स्वातंत्रपूर्व काळापासून ते अगदी आत्ताच्या काळात, देशभरात आणि परदेशात अनेक महिलांचे पक्षीनिरीक्षण चळवळीत अमूल्य असे योगदान आहे. पक्षीनिरीक्षण, पक्षीअभ्यासात पुरुषांची मक्त्तेदारी असल्याचा भास निर्माण झालेला असला तरी महिला पक्षी अभ्यासकांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही.
अनेक पक्षीमित्रांप्रमाणेच मला शालेय जीवनात निसर्गात रमण्याची गोडी लागली. हळूहळू निसर्गातले पशुपक्षी, विविध रंग, ऋतू आणि बारकावे कळायला लागले. निसर्गाभ्यासापैकी पक्षीनिरीक्षण मात्र खूपच जास्त भावले आणि छंद म्हणून सुरु झालेला हा प्रवास अजूनही सुरूच आहे. या प्रवासाच्या अगदी सुरुवातीपासूनच एक प्रश्न नेहमी पडायचा की सगळ्या पक्षी निरीक्षकांना ‘पक्षीमित्र’ असं का म्हणायचं? ‘पक्षीमैत्रिणी’ असं कधीच का कोणी म्हणत नाही? कदाचित ‘पक्षीमित्र’ हा gender neutral शब्द असावा असं मानून याकडे फारसं लक्ष दिलं नाही. सुरुवातीला पक्ष्यांची पुस्तक वाचताना जास्त पुरुष पक्षी अभ्यासकांची किंबहुना त्यांचेच योगदान असलेली माहिती उपलब्ध झाली होती. जसजसा पक्ष्यांच्या अभ्यासाचा आवाका वाढत गेला तसं वाचनही बरंच झालं. आणि यातूनच असंख्य पक्षीमैत्रिणींची ओळख होऊ लागली. स्वातंत्रपूर्व काळापासून ते अगदी आत्ताच्या काळात, देशभरातील आणि परदेशातील अनेकजणींचे योगदान नव्याने कळू लागले. तेव्हा इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच, इथेही पुरुषांची मक्त्तेदारी असल्याचा भास निर्माण झालेला असला तरी महिला पक्षी अभ्यासकांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही, हे जाणवलं. कधी पुस्तकातून, निबंधांतून तर कधी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि मला भावलेल्या पक्षीमैत्रिणीची ओळख आणि त्यांचे योगदान मांडण्याचा प्रयत्न मी या लेखातून करणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पक्षी मैत्रिणी
साहजिकच स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय महिला इतर आवश्यक गोष्टींसाठी मोठा संघर्ष करीत असल्याने, त्यांचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. परंतु, अनेक परदेशी महिलांनी कलात्मक पद्धतीने पक्षीनिरीक्षणाची सुरुवात केली. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात दोन महिलांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. एलिझाबेथ ग्विलिम यांनी तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये शंभरहून अधिक भारतीय पक्ष्यांची चित्रं जलरंगसंगतीमध्ये काढून ठेवली. त्यांनी बराच काळ चेन्नई येथे पती न्यायाधीश सर हेन्री ग्विलिम यांसोबत व्यतित केला आणि तिथेच त्यांची समाधी (मृत्यू सन १८०७) देखील आहे. त्यांची १२१ जलरंग चित्रं कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठाच्या ब्लॅकर वूड संग्रहालयात पाहायला मिळतात. याच काळात बंगालमध्ये सर न्यायाधीश असणाऱ्या सर एलिजाह इम्पे यांची पत्नी मेरी इम्पे यांना कलेची विशेषतः चित्रकला आणि संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी १७७७ मध्ये छोटेखानी प्राणी संग्रहालय सुरू केले आणि आजूबाजूच्या कलाकारांना आमंत्रित करून वेगेवेगळ्या माध्यमात संग्रहालयातील पशुपक्ष्यांची चित्रण करून घेतली. चित्रकारांनी नवीन प्रयोग करत प्रथमच पारंपरिक मुघल आणि पाश्चिमात्य पद्धतीचा वापर करून चित्रं काढली. चित्रांमध्ये रंगछटांचा आणि सावल्यांचा चपखल वापर ही या कलाकृतींची वैशिष्ट्ये होती. सर्व कलाकारांनी मिळून ३०० रेखाटनं केली. प्राणिसंग्रहालयाबरोबरच इम्पे यांनी पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास आणि सवयी यांच्या सखोल नोंदी करून ठेवल्या. त्यानंतर संशोधकांना फार मोलाच्या ठरल्या. या अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार चित्रांचा उपयोग पक्ष्यांच्या अनेक नवीन प्रजातीचे वर्णन करताना झाला. त्यापैकी एक म्हणजे अतिशय मनमोहक दिसणारा मोनाल फेसन्ट. इम्पे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची पावती म्हणून मोनाल फेसन्टचे शास्त्रीय नाव Lophophorus impejanus असे ठेवण्यात आले.
१८२७ ते १८३८ च्या दरम्यान एलिझाबेथ गॉल्ड यांनी पती जॉन गॉल्ड आणि जॉन अडुबॉन या दोन प्रसिद्ध पक्षी चित्रकारांबरोबर अनेक भारतीय पक्ष्याची चित्रं काढून ठेवली. एलिझाबेथ यांनी जलरंग आणि तैलरंग वापरून हिमालयातील ६०० हून अधिक पक्ष्यांचे शिळाछाप तयार केले. हा आत्तापर्यंतचे सर्वात मोठा पक्षीचित्र संग्रह होय. त्याकाळात कॅमेरा वापर फार प्रचलित नव्हता, त्यामुळे चित्रात पक्ष्यांमधले बारकावे टिपणे हे सर्वात कठीण काम होते आणि म्हणूनच या पक्षीमैत्रिणीचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. १८५५च्या दरम्यान मार्गारेट बशबी लासिलिस यांनी तामिळनाडू येथील उटीजवळील कोटगिरी येथे अनेक पश्चिम घाटातील पक्ष्यांची चित्रं आणि नोंदी करून ठेवल्या. मार्गारेट याना लहानपणापासूनच पक्षीनिरीक्षण आणि चित्रकलेची आवड होती. पुढे कॉफीचे मळे सांभाळत त्यांनी पक्षी अभ्यासात अमूल्य योगदान दिले. त्यांची चित्र आणि नोंदी या लंडन मधील Natural History Museum मध्ये जतन करण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळातील पक्षीमैत्रिणी
भारतातील विविध प्रांतातून महिलांनी पक्षी चळवळीला बळकटी देण्याचे काम केले. याची सुरुवात १९७०च्या आसपास सुरू झाल्याचे आढळून येते. जमाल अरा यांनी बिहारमध्ये असताना ‘Watching Birds’ हे सचित्र पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामुळे अनेक लोकांना पक्षीनिरीक्षणाची गोडी निर्माण झाली. पुस्तकाची प्रसिद्ध इतकी वाढली की पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले गेले. दिल्लीच्या रहिवासी असणाऱ्या उषा गांगुली यांचे उल्लेखनीय काम सगळ्यांनाच ठाऊक आहे. उषा गांगुली यांनी A Guide to the Birds of the Delhi Area हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक अनेक नवीन पक्षीमित्रांसाठी आजही मार्गदर्शक ठरते आहे. उषा गांगुली यांनी संकलित केलेल्या माहितीचा उपयोग करून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील पक्ष्यांची यादी तयार करण्यात आली आहे. डॉ. प्रिया दाविदार या १९७०च्या दशकात अगदी मोजक्या लोकांपैकी वन्यजीव संशोधक होत्या. प्रिया यांनी इकॉलॉजी विषयात पुदुचेरी, नंतर मुंबई आणि पुढे हार्वर्ड विद्यापीठातून संशोधन आणि शिक्षण पूर्ण केले. परागीकरणामध्ये पक्षी कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असा त्यांचा संशोधनाचा विषय नाविन्यपूर्ण होता. दक्षिण भारतातील जंगलांमधील पक्षी वैविध्य आणि परिसंस्थेतील त्यांचे महत्त्व अभ्यासण्याचा पायंडा त्यांनी पडला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
आपल्या पक्षीमैत्रिणींच्या यादीत कॅरल इन्स्कीप यांचा उल्लेख नाही झाला तर नवलंच! ‘बर्डस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट’ हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे पुस्तक लिहिण्यात कॅरल इन्स्कीप यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ भारतच नव्हे तर आपल्या शेजारील नेपाळ आणि भूतान या देशातील पक्ष्यांची माहितीही या पुस्तकात मिळते. या पुस्तकाच्या आधारे अनेक प्रादेशिक पुस्तकं देखील कॅरल यांनी संपादित केली आहेत. प्रत्येक पक्षी प्रेमीच्या संग्रही असावे असे हे पुस्तक प्रत्येक प्रजातीच्या विस्तार नकाशासह माहीत देते. माझ्या स्वतःच्या पक्षी अभ्यासाच्या प्रवासात या पुस्तकाचे स्थान अढळ आहे, हे नक्की. असेच एक अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणजे पामेला रसमुसेन यांचे ‘Birds of South Asia: The Ripley Guide’. या पुस्तकाचे दोन खंड असून पक्ष्याच्या सवयी, अधिवास आणि त्यांचा आढळ याची अत्यंत सुरेख माहिती यामध्ये वाचायला मिळते. मूळच्या अमेरिकन असणाऱ्या पामेला यांचे पुस्तकांव्यतिरिक्त अजून एक मोलाचे योगदान आहे आणि ते म्हणजे रानपिंगळ्याचा पुनर्शोध. पामेला यांनी १९९७ मध्ये महाराष्ट्रातील शहादा येथे रानपिंगळ्याची नोंद केली. १८८४ नंतर तब्बल ११३ वर्षांनंतर या पक्ष्याची नोंद केली गेली आणि त्याच्या पुनर्शोधावर शिक्कामोर्तब झाले. या शोधाचा परिणाम म्हणून अनेक पक्षी अभ्यासकांनी केवळ या पक्ष्याचाच नव्हे तर सातपुड्यातील अनेक पक्ष्यांचा अभ्यास करण्यावर भर दिला.
२१ व्या शतकातील पक्षीमैत्रिणी
तसे पहिले तर १९९०च्या दशकापासून महिलांनी वन्यजीव अभ्यासामध्ये आणि संवर्धनामध्ये प्रचंड काम केल्याचे दिसते. पक्षीनिरीक्षण हा केवळ छंद म्हणून नव्हे तर शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकडे महिलांचा कल वाढताना दिसतो. अत्यंत दुर्गम प्रदेशात महिनोन्महिने जंगलात राहून पक्ष्यांचा तपशीलवार अभ्यास करणाऱ्या पक्षीमैत्रिणींची संख्या केवळ वाढतच आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील पक्षीमैत्रिणींबद्दल जाणून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की प्रत्येक पक्षीमैत्रिणीवर स्वतंत्र लेख लिहिता येईल. या लेखामध्ये मात्र आपण काही प्रातिनिधिक योगदानांची माहिती घेऊ. अरुणाचल प्रदेशसारख्या घनदाट जंगलात राहून धनेश पक्ष्यावर अभ्यास करणाऱ्या डॉ. अपराजिता दत्ता यांचे काम थक्क करणारे आहे. धनेश पक्ष्यावर संशोधन करून ते स्थानिक लोकांना समजावून सांगून संवर्धनापर्यंत काम करताना अपराजिता यांनी जवळपास २५ वर्षे सतत मेहनत घेतली आहे. बिबट्यांवरील संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. विद्या आत्रेय यांनी संशोधनाची सुरुवात फळभक्षी पक्ष्यांपासून केली होती. डॉ. दिव्या मुदप्पा यांनी मलबारी धनेशाच्या जीवनचक्राचा अभ्यास करून जंगलं राखण्यात या पक्ष्याचा किती महत्त्वाचा वाटा आहे हे दाखवून दिले आहे. डॉ. गझाला शहाबुद्दीन यांनी हिमालयातील सुतार पक्ष्यांवर अनेक वर्षं अभ्यास केला आहे. केवळ एकाच पक्ष्यावर किंवा पारंपरिक पद्धतीचे संशोधन न करता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यातही पक्षीमैत्रिणी अग्रेसर आहेत. जसे की डॉ. फराह इश्तियाक यांनी पक्ष्यांमध्ये होणाऱ्या हिवतापाचा अभ्यास परदेशात आणि भारतात केला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यातील परस्परसंबंध जाणून घेणे शक्य झाले आहे. डॉ. प्राची मेहता यांचे निशाचर असणाऱ्या घुबडांवरील अभ्यास महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. चंबळच्या खोऱ्यात राहून परवीन शेख इंडियन स्कीमर पक्ष्यांचा प्रवास जाणून घेत आहेत. शहरांमध्ये सहजपणे आढळणाऱ्या परिया घारींचे विश्व उलगडण्यामध्ये उर्वी गुप्ता यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. नाशिकमधील प्रतीक्षा कोठुळे गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. डॉ. अक्षया माने यांनी अंदमान निकोबार द्वीपसमूहातील बेटावर राहून पाकोळ्यांचा अभ्यास केला आहे.
फक्त संशोधनाचाच नाही तर पक्षीमैत्रिणी निरनिराळ्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवतात. आसाममधील पूर्णिमा देवी बर्मन या लोकसहभागातून Greater Adjutants चे संवर्धन करीत आहेत. तर ताडोबातील पक्षीमैत्रिणी पर्यटकांना विविध पक्षी दाखवण्यामध्ये तरबेज आहेत. बानो हारालू या अमूर ससाण्याच्या संवर्धन योजनांचा नागालँडमधील स्थानिक लोकजीवनावर होणार परिणाम समजून घेत आहेत. गरिमा भाटिया या पक्षी निरीक्षणाचा आनंद लहान मुलांपर्यंत प्रभावीपणे कसा पोचवता येईल याचे विविध पर्याय पडताळून बघत आहेत तर सांगलीतील सुनीता शिनगारे पक्ष्यांसाठी खूप तयार करण्यात आणि जखमी पक्ष्यांची सुश्रुषा करण्यात व्यस्त आहेत. पेशाने पशुवैद्य असणाऱ्या डॉ. उष्मा पटेल यांनी जखमी घारीला कृत्रिम पाय बसवून संवर्धनात यशाची नवीन व्याख्या तयार केली आहे. वेंगुर्ल्यातील स्वामिनी गटाच्या कोळी महिलांनी मिळून कांदळ वनातील पक्षीनिरीक्षणाचा आनंद वाटण्यात तर अभिषेका कृष्णगोपाल आणि संगीता कडूर यांसारखे कलाकार चित्रांच्या आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून पक्षी चळवळीला हातभार लावत आहेत. खरंतर ही यादी न संपणारी आहे. थोडक्यात काय तर भारतात महिलांनी पक्षी निरीक्षणाचे क्षितिज विस्तारण्यात सशक्त भूमिका बजावली आहे आणि भविष्यातही त्यांचे योगदान सुरूच राहील यात शंका नाही. फक्त गरज आहे ती आपल्या समजुतींच्या कक्षा रुंदावून, डोळसपणे पक्षीमैत्रिणींच्या कार्याची दाखल घेण्याची.
(लेखाचे छायाचित्र – पूजा पवार)
COMMENTS