इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सलग सहाव्या दिवशी सुरू

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सलग सहाव्या दिवशी सुरू

नवी दिल्ली: इराणमध्ये डोके झाकण्याच्या बंधनाला विरोध करणाऱ्या स्त्रियांना 'मॉरल पोलिसांनी’ केलेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधातील निषेध सलग सहाव्या दिव

मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन
पूर्वग्रहांचा श्रीगणेशा
महासंकट आणि हॉलीवूड

नवी दिल्ली: इराणमध्ये डोके झाकण्याच्या बंधनाला विरोध करणाऱ्या स्त्रियांना ‘मॉरल पोलिसांनी’ केलेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधातील निषेध सलग सहाव्या दिवशी सुरू राहिला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमध्ये स्त्रियांसाठी घालून दिलेल्या पोशाखाच्या नियमांमध्ये डोके झाकणे अर्थात हिजाब घेणे सक्तीचे आहे. हे बंधन झुगारून देण्यासाठी स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत इराणमधील मानवी हक्क कार्यकर्ते स्त्रियांना पोशाखाच्या नियमांचा निषेध करण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी हिजाब काढून टाकण्यास स्त्रियांना सांगितले जात आहे. इराण इस्लामी राष्ट्र असून, तेथील कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घेणाऱ्या स्त्रियांना अटक होऊ शकते.

इराणमधील २२ वर्षीय तरुणी माहसा अमिनी हिला सार्वजनिक ठिकाणी हिजाब ‘व्यवस्थित’ न घेतल्याप्रकरणी  पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत कोसळल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूनंतर निषेधाचे लोण इराणभर पसरले आहेत आणि स्त्रिया रस्त्यांवर उतरून त्यांचे हिजाब जाळून टाकत आहेत.

अमिनीला अजिबात वाईट वागवण्यात आले नाही, ती हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावली, असा दावा पोलीस करत आहेत. मात्र, अमिनीला कोणताही आजार नव्हता आणि अटक झाली त्यावेळी ती निरोगी होती, असा दावा तिचे कुटुंबीय करत आहेत.

अमिनीचे रुग्णालयातील फोटो सर्वत्र पसरले आहेत आणि त्यात तिचा चेहरा सुजलेला, डोळे काळे झालेले दिसत आहेत, तिच्या कानातून रक्तस्राव होताना दिसत आहे. शिवाय, अमिनीला ज्या कासरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने, अमिनीला रुग्णालयात आणले तेव्हाच तिचा मेंदूमृत्यू झाला होता, असे इन्स्टाग्रामद्वारे सांगितले होते. नंतर मात्र ते विधान डीलिट करण्यात आले.

अमिनीच्या आईवडिलांशी फोनवर बोलून तिच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी करण्याचे वचन इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी दिले आहे. न्यायिक व संसदीय चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

अमिनीच्या अंत्ययात्रेदरम्यान निषेध उफाळून आला होता. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करून जमावाला पांगवावे लागले होते. त्यानंतर अनेकांना अटकही करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत कुर्दिस्तानमध्ये पाच निषेधकर्त्यांना ठार मारण्यात आले आहे.

अमिनीच्या मृत्यूनंतर #MahsaAmini हा हॅसटॅग सोशल मीडियावर ट्रेण्डिंग होता. अमिनीला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्सचा पूर आला होता. देशातील सत्ता ‘जेंडर अपार्थाइड’ आहे अशी टीका एका इराणी पत्रकाराने केली आहे. कुर्दिस्तानमध्ये अमिनीच्या घराच्या परिसरात तसेच राजधानी तेहरानसह अन्य काही भागांत स्त्रिया एकत्र येऊन निषेध करत आहेत अशी दृश्ये शेअर केली जात आहेत.

अन्य स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब न वापरण्याबद्दल जाब विचारला जात आहे, त्यांचा अपमान केला जात आहे, धमकावले जात आहे.

सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध आणण्याचेही प्रयत्न करण्यात आले. कुर्दिस्तानची राजधानी सानंदाज येथे इंटरनेट बंद ठेवण्यात आल्याचे लंडनस्थित मानवी हक्क संस्था नेट ब्लॉक्सने यावर प्रकाश टाकला आहे.

अमिनीच्या मृत्यूची नि:पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी इराण सरकारवर दबाव आणला जात आहे. परदेशी उच्चायुक्त, आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्य यांनी न्याय व जबाबदारीची मागणी लावून धरली आहे. २२ वर्षीय तरुणीचा छळ केल्याच्या इराणी यंत्रणेवरील आरोपांची, स्वायत्त अधिकाऱ्यांद्वारे, त्वरित, नि:पक्षपाती चौकशी करावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांचे हंगामी मानवी हक्क उच्चायुक्त नदा अल-नशीफ यांनी केली आहे.

सैल किंवा अयोग्य पद्धतीने हिजाब घेणाऱ्या स्त्रियांना मारहाणीचा सामना कसा करावा लागत आहे हे अलीकडील ‘पडताळणीकृत’ व्हिडिओंमधून दिसून आले आहे, असे नशीफ म्हणाले. अधिकाऱ्यांनी हिजाब न घालणाऱ्या स्त्रियांना अटक करण्याऐवजी हा नियमच बदलला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

इराणमधील यंत्रणेने स्त्रियांचे म्हणणे ऐकावे, त्या सर्वांना मिळाले पाहिजेत त्याच हक्कांची मागणी करत आहेत, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बाएरबॉक यांनी न्यूयॉर्कमध्ये चाललेल्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेनंतर नमूद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0