश्न विचारला गेला, “तुम्हाला पोलीस संरक्षणात का वावरावे लागते आहे?” बांदेकर म्हणाले, “मला ठाऊक नाही. एक दिवस पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी फोन करून तुमच्या जीवाला धोका आहे, असे सांगत पोलीस संरक्षण घ्या, असे सांगितले.” यावेळी बांदेकर यांच्यामागे साध्या वेशातील पोलीस उभा होता. सरकारची बुद्धिवाद्यांवर पाळत ठेवण्याची नवी पद्धत अधोरेखित झाली.
कलावंतांच्या अभिव्यक्तीचा मुद्दा मांडताना, पालेकरांनी प्री-सेन्सॉरशीपविरोधातल्या त्यांच्या न्यायालयीन लढ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “हिंसक, प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांकडून भाषणाचे स्क्रिप्ट तुम्ही आधीच मागता का, टीव्हीवर चर्चेच्या नावाखाली शाब्दिक हिंसाचार घडवून आणणाऱ्या अर्णब गोस्वामी सारख्या लोकांकडून तुम्ही कार्यक्रमाच्याआधी संहिता मागवता का? या विरोधात प्रेक्षक का पुढे येत नाहीत? अभिव्यक्तीची ही लढाई एकट्या दुकट्या कलाकाराची का राहते, ती अवघ्या समाजाची का होत नाही?”
पुरस्कार परत करण्याच्या घटनेनंतर बुद्धिवादी लेखक-कलावंत पुढे आले. त्यांना दक्षिणायन चळवळीने समाजाशी जोडले, आज त्याचा पुढचा टप्पा पार झाला, असे मत प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. समीना दलवाई यांनी मुसलमान अल्पसंख्यकांना येणारे अनुभव मांडले, तर टी.एम. कृष्णा यांनी देशभरातील विविध ठिकाणी चाललेल्या दमनकारी घटनांचा उल्लेख केला. असे कार्यक्रम देशभरात घेतले जावेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
शेवटी विचारमंचावरच्या मान्यवरांसह सभागृहात उपस्थित प्रत्येकाने दमनकारी व्यवस्थेविरोधातल्या एकीचे प्रतीक म्हणून एकमेकांचे हात हातात घेतले आणि स्वतंत्र राहण्यासाठी, आपण एक असल्याचे दाखवून दिले.
संवेदनशील कवी-अभिनेता किशोर कदम यांनी, ‘मैने कहा, आप फॅसिस्ट हो, उसने कहा हम शाकाहारी है’, यांसारख्या अनेक कवींच्या कविता सादर करीत, या कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, दिग्दर्शक अतुल पेठे, नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, नाट्यसंघटक अशोक मुळ्ये यांनी अथक मेहनत घेतली. या कार्यक्रमाची संकल्पना प्रतिथयश वकील आणि पटकथा-संवाद लेखिका संध्या गोखले यांची होती. ‘मुक्त शब्द’चे प्रकाशक येशू पाटील, पत्रकार संध्या नरे पवार, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कदम अशा अनेकजणांनी पडद्यामागे संयोजनाचे मोठे काम केले.
संध्याकाळी साडेसात वाजता सुरु झालेला कार्यक्रम, रात्री पावणे अकरा वाजेपर्यंत सुरु होता. अनेकजण महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून या कार्यक्रमासाठी आवर्जुन आले होते. अनेकजणांनी या कार्यक्रमाचे फेसबुकवरून थेट प्रक्षेपण केल्याने, हा कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक जणांनी त्याचवेळी पाहिला.
COMMENTS